Gattu books and stories free download online pdf in Marathi

गट्टू

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून रामराव आणि माझी काही भेट झाली नव्हती. कालच एका मित्राकडून त्यांच्या आजारपणाबद्दल कळले. मनात विचार आला की जाऊन रामरावांना बघून यावे. तसं म्हंटल तर रामराव आणि माझी ओळख रेल्वे प्रवासात झालेली. पण आवडी-निवडी सारख्या असल्याने आम्ही थोड्याच दिवसात चांगले मित्र झालो. रामरावांना एकच मुलगा. एका जपानी कंपनीत कामाला लागला आणि काही दिवसातचं कंपनीतर्फे जपानला गेला. कंपनीने चांगलं पँकेज दिल्यामुळे साहजिक रामरावांच्या मुलाने, म्हणजे मनोहरने जपानलाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. रामरावांना निवृत्त व्हायला दोन वर्ष शिल्लक होती. जपानला मुलासोबत राहणे रामरावांना पटत नव्हते. त्यामुळे ते व त्यांची पत्नी ठाण्यात घोडबंदर रोड येथे रहात होते. लॉक डाऊनमुळे माझंही घरूनचं काम चाललं होतं. रामरावांच्या आजारपणाविषयी एका मित्राकडून समजले होते. फोनवर माझे बोलणेही झाले , पण त्यांच्या बोलण्यातून एक निराशेचा सूर जाणवत होता. उत्साहाने भरलेल्या रामरावांमध्ये झालेला हा बदल मला काळजीचा वाटला. मनात विचार आला की एकदा त्यांची भेट घ्यावी. त्यांना थोडा धीर द्यावा. हळूहळू अनलॉक सुरु झाल्यामुळे शनिवारी मी रामरावांना भेटायचे ठरवले.
दुपारची जेवणं झाल्यावर मी रामरावांच्या घरी बसने गेलो. दारावरची बेल दाबली. दरवाजा कोणी उघडला नाही. घड्याळात पाहिले. दुपारचे ३ वाजले होते. ‘ झोपले असतील कदाचित ‘ असे मला वाटले. पाच मिनिटांनी दरवाजा उघडला. एका यंत्र मानवाने फटीतून आपली मान बाहेर काढली व सांगितले, ” प्लिझ वेट अँट लिस्ट २० मिनिटीस. मिस्टर रामराव इझ स्लिपिंग .“ मी तोंड उघडेपर्यंत त्याने दरवाजा पटकन बंद केला. सरप्राइझ द्यायच्या नादात अगोदर कळवले नव्हते. इथे मलाचं सरप्राइझ मिळत होते. यंत्र मानवाला बघून ‘ आपण चुकीच्या पत्त्यावर तर आलो नाही ना ‘ अशी शंका मनात आली. दारावरची पाटी परत वाचली. ‘ श्री. रामराव जगन्नाथ जोशी. ‘ नाव बरोबर होते. आता २० मिनिटं मला थांबावे लागणार होते. आलिया भोगाशी.. असं मनाशी म्हणत मी तिथेच उभा राहिलो. रेल्वेत सि.एस.टी. ते डोंबिवली प्रवास उभ्याने करायची सवय होती म्हणा ! मोबाईल जोडीला होता. मोबाईलवर अमिताभचा सिलसिला चित्रपट सुरु केला आणि मग काय वेळ मस्त पुढे सरकायला लागला. उभ्या उभ्या चित्रपटाचा आनंद घ्यायला लागलो. जुन्या आठवणींना उजाळा देत चित्रपट पाहण्यात मी दंग होतो. २० मिनिटं झाल्यावर दरवाजा उघडल्याचा आवाज आला. परत तोच यंत्र मानव समोर आला व म्हणाला, “ सर, प्लिज कम.“ रंगलेला सिलसिला मनात नसताना थांबवला आणि मी त्या यंत्र मानवाच्या आदेशानुसार त्याच्या पाठीमागून चालत निघालो. त्याने मला आत आल्यावर बाथरूम दाखवले व म्हणाला, “ सर, प्लिझ गो अँन्ड फ्रेश फस्ट.” मी शहाण्या मुलाप्रमाणे त्याच्या आज्ञेचे पालन केले. फ्रेश झाल्यावर मी त्याच्याबरोबर रामरावांच्या बेडरूममध्ये गेलो. रामराव बेडवर बसले होते. मला बघून हसत म्हणाले , “ या या शिंदे साहेब.”
मीही हसत म्हणालो, “ काय म्हणतेय तब्येत ?”
एवढ्यात त्या यंत्र मानवाने रामरावांना मास्क घालायला दिला. रामराव हसत हसत म्हणाले, “ घालतो बाबा थांब जरा! बघितलं शिंदे , इतकी काळजी घेतो गट्टू की विचारू नका ! ”
मी नवलाने त्या यंत्र मानवाला म्हणजे गट्टूला बघत होतो. त्याला नीट पाहिलचं नव्हतं. तसं बघण्यासारखं विशेष काही नव्हतं. त्याचं संपूर्ण शरीर लोखंडाचं बनलं होतं. एका ठराविक कोनातून हलणारी मान, लयदार चाल, सफाईदार इंग्रजी बोलणं मला कौतुकचं वाटत होतं. तसे आता यंत्र मानव माणसांसारखे दिसणारेही असतात म्हणा ! पण हा बिचारा तसा साधाचं होता. माझ ते बघणं बघून रामराम म्हणाले, ” गट्टू माझ्या मुलाचे लहानपणीचे घरातले नाव. हा यंत्र मानव मला कुठल्याही बाबतीत मनोहरची उणीव भासू देत नाही. याला हाक काय मारायची? मग मीच त्याला गट्टू म्हणायला सुरूवात केली. त्यालाही हे नाव आवडले असेल कदाचित ? “
मी रामरावांना म्हणालो, “ चला कोणी तरी सेवा करायला, मदत करायला आहे ना, हे महत्त्वाचे ! “
“ शिंदे , काही वेळा माणसांकडे पर्याय नसतो. ‘आली या भोगाशी..’ म्हणत जगावे लागते. एकलुता एक मुलगा परदेशात. गेल्या महिन्यात मालती, माझी पत्नी बाथरुम मध्ये घसरुन पडली. अजून हॉस्पिटलमध्ये आहे.एकट्याने धावपळ करताना नाकेनऊ आले. शेजारीपाजारी कोरोनाच्या भितीने मदतीला येईनात. घरी कामाला बाई ठेवता येईना. सगळं मला बघावं लागत होतं. जीव अगदी मेटाकुटीला आला. मनोहर आमचं दु:ख जाणत होता, पण त्याला काही करता येत नव्हते. त्याच्या एका मित्राने त्याला यंत्र मानव पाठवण्याची कल्पना सूचवली आणि हा गट्टू आमच्याकडे आला.” हसून बोलताना रामरावांचे भिजलेले डोळे माझ्या नजरेतून सुटले नाहीत.
मीही थोडे हसलो व म्हणालो,” रामराव, दोन मुलगे तुमची काळजी घेता आहेत ! आणखी काय हवं ? खर सांगू का, आपल्या पिढीला म्हातारपणाचे टेन्शनचं आहे. हल्ली एकचं अपत्य मुलगा किंवा मुलगी असते. आपले अपत्य परदेशात असले काय किंवा भारतात असले काय ? किती मुलं आपल्या पालकांसोबत राहतात ? प्रश्नचं आहे. त्यामुळे गरजेच्यावेळी कोण जवळ असेल माहित नाही. परदेशात म्हणे लोक वेळ असेल तेव्हा आजारी माणसांची, गरजवंतांची सेवा करताता, मदत करतात व आपले सेवा खाते भरुन ठेवतात. मग म्हातारपणी गरज लागली की त्यांना घरबसल्या पैसा खर्च न करता मदत मिळते. इकडे आपण बँकेत पैसे जमा करतो, तिकडे ते लोक सेवा जमा करतात. वेळ आली की पैसा माणसाची जागा भरू शकत नाही.”
“ हे मात्र अगदी खरे आहे. मी घेतो आहे ना अनुभव! “
मी सुस्कारा टाकून म्हंटले “ कदाचित भविष्यात प्रत्येकाला तुमच्या गट्टूसारखे मदतनीस बोलवावे लागतील मदतीला.”
आमचं बोलणं चालू असतानाच गट्टू सरबत घेऊन आला. त्याच्या लोखंडी हातातला तो ग्लास घेताना मला त्याचा थंडगार स्पर्श जाणवला. मला कसे तरी झाले. सरबत देऊन झाला तरी गट्टू तिथेच उभा होता. कदाचित भेटण्याची वेळ संपली, असे सूचवायचे असेल .मी सरबत पिऊन रिकामा ग्लास त्याच्याकडे परत दिला. घड्याळात पाहिल्यासारखे केले व रामरावांना म्हंटले, “ चला निघायला हवं. तुम्ही ही आराम करा. “
रामराव मला बसण्याचा आग्रह करीत होते, पण गट्टू डोक्यावर उभा होता. शेवटी मी रामरावांना गमतीने म्हणालो, “ पुन्हा येईन तेव्हा गट्टूच्या हातचं जेवण जेवून जाईन. “ रामरावांनी डोक्यावर हात मारला व म्हणाले, “त्यापेक्षा मीच तुम्हांला मॅगी करून देईन.“ रामरावांच्या बोलण्यावरून जेवणाचीही होणारी आबाळ लक्षात आली. मालतीबाई लवकर ब-या होवो व घरी येवो अशी मनातल्या मनात प्रार्थना करून मी निघालो. घरी जाताना माझ्या मनात एकचं प्रश्न वारंवार घोळत होता. माणसाच्या प्रेमाची, मायेची जागा यंत्र मानव घेऊ शकत नाही. पण जिथे खरा माणूस मदतीसाठी उपलब्ध नाही तिथे हा यंत्र मानव पर्याय ठरू शकतो ना ? “

- मंगल कातकर