Gotya - 6 books and stories free download online pdf in Marathi

गोट्या - भाग 6

डी. एड. ला नंबर लागल्यामुळे घरातील सर्वजण खूप आनंदी होते. गोट्या देखील मनोमन खुश झाला होता. पण त्याचा नंबर आदिवासी भागातील कॉलेजमध्ये लागल्याने त्याची आई जरा चिंताग्रस्त झाली होती. आदिवासी भाग म्हणजे सर्व जंगली जनावरांचा भाग. माणसं देखील तशीच जनावरांसारखे जंगलात राहतात असे तिला वाटायचे. गोट्याला घराबाहेर राहण्याचा तेवढा अनुभव नाही. ती तिथे कसा राहील ? काय करून खाईल ? या विचाराने ती जरा काळजी करत होती. गोट्या मात्र आता आपण लवकरच गुरुजी होणार याचे स्वप्न पाहू लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आदिवासी भागातील कॉलेजला जाण्यासाठी कागदपत्रे आणि सोबत जेवण्याचा डबा घेऊन तो आपल्या वडिलांसोबत घराबाहेर पडला. त्याच्या घरापासून ते कॉलेज 200 किमी दूर होते. जवळपास पाच-सहा तासांचा बसचा प्रवास करून दुपारच्या वेळी तो त्या गावी पोहोचला. घनदाट जंगल, जिकडे पाहावे तिकडे झाडेच झाडे दिसत होती. थोड्या थोड्या अंतरावर झोपड्याची घरे आणि उघडी नागडी माणसं त्याच्या दृष्टीस पडू लागली. आजपर्यंत त्याने कधी हा जंगली भाग पाहिला नव्हता त्यामुळे त्याला ते सर्व पाहून कसे तरी वाटत होते. मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली. अश्या भागात दोन वर्षे काढणे त्याला खूपच कठीण जाणार असे वाटत होते. जंगल संपलं आणि शहराचा भाग सुरू झाला. त्याला या अगोदर दिसलेलं चित्र इथं कुठेही दिसत नव्हतं. घरं चांगली दिसत होती आणि माणसं देखील चांगली दिसत होती. ते पाहून त्याला जरा हायसे वाटले. दुपार टळून गेली होती. आपल्या वडिलांसोबत तो कॉलेजमध्ये गेला. ज्याठिकाणी त्याला दोन वर्षे शिकायचे होते त्या अध्यापक विद्यालयात त्याने इकडे तिकडे पाहत जात होता. खूप सुंदर कॉलेज होते. सर्वत्र झाडे लावण्यात आली होती. फुलांचे झाड त्याला आकर्षित करत होती. सर वर्गात शिकवत होते, त्यांचाच फक्त तेवढा आवाज येत होता. बाकी सर्व अगदी शांत होतं. त्यांनी सरळ ऑफिस गाठले. तेथे प्राचार्य आणि एक कारकून आपले काम करत बसले होते. गोट्याने आपले नाव आणि गाव सांगितले. सोबत निवडपत्र ही दाखविले. कारकूनने ते सर्व पत्र वाचून पाहिलं आणि त्यांच्या यादीत नाव शोधू लागला. पण त्याच्या यादीत ते नाव कुठं ही दिसत नव्हतं. तुमचे नाव आमच्या शाळेच्या यादीमध्ये नाही असे कारकून म्हटल्याबरोबर गोट्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली. प्राचार्याने हस्तक्षेप करीत वडिलांना बोलू लागले. तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलाय ना ! प्रवेशाची फी माझ्याकडेच दिली होती का ? गोत्याकडे पाहत प्राचार्यानी विचारले. त्यावेळी गोट्या चेहरा आठवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याला नीट आठवत नव्हते. तेव्हा प्राचार्यानी त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या कॉलेजच्या प्राचार्याची माहिती दिली. तेंव्हा गोट्याला तो चेहरा आठवला आणि लगेच त्याने होकार दिला. तेंव्हा प्राचार्य म्हणाले की, आपला प्रवेश आमच्या कॉलेजमध्ये होण्याऐवजी त्या दुसऱ्या कॉलेजमध्ये झाला असेल कदाचित. त्या कॉलेजमध्ये चौकशी करावं लागेल. ते कॉलेज अजून 200-250 किमी दूर होते अजून पाच ते सहा तास बसचा प्रवास करायचे होते. थकवा आल्यामुळे लगेच प्रवास करणे अशक्य होते म्हणून त्यांनी तो दिवस तिथेच आराम करण्याचे ठरविले. कॉलेजमधून बाहेर पडले. भूक ही जोराची लागली होती. म्हणून त्यांनी सोबत आणलेला जेवणाचा डबा कॉलेजच्या बाहेरील एका मोठ्या झाडाखाली बसून उघडला. सोबत पाण्याची बाटली देखील होती. दोघांनी पोटभरून जेवण केलं, डब्यातील सर्व जेवण संपविले आणि तेथून शहरात आले. लॉजच्या शोधात इकडे तिकडे फिरल्यावर त्यांना प्रगती नावाची लॉज पसंत पडली ज्याचे की दर कमी होते इतर लॉजच्या तुलनेत. तेथे त्यांनी हातपाय धुतले आणि जरा विश्रांती घेण्यासाठी पलंगावर आडवे झाले. हा गोंधळ कसा झाला असेल ? माझं काही चुकलं का ? दुसऱ्या कॉलेजमध्ये तरी आपले नाव आहे की नाही ? याच विचारांच्या तंद्रीत गोट्या व त्याच्या वडिलांनी तेथील लॉजमध्ये ती रात्र काढली.