Gotya - 7 books and stories free download online pdf in Marathi

गोट्या - भाग 7

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गोट्या आणि वडिलांनी थेट बस स्थानक गाठले आणि दुसऱ्या शहराला जाण्यास निघाले. गाडी वेगात धावत होती, त्याच वेगात गोट्याचे मन देखील धावू लागले. अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते. काय होईल आणि कसं होईल ? या विचारांच्या तंद्रीत एकदाचे चार पाच तासाच्या प्रवासानंतर त्या शहरात बस पोहोचली. दोघा-तिघांना विचारत विचारत ते कॉलेजकडे जाणाऱ्या बसजवळ जाऊन पोहोचले. शहरापासून दहा किमी दूर अंतरावर उंच डोंगरावर वसलेले एक छोटेसे गाव आणि त्या गावात ते कॉलेज होते. मुख्य रस्त्यापासून अर्धा किमी दूर कॉलेज होते. बसमधून उतरून ते पायी कॉलेजकडे निघाले. सर्वत्र नीरव शांतता होती. पक्ष्याचा तेवढा किलबिल आवाज ऐकू येत होता. जसे जसे कॉलेजच्या जवळ जाऊ लागले तसे तसे गोत्याच्या मनात धडकी भरू लागली. तीन चार खोल्याचे कॉलेज होते आणि त्याला लागूनच सिनियर कॉलेज देखील होते. कॉलेजचे प्राचार्य खुर्चीवर विराजमान होते, त्यांना पाहताच गोट्याचे कळी खुलली. कारण जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेताना त्याने याच व्यक्तीला कागदपत्रे आणि चेक दिला होता. गोट्याने हळूच बाबाला ही गोष्ट कानावर टाकली. कार्यालयात गेल्यावर नाव व गाव सांगितले. कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले तुम्ही आता येताय ? असे त्या प्राचार्यांनी दोघांनाही झापले. जा रे वर्गात जाऊन बस असे म्हणतात गोट्या वर्गात जाऊन शेवटच्या बाकावर बसला. एकदा जाऊन ज्या बाकावर बसला शेवटपर्यंत त्याच बाकावर तो बसून राहिला. कधी पुढी जाण्याची त्याने हिंमत केली नाही. बाकावर बाजूला बसलेल्या चंद्रकांतसोबत मैत्री करून घेतली. दुपारच्या सुट्टीत चंद्रकांत आणि वडिलांची भेट झाली. गोट्या आज माझ्यासोबत राहील काही काळजी करू नका असे वचन त्याने वडिलांना दिला. वडिलांनी देखील सुटकेचा निःश्वास टाकून मोकळे झाले. सायंकाळी वडील एकटे आपल्या गावी निघून गेले तर गोट्या चार - आठ दिवसांसाठी मित्राच्या खोलीवर राहू लागला. याच ठिकाणी त्याला शिवाजी, सुधाकर, बालाजी, संतोष, विनायक, विजय, अविनाश, हेमंत, आनंद, विनोद, तानाजी, माणिक असे जिवाभावाचे मित्र मिळाले. गोट्याला स्वयंपाक करता येत नव्हते, कधी तशी त्याच्यावर वेळ आली नव्हती. पण आता स्वयंपाक शिकणे आवश्यक आहे. असा विचार करून त्याने चंद्रकांत आणि शिवाजीला स्वयंपाक करायला शिकविण्याची विनंती केली. तशी दोघांनी मिळून गोट्याला स्वयंपाक करण्याचे शिकविले. हीच शिकवण भविष्यात त्याला उपयोगी पडली. सकाळी दहा ते चार या वेळात कॉलेज आणि उर्वरित वेळेत सायंकाळी मैदानावर क्रिकेट खेळविण्यात घालवत असत. महिन्यातून एखादा सिनेमा देखील बघायला जात. त्यांच्या शहरात सोमवारी आठवडी बाजार भरत असे, त्या बाजारात जाऊन सामान कमी खरेदी करायचे पण खेड्यापाड्यातील लोकांना तो जवळून अनुभव घ्यायचा. त्याच्या बोलण्यावर लक्ष द्यायचा. कारण त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी होती. रविवारचा दिवस खूप मजेशीर असायचा. सर्व मित्र एका मित्राच्या खोलीवर एकत्र यायचे आणि मस्तपैकी जेवण्याची पार्टी करून आपापल्या खोलीवर जायचे. त्यापैकी कोणत्याच मित्राला दारूचा गंध देखील माहीत नव्हता, हे विशेष. असेच हसत खेळत अगदी मजेमध्ये गोट्याचे दोन वर्षे संपले. या दोन वर्षात घराबाहेर राहून त्याला खूप काही शिकायला मिळाले. नवीन मित्र मिळाले, कडू-गोड अनुभव मिळाले, जीवन जगण्याची एक दिशा मिळाली, लेखन आणि वाचन करण्याची सवय येथेच जडली. दैनिकात छोटे छोटे लेख आणि कविता लिहिण्याचा छंद वाढू लागला. वृत्तपत्रात साहित्य प्रकाशित झाले की त्याला मनोमन खूप आनंद वाटत होता. पवार नावाचे एक शिक्षक त्याला लाभले, ज्यांनी त्यांच्यात वाचनाची व लेखनासाठी खूप मदत केली, मार्गदर्शन देखील केलं. त्यामुळे त्याचे जीवन हळूहळू बदलू लागले. गोट्या मिळेल तो वेळ वाचन करणे आणि काहीतरी लिहित राहणे यात घालवू लागला. भविष्यात आपण देखील एक लेखक, कवी, कथाकार साहित्यिक व्हावे हे त्याचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो लेखणीचा आधार घेत होता.