Bhagy Dile tu Mala - 16 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग १६

माझी चूक काय ?????????

तिने विचारलेला प्रश्न सर्वाना विचारात पाडणारा होता आणि कुणाकडेच त्याच उत्तर नव्हतं. हा तिचा एकटीचा प्रश्न नव्हताच तर अशा हजार स्त्रिया असतील ज्यांना विनाकारण शिक्षा मिळते मग तो रेप असो की ऍसिड अटॅक? साध्य काय होत ह्याने, मर्दांनगी? पण खरी मर्दांनगी तर स्त्रीचा आदर करण्यात, तिचे रक्षण करण्यात आहे मग मुलींचे चेहरे बिघडवून त्यांच्यावर रेप करून नक्की काय मिळत? समाधान आणि कशाचं? उत्तर त्यालाही माहीत नसेल जो हे सर्व करतो. दिवस बदलत गेले आणि पण स्त्रियाबाबतीत हा प्रश्न अजूनही तिथेच आहे. माझी काय चूक? ना त्यांना ह्याच उत्तर कधी मिळाल ना स्वराला कधी मिळणार उलट ती चुकीची नसताना शिक्षा मात्र कायम तिला भोगतच राहावी लागणार. अशी शिक्षा त्याने तिला केवळ एकदा दिली तर समाज???

स्वराच्या तोंडून तो प्रश्न निघाला आणि वातावरण पूर्ण शांत झाल. स्वरा त्यानंतर एक शब्द बोलली नाही. पूजा, कियारा तिची चौकशी करत होत्या पण तिच्या तोंडून एक शब्द निघाला नव्हता. एवढंच काय ती अजूनबरडली सुद्धा नव्हती. तिला माहीत होतं की आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडलं आहे तरीही ती एवढी शांत कशी हा विचार करूनच इतरांची बोबडी वळाली होती. ती विचार तर करत होती पण कशाचा ते कुणालाच माहिती नव्हत.

सायंकाळची वेळ होती. स्वरा एकटीच बेडवर बसुन होती . धावत धावतच तिचे बाबा आले. त्यांना वाटलं होतं की छोटासा अपघात झाला आहे पण इथे आल्यावर त्यांना काहीतरी वेगळंच माहिती झालं. त्यांनी ते सर्व ऐकलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच नाहीशी झाली. ज्या मुलीच्या सुंदरतेचे गुणगान गायला जायचे आज तिची ती सुंदरता कुणीतरी हिरावून घेतली हे ऐकून त्यांना धक्काच लागला आणि ते आतमध्ये जायचं सोडून बाहेरच बेंचवर बसले. त्यांच्या डोक्यात हजार प्रश्नांनी थैमान घातले होत. आजूबाजूचे लोक बोलत राहिले पण तिचे बाबा कसल्या तरी विचारात हरवत गेले. स्वराचा सुंदर चेहरा पाहून त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची पण आज तोच चेहरा शाप बनला आहे हा विचारच त्यांना नकोसा झाला होता. त्यांचं एक मन काळजी करत होत तर दुसर आतून फारच घाबरल होत. ते स्वराशी नजरानजर सुद्धा करू शकत नव्हते. तिच्या बाबांना तिला भेटायची भीती वाटत होती ह्यासाठी नाही की तिचा चेहरा पाहून ते घाबरणार होते तर यासाठी की ते तिला त्रासात बघू शकणार नव्हते.

जिच्यासाठी जिवाच रान केलं होतं तिचं आता त्रासामध्ये आहे आणि आपण काहीच करू शकत नाही हा विचार करूनच ते धास्तावले होते. स्वराच्या बाबांनी बाहेरच थांबायचा निर्णय घेतला होता तर आई आतमध्ये जाऊ लागली. कियाराही त्यांच्यासोबत आतमध्ये गेली होती. आई जाऊन स्वराजवळ बसली आणि पहिल्यांदा तिचे अश्रू बाहेर आले. ती आईच्या कुशीत झोपत म्हणाली," आई तुमचे सर्व स्वप्न माझ्यामुळे खराब झाले. मी खूप वाईट मुलगी आहे ग!! बघ ना काय झालं हे!! तू मला कशासाठी इथे पाठवल आणि बघ मी काय करून बसले!! तुझा अभिमानच हरवून बसले ग. मी जगातली सर्वात वाईट मुलगी आहे ..!! "

ती रडत होती आणि तिच्या आईलाही राहवलं नाही . त्याही तिच्यासोबत रडू लागल्या. स्वरा पुन्हा रडतच म्हणाली," आई काय चूक होती ग माझी? फक्त त्याने वाईट केलं म्हणून त्याच्यावर हात उचलला तर एवढी मोठी शिक्षा दिली त्याने मला? मला प्रेम करायचा, मुलगा निवडायचा अधिकार नाहीये का आई की हे मुलंच आमचं आयुष्य कस असावं ते ठरवणार आहेत?? मीच चुकले बहुतेक. सर्व मला म्हणत होते की सॉरी म्हण त्याला पण मीच ऐकलं नाही. काय झालं असत नाईलाजाने त्याची संपत्ती बनले असते? त्याच्या इशाऱ्यावर जगले असते? कदाचित त्याच्यावर प्रेम झालं नसत, त्याची बायको म्हणून खोट खोट मिरवत असते पण अस तर झालं नसत ना ??

आई खूप भीती वाटतेय ग! माहिती नाही कशाची पण खूपच जास्त भीती वाटते. तो क्षण डोळ्यासमोरून जात नाहीये. खर सांगू तर असा चेहरा घेऊन मला जगायच नाहीये. तुमच्यावर ओझं बनून रहायच नाहीये मला. आई एक काम कर ना तूच मला मारून टाक ना. असा चेहरा घेऊन जगण्यापेक्षा त्या अग्निमध्ये स्वाहा झालेलं आवडेल मला. तस पण आधीच आगीच्या लाटेत होरपळले आहे अस जानवत आहे तेव्हा त्रास पण होणार नाही. प्लिज आई कर ना हे काम!! "

स्वरा रडत होती आणि तिची आई शांत होती. तिचे बाबा दारावर केव्हा आले त्यांनाही कळलं नाही. तिच्या वडिलांनी बाहेर दारावरूनच सर्व ऐकलं होतं आणि स्वराची स्थिती बघून त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले होते. त्यांना आता दारावरच उभं राहणं कठीण जाऊ लागलं आणि दार उघडतच ते आतमध्ये आले आणि बोलून लागले," स्वरा वेड लागलंय का तुला!! तू ओझं असणार आहेस का आम्हाला? तू आमची शान होतीस आणि राहशील कायम!! आणि तू काहीच चुकीच केलं नाहीस. चूक तर त्याची आहे जो तुला संपत्ती समजतो. मला वाईट वाटत की तू एकच दिली होतीस त्याला आणखी द्यायच्या होत्यास. त्याला अक्कल घडवायची होतीस. तू जे केलंस ते योग्यच आहे. मी तुझ्या कायम पाठीशी आहे. त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आपण मिळवून देऊ त्याला शिक्षा. आणि स्वरा पुन्हा मरायच्या
गोष्टी केल्यास ना तर मीच जीव देईन. चालणार आहे का तुला? तू माझा अभिमान आहेस आणि कायम राहशील सो अस बोलून आम्हाला कमजोर नको करुस.!! "

बाबांना रडताना बघुन तिने हळूच त्यांना मिठी मारली आणि आता तिघेही रडू लागले होते. कियाराला क्षणभर त्या तिघांचाही आदर वाटला होता. आई वडील अशाही स्थितीत फक्त मुलींनाच बोलतात पण स्वराच्या आईबाबांनी तिला हिम्मत देऊन तिला जगायला एक आधार दिला होता. अशा क्षणी जर आईवडिलांनी साथ सोडली तर मुलगी लढायच्या आधीच क्षण क्षण मरत असते पण समोरील सर्व दृश्य बघून स्वराला तिघांचाही फार अभिमान वाटला होता. ती डोळे भरून तिघांना बघत राहिली. तिला कळून चुकलं होत की प्रॉब्लेम खूप छोटे वाटतात जेव्हा आपले लोक सोबत असतात.

स्वराने आज आई-बाबांसमोर हवं तेवढं रडून घेतलं होतं कारण तिला जी लढाई लढायची होती त्यात तिला कमजोर पडता येणार नव्हतं. सर्वांनी तिला धीर दिला होता आणि साथही त्यामुळे आज स्वरा पुन्हा एकदा नव्याने सर्वांशी लढायला तयार झाली होती. दुसर्या दिवशी पोलीस आले आणि स्वराच स्टेटमेंट घेऊन गेले होते पण राज सलूजाच नाव ऐकताच जणू पोलिसांनी सुद्धा चौकशी बंद केली. त्यांनी तक्रार तर घेतली होती पण त्याला अटक होणार नव्हती हे पक्क. त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला वाचवायची पूर्ण प्लॅनिंग केली होती. स्वरावर ज्यादिवशी ऍसिड अटॅक झाला होता तेव्हा राज दिल्ली मध्ये नव्हताच त्यामुळे हेच कारण पुरेस होत त्याला अरेस्ट न करण्यासाठी. राजने खूप बारीक खेळी खेळली होती . तो स्वता बाहेर गेला आणि त्यानंतर सुरजकडून त्याने हे काम करवून घेतल होत म्हणून अजूनही तो जेरबंद झाला नव्हता. स्वराच्या बाबांनी स्वराला तर समजवल होत पण नंतर ते डॉक्टरला भेटायला गेले. डॉक्टरने सांगितलं की ती आता कधीच सुधारणार नाही आणि सुधारली तरीही करोडो रुपये खर्च करावे लागतील. ३-४ सर्जरी कराव्या लागतील तेव्हा काहीतरी फरक पडेल. हे सर्व ऐकल्यावर त्यांच्या छातीत धडकी भरली होती कारण त्यांना आता आयुष्यभर तिला तसच बघावं लागणार होतं. एका वडीलाला आपल्या मुलीला अस आयुष्यभर बघण किती त्रासदायक असू शकत हे फक्त त्याच आई-वडिलांना कळत ज्यांच्या मुलीसोबत हे घडलेल आहे. ते निशब्द झाले होते. त्यांच्या अंग थंड पडू लागल होत पण त्यांना माहिती होत की आता मुलीचा आधार आपणच आहोत म्हणून सर्व दुःख क्षणात पचवून त्यांनी तिच्यासाठी झुंज द्यायची ठरवली. आता तेच होते जे तिला सावरू शकत होते.

स्वरा आज शांती होती. तिला न्याय हवा होता पण नेमका न्याय कोणता हेच तिला कळत नव्हत!! त्याला फाशीही झाली असती तरीही ती जे सहन करत होती त्यातून तिला सुटका नव्हती. तिला आता असच जीवन जगाव लागणार होतं. तर दुसरीकडे राज आपल्या खोलीमध्ये बसून एकटाच हसत होता. त्याला कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नव्हता. उलट आपण बदला घेतला म्हणून तो खूप खुश होता. टीव्हीवर तिची स्थिती दाखवताना त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता आणि फक्त तोच हसत नव्हता तर त्याच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती तिला तस बघून हसत होता. प्रेम अस पण असत का? समोरच्याला त्रास देणं ह्यात कुठलं प्रेम आलं?

क्रमशा....