Bhagy Dile tu Mala - 17 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग १७

आयुष्यात सर्वात अवघड आणि सर्वात सोप काय असत माहिती आहे?

सर्वात अवघड असत ते आपली चूक नसतानाही लोकांची शांतपणे बोलणी ऐकणे आणि सर्वात सोप असत आपली चूक आहे हे माहिती असतानाही लोकांना ओरडून ओरडून सांगणं की मी कसा योग्य आहे.

हे सांगण्याच कारण अस की स्वराची चूक नसतानाही स्वरा येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांच, प्रसारमाध्यमांच गपगुमाने ऐकत होती तर राजच नाव सर्वांसमोर आल्यापासून राज आपण कसे निर्दोष आहोत आणि स्वरा कशी चुकीची आहे ह्याबद्दल वाच्यता करत होता. स्वराला जेव्हा हे सर्व कळालं तेव्हा ती एकटीच वेड्यासारखी हसत होती. तिला काय योग्य, काय अयोग्य ह्यातला फरक सुद्धा आता समजेना आणि तिला काहीच दिवसात जाणीव झाली की आपला पुढचा प्रवास वाटतोय तितका सोपा जाणार नाहीये. ती त्याच विचारात हरवली असायची. तिच्यासमोर सध्या हजारो प्रश्न येऊन उभे राहिले होते आणि एकाही प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. कधीतरी अल्लड हसणारी, उड्या मारणाऱ्या स्वराला नियतीने असा धक्का दिला की ती स्वतालाच हरवून बसली.

आज ती घटना घडून५ दिवस झाले होते . तिच्या आयुष्यात ह्या ५ दिवसात सर्वच काही बदलल होत. सतत अभ्यास, करिअर बद्दल बोलणारी मुलगी आज कुठेतरी स्वतःच्याच विचारात हरवली होती. तिला अभ्यास, करिअर ह्याबद्दल कुठेही विचार येत नव्हता उलट आई - वडिलांचे उदास चेहरे पाहून ती हळूहळू स्वतःच खचू लागली होती. तिच्या आई-वडिलांनी तिला हिम्मत तर दिली होती पण तिलाही माहिती होत की ते आतून खूप तुटले आहेत. त्यांना हजारो प्रश्नांनी हैराण करून सोडलं आहे त्यामुळे स्वराची इच्छा असूनही ती सकारात्मक विचार करू शकत नव्हती. ती सध्या भावना असलेला एक पुतळा बनली होती. जी श्वास तर घेत होती पण त्या श्वासांची किंमत तिलाच माहिती नव्हती. तिला कदाचित हे जीवनच नको होतं.

बितते गये लमहें
मैना कुछ भूल सकी
दर्द छिपा है दिलं मे कुछ ऐसें
जैसे यादे पेहली प्यार की
बताये किसे दिलं की बात
बातभी दिलं को चुभने लगी
मौत से बत्तर है जिंदगी
सजा है ये किसिके ना होणे की !

आज फायनली स्वराचा चेहरा सर्वाना दिसणार होता. कियारा, पुजाने तिचा चेहरा आधीच पाहिला होता त्यापेक्षा काहीतरी वेगळा चेहरा दिसेल का म्हणून त्या बघायला उत्सुक होत्या तर आईवडील तिचा चेहरा पहिल्यांदा बघण्यास उत्सुक होते. स्वराचा चेहरा जसा दिसणार हे माहिती होताच सर्व मित्र हॉस्पिटलमध्ये गर्दी करून होते. त्यात सर्व लोक होते ज्यांना तिची काळजी होती. जेव्हापासून ही बातमी माहिती झाली तेव्हपासून स्वराचे आईबाबा रूममध्ये ठाण मांडून बसले होते. एकीकडे त्यांना तिचा चेहरा पाहण्याची उत्सुकता होती तर आपल्याच मुलीला अस बघावं लागेल म्हणून ते घाबरले होते. तरीही स्वतःच्या भावनांना आवरत ते मध्ये बसले होते. डॉक्टर आले आणि सर्वांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. कदाचित सर्जरी नंतर तिचा चेहरा बरा झाला असावा अशी सर्वांची अपेक्षा होती म्हणून सर्वच आतुरतेने वाट बघत होते. डॉक्टर आले आणि हळूहळू ती पट्टी काढू लागले. कियारा, पूजा, शोभना सर्व बाहेरूनच काचेतून बघत होत्या. हळूहळू काहीच क्षणात तिची पट्टी काढण्यात आली आणि डॉक्टर बाहेर गेले. स्वराने हळूच डोळे उघडले आणि आई-बाबांकडे लक्ष दिले. पट्टी निघाली आणि तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू तोंडावर हात आला. आईच्या डोळ्यात तिला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. आईने तोंडावर हात धरताच स्वराला आपण कसे दिसत आहोत ह्याची कल्पना आली. स्वराला त्या सर्वांच खूप वाईट वाटलं होतं. तिला स्वतःचे अश्रू आवरत नव्हते तरीही तिने ते दाबून धरले आणि हळूच आपल्या चेहऱ्यावर खोट हसू आणलं. स्वरा म्हणजे बाबांचा जीव की प्राण!!ती न बोलताही त्यांना तिच्या मनातलं कळायचं. त्यांना जाणवलं की स्वराला भरून आलंय म्हणून ते हसतच म्हणाले," स्वरा बाळ किती सुंदर दिसत आहेस ना तू!! अगदी जन्माला आली ना तेव्हा पण अशीच सुंदर दिसायचीस. किती लोक तुला पाहायला आले होते माहिती आहे. बाबा गर्दी झाली होती तुला बघायला. बघ ना आज पण तुला बघायला किती गर्दी केलीय लोकांनी. माझं लाडक बाळ!!! तुला बघायच आहे किती तू किती सुंदर दिसते आहेस ते? "

बाबांच्या शब्दांनी तिचा उर भरून आलं होता आणि ती बाबांना मिठी मारण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. तिने मिठी मारली आणि बाबांचे अश्रू तिच्या हातावर येऊन टपकले. तिला खर तर खूप रडायचं होत पण बाबांची अशी स्थिती तिला बघवन शक्य नव्हते. तिचे बाबा आजपर्यंत कितीही खराब परिस्थिती आली तरीही रडले नव्हते पण आज तिच्यासाठी ते रडत होते. हे जाणवताच तिने आपले अश्रू पुसून घेतले आणि हळूच हसत म्हणाली, " बाबा तुम्ही म्हणत आहात न मग मी नक्कीच सुंदर दिसत असणार मग स्वतःला कशाला आरशात बघायच बर. मला विश्वास आहे तुमच्यावर. "

स्वराच उत्तर ऐकून सर्वांना तिचा अभिमान वाटत होता. ही इथली परिस्थिती होती तर बाहेर पूजा, कियारा ह्या स्वराला बघून शॉक झाल्या होत्या. तिचा चेहरा खरच पाहण्यासारखा नव्हता. तिला बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते त्याचवेळी स्वराने त्यांच्याकडे पाहिले आणि सर्व आपले अश्रू पुसतच आतमध्ये आल्या. स्वराच्या चेहऱ्याकडे बघून त्या सहज म्हणाल्या," खरच काका म्हणत आहेत तशी तू खूप सुंदर दिसत आहेस. आधीपेक्षा पण सुंदर दिसत आहेस . नजर ना लगे यार तुझे!! "

स्वराला माहीत होतं की त्या खोट बोलत आहेत तरीही तिने हसून त्यांच्या शब्दांचा मान ठेवला होता. आज बऱ्याच वेळ त्यांच्या गप्पा सुरु राहिल्या. स्वराला कुणालाही एकट सोडायच नव्हतं. स्वरालाही त्यांच्या सोबतीत कसलीच कमी जाणवत नव्हती.

आता खूप वेळ गप्पा मारून झाल्या होत्या त्यामुळे स्वराला आराम करू द्यावा म्हणून सर्व बाहेर जाऊ लागले तेवढ्यात स्वराने पूजाचा हात पकडत तिला थांबवून घेतले. काहीच क्षणात सर्व बाहेर गेलें आणि स्वरा हळूच म्हणाली," खरच सुंदर दिसत आहे मी?"

पूजाच्या चेहऱ्यावर अचानक हसू आलं आणि ती तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत म्हणाली," हो ग वेडाबाई माझी!!! खोट वाटत असेल तर बघ आरशात!! तू खूप सुंदर दिसत आहेस. तुझ्यापेक्षा सुंदर इथे कुणीच नाही. "

स्वरा पुन्हा हसत म्हणाली," सर्व खोट बोलत आहेत समजू शकते पण तू का बोलत आहेस? मला त्रास होत होता ह्याचा अर्थ असा नाही की मला काहीच आठवत नाही. माझा चेहरा बघून तू बेशुद्ध पडली होतीस हे मला माहित आहे मग तो कुरूप चेहरा बघून नक्की काय करू तूच सांग, आताही म्हणशील मी सर्वात सुंदर दिसते आहे? "

पूजाला आता काय बोलू तेच कळत नव्हतं तर स्वराचे अश्रू गालावर ओघळू लागले होते. पूजा क्षणभर शांत राहिली. तिने स्वतःच्या मनाला उत्तर द्यायला तयार केलं आणि स्वराचा हात पकडत तिने तिला बेडवर बसविले. हळूच पुन्हा एकदा गालावर हसू आणत म्हटले," स्वरा मला माहिती आहे की तुला सर्व माहिती आहे. हा क्षण कुणीच विसरू शकणार नाही हेही माहिती आहे पण मी खोट बोलत नाहीये. तू खरच खूप सुंदर दिसत आहेस. रंग, कुरुपता हे तू कशी आहेस हे सांगू शकत नाही. तुझा चेहरा बदलला असेल मन नाही. मनाने माझी स्वरा आजही इथल्या सर्व लोकांपेक्षा सुंदर आहे. खर सांगू तर मला आताही तीच स्वरा समोर दिसते. स्वभावाने आणि चेहऱ्याने म्हणून म्हणाले तू खूप सुंदर दिसत आहेस. मी बेहोश पडले हे खरं पण तुझा चेहरा खराब झालाय म्हणून नाही तर तुझी अवस्था बघवत नव्हती म्हणून. तुझ ओरडण मला सहन झालं नाही म्हणून. नीट ऐक, आता ह्यापुढे तू सुंदर नाहीस अस कधी म्हणायचं नाही. तू आधी होतीस तशीच आहेस आणि कायम राहशील
माझ्यासाठी तू कधीच बदलणार नाही आणि ह्यापुढेही मी प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायला तयार आहे पण अस काही बोललीस पुन्हा तर मार खाशील, कळलं?? "

पूजाच बोलणं ऐकून स्वराने तिला घट्ट मिठी मारली. पूजाच्या स्वरूपात तिला एक आधार मिळाला होता. पूजाने तिला शांत केलं आणि तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. काही वेळ ती तिच्याशी भरपूर बोलत होती. आता स्वरा शांत वाटत होती म्हणून पूजा स्वतःचे अश्रू स्वतःसोबत घेऊन बाहेर पडली तर स्वरा डोळे मिटून पुन्हा एकदा नकोशा विचारात हरवली.

सर्व बाहेर गेले आणि स्वरा एकटीच अंधारात बसली होती. तिने आपल्या रूममध्ये एक पण आरसा ठेवला नव्हता कारण तिने स्वतःला बघितलं असत तर कदाचित तिची उरली सुरली हिम्मतही गेली असती. स्वराचा आधार बनून कियारा, पूजा सोबत होत्या. मागील काही दिवसात तिची नजर शोधत होती ती स्वयमला पण त्याचा काहीच पत्ता नव्हती. त्याला शोधून शोधून तिची नजर थकली पण तो काही आला नाही आणि स्वराची उरली सुरली हिम्मतही नाहीशी होऊ लागली. नाईलाजाने स्वराने पूजाकडे त्याची चौकशी केली होती पण तो तिला बघायला एकदाही आला नाही अस सर्वांकडून समजलं आणि स्वरा अर्धेमेली झाली. तिला सर्वात जास्त त्याच्या आधाराची गरज होती. अस नाही की त्याने प्रेम म्हणून भेटावं पण मित्र म्हणून तर भेटला असताच पण तो काही आला नाही आणि स्वरांच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. तो तिला कधीच भेटला नाही आणि तिला कळून चुकलं की हा चेहरा आता आपलाच दुष्मन बनला आहे मग त्यात जग काय, स्वयम काय कुणीच साथ देणार नाही. ती हा विचार करून स्वतःच वेड्यासारखं हसत होती. कधी कधी सर्वाना त्याच वाईट वाटायचं पण कुणीच काही करू शकत नव्हत. स्वरा दगड बनत चालली होती आणि सर्व तिला फक्त बघत दिवस घालवू लागले. हळूहळू दिवस जात राहिले आणि तिने प्रेम, स्वयम हा विषय आपल्या डोक्यातून काढून टाकला.

स्वराला हॉस्पिटलमध्ये येऊन १५ दिवस झाले होते. तिला आता सुट्टी मिळण्याची वेळ आली होती तरीही राजवर कुठलीही कार्यवाही झाली नव्हती. स्वरा दिवसेंदिवस हिम्मत हरत चालली होती तर राज दिवसेंदिवस काहीच झालं नाही अस वावरू लागला होता. त्याच्या वडिलांच्या साहाय्याने त्याने आपली बाजू सेफ करून घेतली होती त्यामुळे स्वरा आपल्या लढाईत हरते की काय अस सर्वाना वाटू लागलं होतं. एक तर ती आधीच थकली होती त्यात ती घटना तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तो प्रत्येक क्षण तिला आतमधून तोडत होता. अशी एकही रात्र नव्हती जेव्हा ती झोपेतून खळबळून उठली नव्हती. तिला कायम स्वप्नात राज तिच्यावर हसताना दिसत होता आणि स्वराची अचानक झोप उडवली जायची. स्वराची झोप, चैन, आयुष्य, करिअर, प्रेम ह्या एका घटनेने नाहीस झालं होतं. तिच्या डोक्यात नकारात्मक विचार येऊ लागले होते. पुढे ती काय करेल तीच तिलाच माहिती नव्हत. सोपं नव्हतं तिच्यासाठी जगणं, त्या यातनांपेक्षा एक वेळ मरण बर हा विचारही तिच्या मनाला शिवून गेला होता पण प्रश्न एकच उरला होता काय होत तिच्या नशिबात?

क्रमशा ....


Share

NEW REALESED