Nirnay - 2 in Marathi Fiction Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निर्णय - भाग २

निर्णय - भाग २

निर्णय भाग२

मागील भागावरून पुढे…
मंगेश घरातला पहिला मुलगा म्हणून खूप लाडाचा होता. या लाडामुळेच त्यांच्यात हट्टीपणा आला. मी म्हणीन ती पूर्व दिशा असं तो वागू लागला.


कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. नोकरीसाठी मुलाखत तोच घ्यायचा यात तो त्याची इच्छा थोडी पुर्ण करीत असे.नियुक्त केलेल्या मुलींचा गैरफायदा अगदी निर्लज्जपणे घेत असे.हे सगळं इंदीरेला पटत नव्हतं पण मुलांकडे बघून ती गप्प बसत असे. रोज घरात भांडणं होऊन घरातलं वातावरण बिघडवण्याची इंदीरेला अजीबात इच्छा नव्हती. मुलांच्या दृष्टीनं तिनी हे शांत राहण्याचा पाऊल उचललं होतं. मुलं कधी कधी फार चिडत.वडलांच्या विचीत्र वागण्यानी,नको तेवढ्या शिस्तीनी मुलं कंटाळली होती. त्यांना स्वतंत्रपणे वागण्याची मुभा नव्हती.


" आई तू बाबांना काहीच का बोलत नाही. किती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं? अग कुठलीच गोष्ट आमच्या मनासारखी होत नाही .आमच्या सगळे मित्र मैत्रिणी बघ किती मजा करतात. बाबा कधीच आपल्या बरोबर येत नाही. कुठेच येत नाहीत. प्रदर्शनात नाही, हॉटेलमध्ये नाही,सिनेमाला नाही आणि ते म्हणतील तसिच ड्रेस घालायचा. माझ्या मैत्रिणी जसे ड्रेस घालतात ते बघून मलापण घालावेसे वाटतात."

इंदीरा मेघनाच्या जवळ बसली. शांतपणे इंदिरा मेघनाला म्हणाली,


"बाळा मी रोज बाबांशी वाद घालत बसले असते तर तुमच्यासमोर रोज भांडणं झाली असती. ती बघून तुम्ही काय शिकला असता? तुम्हा दोघांना बाबांच्या शिस्तीचा कांच होतो हे मला कळतंय.तुम्हाला जसा त्रास होतो तसा मलाही इतकी वर्ष झाला पण मी तुमच्यासमोर भांडणं नको म्हणून गप्प राहिले. तू छान पद्धतीने शिक्षण पूर्ण कर. चांगली नोकरी मिळव मग तुझ्या मनासारखं वाग."


"आई बाबा एवढे हट्टी आणि कर्मठ विचारांचे का आहेत?"


" मलापण ते माहिती नाही. चल ऊठ फार विचार करू नकोस.काॅलेजची वेळ झाली आहे.लक्षात आहे नं!"


इंदीरेनी शेवटलं वाक्य हसून म्हटलं.तशी मेघनापण हसत उठली आणि आपल्या खोलीत गेली.मिहीर सुद्धा मेघना सारखाच चिडचीड करायचा.त्यालाही शांतपणे समजावून त्याची चिडचीड कमी करणं एवढंच इंदीरेच्या हातात होतं.वर्षवृक्षाची पानं गळायला किती वेळ लागतो! तशीच भरभर पानं कळली आणि आपली वयोगाठ वृद्धत्वाकडे झुकल्याचं इंदिरेच्या लक्षात आलं. मुलंही मोठी झाली.त्यांना आवडणा-या विषयात शिक्षण घेता आलं नाही कारण त्यांचे वडील. मंगेशनी मुलांवर स्वतःच्या इच्छा थोपल्या. तेव्हा वडिलांवर अवलंबून असल्याने मुलांनीही ऐकलं

.

आपलं वय वाढलं तरी मंगेश मध्ये समजूतदारपणा आलाच नाही.याचं कारण त्याला लहानपणापासून जशी वागणूक मिळाली त्यातून हा हट्टीपणा त्याच्या अंगी आलेला होता.तो हट्टीपणा आता नाहीसा होतं शक्य नाही.लहानपणीच त्यांच्या हट्टीपणाला खत पाणी दिलं नसतं तर आज मंगेश खूप वेगळा घडला असता हे नेहमीच इंदीरेला वाटायचं.


***नोकरी लागल्यावरसुद्धा मंगेशनी मुलाला म्हणजे मिहीरला स्वतंत्र होऊच दिलं नाही. त्याचा पगार स्वतःकडे ठेवत गेला. मिहीरला नेहमी तोंड वेंगाडून पैसे मागायला लागायचे.मिहीरला ज्या कारणासाठी पैसे हवे असायचे ते कारण जर मंगेशला योग्य वाटलौ नाही तर तो सरळ पैसे द्यायला नकार द्यायचा. आता मात्र मिहीर खूप चिडला. तो इंदिरेला म्हणाला


"आई अग मला नोकरी लागून सुद्धा माझ्या हातात चार पैसे नसतात.मित्रांमध्ये मी चेष्टेचा विषय झालो आहे. आई आता बस्स झालं. मी बाहेर गावी नोकरी घेतो. प्रत्येक गोष्टीत बाबांची ढवळाढवळ असते. ती मला अजीबात आवडत नाही. सगळ्या गोष्टी आपल्यालाच समजतात असं त्यांना वाटतं. आम्ही काय त्यांचे गुलाम आहोत की रोबोट?त्यांनी ऑर्डर सोडायची नि आम्ही ऐकायचं."इंदिरा मिहीरच्या डोक्यावरून मायेनी हात फिरवत म्हणाली.


"तुझ्या आयुष्याचे निर्णय आता तू घ्यायचे.बाहेर जायचय नं तुला जा पण पूर्ण विचार करून सगळं व्यवस्थित आहे नं हे बघून बाहेर पड. मी तुझ्या पाठीशी आहे.""आई मी बाहेर नोकरीसाठी गेलो तर बाबा तुला कसे वागवतील याची कल्पना आहे मला.पण...इथे माझा जीव घुसमटतो ग मी. मंदबुद्धीचा झालोय असं वाटतं."आणि रडायला लागला."मिहीर आयुष्यात याहून खूप कठीण परिस्थिती येऊ शकते. तशी आली तर न डगमगता त्याला तोंड द्यायचं असतं.रडलास तर तुला मार्ग सुचणार नाही.रडू नको त्याऐवजी विचार कर.बाहेर नोकरी शोध.या गावापासून लांब गेलास तरी हरकत नाही. जिथे तुझ्या हुशारीला,कर्तृत्वाला वाव आहे तिथे जा.तू लांब गेलास तरी शरीरानी जाशील मनानी तर माझ्या जवळच असशील.आईचं बाळ कधीच आईपासून दूर जाऊ शकत नाही.तू माझी काळजी करू नकोस.""आई तू किती कणखर आहेस.किती शांत आणि विचारी आहेस पण बाबांना तुझी अजीबात किंमत नाही."


"असूदे. त्यांना नाही तुला आणि मेघनाला आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. चल ऊठ जरा बाहेर जाऊन ये बरं वाटेल."


****

या प्रसंगानंतर पंधरा वीस दिवसानी मिहीर आईला म्हणाला,


" आई परवा माझा एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू आहे."


"अरे वाह. अभिनंदन. मुलाखतीची छान तयारी कर."


"आई बाबांना यातलं काही कळायला नको." मिहीर


"नाही कळणार. " इंदिरा


इंदिरेनी त्यांच्या गालावर हळुच थोपटत हसत म्हटलं. मिहीरचा हसरा चेहरा बघून इंदीराला मनातून बरं वाटलं.

***

स्वयंपाक करता करता इंदिरेच्या चेहऱ्यावर आलेलं हसू बघून मंगेशनी इंदिरेला विचारलंच, "काय झालं एवढा आनंद व्हायला?"


इंदिरा चमकली तरी आवाज आणि चेहरा स्थिर ठेऊन बोलली


" मला आनंद झाला तर तो व्यक्त केलेलाही या घरात चालणार नाही का?"


"कशाचा आनंद झाला आहे हे विचारतो आहे.ऊलटून प्रश्न कसली विचारते? या घरात फक्त मीच प्रश्नं विचारू शकतो. समजलं?"


"मुलांच्या लहानपणच्या काही गमती जमती आठवल्या की आनंद होतो. त्याबरोबर हसायला पण येतं. हा काही माझा गुन्हा आहे का?"


इंदिरा नी राग मनात दाबून धरत पण वरकरणी शांत स्वरात म्हटलं.


"माझ्या पासून काही लपविण्याचा प्रयत्नही करू नकोस कधी. तुझ्या दृष्टीनी चांगलं होणार नाही." मंगेश ओरडूनच बोलला.

त्यांच्या अशा पद्धतींनी बोलण्याची इंदिराला सवय होती.इतकी वर्ष झाली लग्नाला या राक्षसांशी कसं वागायचं हे काय आज तिला कोणी सांगायला नको. मिहीरनी परवा त्याची मुलाखत आहे सांगीतलं त्याचा आनंद आपल्याही नकळत आपल्या चेहे-यानी व्यक्त केला याचं तिला आश्चर्य वाटलं.


आता आपण आपला चेहरा पण सांभाळायला हवा.आपल्या चेह-यानी एकदा चुगली केली तेवढी बस्स झाली.


शांतपणे इंदिरा काम करत होती. मेघना घरी यायची वेळ झाली होती. तिला आल्या आल्या भूक लागलेली असते म्हणून तिच्या आवडीचा पदार्थ करण्यात इंदिरा गुंतली.


मेघना आल्या आल्या आईच्या गळ्यात पडली आणि कानात कुजबुजली,


"आई मिहीरचा मेसेज आला होता.तुला सांगीतलं नं त्यांनी?


"हो "इंदिरा हसतच म्हणाली.


"बाळा हे सगळं तुझ्या मनात ठेव. चेहरासुद्धा आनंदी ठेऊ नकोस." इंदिरा म्हणाली.


"का?"मेघना नी विचारलं.


"आत्ताच माझा आनंदी चेहरा बघून बाबांनी विचारून झालंय." इंदिरेने सांगीतलं.


"मग! "घाबरून मेघनानी विचारलं.


"केली सारवासारव.पण तू सांभाळ.जा हातपाय धू.आणि खायला घे."


हा प्रसंग घडूनही झाली आता सहा सात वर्षं. तेव्हा घरात धुसफूस झाली.वाद झाला. मंगेशचं टोकाचं शिव्याशाप देणं झालं. हे सगळं होणार हे इंदिरेला माहीत होतं. म्हणूनच मिहीरला इंदिरानी बजाऊन ठेवलं होतं. त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही तसंच त्यांच्या ओरडण्यानी, वाईट बोलण्यानी अजिबात घाबरून जायचं नाही. शांत राहायचं आणि शांतपणे आपला निर्णय सांगायचा.असं केलस तरच घराबाहेर पडू शकशील.स्वत:च्या कर्तृत्वाला वाव देऊ शकशील.


सगळा प्रसंग व्यवस्थित वादविवाद होऊन पार पडला.इंदीरेनी सांगीतल्या प्रमाणे मिहीर शांतपणे बोलला. इंदीरा आणि मेघना एखाद्या अलिप्त राष्ट्राप्रमाणे एका जागी स्थीर बसल्या होत्या.


पहिल्यांदा कोणीतरी मंगेशच्या अधिकाराला आव्हान दिलेलं होतं. त्यामुळे त्याची भयंकर चिडचिड सुरू होती.तो प्रचंड अस्वस्थ झाला होता.


इंदीरा मात्र शांत होती.


असं युद्ध या घरात व्हायला हवं असं इंदीरेला प्रकर्षानी वाटत होतं कारण प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य कसं जगायचं याचा निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार असतो. मिहीरच्या निर्णयानी ही सुरवात झाली याचा इंदीरेला खूप आनंद झाला.

-----------------------------------------------------------------------------------

क्रमशः

पुढे काय घडलं असेल हे पुढल्या भागात बघू.

निर्णय भाग २

लेखिका...मीनाक्षी वैद्य