Nirnay - 4 books and stories free download online pdf in Marathi

निर्णय - भाग ४

निर्णय भाग ४

मागील भागावरून पुढे...



मिहीर पाठोपाठ मेघनापण बंगलोरला गेली.दोघही एकाच फ्लॅटवर रहात होते. मेघनाचही काॅलेज साधारण आठवड्यांनी सुरू झालं की तिही मिहीर सारखीच बिझी होणार.


दोघंही इंदीरेला फोन करत पण मंगेशशी कधी बोलत नसत. यामुळे मंगेशच्या अंगाचा तिळपापड होत असे.


" मुलांना बाप परका वाटतोय का? एवढे दिवस झाले आपण काय करतोय हे बापाला कळवावसं वाटतं नाही?"


" मला माहित नाही." इंदीरा कपड्यांच्या घड्या करता करता म्हणाली.


" तुला कसं माहिती असणार! सांगीतलं तूच त्यांना.म्हणाली असशील बापाला कशाला कळवायला पाहिजे."


इंदीरा अजीबात विचलीत न होता आपलं काम करत होती. तिच्या या वागण्यामुळे मंगेश इतका चिडला की त्याने सगळ्या घड्या केलेले कपडे उचलले आणि भिरकावून दिले.


" अरे हे काय केलं? धुतलेले कपडे आहेत."


" होका मग पुन्हा धू."


आता मात्र इंदीरा चिडली.


" हेच काम आहे का मला? तुमच्या या अश्या विचीत्र वागण्यामुळे मुलं कंटाळली आणि दूर निघून गेली."


खाली पडलेले सगळे कपडे तिनी उचलून झटकले आणि पुन्हा घड्या करू लागली.मंगेशचा राग अजूनही शांत झालेला नव्हता.


" हो. मीच वाईट आहे म्हणून तुम्हाला त्रास हैतो. तुम्ही तिघं चांगले."


"तुम्ही वाईट आहात असं आम्ही म्हणत नाही पण तुम्ही तुमची शिस्त आम्हाला लावताना आमचा विचार केला कधी? मनावर वळ उमटवणारी तुमची ही शिस्त मुलांना तुमच्यापासून दूर घेऊन गेली. तुमच्या इच्छा या इच्छा असतात.पण आमच्या इच्छा हा वेडेपणा असतो,फालतू लाड असतात, हट्टीपणा असतो. आमच्या इच्छा,अपेक्षा जाणून घेण्यासाठी तुम्हीं आमच्या मनापर्यंत पोचलात का? कधी तसा प्रयत्न तरी केला? तुमचं फक्त स्वतःचं आयुष्य जगलात आणि आता जगता आहात. आपलं आयुष्य जगताना इतरांच्या आयुष्याचाही विचार करायचा असतो हे कधीच तुम्ही शिकला नाहीत. म्हणून आज ही वेळ तुमच्यावर आली आहे."


इंदीरा एवढं बोलून रागानीच खोली बाहेर गेली. मंगेशला वाटलं इंदीरानी आपल्याला खूप मोठी चपराक मारली आहे.

तो पलंगावर सुन्न होऊन बसला.

***

या प्रसंगानंतर चार पाच दिवस शांततेत गेले. इंदीरा मंगेशचं वागणं बघत होती. त्याला आपल्या बोलण्यानी खूप धक्का बसला आहे हे तिच्या लक्षात आलं.त्याचा गोरामोरा झालेला चेहरा बघून तिला मनातच हसू येऊ लागलं.तिला वाटलं या पुचाट माणसाला 'वाघ वाघ' समजून उगीच इतकी वर्ष घाबरत राहिलो.

***

आठवडाभर घरामध्ये वातावरण थंड होतं.वादळाची पूर्वसूचना पण नव्हती.इंदीरा नेहमीप्रमाणे आपल्या दीनचर्येत व्यस्त होती.

***

मेघनाचं काॅलेज सुरू झालं होतं.ती छान रूळली होती.शनवार,रवीवारी हा मुलांनी तिला फोन करण्याचा ठरलेला असे. फोनवर बोलताना इंदीरा मंगेशला लपून छपून बोलत नसे. मुलांचं करीयर, त्यांचे नवीन मित्र मैत्रिणी यावरच गप्पा असतं. एक दोनदा मंगेश नी लपून ऐकायचा प्रयत्न केला पण त्याला आक्षेप घ्यावा असं काही ऐकायला मिळालं नाही त्यामुळे तो तसाच मागे फिरला. त्याला माहिती नव्हतं की मंगेशबद्दल बोलताना मुलं इंदिरेशी मेसेज वर बोलतात.

*"*

मंगेश या सगळ्या प्रसंगांमुळे बेचैन झाला.काय होतंय आपल्याबरोबर ते त्याला कळतच नव्हतं. आजपर्यंत म्हणजे नोकरीतून निवृत्त होईपर्यंत मंगेशचा काय रूबाब होता. बाहेर ऑफीसमध्ये त्याची एक वट होती. इंदीरा तर काय त्याच्या हातातील सोंगटी होती. मुलांचा काही प्रश्न नव्हता. मंगेशच्या दृष्टीने ते लिंबूटिंबू होते. मंगेश घरी आल्यावर सगळं घर शांत असे.घरात कोणी राहतं आहे की नाही ही शंका यावी इतकी शांतता घरात असे.


आता अचानक सगळं बदललं. मुलं बंड करून ऊठण्याएवढी मोठी कधी झाली आणि धीट कशी झाली याचा मंगेशला उलगडा होत नव्हता. आत्ता आत्तापर्यंत तर मुलं मंगेशसमोर बोलायला घाबरत असत. आता न घाबरता बोलतात.बोलतात कसले आपले निर्णय सांगतात याचं त्याला आश्चर्य वाटलं.


मुलांमध्ये एवढा धीटपणा इंदीरेनी कधी आणि कसा रूजवला हे आपल्याला कळलं कसं नाही याचं मंगेशला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. आता हा विचार करून काय उपयोग होता! घरातील त्याच्या स्थानाला धक्का लागला होता.


जीवाची होणारी तगमग त्याला सुखाची झोप लागू देत नव्हती.


इंदीरा नेहमीसारखी शांत होती.


****

मागच्या वर्षी मीहीरला त्याच्या ऑफीसमध्ये त्याच्या बरोबर काम करणारी एक मुलगी आवडली.त्याने इंदीरेला सांगीतलं.

"आई शुभांगी नाव आहे तिचं.मी अजून तिला बोललो नाही पण एकत्र काम करताना जाणवतं की ती मला आवडते."


" मीहीर लग्नं हा खूप मोठा निर्णय आहे. तिला तू फक्त चार महिन्यांपासून ओळखतो आहेस. जरा काही दिवस जाऊ दे. तिला लग्नाबद्दल विचारण्याची एवढी घाई करू नकोस."


"तिच्या घरची माहिती मी काढली आहे. बंगलोरचीच फॅमीली आहे. तिला दोन भाऊ आहेत.तिचे वडील सरकारी नोकरीत आहेत."


"वा! बरीच माहिती मिळवलीस तू तिच्याबद्दल."


" हो.आई आपल्या घरी तुला मान देणारी बायको मला हवी आहे. आत्तापर्यंत बाबांच्या राज्यात त्यांनी तुझं पोतेरं केलं.मी असं होऊ देणार नाही."मीहीर म्हणाला.


" ती मुलगी माझा मान ठेवेल हा आत्मविश्वास तुला कसा काय आला?"


"अगं ऑफीसमध्ये बघतो नं.आणि छोट्या मोठ्या प्रसंगातून कळतं ती कशी आहे? तिच्यावर संस्कार कसे आहेत."


" हं… फारच प्रेमात पडेल तिच्या.एवढं बोलून इंदीरा हसली.



" ए आई हसू नकोनं. मला खरंच ती आवडते."


मीहीरचा केवीलवाणा आवाज ऐकून इंदीरेला आणखीनच हसायला आलं.

ती हसतच हसतच असते की मंगेश तिच्या हातून फोन ओढून घेतो.मिहीरला हे कळतच नाही तो बोलतच असतो.


"आई मी तुला फोटो पाठवतो सांग.आई ऐकतेस नं!


"बोल फोन माझ्याजवळ आहे."


मीहीरनी मंगेशचा आवाज ऐकून फोन बंद केला.


इंदीरेला कल्पना आली की आता काय होईल.

"कोणाचा फोटो पाठवतोय मीहीर?" मंगेश ने विचारलं


"त्याला एक मुलगी आवडते.तिचा फोटो पाठवतो आहे."


"छान इथे आईबाप नाही का लग्नासाठी मुलगी बघायला?" मंगेश चिडून बोलला.


"त्याच्या बरोबर काम करते." इंदिरा


"नुसतं तेवढं बघून चालतं का? तिचं घराणं नको बघायला? वडील काय करतात बघायला नको? लग्नं म्हणजे पोरखेळ वाटला का याला? सगळं लपवून ठेवा वडलांपासून."


मंगेश नी इंदीरेचा फोन जवळपास फेकलाच. नशीब तुटला नाही.


"हे असं वागायची हिम्मत कशी आली मीहीरमध्ये? तुझ्या फूस लावण्यामुळे."


"मी कशाला फूस लावू? मुलं आता मोठी झालीत त्यांना कळतंय. त्यांना जे पटेल तेच ते करतात जसं तुम्ही केलं. तुम्ही केलं तेव्हा चाललं नं! आता मुलांची वेळ आहे. ते करतात त्यांना पटेल तसं. तुम्ही कोणत्या तोंडानी म्हणणार आता त्यांना ?" इंदिरा

इंदीरेचं हे बोलणं मंगेशला रूचलं नाही.


"इंदीरा तुला शेवटचं सांगतोय तुझं हे विचीत्र वागणं थांबव नाही तर याचे परीणाम भयंकर होतील." मंगेश



"होऊन होऊन काय होईल? तुम्ही मला माराल, मीहीरशी बोलणं बंद कराल, माझा फोन घेऊन टाकाल. याहून जास्त भयंकर काय कराल तुम्ही. इतकी वर्ष तुमचं खूप भयंकर वागणं सहन केलंय. माझी सहनशक्ती खूप वाढली आहे. करा तुम्हाला जे वाटेल ते." इंदिरा



इंदीरेनी टेबलवर मंगेशी फेकलेला फोनसूद्धा घेतला नाही. ती तडक तिच्या खोलीत गेली.

टेबलावर पडलेल्या फोनकडे मंगेश हाताच्या मुठी आवळून लाखांनी नुसता बघत बसला.


***

संध्याकाळी काॅलेजमधून मेघना घरी आली तेव्हा इंदीरा स्वयंपाकघरात होती. मेघना घाईघाईने तिच्या कडे आली.


"आई काहीतरी लोचा झाला मीहीर म्हणाला."


तव्यावर थालीपीठ लावता लावता इंदीरेनं हुंकार दिला.


"आई मीहीरचं बोलणं ऐकून बाबांनी राडा केला का?"

"काय शब्द वापरतेस ग मेघना?"


"बाबांच्या वागण्याला हेच शब्द फिट होतात."


"चल हातपाय धुवून ये.गरम थालीपीठ खायला."


आई काहीच बोलत नाही बघून मेघना नाराजीने नाक फेंदारून हातपाय धुवायला गेली.

मेघनाचं वागणं बघून इंदीरेन दीर्घ नि: श्वास सोडला.

मीहीरला काय सांगावं आणि मंगेशचा ताल कसा सांभाळावा यांचा विचार इंदीरेच्या डोक्यात चालू होता.

—-----------------------------------------

क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात.

निर्णय भाग ४

लेखिका…मीनाक्षी वैद्य

Share

NEW REALESED