Nirnay - 9 books and stories free download online pdf in Marathi

निर्णय - भाग ९

निर्णय भाग ९

मागील भागावरून पुढे...

शुभांगी मंगेशच्या पसंतीस उतरल्यामुळे पुढचं सगळं काम सोपं झालं. यथावकाश साखरपुडा झाला.साखरपुडा थोडक्यात झाला. साखरपुड्या आधी इंदिरेने काही गोष्टी स्पष्ट केल्या,


" साखरपुड्याच्या वेळी मुलाला आणि मुलीला फक्त कपडे करायचे.बाकी सगळं देणंघेणं लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे श्रीमंत पूजनाला होतच म्हणून ते सगळं आत्ता साखरपुड्याला करायचं नाही.


दुसरं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आहेर द्या आम्ही आमच्या नातेवाईकांना आहेर देऊ.

तुमच्या मुलीला तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या. मुलाकडचे म्हणून काही मागणार नाही. आम्हाला आमच्या सुनेला जे करायचंय ते करु."


इंदिरा हे सगळं एका दमात बोलून गेली.मंगेश तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला.लग्नासारख्या महत्वाच्या कार्याची बोलणी इंदिरानी अचानकपणे आणि झटक्यात केली.


" हो चालेल.तुम्ही म्हणाल तसं करू" शुभांगी चे वडील म्हणाले. इंदिरेच्या बोलण्यातला आत्मविश्वास बघीतल्यावर मिहीर चकीत झाला.


इंदिरेकडे बघून मिहीर हसला. इंदिरा फक्त गालातल्या गालात हसली.

शुभांगी चे आईवडील मिहीरचं घर बघून खूष झाले. लग्नातही फार काही मागीतलं नाही म्हणूनही खूष झाले.


मंगेशला मोठेपणा देऊन लग्नात काही अडथळे आलेले इंदिरेला नको होतं. इंदिरेने धमकीवजा समजून सांगितलं म्हणून तो गप्प होता. इंदिरेलाच लग्नाची बोलणी करायची होती त्यामुळे मंगेशने कुठे मध्येच तोंड ऊचकटायला नको म्हणून तिने मंगेशला साजूक तुपातील धमकी दिली.

***


मिहीर खूष होता.आपलं लग्नं शुभांगी नी होईल की नाही अशी त्याला भीती वाटत होती पण इंदिरेने लग्नाची गाडी छानपैकी रुळावर आणून ठेवली. हे करायला आईला खूप मेहनत घ्यावी लागली असेल याची कल्पना मिहीरला होती.

" आई थॅंक्स."

" कशाबद्दल थॅंक्स देतोय?"

" माझं लग्नं शुभांगीशी होईल की नाही अशी शंका मला होती पण तू छान मॅनेज केलस."

" हं आता लवकर लग्नाचा मुहूर्त काढूया.तू एकदा लग्नाच्या बेडीत अडकलास की मी मोकळी"

" असं काय बोलतेस?"

" अरे... म्हणजे नंतर मेघना साठी बघायला हवं. म्हणून म्हणतेय. मेघना नी पण तुझ्याचसारखं जमवलं तर बरं होईल."

यावर मिहीर हसला.

" का हसला रे? मेघनाचं आहे का काही,?"

"नाही ग.असच हसलो."

इंदिरेनी फार ताणून धरलं नाही.

***

या गोष्टी होऊनही दोन महिने झाले होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती.मेघनानी मनपसंत कपड्यांची खरेदी केली.


मंगेशला एक अक्षरही बोलायचं नाही अशी ताकीद इंदीरेने दिली होती.इंदिरेची धिटाई बघून मंगेशची काही बोलण्याची हिंमत झाली नाही.


****



मेघनाने मनसोक्त खरेदी केल्यानंतर ती हळूच इंदिरेच्या कानात कुजबुजली

" आई तू काय जादू केलीस?"


" कोणावर?'


" अगं बाबांवर. ते एकदम गाय झालेत." आणि मिस्किल हसू लागली. मंगेश तिरक्या नजरेने या दोघींकडे बघत होता.


" बाळा खूप वर्ष वाघाला घाबरून मी जगले. एकदिवस अचानक माझ्या लक्षात आलं की जरा थोडा धीटपणा दाखवायला हवा नाहीतर हा वाघ मला खाईल.मिहीरचं आणि तुझं भविष्य डोळ्यासमोर ठेऊन शेळीची वाघीण झाले."


त्या बोलतच असतात तेवढ्यात टॅक्सी घरासमोर येऊन थांबते. तिघही खाली उतरतात. इंदिरा आणि मेघना कपड्यांच्या पिशव्या घेऊन घरात शिरतात.


***


" आई ही साडी खूप आवडली मला."


" तुझ्या मनासारखी खरेदी झाली नं!"


" खरेदी करताना पैशाचा,बजेटचा काही विचार करायचा असतो हे माहिती नाही का?"


मंगेशचा तापलेला स्वर ऐकून इंदिरा आणि मेघना दोघींनी मागे वळून बघीतलं. मेघना घाबरू गप्प बसली.


" लग्नाची खरेदी आहे.नेहमीची दिवाळीची खरेदी नाही."


" म्हणून एवढा पैसा खर्च करायचा?"


"हल्ली सगळ्यांचे भाव वाढले आहेत त्याला आपण काय करू शकतो?"


" त्या मोलकरणीला एवढी महागाईची साडी घेण्याची काय गरज होती?"


"गेले बारा वर्षांपासून ती आपल्या कडे काम करतेय.ती आहे म्हणून माझा बराच भार हलका होतो. म्हणून तिच्यासाठी साडी घेतली. साडी पाचशे रूपयांची आहे काही हजारांची नाही."


" भांडी,फरशी तिनी करून एवढी कसली मदत होते तुला? दोन हजार पगार देते वरून ही साडी.काढ त्या बाईला."


" काम कोण करणार?"


" तुला स्वयंपाकाशिवाय दुसरं काय काम असतं? घास तू भांडी आणि पूस फरशी."


" तुम्ही तर रिटायर्ड झालात.तुम्हाला तर आरामात खुर्चीवर बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी हातात मिळतात.तुम्ही घासा भांडी आणि पुसा फरशी. मी हे काम करणार नाही. माझ्याकडून ती अपेक्षा करू नका.तुमचा निर्णय ठरला की सांगा मग बाई काढते."


" बोला मुलीसमोर असंच वेडंवाकडं.मग काय एक दिवस तिही तुमच्यासारखी मुक्ताफळं ऊधळेल."


" मुलांना कळतं आपले वडील कसेही वागले तरी ते वडील आहेत तर त्यांना योग्य तो मान दिला पाहिजे.एवढं शिकवलंय मी."


" उपकार केले माझ्यावर."


" तुम्ही प्रत्येक वाक्याला वाकड्यात शिरायचं ठरवलं तर समोरच्या माणसानी कसं वागायचं?"

" मेघना सगळे कपडे पुन्हा तसेच ठेव.रात्री सगळ्या कपड्यांवर कोणती साडी कोणाला द्यायची अश्या चिठ्या लिहून स्टॅपल करून ठेऊ."

"ठीक आहे." मेघना कपडे आवरू लागली.इंदिरा मंगेशकडे लक्ष न देता खोलीबाहेर गेली.कपडे आवरता आवरता डोळ्याच्या कोप-यातून मेघनाला मंगेश रागानी हात झटकत बाहेर गेलेला दिसला. मेघनाला हसू आलं.



बघता बघता मिहीर चं लग्न जवळ आलं.

इंदीरेची आता लगबग सुरू झाली होती. मेघनाचं प्रोजेक्ट चालू असल्याने तीही इंदिरेला मदत करायला येऊ शकत नव्हती.


मंगेशचा भाऊ शरद आणि त्याची बायको प्रेमा दोघांनाही इंदिरेच्या मदतीला यायची इच्छा असून येता येत नव्हतं.याला कारण मंगेशचा स्वभाव.


सोनाराकडे इंदिरा शरद आणि प्रेमाला बरोबर घेऊन गेली होती. इंदिरेबरोबर मेघनाही होती. इंदिरा मेघनाला तिच्या आवडीचे झाडीने घेऊन देणार होती. मंगेशला या गोष्टींची कल्पना नव्हती. त्याला हे सांगायचं नाही हे इंदिरेनी पक्कं ठरवलं होतं.


"वहिनी मंगेशच्या स्वभाव लहानपणापासून च असा आहे. फार हट्टी आहे. कोणाचच कधीच त्याने ऐकलं नाही. फक्त स्वतःच्या मनातच करत आला. आई आप्पांचं सुद्धा कधी ऐकलं नाही."


" माहिती आहे भाऊजी मला.पण आता त्याचा उपयोग काय? ते लहान असतानाच आप्पांनी त्यांना चांगली कडक शिस्त लावायला हवी होती. तर जरा स्वभाव बदलला असता असं आता म्हणून शकतो. आता कठीण आहे."


"खरय वहिनी तुम्ही खूप सहन केलत.मी यांना म्हणते इंदिरा वहिनींसारखी सहनशक्ती आपण कमवायला हवी."


" प्रेमा अगं माझा स्वभाव लहानपणापासून जरा नरमाईने वागणारा आहे. त्यामुळे यांचा धाक, विचीत्र वागणं यावर शांतपणे विचार करून शांत बसण्याची सवय लागली.मुलं लहान होती तोवर ठीक होतं.पण मुलांचं भविष्य ठरविण्याची वेळ आली तेव्हा एक विचार माझ्या मनात आला की आता आपण आपलं मत मांडायला हवं आणि मुलांच्या पाठी ठाम उभं राहायला हवं."


"खूप छान निर्णय घेतला तुम्ही त्यामुळे आज मिहीर आणि मेघना दोघांचं भविष्य चांगलं झालंय.या एका वर्षात मेघना सुद्धा नोकरीला लागेल. वहिनी कसलीही गरज लागली तर आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर."


"हो भाऊजी मला माहिती आहे.आज आपण इथे खरेदी केली आहे हे सांगायचं नाही." इंदिरा म्हणाली.


" त्याची काळजी करू नका वहिनी." प्रेमा म्हणाली.


जरा वेळाने शरद आणि प्रेमा आपल्या घरी गेले.इंदिरा आणि मेघना आपल्या घरी जायला निघाले.


***


घरी येताच सहजपणे इंदीरा मेघनाला म्हणाली


"कितीही आधीपासून तयारी केली तरी शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी राहतच." इंदीरा म्हणाली.


"थाटात लग्न करायची गरज नाही. जेवढा खर्च कपडे आणि दागीन्यांवर झाला तेवढा पुष्कळ झाला." मंगेशनी निर्विणीच्या सुरात सांगीतलं.


" लग्न थाटात करायचं नाही म्हणजे काय? ऐन वेळेवर निर्णय बदलण्याचं कारण काय?" इंदिराने चिडून विचारलं.


"सगळे पैसे काय मिहीरच्या लग्नातच संपवायचे का? मेघनाचं लग्नं कसं करणार याचा विचार केला का? मी रिटायर्ड झालो आहे."


" आपल्या घरातील हे पहिलं लग्न आहे. थाटात करायचं नाही म्हणजे कसं करायचं?" इंदिरा ची तगमग तिच्या आवाजातून जाणवत होती.


" कोर्ट मॅरेज. लग्नाच्या वेळी फक्त साक्षीदार असतील.आपल्याकडून आणि त्यांच्याकडून सुद्धा."


" काय?" इंदिरा जवळ जवळ किंचाळलीच.


"मुलीकडच्या लोकांनी हाॅल बुक केला आहे.त्यांच्याकडच्या पाहुण्यांना आमंत्रण गेलेली आहेत.आपल्याकडेसुद्धा पत्रीका छापून आल्या आहेत आणि आता तुम्ही सांगता आहात.काहीच कसं वाटतं नाही तुम्हाला?" इंदिरेचा स्वर टिपेला पोचला होता.


"लाज कसली वाटायची त्यात! सगळं ठरवताना माझं मत विचारलं होतं? आता लग्नापुरती जेवढी खरेदी आवश्यक होती तेवढी झाली आहे.आता पुढच्या खर्चाला मी पैसे देणार नाही. कळलं."


"वा! वारं करण्याची चांगली पद्धत आहे.शोभत नाही तुम्हाला.तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर देऊ नका.लग्न कसं करायचं मी बघीन." इंदीरा ठामपणे बोलून तेथून निघून गेली.


" पैसे कुठून आणणार? कर्ज कोणाकडून घेणार? कोण देणार कर्ज तुझ्यासारख्या विनानोकरीच्या बाईला?" मंगेशचा स्वर कुत्सीत होता.


" पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आहे.त्याची तुम्ही काळजी करू नका." एवढं बोलून आपल्या कामाला लागली.


इंदिरा कामाची यादीत काही राहिलं नाही नं बघत होती.मेघना आली तिचा चेहरा खूप चिंतेत होता.


" आई बाबांनी हे वेगळंच काय नाटक सुरु केलंय?"


" मेघना त्यांना मिहीरला बाहेर नोकरीसाठी पाठवण्यापासून ते त्याच्या लग्नापर्यंत मी त्यांना कशातच महत्व दिलं नाही त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला गेला आहे. त्यामुळे कसंही करून या लग्नात ते खोडा टाकण्याचा ते प्रयत्न करतात आहे. होईल सगळं ठीक"


" कसं?" मेघनानी विचारलं

तिला बोटांची हालचाल करून तुला मेसेज करीन असं सांगितलं.याच्यामागचं कारण काही मेघनाला कळलं नाही.तेव्हा इंदीरा म्हणाली


" भीतींलापण कान असतात." हे ऐकताच मेघनाला समजलं. तिनी ओके म्हणत इंदीराला मिठीमारली.दोघी हसल्या.

__________________________

क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात.

निर्णय

लेखिका…मीनाक्षी वैद्य.