Nirnay - 11 in Marathi Fiction Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निर्णय - भाग ११

निर्णय - भाग ११

निर्णय भाग ११

मागील भागावरून पुढे…


इंदिरा आता एका वेगळ्या निश्चयाने मिहीरच्या लग्नाची तयारी करत होती. कालच लग्नाच्या पत्रिका छापून आल्या. गणपती आणि देवीला पत्रिका ठेऊन मग काही जवळच्या जेष्ठ नातेवाईकांना पत्रिका देऊन लग्नाची अक्षत द्यायला जायला हवं हे लक्षात घेऊन इंदिरा मंगेशला म्हणाली,


" ऊद्या शुभदिवस आहे. कालच लग्नाच्या पत्रिका छापून आल्या आहेत. ऊद्या आधी गणपती आणि देवीला पत्रिका देऊन मग जेष्ठ नातेवाईकांना पत्रिका आणि लग्नाची अक्षत द्यायला जायला हवं.त्यामुळे ऊद्या सकाळी साडेसात पावणे आठच्या सुमारास तयार रहा. बाबू ड्रायव्हरलापण सांगीतलं आहे."


" माझा काय संबंध? लग्नाच्या पत्रिका तू द्यायला जा. मला यायची इच्छानाही.लग्नं तू ठरवलं." मंगेश तिरसटासारखा बोलला.


"तुमची इच्छा विचारत नाही तुम्हाला सांगतेय.ऊद्या सकाळी तयार रहा.गणपती आणि देवीला पत्रिका दिल्यावर तुमच्या अतुलमामा प्रज्ञामामी आणि गिरीश मामांकडे जायचयं.नंतर प्रल्हाद काका सुलोचना काकूंना पत्रिका द्यायला जायचं आहे.माझ्याहमाहेरच्यांना पोस्टाने पत्रिका पाठवणार आहे. "


इंदिरा ने मेघनाला हाक मारली


"काय आई?"


"मला जरा मदत कर.पत्रिकेवर नावं लिहायची आहेत."


"हो.आले."


संभाषणानंतर मंगेशशी काहीही संबंध नसल्यासारखं इंदिरा पत्रिकेवर नाव लिहिण्याच्या कामात लागली.


"मेघना ज्या पत्रिका एका गावाला पाठवायच्या आहेत त्यांचा एक गठ्ठा कर."

"हो."

***

" आई ऊद्या बाबा येतील का देवळात आणि पत्रिका द्यायला?"


"न येऊन सांगतात कोणाला! त्यांच्या लक्षात आलं आहे की आता मी काही त्यांचं ऐकत नाही.जोपर्यंत त्यांच्या ओरडण्याला घाबरत राहिले तोपर्यंत त्यांना वाटलंकी ही काय करणार? मी माझी सगळी एनर्जी वाचवून ठेवली होती. मला माहिती होतं की भविष्यात कधीतरी आपला आवाज दमदार करायची गरज पडणार आहे.मला जे माहिती होतं ते यांना कुठे यांना माहिती होतं! ते त्यांच्याच मस्तीत राहिले मीही राहू दिलं." आणि इंदिरा हसली.


"आई तू फार धीट आहेस.इतकी वर्ष त्यांच्या म्हणण्यापुढे मान झुकवत आलीस आता अचानक त्यांची बोलती बंद केलीस."


"काही वेळेला शांत राहणं योग्य असतं. जेव्हा गरज पडेल तेव्हा या शांत राहण्याने जी प्रचंड ऊर्जा माणसाला मिळते त्याचा वापर तो अस्त्र म्हणून करु शकतो. हे अस्त्र फार प्रभावी असतं. मी तेच करतेय."


दोघी एकमेकींकडे पाहून हसल्या.पूर्वी मंगेशला ऐकू जाऊ नये म्हणून दोघी हळू बोलत. आता इंदिरा ने तेही घाबरणं सोडून दिलं. मंगेशनी ऐकलं तर ऐकूदे, प्रश्न विचारले तर विचारू दे. इंदिरा आता इतकी धीट झाली होती.


इंदिरेला मंगेश देवळात पत्रिका ठेवायला आणि नातेवाईकांकडे पत्रिका द्यायला येईल की नाही अशी शंका येत होती पण इंदिरेच्या बोलण्यात अशी जरब होती की कुठलीही कुरकूर न करता तो सकाळी तयार झाला.


"नातेवाईकांकडे गेल्यावर मुलाच्या वडलांच्या भूमीकेतून वागा. वायफळ बडबड नको. चिडका सूर तर अजिबात नको. लग्नासारखं मंगल कार्य आहे आनंदानी नातेवाईकांना आमंत्रण करा."


"मला कळतंय." मंगेश रागानीच बोलला.


"तुम्हाला कळतंय पण माझा तुमच्या स्वभावावर विश्वास नाही. म्हणून पुन्हा सांगतेय."


तेवढ्यात बाबू ड्रायव्हर येतो आणि सगळे पहिली पत्रिका देवळात ठेवायला आणि नंतर नातेवाईकांकडे जायला निघतात.


पत्रिका वाटप शांततेत पार पडलं.नंतर कुळाचारही व्यवस्थित आनंदात पार पडला. इंदिरा प्रत्येक क्षणी सावध होती कारण मंगेश वरून शांत दिसत असला तरी त्याच्या मनात काहीतरी चाललंय हे इंदिरेला लक्षांत येत होतं. शेवटी मंगेश बरोबर इंदिरेनी आयुष्यातील तीस वर्ष घालवली होती.


मंगेश केव्हा आपलं वागणं बदलेल यांचा नेम नसल्याने इंदिरा आनंदात असूनही सावध होती. मिहीरचं लग्नं शांतपणे पार पडावं हीच तिची इच्छा होती.


लग्नाच्या दोन दिवस आधी इंदिरा मिहीरला जवळ घेऊन बसली.


"मिहीर आता तुझं लग्न होणार. तुझं आयूष्य दोन स्त्रियांमध्ये वाटलं जाणार. तुझ्या भविष्याची दोरी शुभांगीच्या हातात आहे तर तुझ्या आयुष्याला आकार देणारी आई आहे. दोघींनी वागताना तुला तोल सांभाळावा लागेल. तुझ्यावर आतापर्यंत माझा शंभर टक्के हक्क होता आता पन्नास टक्के होणार.पन्नास टक्के हक्क शुभांगीचा राहणार. तुझी जबाबदारी आहे की दोघींचा हक्क नीट समजून घेऊन त्यांना द्यायचा.मी आई आहे. तुझ्या ऊत्तम भविष्यासाठी तुझं लग्न करून देणार आहे त्यामुळे तुझ्या आयुष्यात सतत मी हस्तक्षेप करणार नाही.पण माझा अपमान होईल असं तुम्हा दोघांकडून घडणार नाही याची जबाबदारी तुझी आहे. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी माझ्या खूप शुभेच्छा."


असं म्हणून इंदिरेने हळूच त्याचा गालगुच्चा घेतला. मिहीर एकदम गहिवरला. त्याला जबाबदारीची जाणीव झाली.


"आई तू काळजी करू नकोस. तू म्हणालीस तसं मी शुभांगीला समजून घेउन.तिच्या इच्छा, अपेक्षा मी जाणून घेईन. माझ्या आयुष्यात तुझं स्थान खूप महत्वाचं आहे.तू ज्या पद्धतीने मला घडवलं त्यामुळे मी आज माझ्या क्षेत्रात छान काम करू शकतो आहे. मला आणि मेघनाला घडवताना तुझ्या इच्छा, अपेक्षा तू बाजूला ठेवल्यास कारण आम्हाला योग्य तो वेळ देता यावा म्हणून. मी आणि मेघना हे कधीच विसरू शकणार नाही.शुभांगी माझं वर्तमान आणि भविष्य असली तरी तू भूतकाळ होऊ शकत नाहीस आणि होणारही नाही. मेघना आणि तिचं ज्याच्याशी लग्न होईल त्याच्याशी मी आणि शुभांगी प्रेमाचं नातं ठेऊ. मोठा भाऊ म्हणून नेहमी तिच्या पाठीशी उभा राहीन.हे वचन देतो तुला."


मिहीरचं बोलणं ऐकून इंदिरेच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलं. मिहीरने ते हळूच पुसले. मेघना दोघांजवळ येऊन बसली. मेघना म्हणाली,


"आई मीपण शुभांगीशी एक मैत्रीण म्हणून वागीन.ती पण कुणाची तरी मुलगी आहे हे लक्षात ठेवीन. मी नणंद आहे म्हणून तिच्याकडून अवास्तव अपेक्षा करणार नाही. माझं ज्याच्याशी लग्न होईल तेव्हा मी त्याला मी माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्ती तू मिहीर आणि शुभांगी आहे हे सांगीन."


" बाळ बाबा सुद्धा तुमच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आहे."


" मला तसं वाटत नाही." मेघना स्पष्ट म्हणाली.


"तुला वाटतं नसलं तरी तुझ्या आयुष्यात येणा-या नवीन मुलांसमोर तुझ्या बाबांची किंमत कमी करायची नाही.लग्नानंतर त्याला बाबांचा स्वभाव कळल्यावर त्याला ठरवू दे.मिहीर तुला सुद्धा माझं हे सांगणं आहे.""आई तू आमचं रोल माॅडेल आहेस. तू ज्या पद्धतीने विचार करतेस ती मी माझ्या त आणण्याचा प्रयत्न करीन.तू आम्हाला जे

संस्कार दिलेस ते मी कधी विसरणार नाही."


मिहीर इंदिरेचा हात हातात घेऊन म्हणाला.


"हो आई मिहीर म्हणतोय ते खरं आहे. तुझ्याकडे बघून खूप प्रेरणा मिळते.तुला तुझी मुलं जशी वागावी असं वाटतं नं तसंच आम्ही वागणार." मेघना नी इंदिरेच्या हातावर थोपटत म्हटलं.


इंदीरेने दोघांच्याही गालावर थोपटले.तसं दोघंही लहान बाळाप्रमाणे तिला बिलगली.


माय लेकरांच्या प्रेमाचा हा अद्भुत सोहळा होता. या सोहळ्याचा आनंद तिघही मनसोक्त घेत होते.

__________________________

क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात

निर्णय भाग

लेखिका…मीनाक्षी वैद्य