Bhagy Dile tu Mala - 30 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ३०

कसूर किसका है
इस बात का ऐब नही
सवालो से घिरी है मेरी हर सांस
क्यू किसींको अब फरक पडता नही
क्या खतम हो गयी है इंसानियत
या लोगो को अपणे स्वार्थ से प्यार है
बेहद आसानी से मूह फेर लेते हो
लगता है तुमको भी सिर्फ सुंदर चेहरेसे प्यार है

आयुष्यात अस एखादं निश्चित वय असत का ज्यावेळी आपण ठामपणे सांगू शकतो की आता मी माणसांना नीट ओळखू शकतो??

कदाचित नाही.... कारण साठी पार केलेले लोक सुद्धा जेव्हा आपलीच मूल त्यांना घराबाहेर काढतात तेंव्हापर्यंत त्यांना आपले कोण, परके कोण ह्याबद्दल अंदाजा येत नाही. सुखात तरी ठीक आहे की खोट का असेना लोक आपल्या अवतीभवती असतात पण आयुष्यात अगणित दुःख आलेले असताना खरच माणसांना ओळखण सोपं असत का???

माणस ओळखण्याशी वयाचा संबंध असतो का ह्याबद्दल कधी कधी शंका नक्कीच येते कारण समाजातील लोकांकडून तिच्या भावना समजून घेण्याची अपेक्षा होती तिथे स्वराला कुणीच समजून घेतलं नाही आणि जिला आपलं सत्य सांगितल्यावर ती आपल्याला सोडून जाईल ह्या भीतीने स्वराने माधुरीला कधीच सत्य सांगितलं नाही तीच त्या सर्वांपेक्षा समजूतदार निघाली, संवेदनशील निघाली. माधुरी तिच्याबद्दल ऐकून अस काही रिऍक्ट करू लागली होती जणू तिला त्याबद्दल फरकच पडला नव्हता. माधुरीच हे अस वागणं स्वरासाठी अनपेक्षित होत पण ते तिला मनातून सुखावून गेलं होतं. आता स्वरा माधुरीसोबत मुक्तपणे विहार करू शकत होती. तिच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती होती जी तिला आपलं सर्व सांगू शकत होती.

प्रेम मागून जगता येत नाही
प्रेम सांगून करता येत नाही
ही तर भावना आहे मना -मनाची
जी बोलून व्यक्त करता येत नाही

स्वराच्या आयुष्यात दुःख होते, यातना होत्या. त्रास देणारे व्यक्ती होते पण नशिबाने तिच्या आयुष्यात एक असा व्यक्ती नक्कीच असायचा जो तिला कधीच नकारात्मक होऊ देत नसे. कधी तिच्यासोबत आईबाबा होते तर कधी पूजा-कियारा आणि आता माधुरी. माधुरी वयाने नक्कीच लहान होती पण मनाने खूप मोठी. तिने स्वराच्या आयुष्यात आनंद तेवत ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. माधुरी असली की स्वराचा प्रत्येक क्षण हसण्यात, फिरण्यात जात होता. जेव्हापासून स्वराबद्दल तिला माहिती झालं होतं तेव्हापासून दोघांच नात आणखीच घट्ट होत गेलं. स्वराला आता तिच्यासमोर वावरताना भीती वाटत नव्हती त्यामुळे ती आणि माधुरी आता निवांत बाहेर फिरू लागल्या. माधुरीला सुट्टी असली की ती स्वराला मुंबईच्या वेगवेगळ्या जागा फिरवत होती आणि त्याच कारणाने तिच्या जीवनातील एकटेपणा नाहीसा झाला. माधुरीच्या आयुष्यात येण्याने स्वरा प्रॉब्लेमला उत्तमपणे डील करू लागली होती. पुन्हा एकदा ती केव्हा हसू, गाऊ लागली तिलाच कळलं नव्हतं.

इकडे दोघांच नात बहरू लागलं होतं पण ऑफिसमधली परिस्थिती काही बदलली नव्हती. सुरुवातीला स्वराला वाटायचं की ह्यात बदल व्हावे पण अलीकडे तिने तीही अपेक्षा सोडून दिली आणि आयुष्य नव्याने, आनंदाने जगू लागली. तिचा एक दिनक्रम ठरला आणि ती त्यात ती खुश राहू लागली. सॅलरी दर महिन्याला येत असल्यामुळे घरचे खुश होते तर घरचे खुश आहेत म्हणून तीही खुश राहू लागली. तिने आजपर्यंत जे जे स्वप्न पाहिले होते आता ते स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आणि त्यासमोर तिला बाकी काहीच दिसत नव्हतं. हेदेखील नाही की आपल्यावर अन्याय होतोय . अन्यायाची पण एक गंमतच आहे. एकदा आपण तो स्वीकारला की मग आपल्यावर अन्याय होतोय हेच विसरून जातो. आयुष्यातल्या अपेक्षा नाहीशा होतात आणि जे मिळत त्यात आपण खुश राहू लागतो. हे स्वेच्छेने करतो अस नाही. हा पण काय जादू आहे मनाची माहिती नाही त्याने एकदा स्वीकारलं की मग कुणीही ओरडून ओरडून जरी सांगितलं तरी त्याकडे लक्ष जात नाही.

ए दिलं मेरा कसूर बता दे
जिने की कोई वजह दिला दे
मैं भी तो हकदार हु तेरी मोहब्बत की
ए खुदा मुझे तेरा सच्चा यार बना दे

स्वराला आता ऑफिसमध्ये जॉईन होऊन एक वर्ष झाले होते. ह्या काळात ऑफिसमध्ये तीच एक वेगळं नाव झालं होतं पण फक्त नावच झालं होत. ती काम तर करायची पण त्याच क्रेडिट इतर लोक घेऊन जायचे. स्वराच्या कामामुळे सर्व लोक पसंद करत होते पण बंधने तोडून कुणीही स्वरासोबत बोलण्याचा किंवा तिची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याबातीत ती कायम सर्वांसाठी अनोळखीच राहिली. आजही स्वरा ऑफिसमध्ये आली आणि तिने दिवसभरात पटापट काम आटोपलं. काम आवरल की तिची नजर आधी जायची ती घड्याळावर. कारण तिचा दिनक्रम तोच होता. ऑफिसला येणे, काम करणे आणि वेळ होताच घराचा रस्ता पकडणे. स्वराच आज काम तर झालं होतं पण ऑफिस सुटायला अजूनही वेळ होता त्यामुळे स्वरा निवांत डोळे मिटून चेअरला टेकून बसली. ती काम करून थकली असल्याने काहीच क्षणात तिला झोप लागायला लागली. तिने डोळे मिटलेच होते की समोर दार उघडण्याचा आवाज आला. दार उघडण्याच्या आवाजाने स्वरा दचकून जागी झाली आणि उभी राहिली. समोर कुलकर्णी सर उभे होते. सरांनी तिला बघून स्माईल दिली आणि चेअरवर बसण्यास सांगितले. स्वरा चेअरवर बसली आणि सरांना न्याहाळू लागली. सरांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे उत्साह नव्हता. सरांची बॉडी लँग्वेज पण नेहमीप्रमाणे काम करत नव्हती. ती त्यांना न्याहाळतच होती की कुलकर्णी सर म्हणाले," स्वरा खूप खूप सॉरी!! "

सर आज अचानक सॉरी का म्हणत आहेत तिला कळत नव्हतं म्हणून प्रश्नःर्थक नजरेने ती उत्तरली," सॉरी कशासाठी सर?"

सर थोडे उदास होतच पुढे उत्तरले," सर्वच गोष्टींसाठी. तुला अशा कैदेत टाकण्यासाठी, तुझ्यापासून स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी, तुला माणुसकीची वागणूक न देण्यासाठी आणि आपण चुकतोय हे माहिती असूनही तुला ह्यातून बाहेर न काढण्यासाठी सॉरी!!"

स्वराच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं होतं कारण उशिरा का होईना कुणाला तरी ह्याची जाणीव झाली होती. नाही तर स्वरा ऑफिसमध्येही असून नसल्या सारखीच होती. तिच्यावर अन्याय होतोय हे तीच विसरली होती तर बाकीच्यांचा प्रश्न येतोच कुठे?? सरांचा चेहरा आता जास्तच उदास जाणवत होता आणि ती म्हणाली," सर आज हे सर्व तुम्ही का बोलत आहात? काही झालंय का ? मला सांगण्यासारख आहे का? असेल तर प्लिज सांगा मला आवडेल ऐकायला."

सर पुन्हा हळुवार उत्तरले," स्वरा आज माझा ह्या ऑफिसमध्ये शेवटचा दिवस आहे. सर्वांनी मला फेअरवेल दिलं त्यात पण मी तुला बोलावू शकलो नाही. खर तर स्वरा मला वाटलं होतं की इथे ऑफिसमध्ये मी जरी तुला सर्वांसोबत राहायची परवानगी दिली नाही तरी तुला इथले कलीग काही दिवसात नक्कीच स्वीकारतील आणि सर्व प्रॉब्लेम आपोआप नाहीसे होतील पण माझ्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या. त्यांनी कुणीच हे बंधन तोंडून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही आणि बघ ना आज तर मी स्वातंत्र्य होऊन इथून जातोय पण तू कायम इथेच अडकून राहशील. हे फक्त माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे. त्याची मला आज लज्जा वाटते आहे. माझ्या जागी ऑफिसला कुणी चांगला आला तर ठीक नाही तर पुन्हा तुला प्रॉब्लेम होतील. कदाचित तुझं जीवन पुन्हा विस्कळीत होईल. मला सर्व माहिती असूनही मी असा वागून गेलो तर जो नवीन येईल त्याला काही माहिती नसेल तो कसा वागेल हा विचार करून भीती वाटत आहे. काश मी तेव्हाच योग्य निर्णय घेतला असता?? ती वेळ निघून गेली त्यामुळे माझ्या हातात आता काहीच नाही. आज फक्त सॉरीच म्हणू शकतो. सॉरी स्वरा माझ्या चुकीची शिक्षा आता तुला कायम भोगावी लागेल आणि त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. "

त्यांचं बोलून झालं तरी स्वरा शांतच होती. स्वराला शांत बघून ते केबिन सोडू लागले तेव्हाच स्वरा म्हणाली," सर खर तर मला तुमचा राग नाही. तुम्ही आपल्या इतर कलीगच्या दृष्टीने विचार केला आणि त्यात काही गैर आहे अस मला वाटत नाही. खर सांगू तर थॅंक्यु. तेव्हा तुम्ही मला जॉब दिली नसती, फक्त चेहऱ्यावरून हाकलून लावून दिलं असत तर कदाचित आज माझ्याकडे मरण्याशिवाय पर्याय नसता त्यामुळे तुम्ही नकळत का होईना माझा जीवच वाचवला. मला तुमचा क्षणभर सुद्धा राग नाही. माझं नशीब सर कुणीच कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे पुढे कोण येईल, कसा येईल, तो कसा वागेल माहिती नाही पण मी स्वतःला सांभाळायला आता तयार आहे. तुम्ही काळजी करू नका आणि हा विचार तुम्ही मनातून काढून टाका की तुमच्यामुळे मी अशी आहे उलट तुमच्यामुळेच मी आज आनंदी आहे हे आवडीने सांगेन. मी तुम्हाला खूप मिस करेन सर. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा."

स्वराने उठून हँडशेक केला आणि स्वरानीही तो आनंदाने स्वीकारला. सरांच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू पसरल होत आणि ते आनंदी होत म्हणाले," स्वरा प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगेन तुझ्यासारखी मुलगी खरच मी कुठेच बघितली नाही. माझ्या हातून चूक झाली ह्यात वाद नाही पण मला वाटत की तुझ्या आयुष्यात असा एक व्यक्ती नक्किच येईल जो तुझा पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. हा माझा आशीर्वाद आहे. अस म्हणतात की आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि मला विश्वास आहे की तुझ्या आयुष्यात आता खूप काही चांगलं होणार आहे."

सर हसत हसत निघाले तर स्वरा सरांकडे बघतच राहिली. सर जाताना तिला आशीर्वाद देऊन गेले होते पण तिला त्याहीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीचा विचार आला होता.

ऑफिसला सुट्टी होताच स्वरा सरांना शेवटच भेटून घराकडे निघाली. आज ती घराकडे तर निघाली होती पण तिच्या चेहऱ्यावर आज नेहमीप्रमाणे तरतरी नव्हती. ती ट्रेनमध्येही बसली तरीही तीच लक्ष कुणाकडे नव्हतं. लेडीज डब्यामध्ये आज खूप गर्दी होती, स्त्रियांचा नुसता चिवचिवाट सुरू होता तरीही स्वराला त्याचा काही फरक पडत नव्हता. काहीच क्षणात ट्रेन वांद्रेला येऊन थांबली आणि काहीच क्षणात सुरू झाली. माधुरी अलगद त्या डब्यात चढली आणि स्वराच्या मागे येऊन उभी राहिली तरीही स्वराच लक्ष तिच्याकडे गेलं नव्हतं. पुढचे पाच मिनिटं माधुरी तशीच तिच्या मागे उभी राहिली पण तरीही स्वराने तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि माधुरीने शेवटी विचारलेच," ताई काय झालं काही टेन्शन आहे का?"

माधुरीच्या आवाजाने स्वरा भानावर आली आणि तिच्याकडे पाहू लागली. स्वराला क्षणभर वाटलं तिला सांगू की नये पण लपवून ठेवण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून ती हळूच उत्तरली, " हो टेन्शन तर आहेच. आज कुलकर्णी सर ऑफिस सोडून गेले. उद्यापासून कुणीतरी तिथे नवीन येईल. तो कसा असेल माहिती नाही. शिवाय मला जॉब वरून काढून तर टाकणार नाही ना ह्याची भीती वाटतेय. आजपर्यंत जॉब कशीही होती पण होती तर सही पण उद्या काय होईल ह्याच टेन्शन आलंय."

माधुरी थोडी हसतच उत्तरली," ताई तू नकारात्मक का विचार करत आहेस!! तो जर चांगला निघाला आणि त्याने तुला बंधनातून काढलं तर मग?"

स्वरा काहीच बोलली नाही. ती विचारच करत होती की माधुरी पुन्हा म्हणाली," ताई मला ना मनापासून वाटत की तुझ्या आयुष्यात दुःख आता जास्त काळ राहणार नाहीत. तुलाही तुझ्या आयुष्यात खूप आनंद मिळणार आहे बघतच राहा. दुःख आणखी किती दिवस राहणार आहेत? त्यांचीही वेळ आलीय परत जाण्याची."

आज माधुरी एकटीच नव्हती जी अस काही बोलली होतीं. कुलकर्णी सर देखील असच म्हणाले होते तरीही स्वरा काही खुश झाली नव्हती. तिने अगदी काही दिवसात इतके वाईट अनुभव घेतले होते की ती आता इच्छा असूनही सकारात्मक विचार करू शकत नव्हती. आज माधुरी खूप खूप छान छान बोलत होती पण स्वराच्या चेहऱ्यावरून दुःखाच्या छटा काही दूर झाल्या नव्हत्या. उद्या काय होईल ह्या विचाराने तिचा मेंदू ब्लॉक झाला होता आणि तिला नको त्या विचारांनी त्रास द्यायला सुरुवात केली.

भीती वाटते मला माझ्याच चेहऱ्याची
मग सांग तरी आशा ठेवू कशी चांगले घडण्याची ?

क्रमशा ....


Share

NEW REALESED