Nirbhaya - 4 books and stories free download online pdf in Marathi

निर्भया - part- 4.

निर्भया - ४

काही दिवसांनी दीपाची प्रकृती सुधारली. तिने हाॅस्पिटलमध्ये ड्यूटीवर जायला सुरुवात केली. " जे काही घडलं, त्यात तुझी काहीही चूक नाही. तुला खाली मान घालायची गरज नाही!" हे आईचे शब्द तिच्या मनावर कोरले गेले होते. ती स्वभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत होती, आणि परिस्थितीशी जमवून घेत होती. आईला आणि नितीनला दुःख होऊ नये, म्हणून ती त्या घटनेचा परिणाम तिच्यावर किती झालाय, हे दाखवत नव्हती. जर घरातलं वातावरण बिघडलं तर त्याचा परिणाम आपल्या भावाच्या अभ्यासावर होईल अशी भिती तिच्या मनात होती त्यामुळे आपलं वागणं तिने संतुलित ठेवलं होतं.

तिच्यावर पाशवी अत्याचार करणा-या त्या तीन तरूणांना काळोखामुळे नीटसं पाहिलं नव्हतं. ख-या आरोपींना पोलीसांनी समोर उभं केलं असतं, तरी ती ओळखू शकली नसती. एखादा निरपराध पकडला जाण्याचीही शक्यता होती. शिवाय आतापर्यंत काही ठराविक लोकांनाच घडलेली घटना माहीत होती. झाल्या प्रकाराचा बोभाटा झाला तर आईला त्रास होईल असं तिला वाटत होतं. शिवाय जर कोर्ट- कचे-या झाल्या असत्या, आणि ती कोर्टात गुन्हेगारांना ओळखू शकली नसती तर ती कोर्टात खोटी ठरली असती. या भीतीपोटी तिने केस पुढे चालविण्यास पोलीसांना नकार दिला.

राकेशने तिला भेटणं पूर्णपणे बंद केलं होतं. शेवटी वाट पाहून दीपाने एकदा त्याच्या आॅफिसमध्ये फोन केला; तेव्हा तो थंड आवाजात म्हणाला,

"मी जेव्हा हाॅस्पिटलमधे होतो, तेव्हा आई-बाबा तिथे आले होते. त्यांना झालेला सर्व प्रकार समजला. आता त्यांनी आपल्या लग्नाला स्पष्ट नकार दिला आहे. जिच्या चारित्र्यावर डाग आहे अशी सून आम्हाला नको, असं त्यांचं म्हणणं आहे." दीपाविषयीच्या प्रेमाचा लवलेशही त्याच्या बोलण्यात नव्हता.

"अरे राकेश! पण यात माझी काय चूक होती? एवढ्या निर्मनुष्य ठिकाणी जाण्याची कल्पना तुझीच होती नं? हे तू त्यांना सांगितलं नाहीस?"

दीपा कळवळून बोलत होती. हे लोक लग्न मोडतायत यापेक्षाही आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातायत, याचं दुःख तिला जास्त होत होतं. आईला कळल्यावर तिला किती दु:ख होईल, याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. आई आताच डिप्रेशनमधून बाहेर आली होती. दीपाला भिती वाटत होती की काळजीमुळे परत आजारी पडेल. दीपाची स्वतःचीही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या लग्न करण्याची क्षमता नव्हती. पण जर राकेशने तिच्याशी लग्न करून वेळ निभावून नेली असती, तर लोकापवादाची धार बोथट झाली असती. आणि आईच्या मनावरचा ताण हलका झाला असता. पण राकेशला आता दीपाच्या बाबतीत कोणताच विचार करण्याची गरज वाटत नव्हती.

" ते काहीही असलं, तरी मी त्यांच्या मनाविरुद्ध जाऊ शकत नाही. यापुढे आपला मार्ग वेगळा आहे." तो स्पष्ट शब्दात बोलत होता. त्याच्या आवाजाला दु:खाची बारीकशी किनारही नव्हती.सहजीवनाच्या आणाभाका तो विसरून गेला होता. आज दीपाची ही अवस्था होण्याला तोच कारणीभूत होता हेसुद्धा तो सोइस्करपणे विसरला होता. दीपाला काय बोलावं कळत नव्हतं. तिच्या सर्व संवेदना जणू गोठून गेल्या होत्या.

***

गेल्या काही दिवसांच्या अनुभवांनी दुःख आणि अपमान यांची धार तिच्या हृदयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच बोथट होत होती. मनासारखेच डोळेही कोरडे झाले होते. "कधी तरी ते तिघे नक्कीच भेटतील. त्यावेळी माझ्या आयुष्याशी खेळ खेळणाऱ्या त्या जनावरांना चांगला धडा शिकवेन." ती मनाशी म्हणाली. त्यांचा सर्वतोपरी शोध घेण्याचा निश्चय तिने मनाशी केला. पण एवढया मोठ्या मुंबईत त्यांना शोधणं सोपं नव्हतं.

जेव्हा त्यांची गाडी समोर थांबली तेव्हा गाडीचा नंबर तिने पाहिला होता, पण त्यांचे चेहरे ती काळोखामुळे नीट पाहू शकली नव्हती. फक्त त्यांची पुसट प्रतिमा तिच्या मनात घर करून बसली होती.

***

एक वर्ष निघून गेलं. दीपा आता बरीच सावरली होती. तिची प्रकृतीही आता चांगली होती. एकदा ती हाॅस्पिटलमधे ड्यूटीवर असताना एक अॅक्सिडेंट केस आली. लोकप्रिय नेते गुरुनाथ कार अॅक्सिडेंटमधे थोडे जखमी झाले होते. त्यांना अॅडमिट करताना खूप गर्दी झाली होती, पण त्या सगळ्यांना घरी जायला सांगितलं गेलं. फक्त त्यांचे सेक्रेटरी मागे थांबले होते. गुरूनाथ सरांना काहीही धोका नाही, ते लवकरच बरे होतील असं डाॅक्टरांनी सांगितलं तेव्हा त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. "यांच्या घरी कळवायचं राहिलं." ते म्हणाले, आणि त्यांनी रिसेप्शनिस्टला नंबर देऊन फोन लावायला सांगितला. काही वेळातच गुरुनाथ साहेबांची पत्नी त्यांच्या भावाला- महेशला बरोबर घेऊन हाॅस्पिटलमधे आली.

ती दोघं बाजूने जात असताना, दीपाला मलबार - हिल प्रसंगातील त्रिकुटातील म्होरक्याने मारलेला परफ्यूम आठवला. तिने त्याला निरखून पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली! तिच्यावर बलात्कार करणा-या तरूणांचा म्होरक्या होता तो! तरीही तिने स्वतःला समजावलं. "कदाचित माझी ओळखण्यात चूक होत असेल. एवढ्या मोठ्या घरचा मुलगा असं कृत्य करणं शक्य नाही. माझ्या मनावर त्या प्रसंगाचा इतका परिणाम झालाय की, आजकाल समोर येणा-या प्रत्येक तरुणाकडे मी संशयाने बघतेय. त्याच्यावर आरोप करण्यापूर्वी सावधपणे शहानिशा करायला हवी."

महेशकडे पाहून असं वाटत होतं की तो नाइलाजस्तव तिथे बसलाय. त्याची चळवळ चालली होती. एकसारखा घड्याळाकडे बघत होता.

त्याची अस्वस्थता पाहून थोड्या वेळाने सुषमा- गुरुनाथ सरांची पत्नी दिराला म्हणाली,

"महेश भाऊजी! तुम्ही आता घरी जा! मी यांच्याबरोबर थांबते. गरज पडली तर फोन करेन." पडत्या फळाची आज्ञा मानून तो लगेच तिथून निघाला.

तो वाॅर्डमधून बाहेर पडताच, दीपा त्याच्या मागून पार्किंगमधे गेली. त्या दिवशीची ०१०१. नंबरची गाडी खाली उभी होती. तो त्या गाडीत बसून गेला ; हे तिने पाहिलं आणि तिची खात्री पटली; की तिचं आयुष्य उध्वस्त करणारा हैवान तोच होता! पण तिने आणखी सावधगिरी घ्यायचं ठरवलं. पक्की खात्री करून घेऊन नंतरच पोलीसांना त्याच्याविषयी सांगावं असं तिने ठरवलं. एवढ्या मोठ्या घरातील माणसावर असला आरोप करणं ही सोपी गोष्ट नव्हती. सबळ पुरावा मिळवणं आवश्यक होतं. त्यासाठी तिने महेशबरोबर ओळख वाढवायला सुरूवात केली.

गुरुनाथसाहेब हाॅस्पिटलमधे असेपर्यंत तो अनेक वेळा आला. गुरुनाथ सरांसारख्या सहृदय माणसाचा भाऊ इतका पाषाणहृदयी असावा याचं तिला आश्चर्य वाटत होतं.त्याला शिक्षा होणं म्हणजे गुरुनाथसारख्या समाजसेवकाच्या प्रतिष्ठेला डाग लागणार होता. पण महेशसारखा नरपशू मोकाट फिरणंही ठीक नव्हतं.

स्त्रियांमधे विशेष रुची असणा-या महेशचं दीपाच्या सॊदर्याकडे लक्ष जाण्यासाठी तिला फार प्रयत्न करावे लागले नाहीत.त्याने स्वतःच तिच्याशी ओळख करून घेतली आणि मैत्री वाढवली. त्या रात्री काळोखात एकदाच तिला पाहिलं होतं. त्यामुळे त्याने तिला ओळखलं नाही. आपल्या मैत्रीविषयी इतक्यात कोणालाही सांगायचं नाही असं तिने महेशला निक्षून सांगितलं होतं. योग्य वेळी दोघंही एकदमच आपापल्या घरी सांगू , असं ती त्याला म्हणाली होती. आणि त्याला तरी कुठे तिच्याशी लग्न करायचं होतं? जवळीक वाढवून तिचा विश्वास बसला, की तिच्याशी काही दिवस फायदा घ्यायचा, आणि कंटाळा आला, की तिला सोडून द्यायचं हे त्याने आधीच ठरवलं होतं. अजूनपर्यंत सहवासात आलेल्या अनेक मुलींशी तो अशाच त-हेने वागला होता. त्यामुळे त्याच्या आणि दीपाच्या मैत्रीविषयी कोणाला कळलं नाही, तर त्याच्या फायद्याचंच होतं.

एक दिवस बोलता बोलता ती त्याला सहज स्वरात म्हणाली, " तुझ्या जवळचे मित्र वगैरे कोणी आहेत की नाही? कधीतरी ओळख करून दे त्यांच्याशी! "

" हो! माझे दोन जिवलग मित्र आहेत. तुझ्याशी ओळख करून द्यायचीच आहे एकदा! आपण एक काम करूया. मालाडला आमचं फार्महाऊस आहे, तिथे एक दिवस आपण छानशी पार्टी करूया. पण त्यांना पार्टीमध्ये व्हिस्की लागते. तुझी काही हरकत नाही नं ?" दीपाला अशीच संधी हवी होती. "तीन मित्र पार्टीसाठी एकत्र येतील, तेव्हा चार पेग पोटात गेले, की मर्मबंधातील गुपित जिभेवर आल्याशिवाय रहाणार नाहीत." ती मनात म्हणाली.

***

Contd..... PART- 5