Rudra - 7 books and stories free download online pdf in Marathi

रुद्रा ! - ७

मनोहरने हात डोक्याच्यावर ताणून मोठा आळस दिला. आपला हरामखोर बाप कुबेर आहे आणि त्याचा काटा परस्पर काढायचाय हे त्याने जेव्हा नक्की केले,तेव्हा त्याचा घरातील बित्तंबातमी हाती असणे आणि ती पुरवणारी व्यक्ती हुडकणे गरजेचे होते. जसवंत शिवाय इतर कोणीच हे काम करू शकणार नव्हते. जसवंताताचा इतिहास शोधताना, मनोहरला ते हुकमी शस्त्र घावले! जसवंतला गांजाचे जबरदस्त व्यसन होते! मनोहरने अर्थात त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला!
"जसवंत, मी तुला गांजाच्या पुड्या देत जाईल, त्या बदल्यात तू मला संतुकरावची माहिती दे!" मनोहरने एक दिवस जसवंत समोर सरळ प्रस्ताव मांडला. विना पैशाच्या 'माल' मिळतोय! अशी संधी जसवंत सोडणार नव्हता!
"काय माहिती? अन कशाला?" जसवंतने सावध पैंतरा घेतला.
"तुला काय करायचंय?"
"तुला काही माहिती दिली अन भलतंच काही झालं तर?"
"मी विचारीन त्यात धोका वाटला तर नको माहिती देऊ! 'माल' पण नाही मिळणार! 'धोका' काही कृत्य केलेतर होतो. फक्त 'माहिती' दिल्याने होत नाही. अन तू मला माहिती देतोस हे कुणाला कळणार आहे? पहा विचार कर!"
"ठीक! मला वाटलं तरच मी माहिती दिल! माहिती दिली की 'माल' मात्र मिळाला पाहिजे!"
"लगेच देत जाईल!"
"विचार."
"संतुकराव कसे आहेत?"
"राजा माणूस! पगारीला तक-तक नाही! दिवाळी बोनस ठरलेला! एक जानेवारीला दोन नवे कोरे ड्रेस! रहायला आऊट हाऊस. जेवण नाश्ता त्यांच्याच किचन मधून !आपुन खुश आहोत! फक्त साल सुट्टी देत नाही!"
" रात्री कितीला झोपतात?"
"नक्की माहित नाही. पण जेवण रात्री नऊच्या ठोक्याला करतात. "
नऊला जेवण म्हणजे साडेदहा अकराच्या दरम्यान झोपत असावे. "सकाळी केव्हा उठतात?"
" सकाळी सहाला !"
"काही 'नाद'? बाई ,बाटली?"
" काहि नाही. "
" काही सवयी ?"
" सवय म्हणशील तर सनकी आहे! बेडरूम मध्ये रोज झोपणारा, एक दिवस बाहेर बाल्कनीत झोपले! एकदा तर गार्डन मधल्या झोपाळ्याला मच्छरदाणी लावूनच झोपले!"
" ठीक . आज इतकंच ! पुन्हा चार दिवसांनी भेटतो! आणि हो हे आजच्या माहितीचा मोबदला." मालाच्या दोन पुड्या देत मनोहर म्हणाला.
संतुकरावानी मनोहरची भेट नाकारली त्याला महिना झाला होता. मनोहरने रुद्राला 'नक्षत्र 'ची रेकी करून ठेवण्यास सांगितले होते. जसवंत 'माला'त फसला होता. खुनाचे स्थळ पक्के होते! नक्षत्र ! वेळ पक्की होती! रात्रीची! फक्त दिवस ठरवायचा होता! आणि मनोहर तो आज ठरवणार होता! त्याने जसवंतला 'येतो' म्हणून कळवले.
"जसवंत आज तुझे मालक बाहेर गावी गेलेत का ?"
" नाही! रात्री येणार आहेत बंगल्यावर!"
" बेडरूम मध्येच झोपणार कि --"
"नाही! हल्ली ते आऊट हाऊस मध्ये झोपतात!"
"काय? "
"हो! गेल्या महिन्याभरा पासून ते आऊट हाऊस मधेच झोपतात!"
मनोहरची भेट नाकारली त्याला महिनाच झाला होता!
" का?"
" सनकीपणा! दुसर काय ?"
"आज अजून एक फेवर पाहिजे! त्या साठी तुला ऍडिशनल माल देतो!"
" काय?"
"मी ठीक नऊला येतो. मला तो झोपतो त्या आऊट हाऊस मध्ये फक्त पंधरा मिनिटे जाऊ दे! "
" कशाला? काय बॉम्ब बिंब ठेवणार कि काय ?"
तसा या बुटक्या माणसाला पंधरा मिनिटेच काय दिवसभर जरी त्या आऊट हाऊस मध्ये सोडले तरी काही हरकत नव्हती! फार गडबड वाटली तर एक फटक्यात लोळवता येणार होते! जसवंतला आपल्या शक्तीवर भरोसा होता.
"मी मोकळ्या हाताने येईन तू तपासून घे!"
" ठीक! ये!"
मनोहरने त्याला दोन गांज्याच्या पुड्या दिल्या! आज त्या जरा ज्यास्तच जाड वाटत होत्या.
" हा, मनोहर रात्री येताना बोनस माल घेऊन ये! " पुड्या खिश्यात सारत जसवंत म्हणाला.
०००
रात्री आठच्या दरम्यान मनोहरने चार गांज्याच्या पुड्या कपाटातून काढून खिश्यात टाकल्या. तसेच एक प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेले , बारीक वायरचे काही इलेकट्रोनिक्स सर्किट त्याने दुपारी खपून तयार केले होते ते खिश्यात सारले.त्याने इलेक्ट्रॉनिक्सचा केलेला हार्डवेअरच्या कोसेर्स आज कामाला आला होता.
त्याने रुद्राला फोन लावला.
"रुद्रा, आज तयारीत रहा. म्हातारा रात्री अकराच्या दरम्यानच्या आऊट हाऊस मध्ये असण्याची शक्यता आहे. मी तुला साडेदहाच्या सुमारास खात्रीलायक टीप देतोच! साधारण तुला नक्षत्र गाठायला किती वेळ लागेल?"
" मी तयारच असतो! पंधरा मिनिटात मी तेथे पोहोचेन. पण गार्डचे काय?"
"एकच आहे. पण त्याची काळजी करू नकोस! तो आज गांज्याचा तारेत असेल! मी त्याची सोय करतोय!"
"ओके."
०००
मनोहरने आपली कड्डम, तरी भरोशाची बाईक काढली. भरवशाची म्हणजे आजवर कधी तिने दगा दिला नव्हता! 'नक्षत्र ' जवळच्या एका कोळोख्या झाडाच्या आडोश्याला ती मुंगळ्या सारखी दिसणारी त्याची बाईक त्याने पार्क केली. अंधाराला डोळे सरावल्यावर मनोहर 'नक्षत्र ' च्या मेन गेट जवळच्या जसवंतच्या केबिन जवळ गेला. जसवंत खुर्चीत तंगड्या पसरून बसला होता. बहुदा दम निघाला नसावा, एखादी पुडी त्याने चढवली असावी.
"जसवंत!" त्याने हलकेच आवाज दिला.
"हू " जड डोळ्यांनी त्याने मनोहरला पहिले आणि मानेनेच 'जा' म्हणून गेट उघडून दिले. मनोहर सावली सारखा आत अंधारात मिसळून गेला.
मनोहर बंगल्या मागच्या त्या आऊट हाऊस कडे जाताना त्याने खिशातून हातमोजे काढून हातावर घातले. झिरो बल्बच्या उजेडात आऊट हाऊसचे दार लख्ख दिसत होते. मनोहर आत घुसला. आत शेड असलेला टेबल लॅम्प लावून खोलीत प्रकाश केला. समोर भिंतीला लागून कॉम्पुटर टेबल, त्याच्या मागे एक चेयर, टेबलवर पुस्तके, वही, पेन असे सटरफटर सामान होते. त्याने आपली शोधक नजर भिंतीवरून फिरवली. टेबल ज्या भिंतीस लागून फिक्स केला होता त्यावर एक उगवत्या सूर्याचे पेंटिंग होते. ते पाहून मनोहर समाधानाने हसला. त्याने खिशातून छोटा स्पाय कॅमेरा आणि त्याची असेम्ब्ली काढली. पेंटिंगच्या सूर्यावर तो कॅमेरा फिक्स केला. या पॉईंट पासून फक्त खुर्चीत बसल्याच माणसाची नाही तर सगळ्या खोलीचे चित्रीकरण होणार होते.! रेकॉर्डिंग असेम्ब्लीत आठ GBचे कार्ड सहा तासाची रेकॉर्डिंग साठवू शकणार होते. त्यातली बॅटरी बारा तास चालू शकत होती. त्याने ती असेम्ब्ली ऑन करून पेंटींगच्या मागे फटीत सरकवली! तो बाहेर पडणार तेव्हड्यात बाहेरचे दार वाजले! तो झटकन अंधाऱ्या कोपऱ्यात सरकला. दारात डाव्या हातात दंडुका घेतलेला जसवंत उभा!
"मनोहर चल निघ! मालक केव्हाही येऊ शकतो!"
मनोहर घराबाहेर पडला आणि अंधारात सरकला. जसवंतने दार लावून घेतले आणि सटकण्याच्या बेतात असलेल्या मनोहरचे गचांडी पकडली! साला गांजाकस! न बोलता मनोहरने दोन गांज्याच्या पुड्या त्याचा हातात ठेवल्या आणि स्वतःची सुटका करून घेतली.
समोरून कोणी तरी मोबाईलच्या प्रकाशात येत होते. ते संतुकराव होते!
"जसवंत इथे काय करतोयस? आणि गेटवर कोण आहे?"
"सर, गेट लॉक केलाय. अकराची राऊंड आज जरा लवकर उरकतोय. सगळं ठीक आहे का पहातोय!"
"तुझा आवाज असा का थरथरतोय? का पुन्हा गांजा -----"
" ना --नाही सर! तो मी मागेच सोडलंय!"
"मग ठीक. मेन गेट वर जा !"
" जी सर!"
गांजाचं एक बर असत त्या दारू सारखं वास मारत नाही! खिशातल्या पुड्या चापचत तो गेटकडे सटकला. आता सकाळी पाच पर्यंत निवांत होत. तेव्हा आता एखादी पुडी ---- मुळीच हरकत नव्हती!

०००

संतुकराव आणि जसवंत बोलत असताना मनोहर गेट बाहेर पडला. त्याने फोन काढला आणि रुद्राचा नम्बर लावला.
"म्हातारा आऊट हाऊस मध्ये आहे!"एकच वाक्य बोलून त्याने फोन कट केला!
रूद्रा तयारीतच होता. तो 'नक्षत्र'च्या रोखाने निघाला!
०००
फोन बंद करून मनोहर आपल्या बाईक जवळ अंधारातच थांबला. तेथून तो नक्षत्र बंगला, त्याचे मेनगेट आणि परिसर दिसत होता. साधारण तासा दीडतासाने एक व्यक्ती झापाझपा ढांगा टाकत बंगल्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरून आली आणि झाडीत अदृश्य झाली.! तो रूद्रा असल्याचे मनोहरने चटकन ओळखले. कोठे तरी मोटरसायकल स्टार्ट झाल्याचा आवाज झाला आणि विरून गेला. रूद्रा निघून गेला होता!
मग मात्र मनोहरने वेळ दवडला नाही.पायातले बूट त्याने बाईक जवळच काढून ठेवले. नुसत्याच पायमोज्यावर, तो जसवंतच्या केबिन जवळ आला. अपेक्षेप्रमाणे जसवंतने लागोपाठ दुसरी पुडीही चढवली होती. नशेतच त्याने मनोहर साठी गेट उघडले आणि पुन्हा काहीतरी बरळत तंगड्या फाकवुन खुर्चीत फतकल मारून बसला.
आऊट हाऊसचे दार आतून बंद होते. मग रूद्रा आत कसा गेला? मनोहरने आऊट हाऊसला वळसा घातला. खिडकी उघडी होती. हाती ग्लोज असल्याची खात्री करून तो खिडकीतून आत गेला. निर्जीव डोळ्याचे संतुकराव त्या टेबल लॅम्पच्या उजेडात भयानक दिसत होते! क्षणभर मनोहरच्या अंगावर काटा आला. त्याने पेंटिंग मागची असेम्ब्ली आणि कॅमेरा हस्तगत केला आणि खिडकीतूनच बाहेर पडला!भोसेकर चाळीच्या खोलीत त्याने पाऊल टाकले तेव्हा सकाळचे तीन वाजले होते! काम मनासारखे झाले होते!
०००
दुसरे दिवशी मनोहरला जाग आली तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते! रात्रीच्या जागरणाने डोळे अजून चुरचुरत होते. त्याने गार पाण्याने अंघोळ उरकली तेव्हा कोठे त्याला फ्रेश वाटले. त्याने काळजी पूर्वक रात्री झालेली स्पाय कॅमेराची शूटिंगची प्रिंट तपासली. चार तासाच्या व्हिडिओत फक्त पंधरा मिनिटाचा मुख्य ड्रामा होता! सर्व प्रथम त्याने ती क्लिप एडिट करायला घेतली. थोडासा ब्राईटनेस आणि कन्ट्रास्ट ऍडजेस्ट केला. तो कॅमेरा कलेक्ट करायला गेला होता त्या भागाचेही चित्रीकरण झाले होते. ते त्याने कट करून डिलीट करून टाकले. झकास! मस्त काम झाले होते.
या क्षणी मनोहर भयानक खुश होता. त्याची आत्तापर्यंतची योजना सुरळीत पार पडली होती. हे इतके सहज घडेल असे त्याला वाटले नव्हते. संतुकरावच्या खुनाचे फक्त दोनच धागे त्याच्या पर्यंत पोहचू शकत होते. जसवंतचा प्रत्यक्ष धागा होता तर रुद्राचा अप्रत्यक्ष घागा ! या दोघांवर मात करणे गरजेचे होते. आणि त्याची स्पष्ट योजना मनोहरच्या डोक्यात तयार होती!
या शूटिंगच्या आधारे राघव रुद्राच्या मुसक्या आनंदाने आवळणार होता. पण त्या पूर्वी काही रक्कम, किमान त्याने सुपारी साठी दिलेले तीन लाख तरी वसूल करण्याचा त्याचा मानस होता! म्हणून मनोहरने त्या शूटिंगची एक छोटीशी क्लिप सिलेक्ट करून आपल्या मोबाईलवर घेतली. आणि रुद्राचा फोन नम्बर फिरवला.

"रुद्रा बोलतोय!"
"हो मला माहित आहे! तुझ्या कडे किती पैसे आहेत?"

(क्रमशः )