Pyar mein.. kadhi kadhi - 19 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-१९)

प्यार मे.. कधी कधी (भाग-१९)

कॉफीचा दुसरा कप संपत आला होता, पण प्रितीचा काहीच पत्ता नव्हता. पुन्हा एकदा घड्याळात नजर टाकली. एक तास होऊन गेला होता. मनातली बैचैनी क्षणा-क्षणाला वाढतच होती.

अस्वस्थपणे मी पुन्हा एकदा कॉलेजच्या गेटकडे नजर टाकली.

प्रितीचा आज रिझल्ट होता.

जेंव्हा कॉलेजपाशी प्रितीला सोडलं तेंव्हा सॉलीड टेन्शनमध्ये होती.

“आय एम स्केअर्ड तरुण…”, तिचा थंड पडलेला हात माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली होती, “आय डोन्ट वॉन्ट टू फ्लंक..”
“कश्याला काळजी करतेस प्रितु.. होशील अगं पास..”, मी समजावणीच्या स्वरात म्हणालो होतो.
“काळजी करु नको म्हणजे.. कसा अभ्यास केलाय.. आणि काय पेपर लिहीले आहेत ते आता आठवतय मला तरुण..”
“पण का? मग करायचास ना अभ्यास..”

“करायचास ना अभ्यास म्हणे..”, प्रिती चिडुन म्हणाली, “तेंव्हा तुच होतास ना माझ्या सगळ्या वह्या-पुस्तकांत.. माझ्या मनात.. सगळीकडे तुच होतास.. कसा करणार होते मी अभ्यास…”

खरं तर प्रिती इतकाच मी सुध्दा टेन्शनमध्ये होतो.. प्रिती नुसती पासच नाही तर निदान किमान फर्स्ट-क्लास तरी मिळावा अशी इच्छा होती. म्हणजे निदान माझ्या आई-बाबांशी बोलताना, तेव्हढंच एक सांगता आलं असतं. आईने विचारलं असतं काय करतेस सध्या.. तर काय सांगणार होती? नापास झालीय म्हणुन? विषय राहीलेत म्हणुन?

१० मिनीटांत येते म्हणुन जी गेली होती, आता तासभर उलटुन गेला तरीही पत्ता नव्हता.

थंड झालेली कॉफी एका घोटात संपवुन टाकली आणि अजुन एका कॉफीची ऑर्डर द्यावी का असा विचार करत असतानाच प्रिती कॉलेजच्या गेटमधुन बाहेर येताना दिसली.


“तरुssssssssssण”, रस्त्याच्या पलीकडुनच मार्कलिस्ट हवेत हलवत प्रितीने हाय केलं..
निदान चेहरा तरी आनंदी होता म्हणजे किमान नापास तरी झाली नव्हती.. मनाला तेव्हढंच समाधान लाभलं.

मी पट्कन उठुन हॉटेलच्या बाहेर आलो..

“फर्स्ट क्लास शोनु…”, प्रिती लांबुनच ओरडुन सांगत होती.

हा शोनु कोण ह्याचा शोध घेत आजुबाजुने जाणार्‍या लोकांच्या नजरा माझ्यावर येऊन थांबत होत्या..

“श्शु..”.. तोंडावर बोट ठेवत मी म्हणालो.. “आधी इकडे ये.. तिकडुनच नको ओरडुस..”

पण प्रितीला काहीच ऐकु येत नव्हते.. मार्कलिस्ट हवेत नाचवत ती अर्धा रस्ता क्रॉसकरुन डिव्हायडर वर येऊन थांबली..
“बघ.. बघ.. फर्स्ट क्लास आहे मला.., चल जाऊ तुझ्या घरी.. काय म्हणतोस..”, प्रिती तिकडुनच मला विचारत होती.

“ओके..”, मी हसत हसत मान हलवली.

प्रितीने रस्ता ओलांडायला सुरुवात केली.. त्याच वेळी समोरुन येणार्‍या एका कारकडे माझं लक्ष गेलं. प्रिती माझ्याकडेच बघत येत होती, तर कारवाला आपल्याच नादात फोनवर बोलत येत होता.

“प्रिती.. लेफ्ट बघ..”, मी ओरडुन म्हणालो..
“अं? काय?”, प्रिती
“चं..थांब तिथेच..”, म्हणुन मी गडबडीत रस्ता ओलांडुन पलीकडे गेलो आणि तिला मागे ढकलले..

नशीबाने त्या कारवाल्याचे लक्ष गेलं आणि त्याने पट्कन गाडी बाजुला घेतली नाही तर आम्ही दोघंही उडलोच असतो. खिडकीतुन वाकुन त्याने आम्हाला दोनचार शिव्या हासडल्या.

गर्लफ्रेंडसमोर शिव्या खालेल्या कुणाला आवडेल.. मी ही दोनचार ‘भ’चे शब्द त्याला ऐकवले आणि माघारी वळलो परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. मागुन येणारा ४०७ टेंपो, खुपच जवळ येऊन थांबला होता, मी पट्कन बाजुला व्हायचा प्रयत्न केला पण बॉनेटच्या साईडची एक जोराची धडक हाताला बसली आणि मी मागे फेकलो गेलो…

रस्त्यावर आदळलो तेंव्हा पाठीतुन एक सण्कन कळ शरीरभर पसरली.. उजवा पाय जोरात फुटपाथवच्या टोकावर आपटला… सगळं जग गोलाकार फिरतंय असंच जणु वाटायला लागलं. डोकं आणि मानेच्या मधुन कसलासा गरम स्त्राव बाहेर आलेला जाणवला.

मला फक्त प्रितीचा आवाज ऐकु येत होता.. “तरुण.. ओ माय गॉड.. तरुण.. आर यु ओके?… ऑटो..! ऑटो.. प्लिज स्टॉप…”
माझं सर्व शरीर बधीर झालं होतं.. शरीराला कुठलीच वेदना जाणवत नव्हती.. पण प्रितीला इतकं हेल्पलेस पाहुन मनाला खुप वेदना होतं होत्या.. मी उठुन बसायचा प्रयत्न केला.. पण व्यर्थ.. शरीरातली सर्व ताकद हरपली आणि मी बेशुध्द झालो.


कित्ती तरी वेळाने संवेदना जाग्या झाल्या. मी कुठे आहे.. काहीच कळत नव्हते.
प्रितीच्या मुसमुसण्याचा आवाज येत होता. कोणी तरी तिला ‘मी बरा होईन..’ वगैरे सांगत होतं, तर कोणी तरी ‘माझ्या आई-बाबांचा फोन नंबर विचारत होते..”

मध्येच कोणीतरी डॉक्टर आले वगैरे म्हणालं.. तर मध्येच कोणी तरी प्रितीला पोलिसांशी बोलुन एफ़-आय-आर नोंदवायला सांगत होते.

बिच्चारी प्रिती.. एकटी पडली होती. मला डोळे उघडायची इछा असुनही उघडता येत नव्हते. कोणीतरी एव्हाना डोक्याला बॅन्डेज वगैरे बांधत होते. काही वेळातच मी पुन्हा बेशुध्द झालो.


बहुतेक संध्याकाळी खुप उशीरा जाग आली. कुठल्याश्या हॉस्पीटलच्या एका खोलीत मी होतो. प्रिती बेडशेजारच्या खुर्चीत बसुन होती.
मी डोळे उघडलेले बघताच ती पट्कन उठुन माझ्याशेजारी आली.

“हाऊ आर यु.? त्रास होतोय काही? खुप दुखतंय का?”
“आय एम फ़ाईन..”, मी कसाबसा म्हणालो.. “काय झालंय…?”
“नथीग.. डॉक्टर म्हणाले.. फार काही नाही.. ब्लड लॉस झाल्याने अशक्तपणा आलाय.. फक्त..”
“फक्त काय?”, मी घाबरुन विचारलं..
“नाही म्हणजे.. फक्त पायाला प्लॅस्टर आहे तुझ्या.. छोटंसं ऑपरेशन करावं लागलं.. दोन स्क्रु लावलेत घोट्यापाशी..”, प्रिती पायाकडे बोट दाखवत म्हणाली..

“ओह.. माय गॉड.. मग आता?”
आता काही नाही.. महीनाभर आराम करायचा..”, प्रिती चेहर्‍यावर उसनं हासु आणत म्हणाली.

मी मगाचपासुन बघत होतो.. ती माझ्याशी नजरानजर टाळत होती.

“काय झालं प्रिती.. एव्हरीथींग ऑलराईट..”
“माझ्यामुळे झालं ना हे तरुण.. मीच मुर्खासारखं रस्ता क्रॉस करत होते.. सो सॉरी शोनु..”, तिला रडु आवरत नव्हते.

मला त्या स्थितीतही हासायला येत होते.. पण शक्यतो मी हासु आवरलं.
हॉस्पीटलची ती हिरव्या-निळ्या पडद्यांची रुम, प्रितीच्या असण्याने सुध्दा कित्ती फ्रेश वाटत होती..

मी काही बोलणार एव्हढ्यात आई खोलीत आली..

“अरे.. आलास तु शुध्दीवर?”, माझ्याकडे बघुन म्हणाली.. “मला फोन नाही का करायचास.. इथेच तर गेले होते खाली..”, प्रितीकडे बघुन म्हणाली.
“मी करणारच होते ऑन्टी फोन..”, प्रिती नाक पुसत म्हणाली..

नक्की काही तरी बिनसलं होतं.. प्रिती थोड्यावेळ थांबली आणि मग बाहेर जाऊन बसली.

“तु काय करत होतास रे तिच्याबरोबर.. असली लोकं भरली आहेत का तुमच्या ऑफीसमध्ये?”, आई म्हणाली
“आई प्लिज.. तिची काही चुक नाहीये..टेम्पो..”
“तु आज्जीबात तिची बाजु घेऊ नको… तुला इथे ज्या लोकांनी आणलं.. त्यांनी सांगीतलं.. ती न बघता रस्ता क्रॉस करत होती.. आणि तु तिला कारपासुन वाचवायला गेलास तर…”
“आई.. ते लोकं काय.. काही पण बोलतात.. आपण त्यांच ऐकायचं का?”
“आणि पोलिस.. एफ़.आय.आर केली त्यांनी.. त्यात पण तेच लिहीलय..”

बोलता बोलता आईचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या प्रितीच्या मार्कलिस्ट कडे गेलं.. बर्‍याचवेळ तिने मार्कलिस्ट बघीतली आणि मग मला म्हणाली..

“खोटं बोललास ना तु माझ्याशी..? तुझ्या ऑफीसमध्ये नाहीये ना ती..? अंडर-ग्रॅज्युएट्स कधी पासुन तुमची कंपनी लोकं घ्यायला लागली..?”
“आई प्लिज.. ऐक तर..”

पण मी काही बोलेपर्यंत आई बाहेर निघुन गेली होती.


एक आठवड्याने मला डिस्चार्ज मिळाला. उभं रहाताना पायातुन वेदनांचा लोळ वाहात होता. वाटत होतं, प्रितीचा हात हातात धरावा.. तिच्या खांद्याच्या सहार्‍याने चालावं, पण आई-वडील बरोबर असल्याने शेवटी वॉर्ड-बॉयच्या सहार्‍याने कसाबसा टॅक्सीत जाऊन बसलो.

“सगळाच प्रॉब्लेम झालाय, विमला मावशीकडे कामांचा ढीग पडलाय, माझ्या भरवश्यावर होती ती.. आता मीच नाही गेले तर..”, घरी आल्यावर आई म्हणत होती.

मावशीकडचं बारसं आठवड्यावर येऊन ठेपलं होतं.. पण आता मी घरीच म्हणल्यावर आईचा मोठ्ठा प्रॉब्लेम झाला होता.

“डोन्ट वरी मम्मीजी, आय विल टेक केअर अ‍ॅट होम..”, अचानक प्रिती म्हणाली.
मी आणि आईने चमकुन प्रितीकडे बघीतलं..

“तु काय करणार? परत काही तरी तोडुन फोडुन ठेवशील..”, आई
“नाही मम्मीजी.. किचन घरी सगळं मीच करते.. ट्रस्ट मी..”, प्रिती

आईला समहाऊ पटलं नव्हतं, पण दुसरा पर्याय पण नव्हता, तिला मावशीकडे जाणसुध्दा तितकंच महत्वाचं होतं. आई नाईलाजाने का होईना तयार झाली.


प्रिती सकाळी ९ वाजताच, आई जायच्या आधी घरी यायची. आई तिला किचनमधल्या गोष्टी दाखवुन जायची. मग फक्त मी आणि प्रिती.
पहीले काही दिवस प्रचंड विकनेस होता. औषधांनी तर सारखी झोप यायची.

“कसं वाटतंय शोनु आता?”, मी उठल्याचं पाहुन प्रितीने विचारलं.
“बरंच बरं वाटतंय..”, सोफ्यावर उठुन बसतं मी म्हणालो..

आम्ही जनरल गप्पा मारत होतो इतक्यात आईचा फोन आला..

“तरुण, काही खाल्लंस का?”, आई
“नाही, आत्ताच उठलोय.. का?”
“अरे सकाळी सांगायचं विसरले.. आज चतुर्थी आहे.. उपास करणार आहेस का आज? म्हणजे बघ.. जमणार असेल तर कर..”
“हो हो.. करेन ना.. बरं वाटतंय मला..”
“बरं.. मग मी येते तासाभरात घरी.. तुला खिचडी करुन देते…”

मी रिसीव्हरवर हात ठेवुन प्रितीला विचारलं..”तुला साबुदाणा खिचडी येते करता?”
प्रितीने हसुन मान हलवली..

“अगं तु कश्याला तेव्हढ्यासाठी येतेस घरी.. प्रिती करेल ना..”
“अरे तिला कुठली येतेय.. पंजाब्यांत नाही करत खिचडी..”
“येते आई.. हे घे बोल तिच्याशी…”

“नमस्ते मम्मीजी..”, प्रिती म्हणाली.
“जी मम्मीजी.. हा मम्मीजी.. कहॉ? हॉंजी….”

आई बहुतेक प्रितीला सुचना देत होती, मी मात्र प्रितीकडेच बघत होतो.

ही पंजाबी लोकं ते “हॉंजी.. ” किती मस्त म्हणतात नाही? कानाला ऐकायला मस्त वाटतं.. आणि प्रिती बोलत असताना तर काय सांगु..

“काय झालं?”, प्रितीने फोन ठेवल्यावर मी विचारलं.
“नथिंग.. तु आराम कर, मी बनवते तुला खायला..”, असं म्हणुन प्रिती किचन मध्ये गेली..

प्रिती किचन मध्ये गेल्यावर मी लॅपटॉप पुढे ओढल, व्हीपीएन चालु केलं आणि कामाला लागलो.
किचन मधुन भांड्यांचे, गॅस चालु केल्याचे, फ्रिजचे दार उघड-बंद केल्याचे, मिक्सर-ओव्हनचे आवाज येत होते. जनरली ज्या गोष्टी नेहमी फक्त आईच वापरते त्या आज प्रिती वापरत होती.

मला काम बंद करुन किचनमध्ये जाऊन प्रितीला मिठी मारायची फार इच्छा होतं होती, पण पायाचा ठणका काही कमी होतं नव्हता.
साधारण अर्ध्या तासाने प्रिती खिचडीची प्लेट घेउन बाहेर आली.

मी एक महत्वाची मेल लिहीत होतो…
“ठेव टेबलावर घेतो.. जस्ट टु मिनीट्स..”, मी म्हणालो
“अरे गार होईल.. खाऊन घे..”, प्रिती
“हो एक मिनीटं फक्त…”

प्रिती माझ्या शेजारी बसली आणि चमच्यात खिचडी घेऊन म्हणाली..
“हम्म.. घे..”
“अरे पण.. घेतो ना मी.. जस्ट एक मिनीट..”
“नाटकं करु नकोस.. देतेय ना एव्हढं…”

पुढची १० मिनीटं महत्वाच्या नसलेल्याही मेल्स मी लिहीत बसलो. प्रितीच्या हातुन खाण्याचा आनंद काही औरच होता

खाऊन झाल्यावर मी प्रितीला माझं ऑफीसचं काम काय असतं सांगीतलं. लॅपटॉपवर तिला आमचं अ‍ॅप्लीकेशन दाखवलं. प्रिती माझ्ं बोलणं मन लाऊन ऐकत होती, मध्येच लॅपटॉपवर वाकुन बघत मी दाखवत असलेलं अ‍ॅप बघत होती. तिचे टपोरे डोळे कधी लॅपटॉपवर तर कधी माझ्याकडे वळत होते.

मध्येच मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी लॅपटॉप कडेला ठेवला आणि म्हणालो.. “प्रिती.. व्हॉटएव्हर हॅपन्स.. तु फक्त माझीच आहेच.. कायमची.. मग त्यासाठी मला काय करावं लागलं तरी चालेल, कसंही करावं लागलं तरी चालेल.. तु फक्त माझीच आहेस.. आणि मी तुझ्याशी लग्न करेनच.. इट्स अ जंटलमन्स प्रॉमीस..” तिचा हात हातात घेत मी म्हणालो..

“वुई हॅव टाईम टु थिंक अबाऊट हाऊ टु डु इट..” आपला खालचा ओठ हलकेच चावत प्रिती म्हणाली, “डोन्ट थिंक अबाऊट इट नाऊ, डोन्ट वरी अबाउट इट नाऊ.. जस्ट गेट वेल सुन..”

“येस राईट..”, मी म्हणालो..

“बरं चल, मी घरी जाऊ? काही लागलं तर फोन कर.. मी असेन तेथुन लग्गेच येईन.. ओके?”

मी प्रितीला घट्ट मिठी मध्ये घेतलं.. तिच्या हातांची मानेभोवतीची गुंफण, प्रेमाचा तो उबदार स्पर्श.. स्वर्गीय होता.. त्या मिठीमध्ये फक्त आणि फक्त प्रेम होतं.

[क्रमशः]

Rate & Review

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 months ago

Radhadevi V

Radhadevi V 1 year ago

Smita Jadhav

Smita Jadhav 3 years ago

Pramod

Pramod 3 years ago

Maneesha Zade

Maneesha Zade 3 years ago