Aali Diwali - 5 books and stories free download online pdf in Marathi

आली दिवाळी - ५

आली दिवाळी भाग ५

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे.

पुराणकथेनुसार, प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना बंदी केले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे त्रिपादभूमीची याचना केली.
बळीने ती मान्य केली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारताच बळीने त्याचे स्वत:चे मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव असे वामनाला सांगितले. वामनाने बळीच्या मस्तकी पाय ठेवून त्याला पाताळात ढकलले.
ते सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडले. नंतर वामनाने बळीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला,
‘देवा, केवळ लोककल्याणासाठी मी एक वर मागतो. या तीन दिवसांत जो कोणी यमाप्रीत्यर्थ दीपदान करील, त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत आणि त्याच्या घरात लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य असावे.’
त्यावर वामनाने ‘तथास्तु’ म्हटले. तेव्हापासून या दिवसांत दीपदान व दीपोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीचा दिवस मानून लोक त्याही दिवशी आनंदोत्सव करू लागले. बळीराजा देवांचा शत्रू असला, तरी तो दुष्ट नव्हता. अलोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता याविषयी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य हे सुराज्य होते. म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावे असी आकांक्षा वरील लोकाचारांत प्रकट झालेली दिसते.
बळीराजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम असावा. त्याची हत्यारेसुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत. म्हणूनच बहुधा "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे!

या दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांच्‍या शिंगांना रंग लावून व त्‍यांच्‍या गळ्यात माळा घालून त्‍यांना सजवतात.
मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. काही ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत मशाली घेऊन नाच करण्याचीही प्रथा आहे. त्या आनंदोत्सवाचे हे महत्त्वाचे अंग मानले जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.

या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करतात. मग ते एका मडक्यात कणकेचा दिवा पेटवतात. डोक्यावर घोंगडी घेतात आणि शेतात जातात. ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात.
बळीची पूजा करताना जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा व पुढील मंत्राने बळीची प्रार्थना करावी, असे सांगितले आहे –

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो |

भविष्येन्द्रासुराराते पूजेयं प्रतिगृह्यताम् ||

हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बळीराजा, तुला नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असूरशत्रू आहेस. ही पूजा तू ग्रहण कर.

त्यानंतर बळीप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात.
बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. वेदकाळी गोधन मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असे.
गोदान हे अत्यंत श्रेष्ठ असे दान समजले जाई. गाईच्या ठिकाणी सर्व देवता अधिष्ठित आहेत, हा समज त्यातूनच निर्माण झाला.
म्हणूनच गोपूजेची प्रथा आपल्याकडे सुरू झाली.
कृष्णाच्या सल्ल्याने गोपांनी इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. तेव्हापासून ही गायीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा, फुले खोचतात आणि कृष्ण, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात. अनेक गावांत गोठ्यातील गायी-बैलांना सजवून त्यांची पूजा करतात व मिरवणूक काढतात.

ही पर्वतपूजा केली नाही, तर कार्तिक महिन्यातील सर्व धार्मिक कृत्ये निष्फळ होतात, अशी धारणा आहे.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम संवताचा वर्षारंभदिन मानला जातो. त्या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया त्यांच्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतातघरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.
. दिवाळीतील हाच दिवस प्रमुख समजला जातो. पती पत्नीच्या मंगल प्रेमाचा हा सण कौटुंबिक पद्धतीने साजरा केला जातो .

त्या दिवशी लोक नवी वस्त्राभरणे लेऊन दिवस आनंदात घालवतात. त्या दिवशी द्यूत खेळावे असेही सांगितले आहे.
पार्वतीने शंकराला त्याच दिवशी द्यूतात हरवले होते. त्यावरून या प्रतिपदेला ‘द्यूतप्रतिपदा’ असेही नाव मिळाले आहे.
या तिथीला द्यूत खेळण्याचे विधान धर्मशास्त्राने सांगितले आहे. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून अत्यंत लक्षपूर्वक द्यूतक्रीडा करावी. त्यामुळे पुढील वर्ष बरेवाईट कसे जाईल त्याची ठीक कल्पना येते, असे शास्त्रवचन आहे.
त्या विषयीची एक कथा अशी आहे –

एकदा बलिप्रतिपदेच्या दिवशी शंकराने पार्वतीसह द्यूत खेळायला प्रारंभ केला. शंकर त्या खेळात सर्वस्व हरला आणि वल्कले परिधान करून गंगातीरी जाण्यासाठी घराबाहेर पडला. कार्तिकेयाला हे समजल्यावर त्याने त्याच्या पित्याकडून द्यूत शिकून घेतले आणि पार्वतीबरोबर द्यूत खेळून शंकराने पणात हरवलेल्या वस्तू परत मिळवल्या व त्या शंकराला नेऊन दिल्या.
त्यानंतर गणेशाने शंकर व कार्तिकेय यांच्याबरोबर द्यूत खेळून त्या वस्तू पुनश्च जिंकल्या व आईला नेऊन दिल्या. अशा प्रकारे पुन:श्च सर्वस्व हरल्यावर शंकर हरिद्वार येथे गेला.
तेथे त्याने विष्णूच्या सूचनेवरून त्र्यक्षविद्या (तीन फाशांची विद्या) निर्माण केली. त्या तीन फाशांपैकी एका फाशाचे रूप साक्षात विष्णूनेच धारण केले होते. ही नवी द्यूतविद्या घेऊन शंकर घरी गेला आणि त्याने पार्वतीला खेळात हरवले.

शिव-पार्वतींच्या या द्यूतक्रीडेची स्मृती म्हणून या दिवशी द्यूत खेळण्याची प्रथा पडली.

पूर्वी गावागावांमध्‍ये बलिप्रतिपदेच्‍या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्‍ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. या प्रथेच्‍या पालनातून सामाजिक एकात्मता, बंधुभाव वाढीस लागावा असा या सोहळ्यामागील उद्देश होता.

राजस्थांनात प्रतिपदेला ‘खेंखरा’ असे म्हणतात. त्या दिवशी गोवर्धनपूजा व अन्नकूट करतात. सायंकाळी बैलांची पूजा करतात. महाराष्ट्रातील बैल-पोळा सणाप्रमाणेच तो सण असतो. त्यात बैलांच्या टकरीही लावतात. बैलांना घेऊन गाणी म्हणत शेतकरी घरोघर जातात. त्याच दिवशी नाथद्वारा येथे मिष्टान्नाचा प्रचंड अन्नकूट करून तो गरीब लोकांकडून लुटवण्याची प्रथा आहे.

केरळमधील ‘ओणम’ हा उत्सव आश्विनमासात बळीच्या स्मरणार्थच साजरा होतो.

दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल,अक्षता वाहून त्यांची पूजा होते.

क्रमशः