Pritichi Premkatha - 15 books and stories free download online pdf in Marathi

प्रीतीची 'प्रेम'कथा - 15

१५

मीठू मीठू

अर्थात

पहिला प्रेम संवाद

घरी आले तोवर मनातले हिशेब करून झालेले होते. सारे काही सकारात्मक. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे. या विद्रोहीचा कशात विश्वास नाही म्हणे. आणि ते सीनियर जगदाळे .. बहुधा त्याच्यासाठीच शोधत बसलेत मुलगी! हे असेच असावे. बापाला आपल्या मुलाची ज्वालाग्राही मते ठाऊक असणार. म्हणूनच त्यांनी त्यादिवशी मुलाबद्दल काहीच सांगितले नसणार! किंवा भिंदि आणि तात्यांना ठाऊक असेल का? कोणास ठाऊक! आई म्हणाली,

"तात्या भेटले? "

"हुं"

"काय म्हणाले?"

"तात्या? कशाबद्दल?"

"जगदाळेंबद्दल. ते स्थळ आलेले त्याबद्दल?"

"मला? मला काहीच नाही बोलले."

इतक्यात तात्याच आले घरी. उत्साहात होते. म्हटले काय झाले असावे? भिंदि.. जगदाळे .. चांगला मूड.. म्हणजे काही गुड न्यूज.. गुड खरेच गुड असेल ना?

म्हणजे हे जगदाळे तो जगदाळेच असेल ना? तात्या आले पण बोलले काही नाहीत. एकतर कालिंदीच्या जुळ्या बहिणीचा धक्का असावा.. कालिंदी माझी बालमैत्रीण. तिची जुळी बहीण एकाएकी अवतरावी नि तिचा धर्मेंद्र नावाचा नवराही निघावा.. हे सारे प्रकरण काही मिनिटांत संपवून कालिंदी गेली असली तरी तात्या त्याने बुचकळ्यात पडले असणारच. त्याबद्दल त्यांना काय सांगावे? की ते विसरून जातील सारे? कुणास ठाऊक. तात्या ना भिंदिबद्दल बोलले काही ना आजच्या सगळ्या प्रकाराबद्दल. त्यांची हीच पद्धत आहे. सारे काही शेवटच्या क्षणी सांगतात ते. त्यादिवशी जगदाळे आले ते.. ते ही अगदी काही तास आधी सांगितलेले. रात्रीचे जेवण झाले. तात्या आईशी बोलत बसलेले. मी प्रेमशी झालेल्या बोलण्याची उजळणी करत पडलेली. त्यांच्या बोलण्यात काही महत्त्वाचे ऐकू येते का याकडे एक कान ठेवून. काहीच सुगावा लागू नये असे बोलणे त्यांचे. किंवा नसेलही काही झालेले.

झोप लागली मला. स्वप्न पाहणे माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. एरव्ही मी अशी स्वप्ने पहायची.. त्यातल्या राजकुमाराला चेहराच नसायचा. आता त्याजागी प्रेम यायला लागला. अबलख वारू सोडून तो हल्ली हातगाडीवर किंवा बैलगाडीत यायला लागला. विद्रोही तो! घोड्यावर कसला येतोय? स्वप्नात रंगले मी त्या निद्रेत. सकाळी जाग आली तेव्हा तात्या आईला सांगत होते.. "उद्या संध्याकाळी जगदाळे आणि त्यांचा मुलगा येताहेत. त्यांना पसंत आहे मुलगी."

"तुमचे आपले काहीतरीच. मुलानी नाही पाहिली मुलगी नि मनीने नाही पाहिला मुलगा.. पसंती बापाची घेऊन काय करायचेय?"

"तसं नाही ग. पण एक स्टेप तर क्लियर झाली. पुढचे पुढे. पण हे जमले तर छान. पुढच्या महिन्यात बार उडवून टाकू!"

"वा! अशी न बघता कुणाच्या गळ्यात बांधायला जड नाही झाली मुलगी मला. करतो तरी काय मुलगा ते कळू देत.."

"चांगली नोकरी आहे, शिवाय तू.."

आता हा प्रेम की आणि कुणी हे कळण्याचा क्षण आलाय.. प्रेम पण काहीतरी नोकरी करतो म्हणे.. तात्याच बोललेले आधी. तितक्यात तात्यांचा फोन वाजला.. परत एकदा सस्पेन्स! तात्या नि आईचे बोलणे राहिलेच मग बाजूला नि तात्याही निघून गेले बाहेर. राहू देत. घोडामैदान जवळच आहे!

मी विचार केला.. प्रेमच्या मनात शिरायचेय तर ते लिहिण्यातूनच. काहीतरी जुगाड जमवायला पाहिजे. काहीतरी म्हणजे काय? काहीच विचार न करता मी प्रेमचा नंबर फिरवला. काय नि कसे बोलावे.. शेवटच्या क्षणी ठरवेन. फोन वाजतोय कसला.. दोनदा ऐकू आले, 'इस रूटकी सभी लाईने व्यस्त हैं.. कृपया थोडी देर बाद डायल करें!'

आणि मग प्रेमनी चक्क तो फोन उचलला देखील! तेव्हा ठाऊक नव्हते पण ही त्याच्या मोबाईलची का‌ॅलर ट्यून होती! हे माहित झाले मला तोवर प्रेम नि मी कितीतरी पुढे निघून अालो होतो.. आणि ही असली काॅलर ट्यून हे ऐकून मी इतकी हसली की पोट दुखायला लागले माझे! तर प्रेमने फोन उचलला नि म्हणाला, "आज सकाळसकाळी आठवण काढलीत?"

आता त्याला काय सांगू की चोवीस तास मी त्याचीच आठवण काढत असते.. पण ते न बोलता मी तात्यांच्या नावाने बोलणे सुरू केले..

"नमस्कार!"

कुणी आपल्या प्रियकराशी नमस्कार म्हणून बोलण्याचा प्रेमी जिवांच्या इतिहासात पहिलाच प्रसंग असावा हा! प्रेमी जीव! एकतर्फी का असेना. छान वाटते बोलायला.

"मी रंगढंग प्रकाशनातून प्रीती घोरपडे बोलतेय. प्रेमानंद ना?"

"बोला. काय काम काढलेत?"

त्याच्या त्या कोरड्या शब्दांनी माझा धीर सुटला असता. पण ही फक्त सुरूवात आहे. प्रेमाची दिल्ली अजून दूर आहे!

"काय आहे की तुमच्यासारख्या लेखकाचे दुसरे पुस्तक आंबेडकर जयंतीस यावे असे वाटते आम्हाला. म्हणजे काय की एक औचित्य म्हणून. बघा पटते का?"

माझ्या बोलण्याने तो थोडा गप्प झाला. विचारात पडला असावा. एकाएकी म्हणाला, "खरेय तुमचे.."

"प्लीज ऐका ना.."

मी रंगढंग प्रकाशनाचे ढंग सोडून आपल्याच रंगात बोलली, "प्लीज ऐकाना.. तुम्ही ते शरणकुमारला मानसपुत्र बनवणार ना ही कल्पना अगदीच नामी आहे." इथे मी ब्रॅंड शरणकुमार म्हणणार होती पण विद्रोहकुमारास हे किती पटेल कुणास ठाऊक! त्यापेक्षा तो शब्द टाकणेच बरे!

"तुम्हाला ही वाटते ना तसेच?"

"हो ना. अर्थातच. तुमच्या कल्पनेचे कौतुक करावे तितके थोडेच. कुठवर आलेय लिखाण?"

"नाही हो. वेळच नाही. बाबा आलेले जळगावहून. त्यांच्याकडे लक्ष देता देता लिखाण मागे पडले. पण लवकरच करतो सुरू. आणि तुम्हाला कळवतो."

"नक्की ना?"

"म्हणजे काय.. असला आग्रह केला तर एक काय दहा लिहीन पुस्तके .."

हे बोलून त्याने जीभ चावली असावी, कारण थोडा वेळ शांतता पसरली. मग म्हणाला तो, "आजच करतो सुरू. झाले की करतो फोन!"

"ठीक आहे.. बदलाची ज्योत पेटवायची असेल तर रात्रीच्या वेळी आपले दिवे जाळावे लागतात!"

"वा! तुम्ही वाचलंत वाटतं.."

"अर्थात. मी तुमच्याशी डिटेल चर्चा केली नव्हती का?"

"हो.. ना."

हे त्याच्या प्रस्तावनेतले पहिलेच वाक्य .. जे वाचून झोप लागलेली मला! तेवढेच तर लक्षात होते माझ्या.

मी करतो फोन तुम्हाला.. म्हणून त्याने फोन ठेऊन दिला. दिवसाची सुरूवात तर छानच झाली. काही म्हणा, मुलगा चांगला आहे. आणि मला वाटते मेरा जादू चल रहा है! माझा आग्रह.. आणि त्या खातर हा लिहिणार दहा पुस्तके! वा! प्रगती पथावर प्रीती! बढे चलो! पण तो खरेच करेल फोन? नाहीतर मीच करेन आठवण त्याला. काही असो त्याच्याशी संपर्क तर होतोय. आणि मला आत्मविश्वास आहे.. फक्त तो उद्याचा जगदाळे कोण आहे माहित झाले तर! म्हणजे हाच असेल तर बघायलाच नको. आणि नसेल तर?

हा विचार आताच करून ठेवायला हवा! तात्या तर पुढच्या महिन्यात बार उडवायला निघालेत. एकतर हा प्रेमच असू देत नाहीतर इतका खराब असू देत की कुणी त्याचा विचारच करायला नको! तरीही त्यातल्यात्यात चांगला असेल तर? माझा प्रश्न नाही. मी पार्वतीसारखे मनोमन वरलेय प्रेमला. आता इकडेतिकडे पाहणे नाही.

मला स्वामींची आठवण आली. म्हणजे हा येणारा मुलगा प्रेम नसेल तर चांगला नसू देत.. हा नकारात्मक विचार माझ्यासाठी सकारात्मक आहे! काय गंमत आहे नाही? नकारात्मक म्हणजे सकारात्मक! तात्यांना नक्कीच माहिती असणार. त्यांचे प्रेमशी बोलणे असे की वाटत नाही तोच असेल हा जगदाळे मुलगा. पण त्याला एवढा आग्रह करून तात्यांनी घरी का जेवू घातले?

आजचा दिवस असाच गेला. कालपर्यंत कामे होती. प्रेमला शोधण्याची मोहीम होती डोक्यावर. त्यासाठी प्लॅन बनवणे होते. आज उद्या संध्याकाळची फक्त वाट पाहणे आले! ते पुस्तक तात्यांच्या कपाटात सापडले .. म्हणजे तेच तुंबाऱ्याची गोष्ट. घेऊन वाचत बसेन म्हटले. घेतलेही हातात .. ज्या प्रेमच्या लेखणीतून झरलेले हे शब्द त्यांच्यावर हात फिरवला नि स्वप्नात रंगून गेली.. आणि पुस्तक वाचणे राहिले बाजूला मागच्या वेळेप्रमाणे. डोळे उघडे ठेवून झोपली मी.. स्वप्न पाहात. माझा विद्रोही वीर बैलगाडी चालवत येतोय.. हातात त्याच्या एक पेन आहे.. इतके मोठे की आभाळात पोहोचलेय ते. खाली तो लिहितोय.. लिहिता लिहिताच येतोय.. बैलगाडीतून उतरतो नि सिनेमातल्यासारखा माझ्याकडे धावत येतोय!.. हातात त्याच्या पुस्तके पण आहेत .. आणि मी तर तयारच आहे.. पाठून गाणे ऐकू येतेय .. 'मैं तेरा तू मेरी.. दुनिया जले तो जले!' तो माझ्या केसांत गजऱ्याऐवजी पुस्तक बांधतोय.. मी दचकून जागी झाली तर आई जेवायला बोलवत होती. किती वेळ अशी झोपली मी कुणास ठाऊक. मी झटकन उठली. ते पुस्तक ठेवले गुपचूप नि गेली जेवायला.

तात्या आलेले. म्हणाले, "दमली असणार बिचारी. काल खूपच मेहनत केलीय तिने."

तात्या हे खरेच म्हणताहेत की उपरोधाने कुणास ठाऊक. मी अर्धवट झोपेत असल्याचे दाखवत काही बोलली नाही. आई नि तात्या बोलत होते पण त्यात तो जगदाळेचा विषय नव्हताच. मी निमूटपणे जेवून उठली. उगाच आईची बोलणी नकोत ऐकायला म्हणून ओटा वगैरे साफ केला नि सरळ झोपायला निघून गेली. मगाचचे स्वप्न अर्धवट राहिले .. त्याचा पार्ट टू पाहीन म्हटले. पण झाले भलतेच. म्हणजे झोपच अशी लागली की स्वप्न पण नाही पडले. उठली तेव्हा डायरेक्ट सकाळ झालेली.