Pritichi Premkatha - 20 books and stories free download online pdf in Marathi

प्रीतीची 'प्रेम'कथा - 20

२०

घडणारे ना टळते

अर्थात

प्रेमचा धक्का!

घरी आली मी. तात्या घरी आधीच पोहोचलेले. काहीच बोलले नाहीत म्हणून जीव भांड्यात पडला. आता फक्त उद्याची चिंता! प्रेम काय सांगणार आहे? मुन्नाभाईच्या त्या सिनेमासारखे म्हणाली मी स्वतःलाच, काय सांगणार तू ते ठाऊक आहे मला.. पण कसे सांगणारेस तेच पहायचेय मला!

आज रात्री झोप नाही यायची मला. रात्रीची झोप उडवणाऱ्या माझ्या प्रेमा.. किती रे छळशील तू.. जिवलगा?

रात्रभर जागीच होती मी. पहाटे डोळा लागला. स्वप्न पहायची खोड माझी .. ते मी जागेपणीच पाहून घेतलेले. उठली तोवर उशीर झालेला. घरी शांतता होती. तात्या निघून गेलेले. आई कामात. कालिंदीला फोन केला, कालच्या स्ट्राॅबेरीबद्दल थ्यांक्स बोलायला. आणि माझ्या त्या चॅनेलवरच्या कागदोपत्री जाॅब साठी ही! किती मदत केलेली तिने नि मिलिंदाने. आज हे सारे सुफल संपूर्ण होणार. एकदा का प्रेमने तो सिनेमात म्हणतात तसा इजहार केला की पुढे सारे सोपेय. काल तात्याच म्हणालेत, मुलगा चांगलाच आहे! त्यामुळे सारे काही सोपे नि सुरळीत! इतक्या लवकर हे सारे घडून यावे यावर विश्वासच बसत नव्हता माझा. आज फक्त मरून ड्रेस.. मरून पर्स .. मरून चप्पल!

संध्याकाळी आम्ही भेटलो तिथेच. प्रेम नेहमीपेक्षा शांत होता. टेन्शन तर असणारच ना! त्याच्या बाईकवर बसून निघालो अाम्ही. स्नोमॅन्स.. आईस्क्रीमचे मोठे दुकान.. समुद्र किनारी तेही. किती छान जागा शोधून काढलीय याने. मी मनात अजूनही लाजत होते..

"चल. मी इथे आजवर कधीच नाही आलेलो.."

"का?"

"कारण ही जागा मला फार आवडते.. एकट्याने इथे काय खायचे आईस्क्रीम? आज तू आहेस म्हणून .. आधी आईस्क्रीम खाऊ.. डोके थंड करून मग बोलू!"

त्याच्या त्या डोके थंड करण्याच्या भाषेने मनात पाल चुकचुकली माझ्या. काय आहे याच्या मनात? पूर्णानंद बोललेला त्याची आठवण झाली. याच्याकडून कसली करावी अपेक्षा. थंडगार आईस्क्रीम खाता खाता म्हटले सकारात्मक विचार करावा! पुढचे पुढे!

स्ट्राॅबेरी आईस्क्रीम समोर होते दोघांच्या.

"लवकर खा.. थंड होईल!"

मी अगदी जोक मारण्याचा प्रयत्न केला! प्रेम हळूच हसला!

समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत बसलो आम्ही. प्रेम म्हणाला, "मी सांगतो ते नीट ऐक. आणि शेवटी बोल काय ते."

मी ऐकायला लागली. मनाची तयारी गेल्या पाच दहा मिनिटात करून ठेवलेली मी. पूर्णाने इशारा दिलेलाच आहे. त्याहून जास्त होणार काय?

"प्रीती.. खरे सांगतो. तुझ्या घरी जेवायला आलो ना त्या क्षणी आयुष्य बदलले माझे. लव्ह ॲट फर्स्ट साईट फक्त ऐकून माहित होते. पण ते प्रत्यक्षात झाले. जेवणाकडे कसले, माझे लक्षच तुझ्याकडे होते. त्यामुळे मी बोललोही नाही विशेष. घरी आलो तर तुझाच विचार. मोठ्या कष्टाने मी त्यातून बाहेर पडलो तर तुझ्या तात्यांनी तुझ्याशी गाठ घालून दिली. तुला नंबरही चुकीचा दिला मुद्दाम.. टाळत राहिलो तुला. वाळूत शहामृगाने तोंड लपवून ठेवावे तशी वस्तुस्थिती नाकारात राहिलो. दूर जायचा प्रयत्न करत राहिलो. कठीण होते ते फार. त्यानंतर मुलाखतीच्या निमित्ताने तूच बोलावून घेतलेस.. मनाने परत उचल खाल्ली.. मला या गुंत्यातून सुटायचे होतेही आणि खरेतर नव्हते ही. दिनरात्र तुझाच विचार. आतातर गेले काही दिवस मी हवेत तरंगतोय तुझ्यामुळे. आता जमिनीवर यावेच लागेल मला. हे असे काही होईल माझे असे मला कधीच नाही वाटले. पण जे वाटते ते मनापासून वाटतेय. आता पुढे काय? माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. आणि त्याहून महत्त्वाचे, माझा स्वभाव असा. कुठे काही चुकीचे दिसले की लागलो भांडायला. मी नोकरीत टिकत नाही. पुढे तुझे कसे होईल? म्हणून आज आईस्क्रीम खाऊन घेतले तुझ्याबरोबर. उद्या पासून आपले भेटणे बंद करायला हवे. आणि तुझे मत मला ठाऊक आहे प्रीती. पूर्णाचा कालच फोन आलेला. सारे सांगितले त्याने मला. उगाच स्वतःला फसवत किती दिवस तुलाही फसवत राहू? त्यामुळे.."

हे सारे मला अपेक्षित होतेही आणि नव्हतेही.

म्हणजे त्यालाही पहिल्या दिवसापासून मी आवडत होती.. हे त्याच्या आजच्या सांगण्याहून जास्त अनपेक्षित होते. त्याची अवस्था माझ्यासारखीच हेही अनपेक्षित होते. आता त्याची यापुढची तयारी हीच खरी लढाई. तरीही डोळ्यांत पाणी आलेच माझ्या.

"प्रीती, मला तू फार आवडतेस, म्हणूनच वाटते, माझ्या सारख्याच्या बरोबर तुझे कसे होईल? प्लीज समजून घे. आयुष्यातला हा सर्वात सुंदर महिना मी हृदयाशी जपून ठेवेन.. तू सदा सुखी रहावीस.. चल निघू आपण."

तो उभा राहिला. मी स्वतःला लगेच सावरले. हे असे घडणार याची कल्पना होतीच मला. तर त्यात एवढे वाईट वाटावे असे काय होते? एकच.. त्याला मुळातच मी आवडत नसते तर..

आता पुढे काय? सिनेमातली हिरा‌ॅईन अशा वेळी बेडवर आडवी झोकून देऊन रडते. मी तसे नाही केले. आजवरचा हिशेब मांडला मी. तो कोण कुठला इथून सुरूवात करत त्याच्याशी सूत जमेपर्यंत मजल मारलीय मी. अाता यापुढे काय नि कसे करायचे हेच बाकी आहे! घरी न जाता काकुच्या घरी पोचली मी. मिलिंदा घरी आलेला. दोघांना शक्य तितकी माहिती दिली आणि मिलिंदाने प्रेप्रीप्रीबंस ची इमर्जन्सी मीटिंग बोलावली!

मिलिंदाने प्रास्तविक केले, "आपली प्रिय प्रीती आणि तिला प्रिय प्रेम यांच्या प्रीतीबंधनात आजवरचे बंध म्हणजे अडथळे आपण दूर करण्यात यशस्वी झालो आहोत. आता समितीपुढे पुढचे नि कदाचित शेवटचे आव्हान आहे. नुकताच आपल्या वैज्ञानिकांनी चंद्रावर यान उतरवण्याचा प्रयत्न केला. तशीच ही परिस्थिती आहे. चंद्राच्या कक्षेत आपले हे प्रीतीयान पोहोचले आहे. आता फक्त यानाचे परफेक्ट लॅंडिंग बाकी आहे. त्याचाच विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे.. कालिंदीबाई तुमचे काय म्हणणे आहे?"

"काॅफी!"

"म्हणजे?"

"तेच. काही सुचत नाही. प्रीतीताई उठा आणि काॅफी बनवायला घ्या कडक."

"मला वाटते या समितीच्या कुठल्याही बैठकीआधीच काॅफी बनवली पाहिजे. अशी केस परत न येवो! मिया बीबी राजी.. काजी भी राजी.. तरीपण.. क्या करेगा दर्जी! कसे शिवावे त्याने लग्नाचे कपडे?"

काॅफी पिऊन बैठक परत बसली. डोके खाजवूनही उत्तर मिळेना. प्रेमा.. कुठल्या मटेरियलचा बनलायस रे तू?

मिलिंदा परत डोके खाजवत बसला, काॅफी तरी कितीदा पिणार? आणि एकाएकी ओरडलाच तो.."सापडला उपाय .. कैलास जीवन"

"म्हणजे?"

"मंचरजी! प्रत्येक दुखण्यावर एकच इलाज. हर दर्द की एकही दवा.. मंचरजी! म्हणजे काही करून त्या प्रेमनामक ठोकळ्याला मंचरजीसमोर उभा करायला हवा."

"ठोकळा काय रे म्हणतोस त्याला.."

"मग काय ढोकळा म्हणू? माझा बाॅस त्याला म्हणजे कोणत्याही ठोकळ्याला समजावू शकतो. यस्स.. मंचरजी इज द सोल्यूशन! फक्त त्याला तिथवर आणायचा कसा हे पाहिले पाहिजे!"

"म्हणजे आता त्यासाठी डोकेफोड करायची?"

"हुं.. ही अशी केस दुर्मिळ. या केसचा अनुभव आपल्याला पुढे उपयोगी पडेल. तेव्हा चला. कामाला लागा! म्हणजे मला झोपू द्या. उद्या उठेन तेव्हा काहीतरी तिकडमबाजी सुचेलच. आणि तसे वेळेचे बंधन नाही .. प्रेम आपल्या खिशात असेल.. आज नहीं तो कल!"

माझ्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहात म्हणाला, "तशी घाईच आहे म्हणा आपल्याला.. झोपेत सोडवतो हा प्रश्न!"

मागच्या वेळेस पण त्याने रात्रीतून उपाय शोधलेला. त्याला आता झोपू देणेच योग्य होते.

घरी आली. आता लढाईतला शेवटचा भाग बाकी. मंचरजी अगदी दिलदार आणि उमदा आहे. भल्याभल्यांना वठणीवर आणतो तो म्हणे अापल्या बोलण्याने. आता हे ही महत्कार्य करेल तोच! मन में है विश्वास! सकारात्मक अगदी. रात्रभर विचार करत राहिली मी. आजवर इथवर मजल मारलीय ती सकारात्मक विचारांतूनच. आता पुढे ही मारेन. 'चोच दिली त्याने तो चारा ही देईल ..' नाही हे उदाहरण ठीक नाही. किती कठीण आहे सारे लिहिणे नाही? माझा प्रेम कसा झरझर लिहितो! आणि एकदा प्रेमच्या मनातला अडथळा दूर झाला की पुढे काय? मला काय नि किती बदलावे लागेल? मी अशी स्वामीभक्त आणि हा पूर्णपणे नास्तिक! याच्या जाॅबचा ठिकाणा नाही म्हणे, म्हणजे त्याच्यासाठी मला काहीना काही हातपाय हलवणे आले.. त्याला लिहायला मदत करायला मला वाचावेच लागेल सारा आळस सोडून. करेन मी सारे. पण हे सारे तो तयार झाला असे समजून .. म्हणजे समझो हो ही गया! अर्थातच हे होणार! बी पाॅझिटीव्ह प्रीती!