Bhatkanti - punha ekda - 8 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ८)

पुन्हा आठवण, त्यात पावसाच्या ढगांनी आभाळ भरत चाललं होतं. थंड गार वारा... मागे असलेल्या झाडाच्या पानांची प्रचंड सळसळ... " आठवणी काढू नये... किती वेळा सांगितलं तरी आमच्या येडीला कधी कळणार हे त्या गणूलाच माहित... " आकाशने टपली मारली सुप्रीच्या. क्षणभरासाठी, तिला आकाश शेजारीच बसला आहे असा भास झाला. सर्वच आठवणी उफाळून बाहेर येण्याचा प्रयन्त करत होत्या. नको थांबायला येथे... घड्याळात पाहिलं... संध्याकाळचे ५:३० वाजतं होते. सुप्री उभी राहिली, पुढे जाणार तर कोणीतरी ओढणी पकडून ठेवलेली... आकाश मुद्दाम कधी सुप्रीची ओढणी गुपचूप टेबलला बांधून ठेवायचा... आनंदाने सुप्रीने मागे पाहिलं. मगाशी आलेल्या वाऱ्याच्या झोताने , ओढणी टेबलाला गुंडाळली होती. पुन्हा थंडगार हवा आली. शहारून गेली सुप्री. कॉफीच्या कपातील वादळ.. तिने तसंच अर्धवट सोडलं आणि निघून गेली ती.


अमोलची तयारी होतं आलेली. आनंदात तर होताच, त्यात आईने वेगळीच सुई टोचली होती त्याच्या मनाला. प्रेमाची सुई... बाहेर थंड वारा सुटला होताच.." आई !! एक कप कॉफी प्लिज... " अमोलने ऑर्डर सोडली. पाचच मिनिटात आई कॉफी घेऊन आली.. " घ्या साहेब !! " अमोल वेगळ्याचं दुनियेत... आईने टपली मारली त्याच्या डोक्यावर. अमोल कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत आला. त्याला तर अजूनही कळतं नव्हतं, खरंच.... हे प्रेम आहे का..आधी कसं कळलं नाही मला.. . एवढा मूर्ख आहे का मी... असेल प्रेम... सांगून टाकू का तिला..नको... एवढ्यात नको... तिला अजून समजून घेऊ.. अमोल स्वतःच्या विचारात... एका थंड हवेच्या झोताने त्याला शहारून टाकलं. तसा अमोल जागा झाला. हसला स्वतःशीच. हातातला कॉफीचा कप, आभाळात भरून आलेल्या ढगांकडे करत ," cheers " केलं त्याने... आणि पुन्हा हरवून गेला कुठेतरी.


--------------------------- ------------------------------ -------------------------- --------------------------- --


म्हणतात, गावात शहरापेक्षा आधीच पाऊस सुरु होतो... गावातला खडबडीत रस्ता, त्यात आपल्याच धुंदीत सुरु असलेली लाल रंगाची S. T. ची बस... वातावरण पावसाळी, बसमध्ये बसलेली मंडळी पावसाची वाट बघत होते. " यंदा चांगला पावूस व्हायला पायजेल ना..." ,
" व्हयं व्हयं... " तसा मागून एक जण उठला.
" व्हयं रं भटक्या... तुजा ठिकाणं यायला टाइम हाय अजून.. " एक गावकरी बोलला.
" आजोबा... पाऊस येतो आहे ना... म्हणून दरवाजात जाऊन उभा राहतो.. तुम्ही कधी पाऊस बघितला आहे का... " म्हणत "भटक्या" पुढे गेला.
" हे येडं कधी आलं बसमध्ये .. पावूस बघितला काय म्हणतंय... काय बोलायचं येडयाला... " एक जण...
" आरं ... मागे झोपलं होतं ते बेणं... पावूस येतो हाय ना... पावसात जीव अडकला हाय त्याचा.. म्हणून गेला पावूस बघायला.. " दोघेही हसले.


वेड्या भटक्याने ऐकलं ते. पाऊस आणि मी खूप आधी पासून मित्र आहोत .. यांना काय कळणार फरक. पाऊस कसा बघायचा असतो ते. त्याने चालत्या गाडीचा दरवाजा उघडला. समोर सूर्यास्त होतं होता आणि गाडीच्या मागून पाऊस येतं होता. दोन वेगळे ऋतू एकाच वेळेस.. पुढच्या ५ मिनिटात पावसाने गाठलं गाडीला. त्याने हात बाहेर काढून पावसाला "स्पर्श" केला. नंतर चेहरा बाहेर काढून गालावर, डोळ्यावर पावसाचे थेंब झेलले. " पाऊस बघायची " सवय , नजर सगळ्यांकडे नसते... त्याला अनुभव लागतो... भटकंतीचा... त्याच्या चेहऱ्यावर केस आलेले.. वाऱ्याच्या एका थंडगार झुळूकेने केस बाजूला केले. हसला भटक्या... ओळखीची smile... डोळ्यात ओळखीचा वेडेपणा.... गावातले काहीही नावे देऊ दे त्याला.. पावसाने, त्याच्या मित्राने बरोबर ओळखलं होतं त्याला... आकाश !!

======================================================================================

" ओ मॅडम... उठायचे नाही का... सूर्य डोक्यावर आला.. " आकाशने सुप्रीला तंबू बाहेरूनच आवाज दिला.
" झोपू दे रे... या संजूने रात्रभर झोपूच दिलं नाही... वाघा सारखी घोरत होती. " आतूनच बोलत होती सुप्री.
" मंद !! " संजनाचा आतूनच आवाज. तंबूचा "दरवाजा " उघडून संजना बाहेर आली.
" काय बोलायचं ते कळतच नाही हिला कधी कधी.. हिचीच मस्ती सुरु होती रात्रभर. सकाळी कुठे डोळा लागला माझा. मी सांगते ना आकाश, हिला कुठे घेऊन जायचं नाही पुढे कधी... " संजना आकाशकडे पाहत म्हणाली.
" हो.. तरी आता तरी निघावं लागेल ना इथून... त्याशिवाय पुढचा प्रवास कसा सुरू करणार.. " सुप्री अजूनही तंबूमध्येच... " थांब हा... पाणीच ओततो आता.. " आकाशने हातात पाणी घेतलं आणि सुप्रीच्या चेहऱ्यावर फेकलं.


सुप्रीला जाग आली. खिडकीवर डोकं ठेऊन झोपलेली. बाहेर हलकासा पाऊस सुरु झालेला. त्याचेच काही थेंब तिच्या चेहऱ्यावर पडलेले. आपण तंबूत नसून एका बसमध्ये आहोत आणि कूठेतरी निघालो आहोत, याची जाणीव झाली सुप्रीला. घड्याळात पहाटेचे ६ वाजत होते. बसमधली बाकीची मंडळी तर अजूनही साखर झोपते होती. पाऊस आकाशमुळे आवडीचा झाला होता. तो गेल्यापासून तरी सुप्रीला पाऊस नकोसा झालेला. नाहीतर खिडकीतून हातात झेलला असता पाऊस तिने, खिडकी बंद करून शांतपणे पाऊस बघत बसून राहिली.

----------------- X ----------------------- X ----------------------- X ----------------------- X -----------


कुठेतरी दूर पहाट होतं होती. सूर्यदेव डोंगराच्या कोनातून हळूच डोकावून पाहत होते. त्यांचा प्रभाव आता तरी जाणवणार नव्हता. कारण मोठे मोठे ढग मार्गक्रमण करत होते ना. वारा होता सोबत. काही ढग तर त्या डोंगरावर ,पडक्या किल्ल्यावर विसावत होते जरा. भटक्या तिथेच होता ना... त्या पडक्या किल्ल्यावर काल रात्रीच पोहोचला होता. त्याचंच घर ते... विसावला रात्रीचा. सकाळी जाग आली, तर ढगांची ओली चादर अंगावर..... भटक्या उर्फ आकाश, उठून बसला आणि समोरच द्रुश्य न्याहाळत बसला. चहुबाजूनी ढगांची सेना येतं होती. सूर्य आपला काही क्षणापुरता दर्शन देयाचा, मग गुडूप होऊन जायचा. आभाळ एवढं गच्च भरलेलं कि उरले -सुरलेले ढग ... समोरचं असलेल्या दरीत नाईलाजाने उतरत होते. " पावसाला अजूनही अवकाश आहे ." आकाश मनातल्या मनात बोलला. खाली नजर टाकली त्याने, काही "डोकी" चालत चालली होती कुठेतरी. बहुदा शेतकरी असावेत, अंदाज आकाशचा. बाकी हिरवळ होतीच . काही ठिकाणी अजूनही मातीचा करडा, मातकट लाल रंग नजरेस येतं होता. एकदा पावसाळा सुरु झाला कि हे सुद्धा दिसायचे नाही. आकाश विचार करून स्वतःशीच हसला. काय नातं आहे माझं या निसर्गाशी.. काहीच कळत नाही मला... सवयीप्रमाणे हातातल्या घड्याळाकडे पाहिलं त्याने. बंद पडलेलं घडयाळ. तो बापडा तरी काय सांगणार वेळ. अजून १५-२० मिनिटं लागतील पाऊस सुरु व्हायला. तोपर्यंत उतरू खाली आपण, अंदाज लावत आकाश तयारी करू लागला निघायची.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: