Nidhale Sasura - 10 books and stories free download online pdf in Marathi

निघाले सासुरा - 10

१०) निघाले सासुरा!
साखरपुड्याचा दिवस उजाडला. मागील काही दिवस भलतेच गडबडीत गेले होते. रविवारी सकाळी सकाळी लवकर उठून सारे पंचगिरी कुटुंबीय अकरा वाजण्याच्या सुमारास कुलकर्णींकडे पोहोचले. कुलकर्णी यांच्या घराची सजावट बघण्यासारखी होती. अल्पावधीतच भिंतींना रंग देऊन झाला होता. दारे-खिडक्यांचे पडदे बदलले होते. घरातील फर्निचर नवीन आणि आकर्षक स्वरुपाचे घेतले होते. घरामागे असलेल्या मोकळ्या जागेवर दोन खोल्यांचे बांधकाम चालू होते. पंचगिरी यांची निमंत्रित पाहुणे मंडळी दहाजण होती तर कुलकर्णी यांचेही पंधरा पाहुणे उपस्थित होते. एकदम सुटसुटीत, आटोपशीर असा कार्यक्रम हसत खेळत पार पडला. कुठेही घाई नाही, गडबड नाही. अगदी सारे कसे यथासांग झाले. एकंदरीत सारे हलकेफुलके वातावरण पाहून पंचगिरी यांच्यासोबत आलेली पाहुणे मंडळी एकमेकांशी हलक्या आवाजात चर्चा करताना 'छायाने नशीब काढले' असेच म्हणत होते.
नियोजित वधूवरांचा साखरपुडा आणि शाल-अंगठीचा कार्यक्रम संपन्न होत असताना दोन्ही मातापित्यांनी वधूवरांना त्यांनी एकमेकांच्या पसंतीने आणलेले कपडे, शाल, श्रीफळ दिले. दोघांनी नवीन कपडे परिधान करून एकमेकांना अंगठ्या घातल्या. दोन्ही घराण्यातील व्यक्तींना दोघांनीही योग्यरितीने सन्मानित केले. विशेष म्हणजे ज्यांनी हे लग्न जुळवून आणले त्या देशपांडे यांचा दोघांनीही आहेर करून सन्मान केला. पंचगिरी यांनी ठरलेली रक्कम कुलकर्णी यांच्या स्वाधीन करून एकप्रकारे सुटकेचा श्वास घेतला.
"कुलकर्णीसाहेब,अगदी छान, उत्तम बेत घडवून आणलात हो. आवडले मला." दामोदर म्हणाले.
"विशेष काही नाही हो. एकमेकांची हौस झाली एवढेच. महत्त्वाचे म्हणजे आमचे गृहमंत्री खुश झाले ही आमच्यासाठी आनंदाची बाब. कारण अशा मंगलकार्यालयात खरी हौस असते ती बायकांची!" कुलकर्णी आनंदाने म्हणाले.
"अगदी बरोबर! कुलकर्णीसाहेब, पण हे सारे घडवून आणणे कठीण असते हो."
"बरे, आपण लग्नाच्या संदर्भात काही गोष्टी ठरवून घेतलेल्या चांगले राहिल, नाही का?" कुलकर्णी यांनी विचारले आणि अशावेळी सर्वसामान्य वधूपित्याच्या पोटात उठतो तसा भितीचा गोळा पंचगिरी यांच्याही पोटात उठला. अशावेळी वरपित्याने एखादी मागणी केली तर ती नाकारताही येत नाही आणि हो म्हणावे तर बजेट 'आ' करून समोर फेर धरु लागते. पंचगिरींनी विचारले,
"म्हणजे? मी नाही समजलो."
"असे दचकू नका. मला उगीच अवडंबर केलेले आवडत नाही. आज मी बँड लावला नाही. तसाच तो लग्नाच्या दिवशी नसावा. फिजुल खर्च आहे, तो टाळावा. तुम्हाला काय वाटते?"
"तुम्ही म्हणाल तसे. एका दृष्टीने आपले एकदम बरोबर आहे. आता आपण म्हणजे आपल्या समाजाने अधिक सकारात्मक होण्याची गरज आहे. ऋण काढून सण करण्यात अर्थ नाही. " दामोदरपंतांनी कुलकर्णी यांची बाजू सहर्ष उचलून धरली.
"दामोदरपंत, खरे आहे तुमचे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अर्थात हा आमच्यापुरता घेतलेला निर्णय आहे. या लग्नात आम्ही ठामपणे आहेराच्या विरोधात आहोत. 'ना करूंगा, ना करने दुंगा।' अगदी आमच्या दोघांच्या बहिणींसह सर्वांना पत्रं पाठवून मी या लग्नाची तारीख आणि सोबतच आहेरबंदी या निर्णयाची माहिती दिली आहे." कुलकर्णी म्हणाले.
"फार धाडसी, अभिनंदनीय आणि अनुकरणीय असा हा निर्णय घेतला आहे. पण आपले पाहुणे, मित्रपरिवार आपल्याला या निर्णयावर ठाम राहू देतील का?" देशपांड्यांनी विचारले.
"का नाही? मी सर्वांना पत्रं तर पाठवली आहेतच सोबत ईमेल, फोन, व्हाट्सअप याद्वाराही कळवणार आहे, की आम्ही आमच्या कुलदेवतेसमोर 'आहेर घेणार नाही' अशी शपथ घेतली असून ती शपथ न मोडण्याचे पाप केवळ आपल्या हातून घडू नये यासाठी आपली साथ हवी आहे. " कुलकर्णी यांनी भूमिका स्पष्ट केली.
"व्वा! ग्रेट! मानलं बुवा! याला म्हणतात निर्णय घेण्याची इच्छाशक्ती आणि त्याची कठोर अंमलबजावणी!" दयानंद म्हणाले.
"आम्ही पत्रिका छापायच्या नाहीत असेही ठरवले आहे."
"बाप रे! कुलकर्णी, हे काय? एका मागून एक बाँब टाकताय!"
"पण श्रीपालने तर पत्रिकाही पसंत केलीय ना?" दामोदर यांनी विचारले.
"पसंत केली होती पण छापली नाही. कसे आहे, लग्न ठरल्यापासून प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींची माहिती जवळपास सर्व पाहुणे आणि परिचितांना दूरध्वनी आणि इतर माध्यमातून समजलीच आहे, अजूनही चर्चा होतच राहणार. आज प्रत्येकाकडे मोबाईल, लँडलाईन, ईमेल अशी व्यवस्था नक्कीच आहे. लग्नाच्या आधी मी स्वतः सर्वांसोबत यापैकी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संपर्क साधून आमंत्रण देणार आहे. पत्रिका म्हणजे तरी काय तर निमंत्रणाचे एक माध्यमच आहे. मग अत्याधुनिक माध्यमाचा उपयोग केला तर बिघडले कुठे?"
"अगदी बरोबर! शिवाय प्रत्यक्ष बोलण्याची सर पत्रिकेला येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पत्रिका मिळेल याचा विश्वास देता येत नाही. पोस्टाचा आणि कुरियरचाही कारभार तसाच. अनेकदा पत्रिका मिळाल्या नाहीत अशाही तक्रारी येतात ते यामुळेच. आता आपण या जुन्या प्रथा कवटाळून बसण्यात काही अर्थ नाही." पंचगिरी म्हणाले.
"सगळा विचार आर्थिक बाबीवर येऊन थांबतो. आपण तोही विचार करूया. श्रीपालच्या मित्राकडून स्वस्तात पत्रिका मिळतेय ही बाब आपण थोडी बाजूला ठेवूया. सर्वसाधारण असा विचार करा, पाच रुपयाची पत्रिका त्यावर पोस्टाचे चार रुपयांचे तिकीट अर्थात कुरियरचा खर्च अजून जास्त म्हणजे एका कुटुंबाला पोस्टाने पाठविण्यासाठी सरासरी दहा रुपये खर्च येतो. गावातल्या गावात पत्रिका द्यायची म्हणजे वाहन खर्च वेगळाच. वरती वेळ लागतो तो वेगळाच..."
"खरे आहे. पण एक घरगुती प्रश्न विचारु?" दामोदरपंतांनी विचारले.
"ओळखला तुमचा प्रश्न. आमच्या गृहमंत्र्यांचे काय? सुरुवातीला थोडासा विरोध झाला पण मग हळूहळू तो कमी झाला. सुवर्णमध्य असा निघाला, की काही पाहुणे मंडळीस आणि गावातील काही कुटुंबीयांना स्वतः जाऊन निमंत्रण द्यावे."
"ऐकतेस का तू?" पंचगिरींनी सरस्वतीकडे बघत विचारले.
"ऐकतंय. घरी तर चला. मग बघू." सरस्वतीच्या म्हणण्याचा अविर्भाव असा होता, की सारे खळाळून हसले.
"काही म्हणा कुलकर्णी, मानलेबुवा तुम्हाला!"
"कसचे काय दामोदरजी, न पटणाऱ्या, अवास्तव खर्च कमी करण्याची सुरुवात आपल्याच घरातून करावी असा विचार केला. आता हक्काने इतरांना सांगता येईल." बोलताना कुलकर्ण्यांचे लक्ष दाराकडे गेले. दारातील व्यक्तीला पाहून ते म्हणाले,
"अरे, या. चौधरी या." तसे चौधरी आत आले. ते सोफ्यावर बसत असताना त्यांचा परिचय करून देत कुलकर्णी म्हणाले,
"चौधरी, हे घ्या एक लाख साठ रुपयांचा धनादेश. सांभाळा सारे."
"कुलकर्णीसाहेब, खरेतर आपले अभिनंदन करावयास हवे. पंचगिरीसाहेब..." चौधरींना थांबवत कुलकर्णी यांनी विचारले,
"चौधरी, हे सांगणे गरजेचे आहे का?"
"होय! आवश्यकच आहे. मिळालेल्या हुंड्याचा कसा सद्उपयोग होतो हे यांच्यासोबतच साऱ्या जगाला कळायला हवे."
"आहे तरी काय हे गौडबंगाल?" दामोदरपंतांनी विचारले.
"गौडबंगाल वगैरे काही नाही. तुम्ही दिलेले ऐंशी हजार आणि आमचे ऐंशी हजार असे एक लाख साठ हजार रुपये श्रीपाल-छायाच्या नावाने एका योजनेत गुंतवत आहे." कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
"म्हणजे दुसऱ्या शब्दात तुम्हीसुद्धा हुंडा देताय?"
"नाही. पंत, नाही. हुंडा हा शब्दही उच्चारायचा नाही." कुलकर्णी हसतहसत म्हणाले. चौधरी यांनी
श्रीपाल-छाया दोघांच्याही काही ठिकाणी सह्या घेतल्या आणि म्हणाले,
"उद्या पावती आणून देतो. बरे, येतो मी."
"असे कसे जाणार? साखरपुड्याचे जेऊन जा."
"कुलकर्णी साहेब, हा निर्णय मात्र नंबर वन हं. दागिन्यापेक्षा ही योजना केव्हाही चांगली. सांभाळण्याची झंझट नको,चोराची भीती नको." दामोदर म्हणाले.
"शिवाय गुंतवलेल्या पैश्यातून अनेक योजनांना म्हणजे राष्ट्रीय प्रगतीच्या योजनांना चालना मिळते."
"पंचगिरीसाहेब, तेवढा कुठला आलाय हो विचार. मात्र आम्ही आमचा स्वार्थ साधला. या योजनेतून त्या दोघांसोबत त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या म्हणजे आमच्या औषधोपचाराचा खर्च कंपनी देणार आहे. शिवाय या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे छायाच्या पहिल्या बाळंतपणाचा खर्च आणि मुलाच्या बारशाच्या दिवशी शंभर माणसांच्या जेवणाचा खर्च ही कंपनी करणार आहे. " कुलकर्णी यांनी समजावून सांगितले.
"कुलकर्णीसाहेब, सारे लाभ नक्की मिळणार. कालच नवीन आलेल्या अटीप्रमाणे या दोघांच्या पहिल्या अपत्याचा कॉलेजमध्ये जाईपर्यंतचा सारा शैक्षणिक खर्च कंपनी देत आहे." चौधरी म्हणाले.
"व्वा! खूप छान पॉलिसी आहे. कुलकर्णीसाहेब, एक विचारु का?"
"भाऊजी, तुम्ही परवानगी मागयात? निःसंकोचपणे विचारा." कुलकर्णी म्हणाले.
"माझी अशी इच्छा आहे की, लग्न अगदी वेळेवर लागावे." दामोधरपंत म्हणाले.
"अगदी माझ्या तोंडातले बोललात. नियोजित वेळीच पहिले मंगलाष्टक सुरू होईल."
"कसे आहे, आपण सारे बैठकीत ठरवितो पण एकदा का वरात निघाली ना की मग आपल्या हातात काहीही राहत नाही. सारा कारभार इतरांच्या हातात जातो."
"बरोबर आहे. माझे श्रीपालशी बोलणे झाले आहे. माझी अशी इच्छा होती, की सीमांतपूजनाच्या अगोदरच वरात काढूया. पण श्रीपालचे असे म्हणणे आहे, की त्याचे काही मित्र... अर्थात वरातीत भाग घेणारे... ते लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी पोहोचणार आहेत. पण मी त्यांना खडसावून सांगणार आहे, की कितीही नाचा पण लग्नाची वेळ पाळलीच गेली पाहिजेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे लग्न लागल्यानंतर हार घालताना कुणीही नवरदेवाला उचलायचे नाही. दोघेही विधिवत आपापल्या जागेवरून एकमेकांना हार घालतील. मी आमच्याकडील मंडळींना निक्षून सांगणार आहे. तेव्हा तोही अघोरी प्रकार होणार नाही."
"कुलकर्णीजी, अगदी बरोबर निर्णय घेतला आहे. वधूवरांना उचलून हार घालणे शास्त्रसंमत नाही. मी अनेक गुरूंशी याबाबतीत चर्चा केली आहे. एकदा एका गृहस्थाने एका लग्नात लग्न लागल्याबरोबर वधूवरांना उचलून हार घालू नये, अशी जाहीर विनंती माईकवरून केली. जवळपास पाच ते सात मिनिटे त्याने या विषयावर प्रवचन दिले म्हणा परंतु दुर्दैव असे..." देशपांडे सांगत असताना चौधरींनी विचारले,
"दुर्दैव? ते कसे?"
"अहो, ती व्यक्ती व्यासपीठावर प्रेक्षकांकडे पाहून तळमळीने, पोटतिडकीने बोलत असताना त्याच्या मागे असलेल्या वधूवरांना त्यांच्या मित्रांनी उचलले... एवढे वर उचलले, की वधू वराला हार घालताना तोल जाऊन चक्क खाली पडली हो. बिचारीचा चेहरा फुटला हो..."
"माय ग्ग! काय हा अघोरी प्रकार म्हणावा..."
"एका लग्नात तर नवरी स्वतःचा तोल सांभाळताना नवरदेवाच्या गळ्यातच पडली..."
"तोल सांभाळताना पडली, की वधूवरांनी मुद्दाम संधीचा फायदा घेतला तेच जाणोत..." दामोदर म्हणाले आणि दिवाणखान्यात हास्याचा धबधबा कोसळत असताना श्रीपाल म्हणाला,
"बाबा, माझ्या मित्राच्या भावाचे लग्न होते. नवरदेवाला उचलायचे हे आम्ही आधीच ठरवले होते. त्याप्रमाणे शेवटचे मंगलाष्टक सुरू होताच आम्ही पाच-सहा जण दक्ष झालो. आमची हालचाल लक्षात येताच मुलीकडचे काही तरूणही सज्ज झाले. शेवटच्या मंगलाक्षता पडल्या न पडल्या की आम्ही नवरदेवाला असे जोशात वर उचलले म्हणता, की वर असलेला पंखा नवरदेवाच्या..."
"बाप रे! काही अनर्थ तर घडला नाही ना? पंखा सुरू असल्यामुळे नवरदेवाला काही जखम..."
"अहो, तो पंखाच बंद होता..." श्रीपाल म्हणाला आणि सारे हसत असताना आकाश म्हणाला,
"माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात तिकडच्या पोरांनी नवरदेवाला उंचच उंच उचलले. त्यामुळे आम्हालाही नाइलाजाने नवरीला उचलावेच लागले. वधूवर उंच जात असताना स्वतःचा तोल कसाबसा सावरण्याची कसरत करणाऱ्या वधूने वराच्या गळ्यात घालण्याच्या प्रयत्नात..." सांगताना आकाश क्षणभर थांबल्याचे पाहून अनेकांनी विचारले,
"काय झाले?"
"हार घालण्याच्या शेवटच्या क्षणी वधूला उचललेल्या एका मुलाच्या हाताला कळ लागली असावी म्हणून त्याने एका क्षणासाठी हात बाजूला केला तसा वधूचा तोल गेला आणि अखेरच्या क्षणी तिच्या हातातील तो हार वराशेजारी उभे असलेल्या गुरूंच्याच गळ्यात पडला. पाठोपाठ ती वधूही गुरूच्या गळ्यात पडली..."
"माझ्या एका परिचिताच्या लग्नात वधूपिता लग्नाच्या दिवशी सकाळपासून नवरदेव, त्याचे वडील, वराची मित्रमंडळी यांना हात जोडून विनवणी करत होता पण कसचे काय? हार घालण्याची वेळ येताच पोरांनी नवरदेवाला उचललाच." चौधरी म्हणाले.
"माझ्या मैत्रिणीने तशा पद्धतीने नवरदेवाच्या गळ्यात हार घालायला नकार दिला." छाया म्हणाली.
"म्हणजे?"
"शेवटचे मंगलाष्टक होताच पोरांनी नवरदेवाला उचलले. ते पाहून इकडची मुलेही वधूला उचलू लागली. तितक्यात वधू कडाडली, 'खबरदार मला उचलायचे नाही..."
"एक-एक मिनिट, ताई, तू त्यावेळी केलेली चारोळीच ऐकव की..."
"आकाश, शांत बस..." छाया आकाशला दटावत असताना कुलकर्णी म्हणाले,
"अरे वा! पंचगिरीसाहेब, आमच्या सूनेचा हा गुण माहिती नव्हता हो. ऐकव तर.." ते ऐकून नाइलाजाने छायाने चारोळी ऐकवली,
"खबरदार! जर वरास उचलूनी
घ्याल वर आणि उंचावर
लाथाडूनी हा हार नि श्रुंगार
निघून जाईन सोडून हा वर!"
"व्वा! बहोत खुब! पुढे काय झाले?" कुलकर्णी यांनी अलकास विचारले.
"शेवटी तो नवरदेव जमिनीवर आला." छाया म्हणाली.
"ताई, कोण ही मैत्रीण? मी नाव विसरले ग?" अलकाने विचारले.
"अलके, कशाची आलीय मैत्रीण? आपली ताई श्रीपालभाऊजींना इशारा देतेय." आकाश म्हणाला आणि सर्वांची हसून वाट लागली.
"कुलकर्णीसाहेब, निघावे का? खूप वेळ झालाय. कार्यक्रम अत्यंत छान झाला. परवानगी द्यावी. काही अडचण आली तर गावातच आहोत. संपर्कातही आहोतच." पंचगिरी आत्यंतिक समाधानाने म्हणाले. तितक्यात आकाश म्हणाला,
"बाबा, सगळ्यापेक्षा एक फार मोठे संपर्काचे साधन... हवे तर वाहिनीच म्हणा ना... श्रीपाल-छाया वाहिनी आहेच की..." ते ऐकून हसत हसत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला....
**