Swapnacha Pathlag --- 1 books and stories free download online pdf in Marathi

स्वप्नाचा पाठलाग!--- भाग १

निनाद त्याच्या पलंगावर गाढ झोपलेला होता. समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत नव्हता.
एका वटवाघुळाने आपला मोर्च्या, पांघुरणात घुसमटून झोपलेल्या निनादकडे वळवला. ते त्याच्या पायावर विसावल्याचे निनादला जाणवत होते! दुसरे त्याच्या खांद्यावर, तिसरे कमरेवर---त्याच्या अंगभर ती वटवाघुळे दाटी करू लागली! हि -हि वटवाघूळांची धाड, आपल्याला सोडणार नाहीत! आपले सर्व रक्त पिऊन टाकणार! मग सगळे मास खाऊन टाकणार! सकाळी फक्त आपला फक्त सांगाडा लोकांच्या हाती लागणार! ते, असाच आपला बदला घेणार! शकी नेहमी हेच सांगते! बहुदा ते, आत्ता खरे होणार!
निनाद भीतीने थरथरत होता. तो दचकून उठून बसला! तो घामाने पुरता भिजून गेला होता!
"काय झालं, निनाद?" स्वरालीने झोपाळू स्वरात विचारले.
"पुन्हा तेच स्वप्न! वटवाघुळीचं!"
शकी जवळच कोठे तरी असल्याचे निनादला जाणवतच होते, पण ती दिसत नव्हती!
त्याच्या बेडरूमच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने उलटे लटकलेले, ते लालभडक डोळ्यांचे वटवाघूळ अंधारात उडून गेले!
०००
"काल नेमकं काय झालं?" डॉ. मुकुलनी विचारलं. डॉ. मुकुल. सायकॉलॉजिचे प्रख्यात तज्ञ! त्यांच्या समोर निनाद आणि स्वराली, हे तरुण जोडपे बसले होते.
"तसे फारसे काही नाही. पण हि स्वराली खूप घाबरते. नको त्या गोष्टीचे टेन्शन घेते. बाब किरकोळच आहे. तुम्ही ऐकाल तर पोरकटपणाच वाटेल तुम्हाला." निनाद म्हणाला. हे मानसशात्राचं खूळ हल्ली उगाच फोफावतय, असे निनादचे मत होते.
"फारसे कसे नाही? अन हे ठरवणारा, तू कोण? डॉक्टरांना ते ठरवू देत ना!" स्वराली हिरीरीने म्हणाली.
" हो. हो. असे भांडू नका प्लिज. निनाद, मला फॅक्ट कळू देत. मग आपण ठरवू, बाब किरकोळ आहे का गंभीर! ओके!" डॉ.मुकुलनी हस्तक्षेप केला.
"तर झालं काय कि", स्वराली सांगू लागली, " काल रात्रीआम्ही, म्हणजे मी आणि निनाद, सिनेमा पहात होतो. साधारण रात्री आकाराचा सुमार असावा. सिनेमा चालू असताना, दोन्ही हात कानावर ठेवून हा अचानक ओरडला, ओरडला कसला? किंचाळलाच! भयंकर भीती वाटल्यासारखा चेहरा झाला होता तेव्हा याचा !"
"मग?"
"मग? मी डॉ. दीक्षितांना फोन करून बोलावले. निनादचा बीपी खूप वाढला होता. आणि पल्स पण. डॉक्टरांनी एक इंजक्शन दिले. ते दोन तास त्याचा जवळच थांबले. कारण इमर्जन्सीची उद्भवण्याची त्यांना शंका होती. पण गॉड थँक्स! तसे काही झाले नाही. त्यांनी तुम्हास रेफर केलं."
निनाद खाली मान घालून बसला होता. आपल्या सारखा एक तिशीतला तरुण 'भित्रा' सिद्ध होतोय, हे त्याला आवडत नव्हते.
"निनाद, तुम्ही का ओरडलात? काही आठवतंय का?"डॉ. मुकुलांनी विचारले.
"नाही, पण मला अचानक खूप भीती वाटली! कारण नाही सांगता येणार."
"ओके. बाय द वे, कोणता सिनेमा पहात होता तुम्ही?"
"बॅटमन सिरीज मधला तो कोणता तरी सिनेमा होता!"
"तुमच्या घरात होम थेटर आहे?"
"हो, मला आणि स्वराला सिनेमाचे वेड आहे. "
"टीव्ही स्पीकरवर होता का हेडफोन वापरता?"
"शेजाऱ्यांना त्रास नको म्हणून, आम्ही हेडफोनचं वापरतो."
त्या मुळे सिनेमाच्या दृश्याची परिणामकता वाढली होती. आणि त्या दृश्यात निनादच्या 'भीती' संबंधी काहीतरी होते. याची डॉ. मुकुलला कल्पना आली.
"अचानक भीती वाटण्याचे कारण आपण शोधून काढू. त्यात तथ्य असेल तर, ती भीती घालवण्यासाठी उपाय योजना करता येतील. निनाद, तुमची संमती असेल तर, मी तुम्हास संमोहित करून, ती 'भीती' कोणती?, हे,मी तुमच्या अंतर्मनातून हुडकून काढू शकेन! पण या साठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे. तुम्ही लहानपणी कशाला भीत होता का?"
"नाही. तसा मी धीट मुलगा होतो!" या डॉक्टरला त्या स्वप्नांचं सांगावं का? पण त्याचा या ओरडण्याशी काय संबंध? उगाच कशाला सांगायचं. विचारलंतर बघू. निनादने असे ठरवून टाकले.
" साधारण वीसेक मिनिटे लागतील, संमोहनाच्या एका सीटिंग साठी. चालेल ना? काय, निनाद ?"
" ठीक. मी तयार आहे." निनाद म्हणाला.
स्वरालीने पर्समधून आपला मोबाईल काढला. डॉ. गालातल्या गालात हसले, आता तासभर लागलातरी हरकत नव्हती!
०००
डॉ. मुकुल निनादला घेऊन संमोहन कक्षात आले. तो छोटासा कक्ष, फिकट निळ्या रंगात न्हावून निघाला होता. अगदी छत आणि जमीनसुद्धा निळसरच होती. त्या कक्षाच्या मध्यभागी, स्पा मध्ये असते तशी आरामदायी, पाय लांब करून झोपतायेण्या जोगी खुर्ची होती. डॉक्टरांनी निनादला त्या खुर्चीत झोपवले. संपूर्ण कक्षाच्या सुखद गारव्यात एक अनोखा सुगंध होता. डॉक्टरांनी एक हेडफोन निनादच्या कानावर लावला. दुसरा हेडफोन त्यांनी आपल्या कानावर लावला. आणि ते काचेच्या पार्टीशन मागे असलेल्या त्यांच्या टेबलवर जाऊन बसले.
निनादला मंद संगीत त्या हेडफोन मधून ऐकू येत होते. नदी काठचा परिसर, हिरवा गारवा, मधेच पाण्याचा खळखळाट असे काही काही त्या संगीतात होते. आपण नदी काठच्या झाडाला टेकून बसल्याचा निनादला फील येत होता.
"निनाद, माझा आवाज ऐकू येतोय का?"
"हो." निनादला संगीताच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनाच आवाज ऐकू येत होता.
"रिलॅक्स व्हा. शरीर सैल सोडा. कुठलाही ताण तुमच्या शरीरावर आणि मनावर नाही. चिंता मुक्त आहेत."
निनाद सैलावला.
"निनाद, तुम्हास समोर लाल ठिपका दिसतोय का? अगदी नजरे समोरच्या भिंतीवर."
"हो." समोरच्या भिंतीवर तळहाताच्या आकाराचा लाल रंगाचा ठिपका अवतरत होता.
"त्याचा कडे एक टक पहात रहा. त्याचा रंग बदलत जाईल. तो बदल मला सांगत रहा. "
" तो लाल ठिपका आता अधिक गडद होतोय, तो ब्राऊन झालाय, अजून गडद होत, तो काळा ठिक्कर पडलाय! तो जागेवरच फिरत असल्याचा भास होतोय."
" हू, पुढे?"
"आता त्यातून काळी वलय बाहेर पडत आहेत!"
" ओके. त्यातले एखादे वलय नजरेने फालो करा. पहा कोठवर जातंय ते वलय."
"ते वलय केंद्रातून निघतंय, फिकट होत छ्ता पर्यंत जातंय आणि ---- पुन्हा---- ग-ड -द ---हो--त ----कें--द्रा--क--डे ---- डोळे ज ---ड." निनादचा आवाज ग्लानीत असल्या सारखा येत होता.
" निनाद, रिलॅक्स, तुम्हाला खूप झोप येतीयय. झोपा. डोळे मिटून घ्या. खूप खोल गेल्याचा भास होईल. लहानपणीच्या काळात जात रहा.!"
" हो, खूप तळाला जातोय!"
काही क्षण डॉक्टर थांबले.
"निनाद बेटा, माझा आवाज ऐकू येतोय?" एखाद्या लहान मुलाची चौकशी करावी, अश्या सुरात डॉक्टर बोलत होते.
"हो, तल, तू बोल!"
"तुझ्या सारख्या लहान मुलांनी असं रात्रीच्या वेळी घराबाहेर भटकू नये!"
"कोन लहान? मी आता मोठा झालोय! तिसरीत गेलोय! आजी म्हनती, मला आठव लागलंय!"
"अरे,वा! तुला अंधारात फिरताना भीती नाही वाटत?"
"छट!, मी नाय भीत आंदाराला! मी शूर मुलगाय!"
"मग, कशाची भीती वाटते?"
"कशाचीच नाय! "
" वा!वा! लहान मुलांनी असच असायला हवं. मग, काल तू का ओरडलंस?"
"काल न? मी अन शकी वडाच्या झाडाच्या पारंब्याला धरून झोका-झोका खेलत होतो. अंधार झाला तरी आमी खेलतच होतो. मग एक पकोली गर्र-गर्र फिलत आली. अन माज्या गालावर चापट मालून गेली! मी पण तिला हातानं जोलात झटकल! गालातुन लक्त आलं माज्या! मग मी रडलो!"
"का? खूप दुखलं म्हणून ?"
"नाय!"
"मग?'
"आले, ती पकोली आता माझा बदला घेनार! माझ्या मागे लागनार!"
"असे कोण म्हणत?"
"शकी! ती मनते कि, मी पकोलीला हाताने झटकल ना! मग ती माझा बदला घेनाल! मला चावून चावून मालून टाकणार! माज लक्त पिऊन टाकनाल! मग मला पकोलीची भीती वाटती! खुप्प भीती वाटती!"
"अरे, बाळा असं काही नसत!"
"असच असत! शकी, खोत नाय सांगत! तूच खोतार्डा आहेस! जा तुझी कट्टी!" मग निनाद एकदम गप्प झाला. तो या पुढे काही बोलणार नाही, याची डॉक्टरांना कल्पना आली. त्यांनी तो संमोहनाचा सेशन आटोपता घेतला.
" बाय, तुला पुन्हा फोन करते." डॉक्टरांची चाहूल लागल्याने स्वरालीने फोन बंद केला. हिप्नॉटिझम रूम मध्ये जाताना निनाद टेन्स दिसत होता आणि डॉक्टर रिलॅक्स होते. आता डॉक्टर टेन्स आणि निनाद फ्रेश दिसत होता.
"Thanks for Co -opretion निनाद!, दोन दिवसांनी आपण पुन्हा भेटू. तोवर मी आत्ताच्या तुमच्या टेस्टचा अभ्यास करून ठेवतो. "
स्वराली आणि निनाद डॉ. मुकुलच्या क्लीनिक मधून बाहेर पडले, तेव्हा निनाद शीळ वाजवत होता! सर्पराईज! कॉलेजतला निनाद स्वरालीला दिसत होता.
तिने चुकून जरी वर पहिले असते, तर तिला ते दिसले असते! एक वटवाघूळ आपले पंख पूर्ण ताणून निनादच्या डोक्यावर घिरट्या घालत होते!

(क्रमशः )