Shetkari majha bhola - 16 - last part books and stories free download online pdf in Marathi

शेतकरी माझा भोळा - 16 - अंतिम भाग

१६) शेतकरी माझा भोळा!
थकला-मांदला गणपत शेहरात पोचला यार्डाकड जाताना त्येन ग्यासतेल, दोन बिंडल, येक काड्याची डब्बी घेतली. गणपत यारडात पोचला तेव्हा ड्रावर म्हन्ला, "पाटील, बिगीनं जावा. गेरडरचा माणुस यिवून गेला. फोल्डर घिवून बलीवलंय. पाटील, काय तरी जाळभाज करुन टाका."
गणपत गेरडरसायेबाच्या म्होरी उबा ऱ्हायला. गेरडरसायेबाफुडी फोल्डर ठिवलं. फोल्डर फात सायेब म्हन्ले, "तुम्हीच का गणपत? त्या लाल ट्रॅक्टरमधला पांढराशुभ कापुस तुमचाच का?"
"व्हय. व्हय ! सायेब, त्योच. सायेब, बुडापस्तोर सम्दी कपास तस्सीच हाय, येका बोंडाला तं डाग न्हाई का काडीकचरा न्हाई. सायेब, ए गिरेड मिळाल?"
"मिळेल ना तुमची तयारी असेल तर मिळेल की."
"आता मह्या तैयारीवर काय हाय?"
"सगळ तुमच्या हातात आहे. कापुस तपासायला आम्हाला कुठे वेळ आहे. तुम्हाला बोलायलाही वेळ नाही. बाहेर बघा, लोक ऊभे आहेत. तेव्हा पटकन सांगा किती देणार?"
"सायेब, म्या लै गरीब माणुस हाय. देयाला मह्याजोळ काय बी न्हाई. औदा पैयल्यांदाच सर्की लावली..."
"हे पहा. टॅक्टर आणलय ना? मग दहा हजार घेवून या मग ए ग्रेड..."
"सायेब. खर सांगतो व्हो. येक बी पैका न्हाई. ईस्वास ठिवा. मारोतीरायाची आण...बायकुची आण."
"ये बाबा, शपथा नको. पैसा देणार का सांग?"
"कहाचा पैका देयाचा रं तुला हराम्या? कपास लावली म्या, औसद फवारली म्या, पाणी देलं म्या, खत देली म्या, कपास येचली म्या, कपास भरली म्या ... आन् कुत्तरीच्या त्वा काय केलस रे? लै सिकलास म्हून दिमाक दाखवतो ? शान्या तू कोण र गिरेड लावणार? जाय, दमडीबी देत न्हाई. तू काय उपटणार हाईस. करुन करुन काय करशील शी गिरेड लावशील? तेव्हढाच तुह्या हातात हाय ना जा मग लाव. थुत तुमच्या जिनगानीवर..." गणपत तसा वरडत आसताना त्येला कोणी तरी बाहीर काढलं. फोल्डर घिवून गणपत पुना गाडीकडे निघाला. चार-दोन शेतकरी त्येच्यासंग निंघले.
"खर हाय सोयऱ्याचं..."
"आर, सोन्यावाणी चकचकीत वाण हाय गडयाचा. मंग चिडणार न्हाई तं काय करलं?"
"आर ते फा मारकीट कमेटीचे चेरमन यायलेत. पावनं, तुमी सांगा त्येंना."
तव्हर चेरमन त्येंच्याजवळून जावू लागले. तसा गणपत म्हणला, "सायेब, त्या गिरेडरला काय तरी सांगा की."
"काय झाल?"
"सायेब, मझा पांडराशिपद वाण हाय. येका बोंडालाबी काळं न्हाई का कचरा न्हाई तरी त्यो हरामी धा हज्जार रुपे मांघतो."
"त्याचं आस्य हाय, त्यो हाय फेडरेसनचा माणूस म्हंजी सरकरी माणूस. आपुन त्येला काय बी सांगू शकत न्हाई"
"तू काय सांगणार हाय रे नामर्दा! कहाला चेरमन झालास? त्या सायेब लोकायची हांजी हांजी कराया की त्याची..."
"ये भडव्या, त्वांड आवर.."
"आतापस्तोर त्येच केलं हाय. आन मला तू सांगणार रे कोण? तू हरामी आवलाद हायेस. शेतकऱ्यांच्या जीवावर चेअरमन झालास आन् आज त्यांना ईसरून त्या सायेबाचा दलाल झाला हायेस. आरं, पैक्याची येव्हढी खाज हाये तर आज राती निरव त्या साहेबा संग... ले पैका... थू तुझ्या जिनगानीवर !"
"तुझ्या मायला मी...." म्हणत चेअरमन गणपतवर सुटला पर लोकायनं दोगायलाबी धरलं. चेरमनला हापीसाकडे नेलं तर गणपतला गाडीकडे. गणपत वरडत व्हता,
"सोडारं सोडा मला. यान्ला आस्सा हिस्का दाखवितो के साले सोत्ताचं नाव ईसराव येंनी. म्हण पैका.... सर्कारी माणुस.... काय जाळाचे का सम्दे... म्हण शी गिरेड लावतो. आरं जाय रे भडवीच्या, काय लावाचं ते लाव. पर न्हाई तुह्या.... नांगराचा फाळ घुसवला तं मंग फाय...."
गणपत गाडीजोळ पोचला. त्याचा त्यो आवतार बगून ड्रावर आन् दुसरे लोक म्हन्ले,
"काय झालं? काय म्हन्ले साहेब..."
"त्येच्या मायला त्या सायेबाच्या. भोसडीचा मला धा हजार माग्तो न्हाई तं शी गिरेड लावतो म्हणं."
"आर ह्यो अन्याव हाय."
"हां, अन्याव हाय, भाडे व्हो, तुमी गांडीत शेपुट घालून सालानुसाल त्येंच्याम्होरी गोंडा घोळता म्हूण ही येळ आली. आरं आपलेच लोक रातच्या आंदारात माय-भैनी घालत्यात म्हून तो शेपारला हाय. थू तुमच्या जिनगानीवर.पर त्येंची मस्ती म्या जिरवणार. न्हाई त्या सायेबाच्या..." म्हण्ता म्हण्ता गणपतनं बिंडल काढलं. त्यातली येक बिडी काढून ती त्वांडात धरली. डब्बीच शील फोडताना त्येच ध्यान ट्रॅक्टरकडं गेलं. ग्यासतेलानं भरलेली बाटली लवंडली व्हती. कपाशीवर ग्यासतेल सांडत व्हतं गणपत बिडी शिलगावत टेक्टरजोळ पोचला. बिडी शिलगायची सोडून त्यानं ती पेटलेली काडी टैक्टरकडं फेकली. आन्..आन्... दुसऱ्या मिन्टाला कापसानं पेट घेतला. फाता फाता सम्दं टैक्टर पेटलं. कोन्लाबी कायबी कळायच्या पैलेच आगीनं जोर पकडला. धुराचे लोट आकाशाला भिडले व्हते. यारडातले लोक तिकडे पळाले. त्यात चेरमन आन् गिरेडरबी व्हते.
"शी गिरेड देत्यो व्हय? आरं पोटच्या पोरावाणी जपलय म्या बोंडायला. हाय का कोणाचा आसा वाण? आर, दिट लागावी, नदर टिकू न्हाई आसा माझा कापुस आन् त्येला तू शी गिरेड लावतो?पैका द्या म्हणं. घे किती फायजेत बोल...किती फायजेत.. ईस.. पसतीस हजार? आरं, हराम्या तुच पैका फायलास का? आर, आश्या पांडऱ्याशिपद वाणाचा गिरेड लिहायला तुहे काळे हात कामाचे न्हाईत. आश्या मालाला शेतकऱ्यायचे हात फायजेत. घे साल्या, आता धा हज्जार घे. कपाशीचा राखुंडा धा येळेला कपाळाला लाव. आरं धा हज्जार रुपै सोड पर धा खेट्र खायाची बी तुही लायकी हाय का? आन तू रे चोरा तो म्हण सरकारी माणूस हाय. तू रे .. तू शेतकरी हायेस ना? आरं, शेतक-्यायचा मूत आन् रगत पेवून येवढ्याला ढेऱ्या झाल्या हायेत तुमच्या. भडव्यांनो फाता काय चालत्ये व्हा. मह्या कपाशीवर तुमची सावली बी पडाय नगं. न्हाई तर तुमची दिट लागलं बगा... दावू
तुमाला मझा वाण? कसा हाय फा.. कसा दिट लागायचा कापुस हाय. त्यो.. त्यो... आरं बगा तर खरं... तुमाला ए गिरेड लावा आस्स सांग्णार न्हाई. तुमच्यामंदी ती हिंमतच न्हाई. मह्या कपाशीला गिरेड लावाय खरा मर्द फायजेत. म्या हाये ना म्या लावतो ए गिरेड! नुस्त फा तर खरी. न्हाई तुमचे डोळे दिपले तर गणपत नाव लावणार न्हाई....थू: तुझ्या जिनगानीवर..." आसं म्हन्ता म्हन्ता, कोन्ला काय बी समजायच्या पैले गणपत बिगी बिगी ज्या बाजूनं जाळ नव्हता त्या बाजूनं टैक्टरवर चढला आन्... आन् सम्द्यांच्या समुर त्येन त्या जाळामंदी उडी घेतली....

**समाप्त**
नागेश सू. शेवाळकर