mayajaal - 11 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल -- ११

मायाजाल-- ११
पोलीसांबरोबर आत आलेल्या हर्षदला बघून इंद्रजीत ताडकन् उठून उभा राहिला.
" हर्षद तू? नाही! हे खरं नाही! तू --माझ्या जीवावर उठलायस? हे मी मान्यच करू शकत नाही." इंद्रजीतच्या तोंडून नीट शब्दही फुटत नव्हते.
" आम्ही खात्री करून घेतली आहे. हे सगळे याचेच कारनामे आहेत. तुम्ही म्हणालात, की तुमच्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला. पण तुमच्यावर आणखी एक हल्ला झाला होता! तुम्हाला आठवत असेल तर; एकदा तुमच्या गाडीचे ब्रेक फेल केले गेले होते. आणि तुम्ही नशीबाने वाचला होतात! तेही याच्याच माणसांनी केले होते; हे आम्हाला त्यांच्याकडूनच कळलं. " इन्स्पेक्टर म्हणाले.
हे सर्व ऐकल्यावर इंद्रजीतच्या पायातली शक्ती जणू निघून गेली. तो हताश झाल्याप्रमाणे खुर्चीवर बसला. तो काही बोलत नव्हता पण एकटक हर्षदच्या चेह-यावर खिळलेली त्याची नजर खूप काही बोलत होती. त्याच्या मनात मात्र विचारांचा झंझावात चालू होता.
हर्षद खाली मान घालून बसला होता. इंद्रजीतच्या नजरेला नजर देण्याचं धैर्य त्याच्यामध्ये नव्हतं. इंद्रजीतच्या संवेदना जणू बधिर झाल्या होत्या. गलितगात्र झाल्याप्रमाणे तो खुर्चीला खिळला होता. " हे शक्य नाही----कुठे तरी गफलत होतेय! " त्याचं मन अजूनही त्याला सांगत होतं.
शेवटी वातावरणातला ताण असह्य झाला, आणि अविनाश बोलू लागले,
"तुला आम्ही नेहमीच इंद्रजीतप्रमाणेच मानत होतो! चांगल्या घरातला, उत्तम संस्करातला मुलगा-- म्हणून तुझ्यावर विश्वास टाकत होतो! आणि तू त्याच्यामागे मारेकरी लावलेस? माझ्या इंद्रजीतनं तुझं काय बिघडवलं होतं? "
हर्षदकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. पण त्याच्या डोळ्यात पाणी मात्र आलं. बहुधा त्याला इंद्रजीतच्या कुटुंबाने दिलेलं प्रेम आठवलं असावं.
शेवटी इंद्रजीत उठला,
"इन्स्पेक्टर साहेब माझी कंप्लेंट मी मागे घेतो. या सगळ्यांनाच सोडून द्या!"
" अरे पण जीत--- यांनी परत तुला त्रास दिला तर? तो तुझ्या जिवावर उठला होता; त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे!" त्याचे वडील त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते.
इन्सपेक्टरनी पुढे केलेल्या पेपर्सवर सही करून इंद्रजीत हर्षदकडे वळला,
"हर्षद! तू हे का केलंस; मला माहीत नाही! पण मी इतक्या वर्षांची आपली मैत्री विसरू शकत नाही! मी माफ केलं तुला!"
आणि तो वेगाने पोलिस स्टेशन मधून बाहेर पडला.

----------*******----------
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजले तरी इंद्रजीत तयार होऊन रूमबाहेर आला नव्हता. त्याची आई त्याच्या बघायला गेली तेव्हा तिने पाहिलं की तो अजुन उठला नव्हता. आईने हलवून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो तापाने फणफणला होता. बालमित्राने दिलेला धोका त्याने मनाला लावून घेतला होता. " त्याच्या मनात सतत विचार येत होता, हर्षदने असं का केलं असेल? मी तर त्याला माझा भाऊ समजत होतो!"
विचार करून करून थकला पण त्याला उत्तर मात्र मिळत नव्हतं..
आणि अचानक दोन्ही वेळा मारेकऱ्यांच्या तोंडून आलेले शब्द त्याला आठवले. ते म्हणाले होते, " त्या मुलीचा नाद सोड नाहीतर पुढच्या वेळी जिवंत राहणार नाहीस!" आणि खरोखरच दुसऱ्या वेळी त्यांनी अधिकच जीवघेणा हल्ला चढवला होता.
आता बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या. म्हणजे हे सगळं हर्षद करत होता----प्रज्ञासाठी! हर्षद सतत प्रज्ञापासून दूर रहाण्याचा सल्ला देत होता; तो तिच्यावर राग होता म्हणून नव्हे; तर त्याचं प्रज्ञावर प्रेम होतं; म्हणून!
********
इंद्रजीतला ताप आलाय हे कळलं; तेव्हा प्रज्ञा इंद्रजीतला भेटायला आली. त्याने तिला पोलीस स्टेशन मध्ये घडलेली कथा सांगितली अाणि म्हणाला,
“ज्याला आपण सरळ - साधा समजत होतो तो हर्षद असं काही करेल यावर माझा प्रथम विश्वास बसेना. हर्षदचा गुंडांशी संबंध? कसं शक्य आहे? आणि तेही मला मारण्याची सुपारी त्याने त्या गुंडांना दिली होती; हे कसं शक्य आहे? मी त्याचं काय वाईट केलं होतं? -----पण जेव्हा तो खाली मान घालून बसला, तेव्हा माझी खात्री झाली; की ते इन्सपेक्टर खरं बोलत होते. माझ्याकडे आणि बाबांकडे बघण्याची त्याची शेवटपर्यंत हिम्मत झाली नाही. ज्याला मी भावाप्रमाणे मानत होतो; तो माझा मित्रच माझ्या जिवावर उठला होता! जगात विश्वास तरी कोणावर ठेवायचा?" हे बोलताना इंद्रजीत मनातून किती खचला आहे; हे त्याच्या थरथरणा-या आवाजातून प्रज्ञाला कळत होतं.
"हर्षद असं काही करेल; यावर विश्वास बसत नाही!" प्रज्ञा म्हणाली.
पण कटू असलं तरी हे सत्य होतं. तिला ते स्वीकारणं भाग होतं.
" मग तो आता लाॅक- अप मध्ये असेल नं? मोठी शिक्षा होईल त्याला! माई आणि तात्यांचं नशीब कसं आहे; बघ! आता कुठे हर्षदला चांगला जाॅब मिळाला होता. आयुष्यात सुख आलं होतं! पण त्यांचं नशीबच खडतर आहे!"
" मीसुद्धा हाच विचार केला; आणि माझी कंप्लेंट मागे घेतली! सोडून दिलं त्याला!" इंद्रजीत हात झटकत म्हणाला.
" आई- बाबांना हे आवडलं नाही! तुला काय वाटतं? मी योग्य केलं नं?" इंद्रजीतच्या या प्रश्नावर प्रज्ञा दिलखुलासपणे म्हणाली,
"जीत! खरंच तुझं मन खूप मोठं आहे. तू ही खूप चांगली गोष्ट केलीस!" तिच्या मनातली इंद्रजीतची प्रतिमा आता अधिकच तेजस्वी झाली होती.
प्रज्ञाला आठवत होतं,
ती लहान होती; तेव्हा नीनाताई एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. तिला त्यावेळी दिवसभर माई सांभाळत असत. खूप मायेने तिला खाऊ- पिऊ घालत असत - कंटाळा आला की, गोष्टी सांगत असत. तात्या घरी येताना तिच्यासाठीही खाऊ घेऊन येत असत. हर्षदशी तिची गट्टी तेव्हापासूनच होती. माई - तात्यांविषयीचं प्रेम अजूनही मनात जागृत होतं! हर्षदविषयी तारूण्यसुलभ आकर्षण कधी वाटलं नव्हतं; पण तो कुटुंबातलाच एक वाटत होता. इतकं सगळं कळलं; तरी तिला त्याच्याविषयी घृणा वाटत नव्हती; तर तो वाट चुकला आहे---- त्याला मार्गावर आणायला हवं, असं वाटत होतं.
प्रज्ञाने ठरवलं - त्याला स्पष्ट सांगून टाकायचं,
" तू जीतला मार्गातून बाजूला केलंस, म्हणजे मी तुझ्याशी लग्न करेन हा तुझा भ्रम आहे. मी फक्त जीतवर प्रेम केलंय. तुझ्याकडे मी या दृष्टीने कधीच पाहिलं नाही! तू माझा चांगला मित्र आहेस आणि रहाशील! आता कुठे तुझं आयुष्य मार्गाला लागलंय- वाईट संगत सोडून दे! माईंची आणि तात्यांची काळजी घे. दोन लहान भावंडांचं भवितव्य तुझ्यावर अवलंबून आहे, हे ध्यानात ठेवून वाग!"
हे सगळं त्याच्याशी सविस्तर बोलायचे असं तिने ठरवले होते पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं.
********
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रज्ञा काॅलेजला चालली होती. रस्त्यावर मानवच्या शेजारी रहाणारे शामकाका भेटले. प्रज्ञाला बघून ते थांबले,
"तुला काही कळलं का?"त्यांनी हलक्या आवाजात विचारलं.
"काय झालं काका? एवढे थकलेले का दिसताहेत तुम्ही? तब्येत बरी आहे नं?
प्रज्ञाने विचारलं.
"माझी तब्येत बरी आहे; पण तुला कळलं का? काल रात्री हर्षदने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला." ते हलक्या आवाजात इतर कोणाला ऐकू जाणार नाही; याची काळजी घेत म्हणाले.
" सुदैवाने विष अंगात पसरण्यापूर्वी त्याच्यावर उपचार झाले; म्हणून वाचला. आता धोका टळला आहे!" ते पुढे म्हणाले.
"आता कसा आहे तो?" प्रज्ञाने चौकशी केली.
"बरा आहे आता! माझी संपूर्ण रात्र हाॅस्पिटलमध्ये गेली. शिकवून -सवरून अाई-बापाने मोठं करायचं; आणि पोराने मात्र घोर लावायचा! घाबरली होती दोघंही! म्हणून त्यांच्याबरोबर रात्रभर थांबलो होतो!"शामकाका म्हणाले.
"त्याने हे कशासाठी केलं; काही कळलं का?" प्रज्ञा मनातून थोडी घाबरली होती. या प्रकरणात तिची विनाकारण बदनामी होणार होती.
" खरं म्हणजे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; पण पोलिसांना खरं सांगितलं नाही. चुकून औषध समजून विष घेतलं, अशी जबानी दिली त्यानं! त्यामुळे अजून खरं काही समजलं नाही. शामकाकांनी माहिती पुरवली, आणि प्रज्ञाने सुटकेचा श्वास सोडला.
"ही आजकालची मुलं---कोणाला भेटतात-- त्यांचा मित्रपरिवार कसा आहे--- घरच्या माणसांना काहीही माहीत नसतं. त्यातून माई आणि तात्या दोघंही सरळ स्वभावाची माणसं--- यांचे छक्के- पंजे त्यांना कसेलन कळणार?"
बोलघेवडे शामकाका त्यांच्या मनातला संशय बोलून दाखवत होते.
"काका! रात्रभर दमला आहात! घरी जाऊन विश्रांती घ्या! " त्यांना निरोप देत प्रज्ञा म्हणाली.
*********
हर्षद समजावण्याच्या पलीकडे गेलेला आहे; हे प्रज्ञाच्या लक्षात आलं होतं. त्याच्याशी बोलून काही उपयोग नव्हता. ती भेटायला गेली असती; तर आपलं प्रेम किती दिव्य आहे हे तिला पटवून देऊन त्याने तिच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता, आणि त्या जोरावर तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असता. तिला हर्षदचा स्वभाव आता थोडा थोडा कळू लागला होता. यापुढे त्याच्याशी मैत्री ठेवायची नाही, आणि शक्यतो त्याच्यापासून चार पावलं दूरच राहायचं असं तिनं मनाशी ठरवून टाकलं.
******** contd.-- part 12