mayajaal - 16 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | मायाजाल - १६

मायाजाल - १६

मायाजाल - १६
शेजारी या नात्याने तात्या आणि माईंशी अनेक वर्षांचे संबंध होते; त्यामुळे हर्षद हाॅस्पिटलमध्ये होता, हे कळल्यावर अनिरुद्ध आणि नीनाताई त्याच्या तब्येतीची विचारपूस करायला त्याच्या घरी गेले. अशक्तपणा असल्यामुळे हर्षद अजून रजेवर होता.
त्यांना प्रभावित करायची ही मोठी संधी होती त्याच्यासाठी!
त्याने त्यांना आपल्या नव्या फ्लॅटचा प्लॅन दाखवला.
" चार- सहा महिन्यांत ताबा मिळेल! गृहप्रवेशाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे! नवीन गाडीही बुक केलीय! मला आॅफिसला जायला बसच्या रांगेत उभं रहावं लागणार नाही; आणि तात्यांना आणि माईंना कुठे जायचं - यायचं असेल; तर उपयोगी पडेल! --- काही वर्षे हप्ते भरावे लागतील; पण कंपनीने मला पगाराचं चांगलं पॅकेज दिलंय! इंटरनॅशनल कंपनी आहे नं! हप्ते भरायला काहीही त्रास होणार नाही! माई आणि तात्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेयत! त्यांना सुखात ठेवणं; हे माझं कर्तव्य आहे! सीमा आणि अंकितची आता बिलकुल काळजी करू नका, तुम्ही आता फक्त आराम करा; असं मी त्यांना बजावून ठेवलंय!"
" तुझे आई बाबा नशिबवान आहेत , की त्यांना तुझ्यासारखा मुलगा मिळाला, पण हे वीष घेण्याचे प्रकरण काय आहे?" नीनाताईंनी न रहावून विचारलं.
" औषधाच्या ऐवजी ते चुकून- -अनवधानाने घेतलं गेलं." हर्षद म्हणाला.
" यापुढे काळजी घे. तब्येत सांभाळ! तुझ्या घराचा आधारस्तंभ तू आहेस; हे विसरू नकोस! अनिरुद्ध म्हणाले.
" प्रज्ञा कशी आहे? तिचं हे एम.बी. बी. एस.चं शेवटचं वर्ष आहे नं? तिच्या लग्नाची तयारी एव्हाना सुरू झाली असेलच!" त्याने साळसूदपणाने विचारलं.
बाबांना त्याला सांगितल्याशिवाय रहावेना! ते म्हणाले,
"काय सांगू तुला! इंद्रजीत पुढचा अभ्यास करायच्या निमित्ताने लंडनला निघून गेला! आणि त्यानंतर सगळे संबंध तोडून टाकले! गेल्यापासून एक फोनसुद्धा केला नाही. तो अशात-हेने फसवेल, असं कधी वाटलं नव्हतं. तुझा मित्र आहे ना तो? एकदा त्याला फोन करून विचारशील का? निदान डोक्यात राख घालून तडकाफडकी तिकडे जाण्याचा निर्णय त्यानं का घेतला; हे तरी कळू दे आम्हाला! "
" होय काका! मी नक्की फोन करेन! त्याचं वागणं मलाही आवडलं नाही! प्रज्ञाला तो दुखवेल असं कधी वाटलं नव्हतं! पण तो माझा मित्र असला, तरी त्याच्या स्वभावाविषयी मी अनेक वेळा प्रज्ञाला सावध केलं होतं! पण तिने माझ्यावर नाही-- त्याच्यावर विश्वास ठेवला!" निमित्त मिळाल्यावर हर्षदने लगेच फायदा घेतला!.
जीतने प्रज्ञाला फसवलं आहे अशी तिच्या आई-वडिलांची समजूत झाली आहे. तिला त्या दु:खातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न नक्कीच चालू असतील. हर्षदचं व्यक्तिमत्त्व उत्तम होतं. तो प्रज्ञाचा बालपणापासूनचा मित्र होता. तो तिला सुखात ठेवेन याविषयी त्यांच्या मनात यत्किंचितही संशय असण्याची शक्यता नव्हती.....
हर्षदला आता मोठ्या पगाराची नोकरी होती--जवळच्याच एका नवीन सोसायटीत प्रशस्त फ्लॅट त्याने बघून ठेवला होता-- गाडी बुक केली होती; हे सगळं त्यांनी पाहिलं होतं. तात्या आणि माईंची तर प्रज्ञा लहानपणापासूनच लाडकी होती, तिचा हात जर मागितला ; तर अनिरुद्ध आपल्याला नकार देणार नाहीत, याची त्याला खात्री होती.
पण एक गोष्ट त्याच्या मनाला खटकत होती. प्रज्ञाने त्याची एकदाही चौकशी केली नव्हती. तिचं मन थाऱ्यावर नसावं म्हणून ती आपल्या चौकशीला आली नसावी ; अशी आपल्या मनाची समजूत हर्षदने करून घेतली होती. तिला या दुःखातून लवकरात लवकर बाहेर काढायचं आणि तिला एवढ्या सुखात ठेवायचे की तिला जीतची आठवणही येणार नाही ' असं त्याने मनोमन ठरवलं होतं. आता हक्काने तिला लग्नाची मागणी घालण्याएवढं स्टेटस त्याने नक्कीच मिळवलं होतं
त्याचा एकच कयास चुकला होता. प्रज्ञा आणि जीतचं लग्न मोडण्यासाठी आपण जे काही केलं; ते इंद्रजीतने प्रज्ञाला सांगितलं नाही असं त्याला वाटत होतं. ' जर सगळं माहीत असतं; तर प्रज्ञाने आणि तिच्या आई- वडिलांनी आपल्याशी संबंध तोडले असते ---आपलं तोंडही बघितलं नसतं; पण तसं काही घडलं नाही, म्हणजेच प्रज्ञाला काही माहीत नाही! ' असा समज त्याने करून घेतला होता... पण प्रज्ञा त्याला पूर्ण ओळखून होती! तो टोकाचे निर्णय घेत होता; त्यामुळे त्याला दुखवण्यात अर्थ नव्हता; पण त्याच्यापासून चार हात लांब रहायचं, हे तिने कधीच ठरवून ठेवलं होतं!
इकडे हर्षद मात्र मनात मांडे खात होता,
"आता प्रज्ञाचा कल बघून हळूहळू तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायचा. आता बरं वाटलं; की मिशन प्रज्ञा सुरू करायचं!" त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. जीतकडून धोका मिळाल्यामुळे आपला आधार प्रज्ञा नक्कीच स्वीकारेल यात हर्षदला जराही शंका वाटत नव्हती. "
********
इंद्रजीत अशातऱ्हेने अचानक आयुष्यातून निघून गेल्यामुळे प्रज्ञा सुरुवातीला कावरीबावरी झाली होती - तिला खूप एकाकी वाटत होतं. डोळे सतत भरून येत होते. कुठेही लक्ष लागत नव्हतं. मनाने ती खूप दुखावली गेली होती, पण ती पहात होती; की आपल्याला दुःखी पाहून आई - बाबांना त्रास होतोय; घरात कामाव्यतिरिक्त कोणी कोणाशी बोलत नव्हतं. एकुण वातावरण कुंद झालं होतं. हळूहळू ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली.
अनिरुद्ध आणि नीनाताईंना काळजी वाटत होती की; प्रज्ञा हा धक्का कसा पचवणार? तिला कसं समजावायचं? इंद्रजीत तर काहीही न सांगता निघून गेला होता; कदाचित् कधीही परत न येण्यासाठी! कारण त्याने लंडनला गेल्यापासून एकदाही प्रज्ञाला फोन केला नव्हता. त्याच्यासाठी झुरत रहाण्यात काहीही शहाणपणा नव्हता. आता तिनं स्वतःला सावरलं नाही; तर तिच्या करिअरचं खूप मोठं नुकसान होणार होतं. तिची फायनल एक्झॅम जवळ आली होती; आणि मन अभ्यासात एकाग्र करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.
एक दिवस प्रज्ञा विचारात गुरफटून विमनस्क बसली होती. हातात पुस्तक होतं,; पण डोक्यात विचार इंद्रजीतचे होते! आज तिच्याशी बोलायचं; असं बाबांनी ठरवलं! त्यांनी तिला हाक मारून तंद्रीतून जागं केलं,
" जीतचाच विचार करतेयस नं? त्याचं हे वागणं अगदी अनपेक्षित आहे. आम्ही त्याला चांगला मुलगा समजत होतो पण शेवटी तो मन मानेल तसं वागणारा - दुसऱ्याचा विचार न करणारा आणि संवेदनाशून्य निघाला."
" तो असा वागेल; असं कधीच वाटलं नव्हतं, बाबा! निदान त्याला असं अचानक् लग्न मोडावंसं का वाटलं;; हे कळलं असतं तरी डोक्यात विचारांचा एवढा गुंता झाला नसता!" नकळत प्रज्ञाचे डोळे पाण्याने भरले.
"पण आता तुला त्याचं खरं रूप. कळलंय नं? कधी-कधी कधी जे होतं, ते आपल्या चांगल्यासाठी होतं. लग्न झाल्यावर असं विचित्र वागला असता; तर तुला किती त्रास झाला असता? अशा एककल्ली माणसाबरोबर आयुष्य काढणं सोपं नाही!" प्रज्ञा काही बोलत नाही; हे पाहून ते पुढे बोलू लागले,
"पुढे काय करायचं ठरवलं आहेस? तुझी परीक्षा जवळ आलीय! तुला विसर पडलेला दिसतोय!" त्यांनी विचारलं.
"मला काहीच सुचत नाही! काय करू बाबा? अभ्यासात लक्ष लागत नाही!" आपली मनःस्थिती सांगताना प्रज्ञाचा गळा दाटून आला होता..
"प्रज्ञा बेटा! कोणी कसं वागावं, हे आपल्या हातात नसतं. त्याचा निर्णय त्याने घेतला! पण या परिस्थितीतून मार्ग काढणं मात्र तुझ्याच हातात आहे. आयुष्याला दिशा देण्याचे प्रयत्न तुझे तुलाच करायचे आहेत! यापुढे अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चांगल्या रीतीने पास होणं तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. इथवर येण्यासाठी तू अनेक वर्षे रात्रंदिवस मेहनत घेतली आहेस! तू तुझ्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी -गोरगरिबांसाठी करायचा की तुला फसवणा-या इंद्रजीतच्या आठवणी काढत - दुःख करत स्वतःचं आयुष्य आणि शिक्षण मातीमोल करायचं, हे तुझं तूच ठरवायचं आहे! आम्ही सगळे नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत, तू एकटी नाहीस हे कायम लक्षात ठेव!" प्रज्ञाशी स्पष्ट बोलणं आवश्यक होतं; नाहीतर तिची एवढ्या वर्षांची मेहनत फुकट जाणार होती.
यावर प्रज्ञा काही बोलली नाही, पण वडिलांचं म्हणणं तिला पटलं होतं. आज ते जे काही सांगत होते, ते ती लहानपणापासून ऐकत आली होती. तिची हुशारी पाहून तिने खूप शिकावं ही त्यांची मनापासूनची इच्छा त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती.. त्यासाठी ती लहान असल्यापासून त्यांनी किती कष्ट घेतले होते! त्यांचं वेळापत्रक तिच्या आणि निमेशच्या शाळा-कॉलेजच्या वेळापत्रका भोवती फिरत होतं. आणि घराचं बजेट त्यांच्या -कॉलेजच्या खर्चाप्रमाणे ठरत होतं.
"मी जर मन खंबीर केलं नाही; आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर माझ्याबरोबरच या दोघांचेही कित्येक वर्षांचे परिश्रम फुकट जातील. माझ्या आयुष्याला काही ध्येय रहाणार नाही आणि त्याचबरोबर यांच्याही सर्व इच्छा अपूर्ण राहतील. मला स्वतःला सावरलं पाहिजे अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे!" त्याक्षणी प्रज्ञाने निश्चय केला. मनावर संयम ठेवून, रात्रंदिवस परिक्षेची तयारी करायला सुरूवात केली.
********* contd---- part. 17

Rate & Review

Bramha Sutar

Bramha Sutar 5 months ago

Arun Salvi

Arun Salvi 2 years ago

Anupriya

Anupriya 3 years ago

महेश

महेश 3 years ago

Dilip Yeole

Dilip Yeole 3 years ago