Samarpan - 24 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - २४

रंगरेज़ मेरे, रंगाकर रुह़ को मेरे,
रंग छूडाने की कोशीश ना कर
थक गया है सब्र इंम्तेहान देते देते,
हराकर इसे, मुझे शर्मिंन्दा ना कर


माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यातून एक गोष्ट मी नक्कीच शिकली, ती म्हणजे 'संयम'...पण सगळं घडून गेल्यावर काय फायदा त्या 'उशिराने शिकलेल्या संयमाचा'...माझ्या आयुष्याच गणित फारच अवघड दिसत होतं मला, असं वाटत होतं हातात काहीच उरणार नाही आणि जे उरेल ते मी स्वीकारणार नाही...आणि आहे ती गोष्ट लवकर मान्य करायची नाही हीच माझी सगळ्यांत मोठी चूक....विक्रम माझ्यासाठी फक्त एक गोड स्वप्न होतं, आणि माझा मूर्खपणा हा होता की मला त्या स्वप्नातून बाहेर यायचं नव्हतं...आणि आता मात्र अभयने माझं ते स्वप्न तोडलं असा माझा समज होता, त्यामुळे मला वाईट वाटत होतं. विक्रम आणि मी दोन समांतर रेषेसारखे होतो, सोबत चालू तर शकत होतो पण कधी एकत्र येऊ शकत नव्हतो...माझं सत्य फक्त आणि फक्त अभय आहे हे माहीत असूनही मी त्या क्षणभंगुर असलेल्या मृगजळामागे जात होती, याच एकच कारण होतं ते म्हणजे माझं गुंतलेलं मन....आणि माझ्या मनाची सुटका काही केल्या होत नव्हती....

किती राग किती चिडचिड होत होती माझी हा विचार करून की विक्रम असा का वागत असेल माझ्या सोबत. त्याच रागाच्या भरात मी विक्रमला मेसेज केला होता आणि दुसऱ्या दिवशी अभय सोबत जाऊन पोहोचली हॉस्पिटलमध्ये अबोर्शन साठी...नम्रता ही सोबत होती माझ्या, ती पण अभयच्या या निर्णयात कशी सहमत झाली मला हेच कळत नव्हतं... आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर एक तास थांबायला लावलं आम्हाला. जसा जसा वेळ जात होता तशी तशी तशी माझी माझ्या निर्णयावरची पकड सुटत जात होती, मी काहीतरी चुकीचं करत आहे माझी ही भावना दृढ होत होती...एक मन सांगत होत नाही विचार करायचा न जन्मलेल्या जीवाचा आणि संपवून टाकायचं सगळं, त्या जीवालाही आणि तोपर्यंत जळत राहायचं जोपर्यंत याची शाश्वती होत नाही की माझं आणि अभयच नातं त्यात 'राख' होत नाही...दुसऱ्याच क्षणाला हे वाटायचं की, जबरदस्तीने का होईना पण ज्या अग्नीला साक्षी ठेवून मी आणि अभयने या नात्याची सुरुवात केली, त्याच नात्याला जेंव्हा एक अंकुर फुटत आहे, मी ते संपवण्याइतपत कशी निष्ठुर होऊ शकते, त्या नात्याला अस अग्निहोत्र नाही करू शकत मी...अश्या कठीण प्रसंगी विक्रम ची गरज खूप भासत होती, मी डोळे बंद केले आणि मला विक्रमचे शब्द आठवले, " सोनू, तुझ्या प्रत्येक निर्णयासाठी माझ्या वर अवलंबून नको राहू, जर तू कान्हाला एवढं मानते तर तो विनाकारण विनाशाच कारण बनत नाही, त्यामुळे तुझी द्विधा मनस्थिती मी नाही तुझा कान्हा दूर करेल, आणि जेंव्हा तुला तुझा मार्ग सापडेल तेंव्हा समजायचं हा विक्रम तुझ्या सोबत आहे..." बरोबर... अगदी बरोबर....तो लीलाधर विश्वकर्मा असून विनाश करत नाही तर मला काय अधिकार आहे?? मला माझं उत्तर मिळालं आणि मी लगेच अभय आणि नम्रताला बोलली,

"मला घरी जायचय, मी नाही करू शकत हे, मला नाही करायचं हे अबोर्शन.... तुमच्या दोघांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल, माझी नाही...हे क्रूर कार्य माझ्याने होणार नाही.."

मी अस बोलल्यावर अभयच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले, तो चिडला असावा कदाचित खूप, पण मला आता त्याची चिंता नव्हती, माझं आणि अभयच तसही सगळं संपण्यातच जमा होत...अस मला वाटायचं...पण अभयच्या मनाची तळमळ मला समजलीच नाही, तो नम्रता कडे बघत बोलला,

"नम्रता तुझ्या मैत्रीणीला समजावं, मला आता या क्षणाला काहीच उपद्व्याप नाही करायचा....आणि नैना खूप झालं तुझं, आता तू तेच करणार जे मी सांगणार..कळलं ना.."

"नाही...नाही कळलं मला, आणि मी काही समजून ही घेणार नाही, आणि माझं नाही तुझं खूप झालं, मी अजिबात आता तुझ्या इशाऱ्यावर नाचणार नाही, नेहमीच तुला तुझा पुरुषार्थ गाजवायचा असतो...पण आता मी ऐकणार नाही...आणि हा माझा शेवटचा दिवस आहे तुझ्यासोबत, मी नाही राहणार तुझ्यासोबत, माझा निर्णय झालाय...."

अस बोलून मी हॉस्पिटलमधुन बाहेर आली आणि माझ्या मागे मागे नम्रताही आली, माझा राग तिच्यावरही होता,

" माझा निर्णय ऐकून तुलाही दुःख झालं असेल ना नम्रता, अभय प्रमाणे तुलाही हेच वाटत का हे बाळ अभयच नाही, तू तर इतकी चांगली मैत्रिण आहेस ना ग माझी, मला समजून घ्यायचीस आणि आता तूच अभयच ऐकून अशी वागत आहे, मला तुमच्या दोघांचं तोंडही पहायची इच्छा नाही...फक्त विक्रम आहे जो मला समजू शकतो..."

"हो का...छान खूप छान...आम्ही तर आहेच खराब लोकं, तुला त्रास देणारी तुला न समजून घेणारी...विक्रम समजून घेतो ना तुला मग बोलावं ना तुझ्या विक्रमला, येतोय का तो बघ जरा... नाही येणार तो नैना कारण तो कुठे आहे त्याचा पत्ता तुलाही नाही, तुला अभय सोबत नाही राहायचं नको राहू पण आज माझी एक गोष्ट ऐकून जा, मान्य आहे अभय चुकीचा वागला तुझ्या सोबत खूप, आणि मला वाटते विक्रमच्या रुपात तू त्याला त्याची शिक्षा दिलीच आहेस...तो रागात तुला खूप काही बोलला ही असेल, पण तुमच्या होणाऱ्या बाळाबद्दल त्याला कोणतीच शंका नाही हेही तितकंच खरं...."

"खरचं... मग त्याला का हवंय हे अबोर्शन? इतका महान तो आहे तर का इतका नीच निर्णय घेतला त्याने??"

"तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी नैना...तुला माहीत आहे ज्या दिवशी त्या हे कळाल होत खूप खुश होता तो, खर तर तेंव्हाच त्याने ठरवलं होतं की विक्रम आणि साफिया या दोन्ही व्यक्तींना तुमच्या मधून कायमच काढून टाकायचं पण त्याचा आनंद जास्त वेळ राहिला नाही, माहीत आहे का नैना?"

"का ?"

"कारण जर या बाळाचा जन्म झाला तर तू या जगात राहण्याचे चान्स खूप कमी आहेत, आणि अभयला बाळापेक्षा त्याची आई जास्त महत्वाची वाटली, तुझं गर्भाशय आकाराने लहान आणि खूप कमजोर आहे नैना, आणि हे अबोर्शन केल्यावर तु दुसऱ्यांदा आई होणार की नाही हे पण माहीत नाही, अभयला हे सगळं माहीत आहे त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला...त्याला माहित होतं तू सध्या खूप टेन्शन मध्ये आहेस आणि हे मान्य करणार नाही त्यामुळे त्याने तुला काही सांगितलं नाही आणि मलाही सांगितलं होतं तुला न सांगायला, पण मी तुला आणि अभयला वेगळं होताना नाही पाहू शकत...आता निर्णय तुझा आहे आणि अभयचा आहे.."

कस नाचवतं ना नशीब आपल्याला??? चांगलीच प्रचिती येत होती मला...किती साधं सरळ आयुष्य जगत होती मी, मग 'लग्न' नावाच्या प्रवासात अभय भेटला...असं वाटलं हा प्रवास सुखकर होईल माझ्यासाठी, पण मला कुठे माहीत होतं अभय जो प्रवास करत आहे माझ्यासोबत, मुळात त्याला त्या वाटेलच जायचं नव्हतं...ती पाऊलवाट मी कित्तीतरी दिवस एकटिच चालत राहिली, रस्ता दिसेल तिकडे चालत होती, विक्रम ने मला या वाटेत गर्द सावलीच सुख दिलं...माझ्या मनालाही पंख आहेत याची जाणीव करून दिली, समाज नियम तोडण्याचं धाडस दिलं... आणि या स्वप्नांच्या मागे धावताना अशी ठेच लागली की सगळं काही विस्कळीत झालं....माझ्या मनात अबोर्शन चा विचार आलाच कसा?? कदाचित याच गोष्टीची शिक्षा मला मिळत असेल की एक स्त्री म्हणून मला ममतेचा पाझर फुटला नाही....खूप हताश झाल्यासारखं वाटत होतं, माझं खराब नशीब म्हणावं की अभयच दूर्भाग्य.... अभयच दूर्भाग्य यासाठी, की मी त्याला कोणतीच सुख नाही देऊ शकत....

"नैना...."
अभयचा आवाज कानावर पडला....

"जास्त विचार नको करुस, काही मोठी गोष्ट नाही...एकदा हे अबोर्शन झालं की सगळं ठीक होईल...चल डॉक्टर वाट बघत आहेत..."

"मला नाही जायचं अभय, प्लिज मला जास्त जबरदस्ती नको करू...हे आपलं बाळ आहे अभय, मी नाही करू शकत हे.."

"जास्त इमोशनल होऊन विचार नको करत जाऊस नेहमी, हाच स्वभाव तुझ्या दुखाच कारण आहे, आणि हे काय बाळ बाळ करत बसलीस...एक दिवस आपला ताबा सुटला आणि त्यात शरीराची गरज पुरवण्यासाठी केलेल्या कृत्याच हे फलित आहे, बस एवढंच,..तुझ्या जीवापेक्षा जास्त काही महत्त्वाचे नाही...आणि तसही आपलं काय भविष्य निश्चित नाही, त्यामुळे जेंव्हा तू नागपूर ला जाशील, तुझ्या घरच्यांना तू सुखरूप मिळायला पाहिजे, तोपर्यंत तू माझी जबाबदारी आहेस..."

"अरे हे काय बोलताय तुम्ही दोघं?? तुम्ही वेगळे नाही होऊ शकत...मला अस वाटते आपण ट्रीटमेंट शोधू दुसरीकडे पण, जर नैना ची इच्छा नाही तर सेकंड ओपिनियन घेऊच शकतो आपण, आणि तोपर्यंत तुम्ही दोघे शांत राहून एकमेकांना समजून घ्या.."
नम्रता आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत बोलली...

"तुझ्या मैत्रिणीचा निर्णय झालाय नम्रता, नको तिला जास्त जबरदस्ती करू माझ्यासोबत राहायला...राहिला प्रश्न तिच्या ट्रिटमेंट चा तर तिच्या जिवासाठी मी सगळ्यांत बेस्ट डॉक्टर शोधून आणेल....आणि एवढं करूनही तिच्या नजरेत फक्त विक्रमच आहे जो मर्यादा पुरुषोत्तम आहे..कसा आहे, तीच तिलाच माहीत...."

आणि अस बोलून अभय रागारागत निघून गेला डॉक्टरला भेटायला...डॉक्टरांनी आम्हाला दोन आठवड्यांचा वेळ दिला विचार करायला. घरी गेल्यावर अभय मला न सांगता बाहेर निघून गेला...नम्रता माझ्यासोबतच थांबली,

"नैना, तुला नक्की काय हवंय? तुला खरंच अभयविषयी काहीच वाटत नाही का?? आज मला तू स्पष्ट सांग, तुला खरंच वाटत तू आणि विक्रम सोबत राहू शकता?? अग, अभय तुला कितीही बोलला असेल, रागवला असेल तरी आज तुझ्यासोबत फक्त अभय आहे, विक्रम नाही...तुला का कळत नाही ही गोष्ट.."

"मला सगळं कळत आहे नम्रता... मी आधीही बोलली आहे की मला विक्रम सोबत राहायचं नाही, तो माझा मित्र आहे आणि ही गोष्ट तुम्हाला कळत नाही आहे...आणि राहिला प्रश्न अभयचा तर मला त्याला कधीच सोडायच नाही, पण गेल्या काही दिवसांत त्याने ज्याप्रकारे माझ्यावर चिखलफेक केली आहे ते मात्र मी नाही विसरू शकत, माझ्या सहनशक्ती च्या पलीकडे आहे ते, आणि आज मी यासाठी नाही भांडत की मला विक्रम सोबत राहायचं आहे, फक्त मला एक सांगायचं आहे की त्याला न भेटता, त्याला न ओळखता त्याला चुकीचं समजू नका तुम्ही...हाथ जोडून हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी...माझं अभयला ही हेच म्हणणं आहे की त्याला भेट आणि मग निर्णय घे की तो किती चुकीचा आहे , किंवा त्याने मला फसवलं की नाही फसवलं..."

"ठीक आहे बघते मी पण वाट तुझ्याप्रमाणे विक्रमची..."

मी तर खरच वाट पाहत होती विक्रमची...आणि माझी तळमळ यासाठी अजीबात नव्हती की मला कोणाला आमच्या नात्याबद्दल काही पुरावा द्यायचा होता...फक्त मला खूप प्रकर्षाने वाटत होतं की नक्कीच विक्रम काहीतरी अडचणीत आहे, आणि कदाचित त्या अडचणीत त्याला माझी मदत हवी असेल....पण विक्रमलाही माझ्या ह्या अस्वस्थ मनाची जाणीव असेल का??? माहीत नव्हतं... आता मात्र मला कंटाळा यायला लागला होता नम्रता आणि अभयला, आमच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देताना...मला हे कळून चुकलं होतं ज्या निखळ मनाने आम्ही ही मैत्री निभवत होतो, समाजासाठी ते फक्त एक गढूळ पाणी होतं...माझ्या या सगळ्या भानगडी मध्ये मी विक्रमला काही मेसेज केला आहे याचा मला विसर पडला...तो मेसेज मात्र आता विक्रमला डिलीव्हर झाला होता...आता मात्र हे पाहायचं होतं आमची ही मैत्री काय निरनिराळे रंग दाखवते...
-------------------------------------------------------------
दोन दिवसांनी माझ्या फोनवर विक्रमच्या नंबर वरून मेसेज आला,

📱"तुझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत की नाही माहीत नाही, पण तरीही जर तुला माझ्यावर राग काढायचाच असेल तर शेवटचं भेटून मला काय शिक्षा द्यायची ती दे....विक्रम..."

किती अनपेक्षित होत हे माझ्यासाठी, मला तर आधी विश्वासच झाला नाही की विक्रम ने मेसेज केला...म्हणजे त्याचा फोन सुरू झालाय...मी खूप घाईघाईने त्याला फोन केला, त्याने लगेच फोन उचलला माझा,

"नैनिका....कधी भेटायचं कुठे भेटायचं तुझ्या सोयीनुसार मला सांग, मी येईन तिकडे...आता बिझी आहे..."

एवढं मोजकेच बोलून त्याने फोन ठेवला...जो विक्रम माझा आवाज ऐकण्यासाठी आतुर असायचा त्याने आज मला बोलुही दिल नाही... अस काय झालंय...आणि हे काय, विक्रम आज मला नैनिका बोलला... आमच्यात खूप भांडणे झाली, खुप मतभेदही झालेत पण विक्रम मला आजपर्यंत या नावाने कधीच बोलला नाही, त्याच्यासाठी तर मी नेहमीच त्याची सोनु होती ना...मग आज हे अस का??? म्हणजे काहीतरी नक्कीच बदललं होतं आमच्यात आणि त्या बदलावासाठी माझा त्याच्यावरचा अविश्वास कारणीभूत होता...त्याच बोलणं नक्किच मला खटकलं होत पण तो परत आलाय याचा आंनदच जास्त होता मला त्यामुळे मिबती गोष्ट दुर्लक्षित केली...

मी विक्रमला भेटायला तयार तर झाली होती पण या अवस्थेत अभय मला बाहेर जाऊ देणार होता की नाही हे माहीत नव्हतं..पण मला काहीही करून जाणून घ्यायच होतं की नक्की काय झालंय माझ्या मित्रासोबत... त्यामुळे मी नम्रताला तयार केलं माझ्यासोबत येण्यासाठी, तिला तर पटलचं नव्हतं माझं विक्रमला भेटायला जाणं... पण निव्वळ माझ्या मैत्रीसाठी तिने मान्य केलं...

त्यावेळी मी नाही विचार केला की माझं आणि अभयच नातं या परिस्थितीत येऊन ठेपल आहे तरीही माझं विक्रमला भेटणं योग्य आहे की नाही, मी चुकीचीचं असावी कदाचीत... पण 'न चुकता' आयुष्य जगणं हीच मोठी चूक समजते मी....आणि अशी 'न चुकलेली' माणसं फक्त व्यवहार करू शकतात...मैत्री आणि प्रेम ह्या या लोकांचा पिंड नसलेल्या गोष्टी....चूक बरोबर, फायदा तोटा या गोष्टी मला नाही वाटत मैत्री आणि प्रेमात बघत असेल कोणी..

आता हेच घ्या ना, नम्रताला किती राग होता विक्रम बद्दल, तिला तर पूर्ण विश्वास होता की माझ्या आणि अभयच्या आयुष्यात आलेल्या वादळाच कारण फक्त विक्रम आहे, मलाही किती रागावली त्यासाठी ती...पण किती वेडी ती...हो वेडीच, एवढं सगळं असताना केवळ माझ्या समाधानासाठी ती माझ्यासोबत यायला तयार झाली...मी कुठे चुकते, कुठे बरोबर आहे, नम्रता मला सगळं काही सांगायची, रागवायची, प्रेम ही तितकंच द्यायची, आणि माझी साथ ही तेवढीच द्यायची...कदाचित यालाच मैत्री निभावणं म्हणत असतील....मीही तेच तर करत होती विक्रमसाठी, त्याची अडचण, त्याच्या समस्या जाणून घेणं चुकीचं होत का माझं?? नाही माहीत...कोणाला माझं हे वागणं चुकीचं कोणाला बरोबर वाटेल पण मी फक्त हा विचार केला जर माझ्या प्रत्येक अडचणीत विक्रम धावून आला तेंव्हा मी नाही प्रश्न केले त्याला त्याच्या वागणुकीबद्दल... आणि आज जर पहिल्यांदा तो कुठे चुकला असेल तर मी नक्कीच संशय नाही घ्यायला पाहिजे त्याच्यावर...पण संशय तर मी घेतलाच होता ना, आणि त्या संशयापायी त्याला उलटं सुलट बोलली ही होती...थोड्या फार प्रमाणात का होईना आमचा एकमेकांवरचा विश्वास ढासळला तर होताच....

-------------------- ----------------------------------------

क्रमशः