Prarambh - 14 books and stories free download online pdf in Marathi

प्रारब्ध भाग १४

प्रारब्ध भाग १४

रोज ती त्या सोसायटीकडे पाहता पाहता मनाने त्या आयुष्याची स्वप्ने पाहु लागली .
कोण किती वाजता बाहेर जाते ,कोण कधी बाहेरून येते हे आता तिला समजु लागले .
आता दिवसाचा बराच वेळ तिचा बाल्कनी मध्ये जाऊ लागला .
दुपारचे जेवण तिथेच असे ,संध्याकाळी मात्र परेश आल्यावरच ती आत येत असे ..
नंतर पण सतत तिच्या डोक्यात तिकडचेच विचार असत.
एके दिवशी अशीच सकाळी ती बाल्कनीत उभी असताना एका तरुणीने तिला हाताने इशारा केला .
आधी तिला समजेना ही कोणाला इशारा करते आहे .
पण तिचा रोख आपल्याकडेच आहे असे समजल्यावर तिने पण हसून हात हलवला .
ती तरुणी रोज सकाळी अकराच्या सुमारास एका रिक्षातुन बाहेर जात असे .
गोरी ,उंच आणि दिसायला सुंदर असणारी ती रोज वेगवेगळे कपडे घालत असे .
भरपूर मेकअप ,रोज नवनव्या स्टाईलचे कपडे ,रोज नवी वेगळी पर्स ..
सुमन तिला रोजच पाहत असे ..
संध्याकाळी कधीतरी ती सोबतच्या महिलांच्यासोबत हिरवळीवर गप्पा करीत बसलेली दिसे .
तिने आज अशी ओळख दिली म्हणल्यावर सुमन अगदी खुष होऊन गेली .
संध्याकाळी पण सुमनला पाहुन तिने हात केला ..
सुमनने पण प्रतिसाद दिला ..
दोन दिवस असेच गेल्यावर एके संध्याकाळी तिने सुमनला खुण करून खाली बोलावले .
सुमन जरा नीटनेटकी होऊन बाहेर पडली आणि सोसायटीच्या गेट वर गेली .
त्या तरुणीने गार्डला सांगुन तिला आत नेले .
तेथील एका खुर्चीवर बसून तिने सुमनला बसायला सांगितले .
..”हाय ...तुम्ही समोर राहता ना ..काय नाव तुमचे ?ती म्हणाली
“हो मी पण रोज पाहत असते तुम्हाला ..माझे नाव सुमन ..
“ओह ग्रेट आजपासुन आपण मैत्रिणी ..एकमेकांना एकेरी हाक मारुया चालेल ?
“चालेल की पण तुमचे नाव काय ..?सुमनने विचारले ..
माझे नाव माया ..ती हसुन म्हणाली ..
तिने तेथेच एका मुलाला हात करून दोघींसाठी चहा आणायला सांगितला ...
“अहो ...सॉरी..अग चहा कशाला ...सुमन म्हणाली .
“असु दे ग इथे आमच्या क्लबचे एक रेस्टारंट आहे तेथुन आणेल तो ..
आणि आपली पहिलीच भेट आहे ...पहिला चहा घेऊया ..
बाय द वे..तु खुपच सुंदर आहेस दिसायला ..अगदी तुझ्या नावासारखीच ..
यावर सुमन खुष होऊन हसली ..
मग मायाने सुमनची सर्व माहिती विचारली ..
सुमनने तिच्याविषयी विचारले असता तिने संगितले ती एक जॉब करते आणि एकटीच असते .
आईवडील दिल्लीत असतात असे ..
तिचा जॉब कसला आहे हे विचारल्यावर ..मी नंतर सांगेन तुला असे ती म्हणाली .
मग एकमेकींचे फोन नंबर शेअर झाले वाटसअप वर रोज भेटायचे ठरले .
तिथे असलेल्या तिच्या काही मैत्रिणींशी पण तिने सुमनची ..आपली नवीन मैत्रीण अशी ओळख करून दिली .
मायाचा निरोप घेऊन सुमन घरी आली तेव्हा अतिशय खुशीत होती .
तिने परेशच्या आवडीचा छान स्वयंपाक केला आणि आनंदाने परेशची वाट पाहु लागली .
रात्री परेश जेवायला बसल्यावर त्याचे आवडते पदार्थ पाहुन खुष झाला .
मग तिनेच मायाविषयी आणि संध्याकाळी घडलेले सगळे सांगितले .
परेशला जरा बरे वाटले निदान तिला एक मैत्रीण तरी मिळाली .
ती रात्र फारच झकास होती परेशसाठी ..
दुसर्या दिवशी पासून दोघीचे मेसेज ..कधीकधी फोन सुरु झाले .
पुढील आठवड्यात संध्याकाळी बाहेर जायचा प्लान मायाने केला .
सुमन पण मायासोबत जाण्यासाठी तिच्यासारखीच अपटूडेट तयार झाली .
तिला फ्रॉक मध्ये पाहील्यावर माया थक्कच झाली ..
ओह माय..माय !!
केवढी सुंदर दिसतेस ग ...सुमन हसली .
मग मायाने रिक्षा बोलावली आणि एका लांबच्या मॉल मध्ये तिला घेऊन गेली.
तिची भरपुर खरेदी झाली.
तिचा खरेदीचा “स्पीड”बघुन सुमन चकीत झाली .
तिने नको नको म्हणत असताना सुमनसाठी पण काही कानातली घेतली
एक पर्स घेतली ...
अग तुला मस्त दिसतील ही कानातली आणि ही पर्स तुझ्या फ्रॉकला सूट होतेय .
सुमनला काहीच बोलायला तिने संधी ठेवली नव्हती .
सुमन अगदी इम्प्रेस होऊन गेली होती .
प्रत्येक ठिकाणी तिने पर्समधुन पैसे काढले की त्यातील नोटांची बंडले दिसत होती .
यानंतर दोघी एका छान हॉटेल मध्ये गेल्या ,तिथे टोस्ट आणि केपीचीनो कॉफी घेतली .
हे हॉटेल इतके महाग होते की एवढ्याशा गोष्टीचे पाचशेच्या आसपास बिल झाले .
सुमन घरी पोचली तेव्हा बराच उशीर झाला होता .
ती कपडे बदलायच्या आताच परेशचे आगमन झाले .
बाहेरून आलेल्या फ्रॉकमधल्या सुमनला पाहुन परेशचे डोळे चमकले .
बाथरुममधून फ्रेश होऊन येताच आधी त्याने सुमनला मिठीत घेतले .
सुमन पण आनंदात होतीच ..
‘काय कुठे गेला होता दौरा ..आणि एकटीच ?
“एकटी कशाने? बरोबर माया होती आम्ही शॉपिंग ला गेलो होतो .
एक क्षण परेशच्या लक्षात आले नाही ..माया कोण .
मग कळले त्यला हीच ती सुमनची नवी मैत्रीण ..
“चला जेवायला वाढू न ..?सुमनने विचारताच ..
“आता जेवायला नको आधी मला हवे ते दे ..असे म्हणून तो तिला बेडकडे घेऊन गेला .
सुमन पण लगेच मिठीत विरघळली ..आणि मग जेवायला बरीच रात्र झाली .
दुसऱ्या दिवशी रविवार होता त्यामुळे दोघेही निवांत उठली .
चहा पिताना सुमनने तिला गिफ्ट म्हणून मायाने दिलेली पर्स ,कानातली दाखवली .
“वा वा मैत्रीण अगदी खुष दिसतेय तुझ्यावर ..असे म्हणत परेशने त्या वस्तूंचे कौतुक केले .
त्याला या गोष्टींच्या किमतीचा अंदाज नव्हता पण तरी त्याच्या लक्षात आले की
या गोष्टी खुप महाग असाव्यात .
रविवार असल्याने दोघेही संध्याकाळी फिरायला एका बागेत गेली .
येताना हॉटेलला जेवून यायचा बेत पण होता .
हॉटेलमध्ये जेवताना सुमन म्हणाली ..
“हे हॉटेल एकदम फालतू आहे काल आम्ही खुप चांगल्या हॉटेलला गेलो होतो .
आता पुढच्या वेळी जरा पॉश हॉटेलला जाऊया ..
परेशने मान हलवली ..
दोघेही चालत चालत घरी येत होती ..आणि कोपऱ्यावर सुमनला कोणी तरी हाक मारली .
सुमनने मागे वळून पाहिले तर माया रिक्षातुन उतरत होती .
सुमन आणि परेश दोघेही थांबले .
माया पैसे देवून दोघांच्या समोर आली .
टाईट कपडे घातलेल्या आणि भरपुर मेकअप केलेल्या टंच मायाला पाहताच परेश चकित झाला .
सुमनने पुढे होऊन ओळख करून दिली .
“हाय ..असे म्हणुन मायाने परेशचा हात हातात घेतला आणि थोडा दाबला .
परेश एकदम संकोचला आणि त्याने हात चटकन काढुन घेतला .
मायाची “नजर” आणि वेशभूषा परेशला आवडली नाही .
ती थोडी “उत्तान” वाटली त्याला .
सुमन आणि ती मात्र अगदी मनापासुन एकमेकीशी बोलत होत्या .
मधुनच एकमेकांना टाळ्या देत होत्या .
एकदा मोबाईल मध्ये पण काहीतरी शेअरिंग झाले दोघींचे.
त्या काय बोलतात याकडे परेशचे अजिबात लक्ष नव्हते .
तो थोडा दूरच आपला मोबाईल बघत उभा होता .
थोड्या वेळाने दोघींचे बोलणे संपले आणि परेशकडे एक कटाक्ष टाकत माया म्हणाली ..
“सुमन मला कधी बोलावतेस घरी ..परेश असतील तेव्हा येईन मी .
“चालेल ग ..पुढल्या रविवारी येतेस का ...यांना सुटी असेल ..
चालेल ना हो .?.”
सुमनचे बोलणे ऐकुन परेश गडबडीने हो हो म्हणाला आणि घराच्या दिशेने चालला .

क्रमशः