Prayaschitta - 5 in Marathi Fiction Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | प्रायश्चित्त - 5

Featured Books
Categories
Share

प्रायश्चित्त - 5

शंतनू जसजसा तिच्या घराजवळ जाऊ लागला त्याचं अवसान गळू लागलं. “परत त्या तिरस्काराने भरलेल्या नजरेचा सामना करण्याची ताकद नाही तुझ्यात “मन बजाऊ लागलं. तो रस्त्याच्या कडेला थांबला. “काय करावं?” घालमेल होत होती जीवाची!

मग तो गाडी कडेला लावून उतरला. मोकळा श्वास घेतल्यावर बरं वाटलं त्याला. समोरच मोठं खेळण्याचं दुकान दिसलं. तो आत गेला. समोरच एक मोठा टेडी होता. तो घेतला. कार्डवर लिहीलं “तुझ्या वेड्या बाबाकडून”

मग शाल्मलीच्या माहेरचा पत्ता दिला. पोहचवायला सांगून तो परतीच्या वाटेला लागला. डोळे वहात होते. धूसर वाट होती पण निदान मार्ग मिळाला होता.

प्रशांतने शाल्मली आणि श्रीश ला घराजवळ आणून सोडले. तिने वर बोलावले नाही. तो गाडी वळवून निघून गेला.

शाल्मली काही क्षण पाहत राहिली. रिअर मिरर मधे त्याला दिसली. मग वळून गेली. काही वेळातच आई आली. तिच्या हातात टेडी. “आई, अगं एवढा मोठा टेडी? कोणी आणला? कशाला एवढा खर्च?”

आईने तिच्या हातात दिला. शाल्मली ने कार्ड वाचले. मटकन खाली बसली. कितीतरी वेळ पाहत त्याकडे. “आला होता?” क्षीण आवाजात विचारले तिने. नाही दुकानातला माणूस देऊन गेला.

“हं!” तिने कार्ड काढून कपाटात ठेवले. वरचे प्लास्टिक काढून टेडी श्रीश ला दिला. तो त्याच्यावर चक्क पहुडला. आई गेल्यावर शाल्मली गदगदून रडायला लागली. दिवसभराच्या घडामोडी आणि वर हे. आजपर्यंत तिने वर्षभर निकराने धरून ठेवलेला धीर क्षणात सुटला. कितीतरी वेळ हुंदक्यांनी तिचे शरीर गदगदत राहीले.

--------------------

शंतनू घरी कसा पोहोचला त्याचं त्यालाही सांगता नसतं आलं इतका विचारात हरवला होता तो. पण आल्यावर मात्र तो शांत झोपला. किती तरी दिवसात प्रथमच. काहीतरी पक्का निर्णय घेतला होता त्याच्या मनाने.

रात्री शांत झोप झाल्याने तो सकाळीच उठला.बऱ्याच दिवसांनी जीमला हजेरी लावून आला. हो फक्त हजेरीच. फारसं काही करण्यागत स्नायूत बळ उरलंच कुठे होतं? पण इंस्ट्रक्टरशी बोलून आला. डाएटिशियन बरोबर पण बोलला. सगळं नीट लिहून घेतलं. पूर्वी शाल्मली आपलयाला सगळ्याची, आठवण, तयारी, करायची ,आता त्याची त्यालाच करायची होती स्वत:ची मदत, शाल्मली आणि त्याच्या मुलाला परत मिळवण्यासाठी.

मग घरी येऊन त्याने नाश्ता बनवला , ब्रेड टोस्ट, कॉफी, बॉईल्ड एग्ज. तो खाऊन, सगळं आवरून ऑफिसला आला. सर्वप्रथम जाऊन बॉस ला भेटला. आतापर्यंत आपण फार हलगर्जी पणा केला कामात, यापुढे असे होणार नाही अशी ग्वाही दिली. कामत सर वय, अनुभवाने सिनियर. त्यांनी पाठीवर हात ठेवला. म्हणाले तू आमचा ॲसेट आहेस शंतनू . तुझी हार ती आमची हार. आता आयुष्याला भरकटू देऊ नकोस. कधीही काही बोलावसं वाटलं तर मी आहे हे विसरू नकोस. शंतनू ला बराच धीर आला.

बऱ्याच दिवसांनी त्याने परत कामावर लक्ष केंद्रित केलं. कित्येक गोष्टी हातावेगळ्या केल्या. काही फाईल्स घरी अधिक वाचनासाठी काढून ठेवल्या.

मग दुपारी त्याने त्याच्या डॉक्टर मित्राला फोन लावला. पहिल्या रिंगलाच त्याने उचलला. अजून एक संकेत मिळाल्यासारखं वाटलं त्याला.

“शंतनू, अरे आहेस कुठे मित्रा? किती दिवसात काही खबरबात नाही.”

“मला एक चांगला डॉक्टर सुचव. मूक बधीर मुलांवर उपचार करणारा. जन्मत:च बहिरेपण असणाऱ्यांसाठी.”

“अरे कोणासाठी पण? कुणी जवळचं?”

“माझ्या स्वत:च्या मुलासाठी!”

“अरे, ताबडतोब मला प्राथमिक तपासण्यांचे रिपोर्ट मेल कर. माझा एक चांगला मित्र उत्तम ट्रीट करतो अशा केसेस. त्याला पाठवतो. मग अपॉईंटमेंट घेऊ. अँड जस्ट डोंट वरी यार. अगदी नॉर्मल लाईफ जगतात असे पेशंटस. अभिनंदन, मुलगा झाल्याची पार्टी दे लेका आधी!”

“ऐक, मित्रा, कदाचित लगेच दाखवायला नाही आणता येणार, पण मी भेटून जाईन आधी डॉक्टरांना. तुला प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेन सगळं. रिपोर्टसचे स्कॅन लगेच पाठवतो. “

एवढं बोलून त्याने फोन ठेवला. रिपोर्टस स्कॅनर मधे टाकले आणि लगेच मेलवर पाठवून दिले.

मग परत तो आपल्या कामात गुंतून गेला. वर्षभराचा बॅकलॉग त्याला भरून काढायचा होता. सगळंच आयुष्य वर्षभर ठप्प झालं होतं. ते परत सुरू करायचं होतं. आता त्याला एक मिनीटही वाया घालवायचं नव्हतं.

---------------------

बऱ्याच वेळाने शाल्मली शांत झाली. पाहते तर श्रीश टेडीवरच झोपून गेला होता. तिने त्याला उचलून घेतले तर टेडी पण आला त्याच्याबरोबर. घट्ट धरून झोपला होता. मग तसंच दोघांनाही बेडवर ठेवलं. शेजारी ती ही आडवी झाली. शारिरीक, मानसिक थकव्याने केव्हातरी झोप लागून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमधे पोहोचली. पण मनाशी काहीतरी ठरवूनच. प्रशांतच्या सकाळपासून क्लायंटस् बरोबर मिटींग्ज होत्या.त्या जेवणाची वेळ होईपर्यंत चालल्या. शाल्मली तिच्या केबीन मधे कामं हातावेगळी करत राहिली. जेवणाच्या वेळी इंटरकॉम वाजला, पलिकडे सुरेश होता. सर बोलावत आहेत असा निरोप आला. प्रशांत च्या केबीन मधे क्लायंट , त्याची दोन माणसं, प्रशांत आणि सुरेश होते. प्रशांतने ओळख करून दिली. माझ्याबरोबर आता तुमचं काम या ही पाहतील. आधी दिनेश पाहत होता तुमचं काम ,पण आता या पाहतील.

शाल्मली चकित झाली. पण क्लायंट समोर काही बोलणे प्रशस्त वाटले नसते. पण याविषयी बोलायचं हे तिने ठरवून टाकलं. क्लायंट म्हणाला “मी केव्हापासूनच मॅम ना इन्व्हॉल्व्ह करा म्हणत होतोच. पावगींच्या प्रोजेक्ट मधे तुम्ही इन्व्हॉल्व्हड होता तर फार व्यवस्थित ते काम पूर्ण झाल्याचं त्याने सांगितलं. आता आम्हाला काही शंका नाही.”

शाल्मलीच्या चेहेऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. प्रशांत ते निरखत होता. तिच्या मनातल्या विचारांचा बरोबर अंदाज त्याला आला होता.

लंच घेता घेता बरीच चर्चा झाली. शाल्मली ला तशी थोडीफार कल्पना होतीच. आज रात्रीच तिने फाईल परत नजरे खालून घालायचं ठरवलं. मंडळी गेल्यावर परत दोघांत थोडी चर्चा झाली. प्रशांत ने दोघांसाठी कॉफी मागवली. मग म्हणाला , “या आधी कुठे जॉब करत होतीस?” ती म्हणाली “नव्हते करत. इथे इन कोर्स ट्रेनिंग केलं होतं.”“श्रीश ची काही ट्रीटमेंट वगैरे?”प्रचंड गिल्ट शाल्मली च्या चेहऱ्यावर दिसली. नकळत डोळे ओलावले. पटकन स्वत:ला सावरत म्हणाली, “अजून नाही काही केलय, पण आता करेन लवकरच.”

पुढचा प्रश्न दोघांच्या मनात लटकत राहिला त्यांच्या सेपरेशनचा. पण प्रशांतने आत्ताच नको असं ठरवलं आणि शाल्मलीने सुटकेचा निश्वास टाकला.

मग अजून काही गोष्टींवर चर्चा झाल्या. प्रशांत म्हणाला “तुला कामाचा ताण वाटला तर सांग, एखाद दुसरं प्रोजेक्ट शिफ्ट करू.” ती म्हणाली “नको. दोन लास्ट फेज मधे आहेत. ती संपतीलच.”

“तुझ्याबरोबर काम करायला मजा येते शाल्मली. एका लेवल वर येऊन चर्चा होते. हुद्द्याने मी वर असेनही, ते केवळ तू नोकरीत उशीरा रुजू झालीस म्हणून. नाहीतर बुद्धीमत्ता, कुशलता यात तू कुठेच कमी नाहीस. मला सर वगैरे म्हणायची गरज नाही.” नावानेच संबोध मला. शाल्मली काहीच बोलली नाही यावर. गप्प राहणेच पसंत केले तिने. दिवस भराभर पुढे जात होते.

एकीकडे तिलाही त्याच्याबरोबर काम करायला आवडत होते पण बाकी कोणतीच गुंतागुंत तिला नको होती. प्रशांत स्पष्ट काही बोलला नसला तरी तो तिच्याकडे आकर्षित होतोय हे तिला जाणवत होते. पण तो सुसंस्कृत होता. लोचटपणा करणारा अजिबातच नव्हता. शिवाय त्याची बुद्धीमत्ता त्याच्या प्रत्येक निर्णयातून दिसत असे. काहीच दिवसात संपूर्ण ऑफिसमधे त्याने आदरयुक्त दबदबा निर्माण केला होता. बऱ्याच गोष्टी जास्त प्रोफेशनली केल्या जाऊ लागल्या होत्या.

विनाकारण कामात विघ्न निर्माण करून नियमांमागे लपून मज्जा बघायला आवडणारे लोक प्रत्येक ऑफिस मधे असतातच. तसे इथेही होतेच. त्यांना व्यवस्थितपणे मेन स्ट्रीमच्या बाहेर काढून, जरा एकट्याने करावयाची कामे जसं डेटा फिडींग, स्टोअर वगैरे ठिकाणी पाठवून त्यांच्या उपद्रवाला आळा बसवला होता. त्यांचं डायरेक्ट रिपोर्टींग स्वत:कडे ठेऊन एकाच वेळेस त्यांना उगाचच आपण फार महत्वाचे आहोत असं वाटायला लावून , बऱ्याच युनिट हेड्स ची डोकेदुखी वाचवली होती.

काही इफरव्हेसंट मंडळी ज्यांच्याकडे भरपूर उत्साह होता पण कौशल्याची कमी होती त्यांना शाल्मलीच्या ताब्यात दिले त्याने. मॅडम लवकरच त्यांच्या गळ्यातल्या ताईत बनल्या होत्या आणि शाल्मलीचा लोड ही कमी होत होता. प्रशांतच्या या सर्व खेळ्या शाल्मलीच्या लक्षात येत होत्या आणि त्याच्याविषयीचा आदर दुणावत होता. एक कुशल प्रशासकाचे सर्व गुण त्याच्यात असलेलं तिला जाणवत होतं.

------------------

संध्याकाळचे सहा वाजले तरी शंतनू अजून त्याच्या केबिन मधेच होता. त्याची सेक्रेटरी स्नेहल केव्हाची चुळबुळत बसून होती. पण कित्येक दिवसांनी आपले सर पहिल्यासारखे परत कामात दंग झालेले पाहून तिलाही बरं वाटत होतं. तिचा सिक्रेट क्रश होता शंतनू वर . तिला बॉय फ्रेंड होता पण नुकताच ब्रेक अप ही झाला होता. पण एखाद्या सिनेनटासारखा हॅंडसम शंतनू तिचाच का, बऱ्याच जणींचा ऑफिस मधे लाडका होता. त्याला एक नजर पहायला बऱ्याच जणी स्नेहल शी दोस्ती करून उगाचच तिला भेटायला म्हणून येऊन जायच्या. आधी किंवा आत्ताही शंतनू ला त्यात स्वारस्य नव्हतं.

आत्ताही स्नेहल बसलीय ताटकळत हे त्याच्या गावीही नव्हतं. साडेसहा होऊन गेले तेव्हा मात्र स्नेहल केबीनमधे डोकावली. “सर चहा मागवू तुमच्यासाठी?” “अं?, हं. विल डू” तिने दोन चहा मागवले. आल्यावर केबीनमधेच ठेवायला सांगितलं पॉट. मग आपण आत गेली. चहा बनवून शंतनू समोर धरला. त्याने मान वर करून पाहिलं. मग घेतला कप. मग तिने स्वत:साठीही भरला कप. “सर, अजून बराच वेळ लागेल का तुम्हाला? सेक्युरिटीला सांगून ठेवते.”

“अं, अजून एक अर्धा तास, ही एवढी फाईल संपवतो. राहीलेल्या कारमधे ठेवायला सांग.” “ओके सर” “नीड एनी हेल्प सर?” “नो, थॅंक्स” “ओके सर” संपलं संभाषण. खट्टू होऊन स्नेहल बाहेर आली. शंतनू काम संपवून निघाला. स्नेहल अजून थांबलेलीच होती. बाकी ऑफिस मधे शुकशुकाट होता. मग शंतनू म्हणाला “कशी जाणार आहेस?” “बसने” “मी सोडतो चल, कुठे रहातेस?” “सागरनगर” “मग माझ्या रस्त्यावरच आहे.” दोघं निघाली. स्नेहल ला लॉटरी लागल्यासारखंच वाटत होतं. तिच्या मनात उकळ्या फुटत होत्या. उद्या सगळ्यांना हे कसं रंगवून रंगवून सांगता येईल याचाच ती विचार करत होती. “सर, घरी कोण कोण आहे तुमच्या? कुठे राहता तुम्ही?”

“अं?”शंतनू आपल्याच नादात होता. “काय म्हणालीस?”

“घरी कोण कोण असतं असं म्हटलं?”

“एकटाच असतो मी.”

“ओह, मग जेवणांचं काय करता?”

“बाई करते पोळी भाजी.”

“ओह”

“तुला कुठे उतरायचं सांग.”

“अं, हो हो.”

“पुढच्या सिग्नल ला उतरेन मी सर.”

“ओके.”

“बाय गुड नाईट सर. थॅंक्स फॉर द लिफ्ट!”

“बाय”

दुसऱ्या दिवशी स्नेहल मोठा टिफीन घेऊन आली. लंच टाईम झाल्यावर सरळ केबीनमधे घुसलीच. भराभर प्लेटस्, ग्लासेस सगळं मांडलं टेबल वर. शंतनू ने आश्चर्याने पाहिलं. स्नेहल म्हणाली सर आजपासून आपण बरोबर जेवणार आहोत. असं म्हणून तिने भराभर प्लेट्स भरल्या. सुग्रास जेवणाचं असं घरगुती ताट बऱ्याच दिवसानी शंतनूच्या समोर आलं होतं. त्याने त्याचा डबाही काढला. स्नेहलने त्यातलही थोडं वाढून घेतलं. मग दोघे जेवली. मग परत वाढण्याच्या निमित्त्याने ती शंतनू च्या जरा जास्तच जवळ गेली. परफ्युमचा मंद सुगंध त्याला जाणवला. तिने किंचित वाकत बाऊल उचलला आणि परत भरून तसाच प्लेट मधे ठेवला. मग समोर येऊन बसली.

“सर आवडतंय का जेवण?:” “हं! बऱ्याच दिवसांनी असं घरचं जेवलो. थॅंक्स”

“सर तुम्हाला आवडलं हेच खूप आहे माझ्यासाठी. आता रोज मी आणत जाईन तुमच्यासाठी डबा.”

“छे छे! एखाद दिवशी आणलस बस झालं.”

“नाही सर, मला ही एकटीला खूप कंटाळा येतो जेवायला. बाकीच्यांची आणि आपली लंच टाईम पण निरनिराळी. आता ठरलं हं! मी आणणार डबा तुमच्यासाठी पण.”

शंतनू काहीच बोलला नाही.

स्नेहल ने पटापट टेबल क्लिअर केलं.

“सुपारी?”तिने छोटीशी डबी पुढे केली.

शंतनू पाहतच राहिला. हसून चिमूट तोंडात टाकली.

मग हे रोज आठवडाभर सुरू राहिलं. दुपारी एकत्र जेवण. संध्याकाळी कारमधून सोडणे.

शुक्रवारी तर बराच उशीरपर्यंत शंतनू काम करत बसला. स्नेहल ही तिची कामं उरकत राहिली. जवळ पास ८ वाजता त्याने थांबवलं काम. एक मस्त हात वर ताणून आळस दिला. त्याच क्षणी स्नेहल आत आली.

“तू जायला हवं होतस घरी, बराच उशीर झाला.”

“तुम्हाला काही लागलं असतं तर”

“बरं चला निघूयाच” एक मोठा फाईलचा गठ्ठा उचलत तो म्हणाला.

तिच्या उतरण्याचं ठिकाण आल्यावर तो अचानक म्हणाला, “जेवायला जाऊया आज बाहेर? आज माझी ट्रीट.”

“घरी सांगते फोन करून, तुमच्या बरोबर जाते म्हटल्यावर आई नको नाही म्हणायची”

स्नेहल जाम खूश झाली स्वत:वरच! गोष्टी कशा अगदी तिच्या मनासारख्या घडू लागल्या होत्या.

--------------------