Aga je dhadlechi aahe - 4 in Marathi Thriller by Nitin More books and stories PDF | अगा जे घडलेचि आहे! - 4 - अंतिम भाग

अगा जे घडलेचि आहे! - 4 - अंतिम भाग

४.

अवि पुढे बरेच काही बोलला. माझी कथा इथेच संपायला हवी. पुढे घडण्यासारखे काय होते या गोष्टीत? पण नाही. हिंदी सिनेमाचा उसूल आहे. त्यात हॅपी एंड व्हायलाच हवा! सारी गोष्ट त्यासाठी कितीही वळसे खात असली तरी चालते त्या गोष्टीत! हीरोला हीरॉईन मिळायलाच पाहिजे. शेवटच्या सीन मध्ये त्यांनी एकाच गाडीतून कुठे जायलाच पाहिजे आणि 'द न्यू बिगिनींग' वर 'द एंड' व्हायला पाहिजे. आणि या गोष्टीचा हीरो मी आहे! तेव्हा सुखांत व्हायलाच हवा!

मी म्हटले ना जे घडते तेच दिसते सिनेमात. अशा गोष्टीचा अंत सुखांत होत असेल तर तसाच तो सिनेमात दिसणार नाही का?

पुढे माझे जुळले ते बटाटेवडेवालीशीच! आणि ते ही खुद्द अविच्या प्रयत्नांतून! कुठल्यातरी सिनेमात म्हटलेय ना.. सारी कायनात एक हो जाती है मिलाने के लिए! तसेच काहीसे! अर्थात कायनात काय चीज आहे मला ठाऊक नव्हतेच आणि अजूनही नाही. पण अवि आणि इतर.. ज्यांनी हे घडवून आणले तीच असावी ती कायनात की कायतरी!

मध्ये काही दिवस गेले. सहानींचे काम झाले पूर्ण. त्यांच्या घरी एक दोनदा जाऊनही आलो. उगाच बिल्डिंगीमागे जाण्याचा अगोचरपणा टाळला मी. तीनशे नऊ नंबरात जाताना किंवा तिथून निघताना तीनशे सहा कडे नजर मात्र हटकून जायचीच. पण ते तात्पुरते. एकदा सहानी प्रकरण संपले की परत तिकडे जायची गरज नव्हती मला. माझी ती अधूरी एक कहानी तिथेच संपायला हवी. पण नाही. काही सिनेमात कसे सुखान्त होण्यासाठी गोष्टीला हवे तसे वळणे दिले जाते ..

शालिनी निवासात परत जाण्याची गरज नव्हती असे वाटत होते मला. पण प्रत्यक्षात तसे झालेच नाही. एके दिवशी मला फोन आला.. त्याच मंजूळ आवाजात!

"हॅलो.. मिस्टर अनिकेत अकलूजकर?"

"यस्स.. स्पीकिंग!"

"हॅलो, तुम्ही काही दिवसांपूर्वी आलेलात.. शालिनी निवासात.. "

"हां.."

"आता आलेत माझे बाबा परत. प्लीज याल का परत?"

"तुमचा काहीतरी गैरसमज.."

"नो.. गैरसमज नाही. तुम्ही भेटून जा. बाबांना पण काम आहे काही पॉलिसीचे. त्यांनी खास रिक्वेस्ट केलीय!"

काहीही म्हणा.. त्या आवाजातली ती 'रिक्वेस्ट' टाळण्याची हिंमत नव्हतीच माझ्यात. त्यामुळे जास्त आढेवेढे न घेता गेलोच!

यापुढे काय काय घडले?

झाले असे की शनिवार दुपारी माझी अपॉइंटमेंट होती. शालिनी निवासाच्या पायऱ्या चढलो मी. तीनशे सहा नंबरची बेल वाजवली. तीनशे सहा म्हणजे तोच नंबर.. तीनशे नऊ दिसणारा! दरवाजा उघडला तो त्याच सुर्वे कन्येने. सुंदर दिसत होती ती निळ्या ड्रेस मध्ये. वहिनीकडे पाहिले मी पण वाकड्या नजरेने मात्र नाही.

"या ना प्लीज." ती म्हणाली.

त्याच झोपाळ्यावर बसलो मी. झोके घेत.

"कुणाची काढायची आहे पॉलिसी?"

"पॉलिसी? ॲज अ मॅटर ऑफ पॉलिसी.. कुणाचीच नाही.." ती हसत म्हणाली.

"पण तुम्ही बोलावलेत.."

"ते तुम्ही कार्ड दिलेले.."

"सॉरी.. तुमच्या दरवाजावरचा तो नंबर.. सहाचा आकडा उलटा झालाय.. त्यामुळे.." मी चाचरत बोललो.

"त्याचे काही नाही हो. मीच मुद्दाम बोलावले तुम्हाला.. नाही तुला.."

ती एकाएकी एकेरीवर आली.

"बाबा तुमचे.. दिसत नाहीत.."

"ते? गावी गेलेत.."

"तुम्ही तर म्हणालात.."

"अनिकेत.. ते सोड.. तुझा मित्र आहे ना.. अविनाश.. त्याने सांगितलेय सारे.."

"सारे.. म्हणजे? नाही सॉरी.. म्हणजे खाण्याच्या बाबतीत थोडा.. म्हणजे खाणे माझा वीक पॉइंट आहे.. पण.. त्यादिवशी मला खरेच माहिती नव्हते.. तो गोंधळ.. नंबरप्लेट.." मी गोंधळून चाचपडत शब्द शोधत बोलत होतो.

"जाऊ देत रे.. खाण्याबद्दल नाही.."

"नाही तो अवि मला अनिकेत खादाड म्हणतो.. तुम्हाला तर माहितीच आहे ते.."

"अनिकेत.. ते जाऊ देत रे.. मला सांग तुला मी आवडले ना? अवि हॅज टोल्ड मी एव्हरीथिंग.."

मी काय बोलणार यावर. अविची गर्लफ्रेंड.. माझ्याशी असे बोलतेय? मी शुंभासारखा गप्प बसून राहिलो.

"तू काहीच नाही म्हणालास तर मी नाही समजू?"

"नाही.. नाही म्हणजे हो.. म्हणजे नाही.."

"म्हणजे नक्की काय?"

मी सारे धैर्य एकवटून म्हणालो, "ते खरेय.. अविला माहिती आहे.. पण.."

"पण बिण काही नाही.. अवि म्हणाला मला.."

बाप रे! इथे कहानी में ट्विस्ट की काय?

माझ्यासाठी एकवेळ माझ्या जवळच्या मित्राने त्याग करणे ठीक होते.. पण या.. अजून मला जिचे नाव ही माहिती नाही.. त्या सुर्वेकन्येने.. अविचा त्याग करावा.. का?

"हे बघ अनिकेत.. तुला मी आवडले तर सांगून टाक. मी माझ्याकडून काय ते सांगून टाकते!"

"म्हणजे?"

"म्हणजे काय ते कळले नाही तुला? अरे बाबांच्या बहाण्याने तुला परत बोलावले.."

"ते पाहिले मी."

"त वरून ताकभात कळत नाही तुला? तू अकलेचा थोडा कमी आहेस का रे?"

थोडा? थोडा जास्तच! नाहीतर सीए सोडून इन्शुरन्स एजंटची करीयर करीत फिरलो असतो? काही असो.. तिच्या आक्रमक पवित्र्याने मी अजूनच गोंधळलो. अशा पोरी फक्त सिनेमात दिसतात. श्रीमंत बापाच्या बिगडी हुई औलाद! ही श्रीमंत बापाची पोर तर नव्हतीच, ना बिगडी हुई दिसत होती. तिला माझ्याबद्दल सांगितलेले अवि ने.. पण अवि तिच्याशी माझ्याबद्दल बोलेल? कितीही जिवलग असला तरी आपल्या प्रेयसीशी स्वतःच्या मित्राबद्दल बोलण्यात कुणी वेळ का घालवेल?  'ये गो ये गो  पाव्हन्या.. कुन्याच्या तरी मेव्हन्या.. हिच्याकडे बघून हसतोय गो.. काहीतरी घोटाळा दिसतोय गो..' अवि यावेळी हेच गाणे म्हणाला असता. मनाशी मी तेच गाणे गात बसलो. माझ्या त्या ब्लॅंक फेस म्हणावे अशा चेहऱ्याकडे पाहात ती म्हणाली, "बटाटेवडे खाणार..? मी छान बनवते.. आलेच हां!"

ती आत निघून गेली.

आणि हे काय प्रकरण आहे हे कळायच्या आत आतून परत बाहेर आली ती.

मी अगदी चकित झालो. आत गेली तेव्हा तिने निळा ड्रेस घातलेला. हो.. वहिनी झाली माझी तरी तिचा तो तिच्याइतका नसला तरी सुंदर ड्रेस माझ्या नजरेतून सुटला नव्हता. आणि आता ही इतक्या झटपट लाल कपड्यांत. त्यातही ती सुंदरच दिसत होती हे खरे पण इतक्या पटापट तर सिनेमात पण कपडे बदलत नाहीत हिरॉयनी.

बाहेर येता येताच म्हणाली,

"हाय अनिकेत, कधी आलास? मला नाही वाटत तू मला कधी भेटलायस!"

मला गोंधळात टाकायचा पण केलेला दिसत होता या सुर्वे कन्येने!

माझे आ वासलेले उघडे तोंड पाहून म्हणाली, "काय करतोस हल्ली.. म्हणजे बिझी दिसतोस.. तोंड मिटायची पण फुरसत दिसत नाही!"

मी काही बोलण्यासाठी तोंड मिटणार होतो. पण नाही.. माझे उघडे तोंड उघडेच राहिले.. कारण आतून अवि बाहेर आला! आणि त्याच्या पाठोपाठ सुर्वेकन्येची निळ्या ड्रेसातली कलर झेरॉक्स कॉपी!

"झापड मिटा अनिकेतराव.. माशी जाईल तोंडात.."

अवि म्हणाला..

.. आणि मी अजून मोठा आ वासला!

च्यायला! हे असे होते तर! सुर्वेकन्या जुळ्या बहिणी होत्या! एक अविची ती मीना आणि माझीवाली ती लीना! त्या एकमेकांना ताई माई म्हणून हाक मारत! कोण म्हणते हिंदी सिनेमातच असे काही होते म्हणून? राम आणि श्याम असतात.. तशा सीता आणि गीताही असताथ. सत्यच कित्येकदा कल्पनेहून जास्त विचित्र असू शकते! पुढे काय! हॅप्पी एंडिंग. आणि या साऱ्या शालिनी निवासातल्या नाटकाच्या शेवटच्या एपिसोडचे दिग्दर्शन होते ते अविनाशचे!

हिंदी सिनेमाला उगाच बोल लावत असतो आपण. जे घडते तेच तर त्यात दिसते.. मी चुकीच्या नंबरची बेल वाजवतो काय.. मुळात तो नंबरच चुकून चुकीचा निघतो काय.. त्यानंतर माझा पाहुणाचार.. आणि त्यात जुळ्या बहिणी.. त्यातली एक माझ्याच सख्ख्या मित्राची मैत्रीण.. त्यातून मग नंबर माझा! किती योगायोग म्हणा की अकल्पित घटना म्हणा. हे घडले ते असे. प्रूफ म्हणजे मी आणि माझी लीना! फक्त त्या पहिल्या दिवशी ती ते बटाटेवडे कुणासाठी बनवत होती हे मी अजूनही नाही विचारलेय तिला!

माझ्या छोटीला मात्र ही गोष्ट सांगितली नाही मी. लहान आहे ती अजून. तरीही सत्य हेच आहे.. अगा हे घडलेचि आहे..

आणि इतकेच नाही.. तर अगा हे ऐसेचि घडले आहे!

*************

Share