THY NAME IS LIFE - PART 2 books and stories free download online pdf in Marathi

ह्याला जीवन ऐसे नाव - भाग २

ह्याला जीवन ऐसे नाव

भाग 2

भाग 1 वरुन  पुढे वाचा.

 

“कोण कोण आहेत बरोबर ?” पंडितनी विचारलं.

“मी एकटाच. तुम्ही येता ?” पुरोहितचा प्रतिप्रश्न.

“नाहीतरी मी भटकंती करायलाच निघालो आहे, तेंव्हा विचार करतोय की काय हरकत आहे पायी परिक्रमा करायला ? हा ही अनुभव घेऊन पाहावा.” पंडित म्हणाला.

“अरे वा ! मग तर छानच होईल मला पण कंपनी मिळेल.” पुरोहित म्हणाला. त्याला आनंद झालेला दिसत होता. “बोलता, बोलता वाट कशी सरेल ते कळायचं पण नाही. परत अडचणीच्या काळात कोणी बरोबर आहे याचाच दिलासा असतो. विचार करा आणि सांगा.”

जेवता जेवता बऱ्याच अवांतर गप्पा झाल्या, पंडितला पुरोहित एकदम आवडून गेला. गृहस्थाचा, पुरोहित असून संस्कृत शिवाय इंग्रजी आणि कन्नड आणि मराठीचा व्यासंग दांडगा होता. जेवण झाल्यावर पंडित म्हणाला की

“कुठल्या रूम मध्ये आहात?”

“मी चौदा नंबर मध्ये उतरलो आहे.” – पुरोहित.  

रात्री पंडित चौदा नंबरच्या खोलीत गेला. पुरोहित झोपायच्या तयारीत होता.

“काय म्हणता पंडित?” – पुरोहितनी  विचारलं.

“मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. केंव्हा निघायचं?” – पंडित.

“उद्या तुम्हाला थोडी तयारी करावी लागेल. मग परवा निघू.” – पुरोहित.  

“मी तयारच आहे. प्रवासाच्या तयारीनिशीच घरातून निघालो आहे.” – पंडित.  

“एक पिवशी आणि त्यात जरुरीचे दोन जोडी कपडे एवढंच घेऊन चलायचं  आहे. बाकी तुमचं सामान, मोबाइल, क्रेडिट, डेबिट कार्डस वगैरे इथेच ठेऊन जावं लागेल. वाटमारी चा धोका असतो. थोडे पैसे घ्या बरोबर.” – पुरोहित माहिती देत होता.  

“आणि पैसे संपल्यावर? खायचं काय?” – पंडित.

“नाही तशी वेळ येत नाही. जितकी माहिती मी गोळा केली आहे त्या प्रमाणे ठिकठिकाणी आश्रम आहेत आणि कुठेही पैसे खर्च करावे लागत नाहीत. काळजी करू नका. बाकी राम भरोसे.” – पुरोहित.  

“ओके. सामान कुठे ठेऊ ? लॉज मध्ये ठेवतील ?” – पंडित.

“इथे देवळात माझ्या ओळखीचे गुरुजी आहेत, मी त्यांच्याच कडे ठेवलं आहे. तुमची पण सोय होईल.” – पुरोहित.

तिसऱ्या दिवशी प्रवासाला सुरवात झाली. ३०-३५ किलोमीटरवर नर्मदा   तीरावर एक आश्रम होता तिथे थांबले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघ पुढच्या प्रवासाला निघाले. पंडित बघत होता की पुरोहित आवाज न करता काहीतरी म्हणत होता. कुतूहल वाटून त्यांनी विचारलं की काय म्हणत होता ते

“अरे आमची संथा असते ती रोजच्या रोज म्हणावी लागते. नाहीतर विसरण्याचा धोका असतो. आणि आम्ही शपथ घेतली आहे की रोज पूर्ण पाठ झालाच पाहिजे म्हणून.” – पुरोहित.  

“मग मोठ्याने म्हणा न. मलाही कळेल.” – पंडित.  

“तुम्हाला काय येतं ?” – पुरोहित.

मारुती स्तोत्र आणि रामरक्षा मी रोज म्हणतो.” – पंडित.  

“नाही तेवढं पुरेसं नाहीये.” – पंडित.  

“मग तुम्ही शिकवा, नाही तरी आपण येते सहा महीने बरोबरच असणार आहोत. टाइम पास पण होईल आणि ज्ञानात भर पण पडेल.” पंडितनी विनंती केली.

आणि त्यांचा ट्यूशन क्लास सुरू झाला. सहा महीने झाले आणि त्यांची परिक्रमा पण पूर्ण झाली. विविध प्रकारचे, चांगले  वाईट अनुभव आले. नाना प्रकारची माणसे भेटली, माणसांच्या स्वभावाच्या इतक्या तऱ्हा पाहून, पंडितला अचंबित व्हायला झालं. सहा महिन्यात इतके अनुभव गोळा  झालेत, की लिहिलं असतं तर एक पुस्तक तयार झालं असतं. ओंकारेश्वरला रात्री लॉज वर जेवण करतांना पुरोहित म्हणाला

“पंडित, तू आता पूर्ण पुरोहित झाला आहेस. संपूर्ण पूजा पद्धती, विष्णु सहरत्र नाम, श्रीसूक्त, महीम्न, रुद्र, सप्तशती सर्व तुला येतं. खूप लवकर शिकलास तू. कसं वाटतंय ?” पुरोहितनी विचारलं.

“खूपच छान.” पंडित उत्साहाने म्हणाला. “परिक्रमा पण छान निर्विघ्न पार पडली. मला तर अस वाटतंय की मी आता एक वेगळाच माणूस झालो आहे. आमूलाग्र बदल झाल्यासारखा वाटतोय.”

“आपण आता अस करू इथून वाराणसी ला जाऊ काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या, आपल्या वाटेला लागू.” पुरोहितने सुचवलं, आणि पंडितने होकार भरला.  काशीहून पुरोहित ने मुंबईची गाडी पकडली आणि पंडित दिल्लीला जाणाऱ्या गाडीत बसला. कानपूरला गाडी बराच वेळ थांबली चौकशी केल्यावर समजलं की पुढे एक मालगाडी बंद पडली आहे आणि तिचं इंजिन बदलून ट्रॅक मोकळा झाल्यावरच  त्यांची गाडी पुढे जाईल. पंडित तसाही कंटाळलाच होता. त्यानी कानपूरलाच उतरायचं ठरवलं. कानपूरची काहीच माहिती नव्हती, थोडी चौकशी करून त्यांनी एक लॉज गाठलं. सामान टाकून फ्रेश होऊन शहर बघायला निघाला. दोन दिवस असाच फिरत होता. पायी परिक्रमा झाल्यावर, पायी फिरणं हा काही प्रॉब्लेम नव्हता.

असाच फिरता फिरता तो एक दिवस एका नवीन वस्तीत जावून पोचला. तहान लागली म्हणून झोळीतून पाण्याची बाटली काढली पण ती रिकामी होती. उन्हाळ्याचे दिवस, घसा कोरडा पडला होता. इकडे तिकडे पाहिलं तर कुठलच दुकान नव्हत. समोरच एक धोब्याची टपरी होती, कदाचित तो पाणी देईल म्हणून त्याला विचारलं.

भाई थोडा पानी मिलेगा? बहुत प्यास लगी है .

धोब्याने त्याच्याकडे पाहिलं. पायजमा आणि शर्ट, आणि तोही स्वत:च धूत असल्याने जरा मळकटच दिसत होता. सहा महिन्यांची परिक्रमा, त्यामुळे रंगही जरा रापला होता. कुठल्याही अंगांनी तो एका मोठ्या कंपनीतला रिटायर्ड ऑफिसर वाटत नव्हता. धोब्याने पाणी दिलं आणि जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्याची चौकशी केली. मग म्हणाला

“कुछ काम करोगे ?” – धोबी.

“कैसा काम ?” – पंडित.

“यही. कपडा इस्त्री कर सकोगे. ?” – धोबी.

पंडितने क्षणभर विचार केला, काय हरकत आहे, करायला मजा वाटली तर करू काही दिवस, नाहीतरी अनुभव घ्यायलाच निघालो आहोत.

“हां जी. ज्यादा आदत तो नही है, इस्त्री करना जानता हूं पर स्पीड नाही है. लेकिन चिंता ना करो थोडे समयमे वह भी या जायगी.” – पंडित.  

“ठीक है, तो फिर शुरू हो जा. दो दिन देखूँगा, अगर सही लगा तो ठीक है नही तो छुट्टि. कोई पैसा नही मिलेगा मंजूर है ?” – धोबी.

“जी. मंजूर.” – पंडित.

पंडित ची नोकरी सुरू झाली. त्याला मजा वाटत होती. मनात विचार आला की कोणी त्यांच्या सहकाऱ्याने बघितलं तर काय होईल ? त्याला हसू आलं. महिना झाला. धोब्याचा त्याच्यावर आता विश्वास बसला होता. धोब्याने रात्री त्याला, त्याच टपरीत झोपायची परवानगी पण दिली. एकूणच तसं छान चाललं होतं. रात्रीच्या वेळी कपडे, आणि सामान समोरच्या घराच्या आउट हाऊस मध्ये ठेवाव लागायचं. धोबी त्यांच्या मेहनती वर खुश होता. आणि धोब्याला अचानक त्यांच्या गावी जावं लागलं. शेतावर कोणीतरी मालकी हक्क दाखवला होता. पंडितला दुकान सांभाळायला सांगून ते दोघं पती पत्नी  निघून गेले. आता पंडित एकटाच, सर्वच कामं त्यालाच करावी लागत होती. दोन तीन दिवसांनंतर तो इस्त्री करत असतांनाच अतिक्रमणवाले आले आणि त्याची झोपडी उखडून टाकली आणि त्याला पण फटके मारून पळवून लावलं. पंडितने बरीच गयावया करून आणि गल्ल्यातले सर्व पैसे देऊन इस्त्री आणि लोकांचे कपडे वाचवले. संध्याकाळ पर्यन्त सामान आणि कपडे हाताशी घेऊन तो समोरच्या घराच्या फटकापाशी बसला होता. त्या घराची मालकीण एक बाई होती आणि ती बँकेत काम करायची. संध्याकाळी ती आली आणि पंडितला असं  बसलेला पाहून म्हणाली

 

“अरे ! पंडित क्या हुवा? तुम्हारी झोपडी?” – मॅडमनी विचारलं.

“मॅडमजी वो कार्पोरेशन वाले आये थे. झोपडी उखाड कर चले गए.” पंडित उत्तरला.  

“फीर अब?” – मॅडम.

“अब क्या, ये कपडा जिस किसीकाभी है, ये देखके कल लौटा दुंगा. बस आज मुझे यहाँ रहने की इजाजत दे दो. बस एक दिन के लीये. प्लीज.” – पंडित  

“पंडित बहुत दिनसे सोच रही हूँ की तुम्हारे हिन्दी को मराठी टच है, ऐसा लगता है. कौन हो तुम ?” – मॅडमनी उत्सुकतेने विचारलं.

“मै मराठी हूँ. लेकिन आपको कैसे पता ?” – पंडितनी आश्चर्याने विचारलं.

“मी पण मराठीच आहे. पण बरीच वर्ष इथेच आहे.” – मॅडम  

“मॅडम तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.” पंडित म्हणाला.  

“हो. ठीक आहे आज तू रहा इथे. नो प्रॉब्लेम. इथे व्हरांड्यात झोपशील ?” – मॅडम.

“हो मॅडम.” – पंडित.  

रात्री मॅडम जेवणाचं ताट घेऊन आल्या. “घे. जेवून घे.” म्हणाल्या. त्याच दिवशी रात्री अडीच तीन च्या सुमारास ४-५ लोक घरात घुसले. चाहूल लागून पंडित उठला. त्याला घेरून ४ लोक उभे होते. हातात लाठ्या होत्या. चांगलेच सराईत चोर वाटत होते. त्यांनी पंडितला काठीनेच दाबून धरलं होतं.

 

 

क्रमश:.........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.