Aaropi - 5 books and stories free download online pdf in Marathi

आरोपी - प्रकरण ५


प्रकरण ५

“मिस्टर पटवर्धन मला असं इथून लगेच निघता येणार नाही. मी माझ्या खोलीतून काही आणले नाहीये. म्हणजे अगदी दात घासायचा ब्रश टूथपेस्ट सुद्धा घेतलेलं नाहीये.” क्षिती म्हणाली
“टूथ ब्रश आणि टूथपेस्ट पेक्षा इतर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्येत. आपण निघतोय.” पाणिनी म्हणाला “तुझ्याबरोबर तू तुझी पर्स घेतलेली दिसतेस !”
“हो. एवढ्या सगळ्या त्या गोंधळात आणि हातघाईच्या लढाईत मी पर्स मात्र घेतली.”-क्षिती
“किती मोठी लढाई झाली?” - पाणिनी
“शारीरिक लढाई नाही पण तोंडा तोंडी खूप झाली.”-क्षिती
“आणि तू काय सांगितलंस त्यांना?”
“मी काही सांगितलं नाही. तुम्ही जेवढं सांगायला सांगितलं होतं तेवढं फक्त सांगितलं. मी सांगितलं की मी काहीही पैसे चोरले नाहीत आणि मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. जेव्हा माझा वकील माझ्यासमोर असेल तेव्हाच त्याच्या सल्ल्याने मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन कारण मी कुठलाही गुन्हा केलेला नाही .आणि माझं मत असं आहे की मला प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकारच नाही. हेच वाक्य मी त्यांना सतत ऐकवत राहिले.”
“एकदम छान ! असंच उत्तर तुझ्याकडून अपेक्षित होतं.”—पाणिनी
“सर वाऱ्याने एखादं पान थरथराव तशी ती थरथरते आहे.” सौम्या ने पाणिनीच्या नजरेला आणून दिलं.
“मला कल्पना आहे. आपण जरा बाहेर जाऊ जिथे आपल्याला शांतपणे बोलता येईल.”
“कुठे जायचं ?तुमच्या ऑफिसमध्ये?”-क्षिती
“नाही. ते खूप लांब आहे. आपण बाहेर रस्त्यावर पडू आणि सगळ्यात जवळचे हॉटेल दिसेल तिथे जाऊ. आपण त्या हॉटेलमध्ये चक्क तुझ्या नावाने खोली बुक करू. मग तुझ्या वस्तू कशा तिकडे आणायचा ते ठरवू. आज तू कामावर हजर झाली नाहीस ना?”-पाणिनी
“नाही आज नाही. मी माझे मालक राजे यांना सांगितल की मी दुसरीकडे राहायला जाते आहे त्यामुळे मला आज संध्याकाळची आणि रात्रीची रजा लागणारे आणि त्यांनी रजा दिल्ये मला.”
“ठीक आहे. हे छान झालं. चला आपण जरा हॉटेल शोधू .”
ते तिघेही गाडीत बसले आणि पाणिनीने आपली गाडी रस्त्यावरच्या रहदारीत घुसवली.
“ क्षिती, मी सांगतो ते आता नीट ऐक. मला तुझ्याशी कदाचित फार सविस्तर बोलता येणार नाही कारण त्यांनी एव्हाना पोलिसांना कळवले असेल ,आणि कदाचित पोलीस आपल्या मागावर पण असतील. तू आत्ता मला आणि सौम्याला जे काही सांगशील ते पूर्ण गोपनीय असेल याची खात्री बाळग. आता त्यांच्यासमोर मी तुला काहीही बोलू नको असं सांगितलं आणि ते मला तसं सांगावंच लागलं. याचं कारण अस की आम्हाला वाटतय की ज्या गोष्टी तू करायला नको होत्यास त्या तुझ्या हातून झाल्येत. तुला फार उत्सुकता होती त्या खोक्या मध्ये काय आहे ते बघायची.”
“प्रत्यक्षात तुला तसं करायचा काही अधिकार नव्हता, कायद्याने. या उत्सुकतेपोटी ज्या क्षणी तु खोक्याला हात लावलास त्या क्षणी तुझी अवस्था फार नाजूक झाले कायदेशीरदृष्ट्या.आता तुझी मधूरा आत्या किती नोटा गेल्याचा क्लेम करत्ये?”
“दोन हजार रुपये”-क्षिती
“काय ! फक्त दोन , हजार रुपये? ते सगळे खोके जे नोटांनी खचाखच भरले होते, त्यातून फक्त दोन हजार रुपये घेतल्याचा आरोप तुझ्यावर करते आहे तुझी आत्या?” पाणिनी पटवर्धनने आश्चर्यानं विचारलं.
“मिस्टर पटवर्धन काहीतरी गौडबंगाल आहे. त्या खोक्यांमध्ये आता पैसे नाहीत. ती सर्व खोकी रिकामी आहेत.”-क्षिती
“सर्वच्या सर्व खोकी रिकामी आहेत?”-पाणिनी
“हो”
“आणि त्या सगळ्या खोक्यात मिळून जिथे लाखो रुपये च्या नोटा असायला हव्या होत्या त्याठिकाणी फक्त दोन हजार रुपये तू चोरल्याचा आरोप तुझी आत्या करत्ये?”
“हो”
“वेड लागायची पाळी आली मला.” पाणिनी ओठातल्या ओठात पुटपुटला
“दुपारी साहिर माझ्या आत्याला भेटायला आला. त्यांच्या गप्पा झाल्या. तिने त्याला रात्री जेवायला येण्याचे निमंत्रण दिलं. तिने मलाही जेवायला बोलावलं.आम्ही तिथे बसलेलो असताना ती वरच्या मजल्यावर गेली. जवळजवळ पंधरा मिनिटं तिने आम्हा दोघांनाच खाली एकत्र सोडलं. आणि अचानक वरच्या मजल्यावरून ती किंचाळायला लागली की मोठी चोरी झाली आहे.
ती किंकाळी ऐकल्याबरोबर साहिर विजेच्या वेगाने वरच्या मजल्यावर पळत गेला. मी ही त्याच्या मागोमाग वर गेले बघते तर आत्या तिच्या त्या कपाटाच्या दाराजवळ उभी राहून बोटाने खोकी दाखवत होती आणि आणि किंचाळून बडबडत होती कि मी पुरती लुटली गेले असं. शेवटी साहिर नं तिला शांत केलं. पटवर्धन तुम्ही कल्पना करा त्या वेळेला मला काय वाटत असेल मी प्रचंड भ्याले होते”
“साहिर न तिला विचारलं की किती रक्कम गेली, तेव्हा तिने एका खोक्या कडे बोट दाखवून म्हटलं की दोन हजार रुपये गेले आहेत. तिनं त्या खोक्यात ते ठेवले होते आणि आता ते दिसत नाहीयेत.”—क्षिती
“इतर खोक्या बद्दल ती काय म्हणाली?” –पाणिनी
“काहीही बोलली नाही.”
“आणि त्यावर साहिर काय म्हणाला?”
“बोलला काहीच नाही तो हरामखोर, साहिर सामंत. असं दिसतंय की पहिल्यापासूनच मी आत्याकडे राहायला आलेली त्याला आवडले नाहीये. आत्याच्या बेडरूम मधल्या खोकी ठेवलेल्या कपाटाला जवळ जायची सगळ्यात पहिली संधी मला होती हे आत्याच्या मनात ठसवायला तोच कारणीभूत आहे.”
“तू घरी किती वेळ होतीस?”—पाणिनी
“मी दुपारची सुट्टी घेतली होती. आणि मला काही वैयक्तिक खरेदी करायची होती. नंतर मी घरी गेले माझं सामान भरलं आत्या नं मला रात्री जेवणाचे निमंत्रण दिलं. मी हो म्हणाले नंतर रात्री आल्यानंतर आत्यानं मल सांगितलं किती ने समीर सामंत ला पण जेवायला बोलावलं आहे.”
“तू त्याला आधी भेटली होतीस कधी?”-पाणिनी
“हो अगदी जुजबी ओळख झाली होती”
“तुला त्याच्याबद्दल काय माहिती आहे?”-पाणिनी
“काहीही माहिती नाही.”-क्षिती
“तो स्वतःला आत्याच्या कुटुंबाचा मित्र म्हणवतो.” पाणिनी पटवर्धन ने तिच्या लक्षात आणून दिलं
“तो कुटुंबाचा मित्र वगैरे नक्कीच नाहीये कारण कुटुंब असं आता अस्तित्वातच नाहीये. आता माझेच आई-बाबा अपघातात गेले पण मला माहिती आहे की माझ्या आई-बाबांनी सुद्धा या साहिर सामंत ला कधी पाहिलं नसावं. तेव्हा जरी मी लहान असले तरी मी आई बाबांच्या किंवा आत्याच्या तोंडून या साहिर च नाव कधीही ऐकलेलं नव्हतं.”
“त्या दिवशी तू त्याच्या बरोबर किती वेळ होतीस?”-पाणिनी
“फार वेळ नव्हते. फार तर दहा पंधरा मिनिटं. जेव्हा आत्या वरच्या मजल्यावर गेली होती तेव्हा पण मला तो माणूस जास्त उर्मट वाटला.”
“तो काय करतो ते त्यांन तुला सांगितलं?”-पाणिनी
“तो म्हणाला की तो गुंतवणूक सल्लागार आहे.आणि कर्ज मिळवून देण्याचं वगैरे पण काम करतो पण मला त्याच्याशी बोलताना असं जाणवलं तो त्याच्या बद्दल फारशी माहिती देण्यात इच्छुक नव्हता.”-क्षिती
“तू त्याला हे नाही विचारलंस की तो तुझ्या आत्याला किती वर्षे ओळखतोय?”
“ नाही विचारलं. मी वैयक्तिक असे कुठलेच प्रश्न त्याला विचारले नाहीत आम्ही दोघेही खाली बसलो होतो आणि फालतू विषय काढून वेळ काढत होतो.तो विचारत होता की इथे तुला कसं वाटतंय.तू हॉटेलात नोकरी करतेस हे समजलं असं ही म्हणत होता.मग त्याने हे ही विचारलं की का नोकरी करतेस? अशी चर्चा झाली.माझ्या कडून काही गोष्टी तो काढून घेत असावा असं मला जाणवत होतं. "
“ आपण साहिर सामंत बद्दल आणखी माहिती काढू या.” पाणिनी म्हणाला. “ मला एक शक्यता वाटत्ये की तो एक घुसखोर असावा.”
“म्हणजे काय? ”- क्षिती
“ त्याने शोधून काढलं असावं की तुझी आत्या जरी गरीब असल्याचं दाखवत असली तरी तिच्या मालकीची काहीतरी मालमत्ता असावी.इन्कमटॅक्स विभाग अशा लोकांची माहिती देणाऱ्याला काही बक्षिसी देतो, जर त्यांना त्या व्यवहारात कर टाळला गेल्याचं लक्षात आलं तर.”
“ त्याच्याशी बोलताना मला तो असाच चोंबडे पणा करणारा वाटला.त्याला काही प्रश्न मी विचारले की तो खांदे उडवायचा , विषय बदलायचा. आम्ही खाली होतो तेव्हा मला त्याने विचारलं की मधुरा आत्या स्वयंपाक कसा करते. मी उत्तर दिले की फारच सुगरण आहे ती. मला उगाचच वाटतंय की या पूर्वी तो तिथे जेवायला आला असावा.”-क्षिती
“ त्या रात्री आत्याने काही खास असे पदार्थ केले होते? की नेहेमी जे करायची तेच?” –पाणिनी
“ नेहेमीचेच, फक्त गोड काहीतरी पाहिजे म्हणून श्रीखंड.”
“ बरं,तुझ्या आत्याने जेव्हा आरडा ओरडा केलं की ती लुटली गेल्ये म्हणून, त्या नंतर काय झालं?”
“ त्या वेळीच साहिर ने आत्याला सांगितलं की पोलिसांना बोलावलं पाहिजे. तेव्हा आत्या म्हणाली की या भानगडीत पोलीस नकोत, तेव्हा साहिर म्हणाला की त्याच्या ओळखीचा एक खाजगी गुप्त हेर आहे तो त्या खोक्यावरचे ठसे घेऊ शकेल. ”-क्षिती
“ सगळे खोके नाहीसे झाले होते?” पाणिनी नं विचारलं
“ सगळे. फक्त एकाचा अपवाद. तो एकच रिकामा खोका जमीनीवर पडला होता.”
“ नंतर काय झालं?”पाणिनी नं विचारलं
“ साहिर ने त्या गुप्त हेराला फोन करून बोलावलं.जनार्दन दयाळ ला.मी लगेच तुम्हाला फोन लावत होते पण फोन बिझी होता तुमचा. पुढे घटना फार झपाट्याने घडल्या. हा जनार्दन दयाळ आला.तो फारच आक्रमक आणि उद्धट होता. त्याचा आग्रह होता की मी माझ्या बोटाचे ठसे त्याला घेऊ द्यावेत. मी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं.मी हे ही सांगितलं की तुम्ही माझे वकील आहात आणि मी तुम्हाला बोलावून घेतलंय.नंतर मी तुम्हाला फोन केला, तुम्ही आलात, पुढंच तुम्हाला माहितीच आहे.”-क्षिती म्हणाली
पाणिनी इतका वेळ लक्षपूर्वक गाडी चालवत होता.त्याने पाहता पाहता गाडी हाय वे वरच्या ‘प्रवासी’ नावाच्या हॉटेल च्या आवारात आणली. त्याने स्वतः ची आणि सौम्या,क्षिती ची ओळख मॅनेजर ला करून दिली. क्षिती ला रजिस्टर मधे सही करायला लावली.
“ आम्ही क्षिती बरोबर इथे थोडा वेळ थांबू इच्छितो.”
“ तुम्ही आत आलात तेव्हाच मी तुम्हाला ओळखलं होतं , पाणिनी पटवर्धन. ” तो म्हणाला. “ जरूर.तुम्हाला काहीही हवं असलं तरी नि:संकोच पणे सांगा.”
पाणिनी ने त्याचे आभार मानले.
“ क्षिती अलूरकर, तुझ्या आत्या विषयी आम्हाला काही माहिती मिळाल्ये, अजूनही काही काढतोय आम्ही. पण तुला मी मुद्दामच अत्ता सांगणार नाहीये. पोलिसांनी तुला प्रश्न विचारले तर तुला ती माहिती नसलेलीच बरी,कारण माहिती दिली तर तुला काही गोष्टी दडवाव्या लागतील, खोटे बोलावे लागेल, ते मला नकोय.त्यापेक्षा तुला माहिती नसलेलीच बरी.”
“ बरोबर आहे.”-क्षिती
“ आपल्याला काळजीचा मुद्दा असा आहे की तुला नोटांनी गच्च भरलेला खोका दिसला.तू हे पोलिसांना किंवा कोणालाही सांगितलस किंवा कबूल केलंस की लगेच ते या निष्कर्षाला येतील की तुझ्या आत्याने नोटांनी भरलेला जो खोका लपवून ठेवला होता,त्यातल्या नोटा तू चोरल्यास.नेमके पैसे किती होते हे सांगण्याचे धैर्य आत्या मधे नाही म्हणून ती म्हणत्ये की फक्त दोन हजार ची नोट चोरली गेली आहे. पोलिसांच्या दृष्टीने तू हजार ची एक नोट चोरलीस काय किंवा सगळ्या नोटा चोरल्यास काय तुला चोर ठरवण्यात ते यशस्वी होणं त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे.म्हणूनच तू त्या कपाटात काय बघितलंस ते तू सांगू नयेस असं मला वाटतं,पण त्याच बरोबर तू खोटे ही बोलू नको.” पाणिनी म्हणाला.
“ पण मग या दोन्हीचा मेळ कसा काय घालायचा?”- क्षिती
“ बरोबर आहे, मेळ घालायला गेलं तर ते जास्तच संशय घेतील म्हणूनच, तूअसे विधान करणार आहे की तू एक चांगल्या घराची कुटुंबवत्सल अशी मुलगी आहेस अपघातात आई-वडील गेल्यामुळे तू खूप काही सोशल आहेस आणि त्याला मदत म्हणून तू नोकरीपण करत आहेस अशा परिस्थितीत तुझ्यावर आलेल्या या आरोपामुळे तू व्यथित झाली आहेस आणि त्यामुळे तुझ्यावर आरोप करणाऱ्या गुप्तहेर दयाळ आणि स्वतःला कौटुंबिक मित्र म्हणणारा साहिर सामंत या दोघांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करायचा विचार करत आहे. त्यामुळे मी सध्या तरी कोणतेही विधान करणार नाही या दाव्यात आत्याला पण सामील करून घ्यायचे की नाही याचा आम्ही विचार करत आहोत. आमचा हा निर्णय पक्का होईपर्यंत कोणतेही विधान करण्यासाठी मला माझ्या वकिलांनी परवानगी दिलेली नाही.”
तिने मान डोलावली.
“तू करु शकशील ना हे सर्व?” पाणिनी नं विचारलं
“हो. का करू शकणार नाही मी? मी काही बुद्दू नाहीये.”-क्षिती
“गुड गर्ल !” क्षिती ला उद्देशून पाणिनी म्हणाला.
“ आता या टेबलवर बस आणि मी सांगतो तसं पत्र तुझ्या आत्याला उद्देशून लिही. असं लिही की येथून पुढे पाणिनी पटवर्धन हे माझे वकील राहणार आहेत त्यात उल्लेख कर की मी अचानक तिथून निघून गेले याचं कारण मला धमक्या येत होत्या. माझ्या काही वस्तू तुझ्या घरातील मी राहत असलेल्या खोलीत आहेत त्या तिथून घेण्यासाठी मी सौम्या सोहोनी हिला अधिकार दिले आहेत ती माझ्या वस्तू घेऊन येईल सगळ्या वस्तू एकाच खेपेत आणता आल्या नाहीत तर ती पुन्हा तिथे येईल त्याच्यासाठी सुद्धा मी तिला अधिकार दिले आहेत पण या सगळ्या वस्तू मला लगेच लागणारच आहेत”
पाणिनीने सांगितल्यानुसार क्षितीने पत्र खरडले आणि पाणिनी कडे दिले.
“ माय गॉड हे पत्र घेऊन तुम्ही आत्याच्या घरी गेलात तर ते लोक तुम्हाला हाकलून देतील”-क्षिती
“ मला नाही वाटत तसं” पाणिनी म्हणाला “ते कदाचित मज्जाव करतील मला आत येण्यासाठी पण हाकलवून नाही देणार. बर, तुझं जेवण झालंय का?”
“ नाही”
पाणिनी पटवर्धन ने आपल्या खिशातून हजार रुपये काढून तिला दिले
“या हॉटेलमध्ये खाली रेस्टॉरंट आहे तिथे जाऊन जेवून ये.थोडे पैसे उरतील ते तुला राहू देत.”
“ मला भूक नाहीये. इच्छाच नाही अन्न खायची. मी पार कोलमडून गेल्ये”-क्षिती
“ठीक आहे अशा कठीण प्रसंगात असा होतो भुकेवर परिणाम पण तरीही जेवून घे थोडा आराम कर आम्ही अर्ध्या पाऊण तासात पुन्हा येतो” पाणिनी म्हणाला.
एवढं बोलून पाणी पटवर्धन ने सौम्याला खूण केली आणि तिला घेऊन तो हॉटेलच्या बाहेर पडला बाहेर पडल्यावर सर्वात प्रथम त्याने कनक ओजसला फोन लावला.
“ मी सांगतो ते नीट ऐक क्षितीच्या आत्याच्या घरी खूप वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. तुला पोलीस किंवा इतरांकडून कळेलच की आत्याच्या खोक्यातून भरून ठेवलेल्या नोटा तिने चोरल्या असा तिच्यावर आरोप आहे मला तुझी मदत हवी आहे.”
“ बोल काय हवय तुला पाणिनी?” कनक ने विचारलं
“ जनार्दन दयाळ च्या फर्म बद्दल तुला किती माहिती आहे?”
“ चांगलं नाव आहे त्यांचं या धंद्यात.”-कनक
“ मला म्हणायचंय की जनार्दन दयाळ हा त्या खोक्यावरचे ठसे घेऊ शकेल एवढा तयारीचा आहे का?” पाणिनी नं विचारलं
“ त्या बद्दल मला शंका आहे.कारण ती एक मोठी कला आहे. वायुरूप आयोडीन वापरूनच ते ठसे घेता येतात.त्यातही नशिबाची साथ लागते. खर तर प्रयोग शाळेतच ते करावं लागतं.”-कनक
“ या बाबत माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट सांगतो तुला, कागदावरचे किंवा पुठ्यावरचे ठसे मिळवण्यासाठी पृष्ठ भागावर लोह चुम्बकाच्या बारिक पावडरीचा पातळ थर टाकला जातो. नंतर तो थोडया वेळाने लोह चुंबकाच्या मदतीने काढून टाकला की खाली ठसे पडलेल्या ठिकाणी फक्त पावडर चिकटून राहते.”-पाणिनी म्हणाला.
“ बापरे! मलाच हे माहीत नव्हतं.त्या दयाळ ला तर शक्यच नाही माहीत असणं” –कनक
“ तो तिचे ठसे मागत होता. जुळवून बघायला.” पाणिनी म्हणाला.
“ केवळ रुटीन म्हणून. तिच्यावर दबाव टाकायला आणि तिची कबुली मिळवायला त्याला त्याचा वापर करायचा असेल” –कनक “ त्या दयाळ चे आमच्या क्षेत्रातील नाव असेच आहे, हाताळायला कठीण,हट्टी,गुंड गर्दी करणारा. तो खास करून अंग रक्षक म्हणून बरीच कामं घेतो, गुप्त हेरापेक्षा.” –कनक
“ मला तेच हवं होत नेमकं. मला त्याच्या फर्म वर अब्रू नुकसानीचा दावा थोकायचाय” पाणिनी म्हणाला.
“ माझं काहीच जात नाही,दावा थोकलास तर. त्या मधुरा बद्दल मी आणखी काही करू का?”-कनक
“ काहीच नाही अत्ता. तिच्या पाळतीवर ठेवलेल्या माणसाला काढून टाक आता.त्याला घरी जाऊ दे.मला बिल पाठव.”
“ जशी आपली आज्ञा.” कनक म्हणाला.
फोन झाल्यावर पाणिनी आपल्या गाडीत येऊन ड्रायव्हिंग सीट वर सौम्या शेजारी बसला आणि त्याने गाडी चालू केली.
( प्रकरण ५ समाप्त)