Prema Tujha Rang Kasa - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमा तुझा रंग कसा ? - 1


"ए भावा, चल यार काय नौटंकी यार?” प्रथम अविकला खेचत होता.



“यार...... काम आहे मला.... आज नाही” अविक प्रथमकडे न बघताच पीसीवर खाड्खुड करायला चालू झाला.



“यार प्लिज प्लिज... भावासोबत अस करणार आता......” प्रथमच तरिही अविकला खेचन चालुच होत.



“च्यायला, मी तर सुट्टा मारत नाही....  तरिपण साल्या तुझ्यामुळे मला हे सो कॉल्ड सुट्टा ब्रेक्स घ्यावे लागतात.” प्रथम ऐकनार नाही हे माहित असल्याने अविक नाईलजाने पीसी लॉक करून उठला. अविक आणि प्रथम शाळेपासुनचे जीवलग मित्र. नशिबाने जॉबला पण एकाच मल्टिनॅशनल कंपनीत होते. एकमेकांचे जीवलग दोस्त स्वभावाने मात्र एकमेकाच्या अगदी विरुद्ध. प्रथम प्रत्येक दिवस फक्त मजा करायला आहे ह्या तत्वावर जगायचा. अविक बिचारा शक्यतो आपण बर आणि आपल काम बर असा माणुस पण आत्यंतिक मित्रप्रेमामुळे प्रथमने केलेले सगळे ‘कांड’ अविकला निस्तारायला लागायचे. दारु,सिगरेट हे प्रथमसाठी रोजचच होत आणि अविक मात्र त्याच्या विरुद्ध होता. प्रथमच्या सुट्टा ब्रेक वरुन त्या दोघांच रोजचच भांडन व्हायच. पण प्रथमला अविकशिवाय करमायचच नाही मग काय सिगरेट संपेपर्यंत दोघेही भांडतच असायचे व एव्हाना ‘भांडन ओव्हर’ सिगरेट्ची दोघानाही सवय झालेली आता. प्रथम प्रत्येक संडे नंतर पुर्ण विक नेक्स्ट संडेचा प्ल्यान करत असायचा आणि अविक संडेला देखिल नेक्स्ट वीकच्या टास्कचा विचार करायचा. हे अस काहितरी विचित्र समीकरण होत दोघांच.



क्युबिकल मधुन बाहेर आल्यावरही अविकच्या डोक्यात टास्कचेच विचार होते आणि प्रथम ऍज य़ुजुअल संडेच प्ल्यानिंग करत होता. प्रथमच्या अखंड बडबडीमधले काहिच शब्द कसेबसे अविकच्या मेन्दुपर्यंत पोचत होते. काहितरी उत्तर द्यायच म्हणुन तो ह्म्म, ओके, अच्छा असे ऑलटाईम चालणारे डायलॉग फेकत होता. पण थांबेल तो प्रथम कसला. शेवटी वैतागून अविकने आपलेच विचार बन्द केले. त्याच्या त्या चिडचिडीवर प्रथम लोटपोट होऊन हसायला लागला. अविक लटक्या रागाने त्याला मारायला त्याच्या मागे धावला. टपरीपर्यंत अक्षरशः धावतच आले दोघे.



"काका एक गोल्डफ्लेक द्या" प्रथम सुट्टया पैशांसाठी खिसे चाचपडत होता.



"लाईट द्या" अविकने स्वतःच्या खिशातून सुट्टे पैसे काढत काउंटर वर ठेवले. प्रथमने लगेच अविकला मिठी मारली "तू तो मेरा भाई है यार". त्यांची हि नाटक रोजचीच होती. टपरीवाले  काका पण हसायला लागले. अविक आताही शांतच होता. प्रथमने एक जोराचा धपाटा त्याच्या पाठीत घातला. "अव्या, किती विचार करणार ?? सोड ना भावा झालं गेलं ते. हम है तो क्या गम है??"



" तुझ्या ह्या पकाव पीजेचा त्रास आहे रे माझ्या आयुष्यात." अविकने त्याच्यासमोर हात जोडले.



प्रथमने दोन्ही हात आकाशाच्या  दिशेने वर केले आणि चेहऱ्यावर व्याकुळ भाव घेऊन बोलला. "परमेश्वर, ये बालक नादान है... इसको माफ करना."



"तुझ्या तर आता..." अविक त्याच्या पोटात गुद्दाच घालणार होता इतक्यात... प्रथम शायरच्या अविर्भावात बोलला "ये हुस्न कि मलिका जन्नत छोड इस धरती पर कैसे पधारी???"



"तुझ्या आयला, आता कोण दिसली तुला ?"  अविक मागे वळला.



खरंच चालती बोलती बार्बी डॉल ￰फ्लोरल पिंक ड्रेसमध्ये उभी होती. आजूबाजूची सगळी गर्दी तिलाच न्याहाळत होती. तिच्या सुंदरतेला बघण्यापेक्षा एकटी मुलगी टपरीवर उभी राहून सिगारेट पितेय ह्याचीच उत्सुकता होती बहुतेकांच्या डोळ्यात. प्रथम पण हातात जळणारी सिगारेट तशीच पकडून तिच्याकडेच बघत होता. उघडलेलं तोंड बंद करायला पण विसरला तो. इतकी बेफिकीर मुलगी खरंतर अविकने पण कधी पहिली नव्हती. चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे भाव नव्हते तिच्या....सुंदर मुलींच्या चेहऱ्यावर असतो तो सुंदरतेचा माज पण नव्हता तिच्या चेहऱ्यावर. आजूबाजूला बघणाऱ्या कोणाकडेही लक्ष नव्हतं तीच. ती शून्यात नजर लावून चूपचाप सिगारेट पीत उभी होती. अविकने आपली नजर दुसरीकडे वळवली. कोणत्याही मुलीकडे बघत राहण हे त्याला जमलंच नाही कधी फक्त 'त्याच्या तिच्याशिवाय'....



" प्रत्या...साल्या...नजर लागेल तिला तुझी. कसा भिकाऱ्यासारखा बघतोय रे." अविक चुकून जरा मोठ्यानेच बोलला. पण त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोचलाच वाटत. तिची नजर त्यांच्याच दिशेने वळली. प्रथमच्या चेहऱ्यावरची स्माइल अजूनच रुंदावली. अविक मात्र नजर चोरून उभा होता. त्याने कोपरानेच प्रथमला ढोसलं. पण प्रथमला संवेदना कुठे होतायत. अविकने हळूच प्रथमकडे पाहिलं. पण साहेब त्या हूर परीच्या नजरेने केव्हाच घायाळ झाले होते. तरीपण त्याने प्रथमच शर्ट खेचलं आणि त्याच्या कानाशी खुसपुसला "चल ना यार".... प्रथम महाराज तर काही हलायला तयार नव्हते.आता त्याची तर काही हिम्मत नव्हती तिच्याकडे मान वर करून बघायची. पण काहीतरी ऐकवल्याशिवाय हि बया काही सोडणार नाही.... त्याने भीतभीतच मान वर केली. डोळ्यात हजार सश्यांची व्याकुळता दाटली होती. ओठ ओठावर घट्ट मिटून घेतले. चेहऱ्यावर तणाव अगदी स्पष्ट दाटून आला होता. त्याने एक क्षण पाहिलं तिच्याकडे. तिच्या निर्विकार डोळ्यांनीच त्याच लक्ष वेधून घेतलं. तिच्या डोळ्यात कसलेच भाव नव्हते. एक क्षणासाठी त्याला वाटून गेलं कि ती त्यांच्याकडे पाहतच नाहीये. पण ती असं कुठे बघतच नव्हती. चेहऱ्याप्रमाणेच भयानक निर्विकार डोळे. ती निघून पण गेली काहीच प्रतिक्रिया न देता. " इतके निर्विकार गहिरे डोळे.... माय गॉड..." एव्हाना प्रथम भानावर आला होता. त्याने अविकला खेचून घेत गायलाच सुरुवात केली."किताबे बहुत सी पढी होंगी तुमने......"



"च्यायला, साल्या रोबोट होती वाटत ती..." अविक अजूनही तिच्या डोळ्याच्या मायेत गुंगून  गेला होता.



"नाही... बार्बी डॉल होती... तिचे ते सोनेरी उडणारे केस... मासोळीसारखे पाणीदार डोळे... गुलाबी गुलाबी ओठ... गोबरे गाल... पिटुकल नाक... कमनीय बांधा... आहा..."  प्रथम डाव्या छातीवर हात ठेवून अविकवर कोसळला.



"अय..भावा...ह्या आठवड्यातील हे तुझं तिसरं  love at first sight." अविकने कोपरापासून  हात जोडले त्याच्यासमोर.



"असं रोज प्रेमात पडण्यात काय मज्जा आहे वो तुम क्या जानोगे अविकबाबू ?" प्रथमने पटकन जीभ चावली.



" हम्म....कळून पण नाही घ्यायचं...." अविक रागाने तिथून निघून गेला.


"ohh shitt...प्रथम तू मूर्ख आहेस...."  प्रथमने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. नकळत नको तेच बोलून गेला होता तो. "आता काही आठवडाभर अविकचा मूड ठीक होणार नाही... मीच मूर्ख आहे.... त्याला सगळं विसरायला लावायच्या ऐवजी मीच...मीच आठवण करून देतो...श्या...मित्र म्हणून नेहमीच का कमी पडतो मी..शी..." स्वतःशीच वैतागत प्रथम त्याच्या क्युबिकलमध्ये पोचला. त्याने अविककडे बघितलं. अविक अक्षरशः घुसला होता पीसीमध्ये. आता त्याच्याशी काही बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. प्रथमने एक लांबलचक sorry चा मेसेज टाईप करून पाठवून दिला. पण मेसेज डिलिव्हर नाही झाला. तो समजून चुकला कि अविकने फोन बंद केलाय. उरलेल्या  ऑफीस टाइममध्ये अविकने एकदाही पीसीच्या बाहेर बघितलं नाही. पण प्रथमच सगळं लक्ष फक्त अविककडेच होत. कसाबसा काम संपवून निघण्यासाठी म्हणून अविकला आवाज द्यायला गेला तर अविक आधीच निघून गेलेला.



अविक आणि प्रथम आधी एका कंपनीमध्ये इंटर्नशिप करत होते. तेव्हाचा अविक खूप मस्तीखोर आणि सर्वांचा लाडका होता. तिथेच त्यांची भेट झालेली श्रेयाशी. श्रेया तिथे आधीपासूनच एम्प्लॉयी होती. स्वभावाने खूपच गोड होती. आधी फक्त हाय, हॅलो असायचं पण नंतर नंतर जशी मैत्री झाली तसे ते तिघे जेवायला पण एकत्र जायला लागले. आणि काहीच महिन्यात खूप चांगले मित्र बनले. मग काय..धमाल नुसती... ट्रेक्स काय.. लॉन्ग ड्राईव्ह काय... बाईक राईड काय.... पार्टी काय... ऑफिसनंतरचा बराच वेळ आणि वीकेंड्स पण सोबतच असायचे तिघे. श्रेया आणि अविक नकळ्त कधी जवळ आले कळलंच नाही. प्रथमच्या नजरेतून त्यांचं एकमेकांची काळजी करन, डब्बा ठेवून देणं, चोरून बघणं हे सगळं सुटलं नव्हतं. पण अविक जेवढा मस्तीखोर होता तेवढाच फट्टू होता. सातवीतल्या त्याच्या क्रशने त्याला प्रपोज  केलं तर हा पट्ठ्या घाबरून आठ दिवस शाळेत आला नव्हता. त्या पोरीला बिचारीला उगाचच शिक्षा केली होती टिचरने. श्रेयाच्या बाबतीत तो कधीच पुढाकार घेणार नाही हे प्रथमला पक्क माहित होत. पण प्रेमात इजहार तो करना पडता है ना यार... त्याच्याशिवाय कळणार कस? आणि श्रेयाच्या केसमध्ये तर इजहार केलाच पाहिजे होता नाहीतर तिच्यामागे खूप मोठी लाईन होती. कोणता कावळा कधी टपकेल काही भरोसा नव्हता. तस श्रेया अविकला भाव देत होती म्हणून काही भीती नव्हती. पण कन्फर्मेशन महत्वाचं.



त्यादिवशी अविक खूप खुश होऊन गुणगुणत होता 'इशारो इशारो में दिल लेनेवाले....' आजकाल तो असाच खुशीत असायचा म्हणा.

 


"प्रेमात पडलायस तू भावा..."  प्रथमच्या आवाजाने दचकून अविकने मागे पाहिलं. खरतर तो ब्लश करत होता पण "भावा तूपण  ना..." म्हणत त्याला प्रथमची बोळवण करायची होती.

 


"सांगून टाक ना अव्या तिला.."  प्रथमलाच आता धीर धरवत नव्हता.



अविक नाहीतरी नौटंकीच होता. चेहऱ्यावर भोळसट भाव आणत विचारलं "कोणाला ....काय..... काय बोलतोय तू?"



प्रथमने रागानेच टपली मारली त्याला. "हे तुमचं  म्हणजे तुझं आणि श्रेयाच जे काही आखों ही आंखो मे चाललंय ते न समजण्याइतपत मी येडा तर नक्कीच नाही. आता भावा आग अगर  दोनो तरफ से बराबर लगी है तर मी काय म्हणतो विचारून टाक ना तिला."



आता अविकला थोडं लाजायलाच येत होत. "प्रत्या...प्लिज यार...."



"ओहो....पिंक चिक्स.... पिंक चिक्स...."  प्रथम अविकचे गाल खेचत चिडवायला लागला.



"प्रत्या.... तुझ्या आयला.... सोड ना भिकाऱ्या..."



"आधी बोल आज विचारशील तिला" प्रथमने त्याने दोन्ही गाल पकडून जोराने पिळले.



"हो......."अविकने कसबस स्वतःला सोडवून घेतलं.

 


"शहाणं माझं बाळ ते"  प्रथमने त्याच्याभोवती  हात फिरवून नजर काढायची ऍक्टिंग केली. पोरींसारख्या नौटंकी गप्पा पोरांच्या पण चालायच्या. त्यात अविक दिसायला खूपच गोड होता. येताना जाताना ऑफिसमधले सगळे उगाचच त्याचे गाल खेचायचे. ज्याचा अविकला खूप जास्त राग यायचा. अविक म्हणजे खूप मस्तीखोर असला तरी कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा पोरगा. ऑफिसमधल्या अर्ध्या अधिक पोरींचा क्रश त्यामुळे सगळे त्याला छळत असायचे. पण प्रेमाच्या भानगडीपासून मैलोन मैल दूर राहणार तो श्रेयाच्या प्रेमात धडपडलाच शेवटी.



आता प्रथमला हो बोललोय तर काहीतरी तर बोलावच लागेल श्रेयाशी. प्रथमला विचारायचं म्हणजे काहीतरी कांड होईल. त्यापेक्षा काय करायचे ते स्वतःच. असा विचार करून त्याने श्रेयासोबत बोलायचं तर ठरवलं. प्रथम प्रत्येक पाच मिनिटानंतर त्याला रिमाइंडर्स देत होता. आज सकाळी आल्यापासून श्रेया त्याला भेटलीच नव्हती तेव्हा त्याच्या मनाची थोडी चलबिचल चालू होती. श्रेयाला मेसेज केला तर त्याचा रिप्लाय पण नाही मिळाला. 'कुठे असेल हि पोरगी?' अविकने नाईलाजाने कामाला सुरुवात केली.



थोड्या उशिरानेच श्रेया ऑफिसला आली. आज ती एकदम खुशीत दिसत होती. अविकला वाटत होत कि आत्ताच जावं आणि मोठ्याने ओरडाव कि श्रेया आय लव यु.....



"हाय हँडसम " श्रेया त्याच्याच दिशेने येत होती. रोजच्यापेक्षा आज तिच्या गालावरची खळी जास्तच उठून दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरच हास्य होऊन त्या खळीच्या डोहात बुडून जावेसे वाटत होते त्याला.



"हाय"  आपल्या भावना कशातरी सावरत त्याने तिला हाय-फाय केलं.



"आय हाय कितनी ख़ुशी झलक रही है....किसी हसीना का दुपट्टा अटक गया क्या घडी में "  श्रेयाने त्याला चिमटा काढला.



"सगळे मिळून माझीच घ्या...."अविक वैतागला.



"चील ब्रो....चील..."  प्रथम डायलॉग फेकायच्या तयारीतच होता. त्याने श्रेयाकडे मोर्चा वळवला. "आज आपण लेट..? कहीं आपका दुपट्टा तो नही अटका था ना...."



" उम्म....असच काहीस समज..."  प्रथमला डोळा मारून श्रेया हसतच आपल्या डेस्ककडे वळली.



अविकच्या काळजात बारीकशी कळ उठली तिच्या उत्तराने. खरंच असं काही झालं असेल तर.. नकळत त्याने डोक्याला हात लावला.

 


"दिल के अरमान आसूओमध्ये वाहून जायच्या आत आजच विचार..."  प्रथम पुन्हा कानाशी खुसपुसला.



"हो...." मनाच्या तयारीने अविक उत्तरला.



लंचब्रेकनंतर अविकने श्रेयाला थांबवले "श्रेया, ऐक नं...मला काहीतरी बोलायचं."

 


"तुम्ही बोला मी निघतो" प्रथम कल्टी मारुन तिथून गेला पण त्यांच्यापासून दूर उभा राहून त्यांच्याकडे बघत होता. अविक ऐनवेळी पळून गेला तर..



अविक त्याच्या क्युबिकलमध्ये आला ते उडतच... त्याच्या चेहऱ्यावर श्रेयाचा होकार स्पष्ट दिसत होता..



"अव्या... लेका... अभिनंदन..." प्रथमने सगळा जोर लावून त्याची पाठ थोपटली. अविकचा चेहरा मात्र पहिल्या प्रेमाच्या पहिल्या होकाराने उजळून निघाला होता. 



अविकचे दिवस एकदम प्रेमात चालले होते. अर्थात आता प्रथमला सिगारेट प्यायला सोबत शोधावी लागायची. दोस्ती में इतना तो चलता है ना यार....



सकाळपासून अविक उदास उदास वाटत होता. सतत टिवटिव करणारा चायना फोन सायलेंट वर ठेवला तर कसा वाटेल तसा... शंभर वेळा तरी फोन चेक करून झाला त्याचा. काहीतरी बिनसलंय हे प्रथमला कळत होत पण अविक स्वतःहून काही सांगण्याची वाट बघत होता. पुढचे काही दिवस तसेच उदासवाणे गेले. एवढ्या दिवसात श्रेया कधीच अविकशी बोलली नाही कि प्रथमशी. दोघांनाही ती सरळ सरळ इग्नोर करत होती.



त्यांच्या इंटर्नशिपचा तो शेवटचा आठवडा होता. प्रथमने अविकशी त्या विषयावर बोलायचा प्रयत्न केला. पण 'जाऊदे संपलाय तो विषय'  म्हणत अविकने कधी काहीच चर्चा केली नाही. प्रथमसाठी त्यांची रीलेशनशिप म्हणजे मिस्ट्री बनून राहिली. त्यानंतर त्याचा तो मस्तीखोर अविक हरवला तो हरवलाच.



अविकच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर प्रथम आणि त्याची फॅमिली हेच त्याचे सगळे होते. म्हणूनच कि काय प्रथम त्याची मित्रापेक्षा जास्त काळजी करायचा. श्रेयाशी ब्रेकअपनंतर तो सगळ्यांपासून अलिप्त राहायचा. स्वतःच विचार करत आतल्या आत कुढत राहायचा. आता चार वर्ष झाली सगळं उलटून पण अविक ना त्या उदासीनतेतून बाहेर आला ना त्याने प्रथमला श्रेयाच्या वागण्याचं कारण सांगितलं.



बेडवर पडल्यावर आज प्रथमला काही झोप लागत नव्हती. डोक्यात अविकचाच विचार होता. तिकडे अविक अंधारात बसून कदाचित भूतकाळात रमला होता. बाहेरून चंद्राची किरणे आत शिरत तेवढाच काय तो प्रकाश होता. बऱ्याच वेळाने कधीतरी त्याचा डोळा लागला.


क्रमशः