Hold Up - 10 PDF free in Detective stories in Marathi

होल्ड अप - प्रकरण 10
प्रकरण १०
दुसऱ्या दिवशी सव्वा अकरा वाजता पाणिनी ऑफिसातल्या त्याच्या केबिन मधे असतांना त्याचा फोन वाजला.सौम्या फोन वर होती. “ सॉरी सर तुम्ही तुमच्या सवयी प्रमाणे कोर्टाचे अद्ययावत निकाल वाचत असाल पण त्रास देत्ये कारण बाहेर अशी व्यक्ती आल्ये की तुम्ही तिच्याशी बोलायला हवं अस मला वाटतं.”
कनक , सौम्या, आणि पाणिनी खास मित्र होते. वर्ग मित्र.एकमेकांना काहीही बोलू शकत होते,एकमेकांसाठी कधीही काहीहीकरू शकत होते. कनक गुप्त हेर झाला,पाणिनी च्याच मजल्यावर त्याने ऑफिस थाटले. इन्स्पे.तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र.पण तो पोलीस झाला. अनेकदा तो आणि पाणिनी एकमेकांच्या विरुध्द उभे ठाकले पण मैत्री आणि व्यवसाय ,यात त्यांनी कधी गल्लत केली नाही.मैत्रीत कधीच गैरसमजाला थारा दिला नाही.
“ कोण आहे तो? ” पाणिनी ने विचारलं.
“ तो नाही ती आहे.” सौम्या म्हणाली. “ मृद्गंधा इनामदार. ”
“ इनामदार...इनामदार.. नाव ऐकल्यासारखं वाटतंय... अरे,हो ! आपल्या होल्ड अप केस मधला आरोपी.त्याच ही आडनाव इनामदार च आहे की.” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर.”
“ मृद्गंधा कोण आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ त्यांची पुतणी आहे. त्याला अटक झाल्याचं वाचलं तिने वर्तमान पत्रात आणि लगेच आली इथे. ”
“ पेपरात वाचून? म्हणजे ती बाहेर गावी राहते का?” पाणिनी म्हणाला.
“ हो देवगिरी ला राहते. मला वाटत तुम्ही तिला वेळ द्यावा.कनक ला तुमच्याशी बोलायचं होतं पण तुम्ही वाचनात असतांना तो तुम्हाला त्रास देऊ इच्छित नव्हता.”
बरोबर अर्ध्या तासाने मृद्गंधा ला घेऊन सौम्या आत आली. मृद्गंधा ने पाणिनी ला शेकहँड केला.सौम्या ने पाणिनी आणि तिची ओळख करून दिली.
“ मी रात्रीच बस ने निघून इथे डायरेक्ट आले. थोडेसेच पैसे घेऊन आले आहे येताना, तुमच्यासाठी.”
“ काय करतेस तू? नोकरी? ”
“ मी टायपिस्ट आहे पटवर्धन साहेब.”
“ तुझ्या बद्दल आणि काका बद्दल सांग.” पाणिनी म्हणाला.
“ मी खाजगी नोकरी करते दिवसभर टायपिंग, करणे संध्याकाळी घरी जाणे जेवणे, झोपणे.पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जाणे. त्यत खास सांगण्याजोगे नाही. एका मुली बरोबर भाड्याच्या खोलीत राहते. माझे आई बाबा गेले, तेव्हा माझ्या याच काकांनी मला मोठं केलं. स्वतः ची आर्थिक स्थिती ठीक नसताना सुध्दा. मला त्यांची उतराई व्हायची संधी आहे ही. माझ्याकडे अत्ता पैसे नसले तरी मी तुम्हाला हळू हळू करीन पेमेंट.”
“ तुला माहिती आहे का, की ज्याला वकील द्यायची ऐपत नसते त्याला कोर्ट स्व खर्चाने वकील देते?” पाणिनी ने विचारलं.
“ मला माहिती नव्हतं पण मी अत्ता काकाची भेट घेऊन आले मी कस्टडीत जाऊन, तेव्हा काका मला म्हणाला की शहरातला सर्वोत्तम वकील पाणिनी पटवर्धन त्याला मिळालाय. म्हणून मी तुम्हाला भेटायला आले.” मृद्गंधा म्हणाली.
“ आता परत जाणार असशील ना ? ” पाणिनी ने विचारलं.
“ नाही साहेब. मी खटला चाले पर्यंत थांबणारे.” ती पर्स मध्ये हात घालत म्हणाली.
“ पैशाचा विषय काढू नकोस. तुझं माझ्याकडे नेमकं काय महत्वाचं काम होतं? असणारच, त्याशिवाय सौम्या न आज तुझी – माझी भेट जुळवून आणली नसती.” पाणिनी म्हणाला.
“ मी काकाला भेटायला गेले तेव्हा तिथे एक पोलीस मला बाजूला घेऊन म्हणाला की मी जरा शहाणपणा दाखवला तर काका ची काळजी करायची गरज नाही.”
“ म्हणजे कसं?” पाणिनी ने विचारलं.
“ तो म्हणाला की काकाने गुन्हा कबूल केलं तर डाक्या ऐवजी सौम्य गुन्हा दाखल करता येऊ शकेल.”
“ कोण होता तो?, नाव काय माहित्ये?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही. पण तरतरीत होता.तयारीचा वाटत होता.तो म्हणत होता की पटवर्धन वकील म्हणून चांगले आहेत पण ते फार प्रश्न विचारतात.आणि ते असेच वागत राहिले तर ज्यांच्यावर डाका पडला ते मोठे प्रसिद्ध आणि वचक असलेले लोक असल्यामुळे, आरोपी अडचणीत येईल.”
“ मग तू काय उत्तर दिलंस?” पाणिनी ने विचारलं.
“ मी म्हणाले की मला यातलं काहीच माहीत नाही. पण तुम्ही मला हे सांगायच्या ऐवजी काकालाच सांगितलं असतं तर त्याने तसं केलं असतं आणि हा खटला टळला असता.” मृद्गंधा म्हणाली.
“ छान ! आणि या तुझ्या उत्तरावर तो तरतरीत पोलीस काय म्हणाला?”
“ वर्तमान पत्रवाल्यांच्या दबावामुळे आम्हाला अटक करून खटला दाखल करावा लागला. पण त्याला वैयक्तिक वाटतंय की त्याच्या विरुद्धचा पुरावा फार चांगला आहे असे नाहीये.त्याला चुकीनेच पकडलं गेलंय.”
“ त्यांची ओळख पटवण्यात आल्या बद्दल तो काही बोललं का ?” पाणिनी ने विचारलं.
“ खटल्या बद्दल तो फार बोलला नाही. तो काका बद्दल सहानुभूतीने बोलत होता.त्याने सुचवल की मी काकाला जाऊन तो म्हणाला ते सर्व सांगावं.” मृद्गंधा म्हणाली.
“ मग? सांगितलंस?” पाणिनी ने विचारलं.
“ मी असलं काहीही केलं नाही.सरळ इथे आले तुमच्याकडे.”
“ का बरं?” पाणिनी ने विचारलं.
“ पटवर्धन साहेब जेव्हा माझ्या सारख्या मुली एकट्या राहतात ना, आई वडिलांशिवाय, तेव्हा त्यांना जग लवकर समजत. जेव्हा एखादा माणूस अती गोडबोलतो आणि उगाचच मदत केल्याचा आव आणतो तेव्हा त्या मागे असलेला स्वार्थ आम्हाला कळतो. तुम्ही काय करणार आहात पटवर्धन पुढे? ”
“ काहीतरी भानगड आहे, हे लोक घाबरलेत. त्यांना तुझ्या काकाला सोडवायची इच्छा नाहीये.त्यांना काका कडून गुन्हा कबूल करून घ्यायचा आहे. कुठला तरी.” पाणिनी म्हणाला.
“ कारण काय?” –मृद्गंधा
“म्हणजे खोटी अटक केल्याचा आरोप त्या लोकांवर येणार नाही.” पाणिनी म्हणाला.
“ पुढच्या हालचाली काय असतील तुमच्या?”
“ आपण सर्वात आधी सिया माथूर ला समन्स काढू, सोमवारी साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यासाठी. ती नाहीच आली तर कोर्टाला वॉरंट काढायला सांगू. किमान आपण मरुशिका मतकरी, कामोद या लोकांना याची जाणीव तरी करून देऊ की आपण सिया ला कोर्टात हजर करणार आहोत.कामोद ला आपण याची जाणीव करून देऊ की त्याला पुन्हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आम्ही बोलावून गाडीतल्या लायटर ची चौकशी उलट तपासणीत करणार आहोत.” पाणिनी म्हणाला.
“ अहो पण तो पर्यंत त्यांना रविवारची सुट्टी विचार करायला आणि काय साक्ष द्यायची हे ठरवायला मिळेल.” मृद्गंधा म्हणाली.
“ हो, त्याला इलाज नाही.” पाणिनी म्हणाला.
“ आणि ते लोक हुशार आहेत ना ?”
“ खूपच हुशार आहेत.” पाणिनी म्हणाला.
“ मला करण्यासारखं काही आहे?”
पाणिनी ने मान हलवून होकर दिला.
“ बोला,काय करू?”
“ माझा गुप्तहेर मित्र, कनक ओजस म्हणून आहे.त्याला मी सिया माथूर ला शोधून काढायला सांगितलं आहे. एव्हाना त्याने ते काम केलाच असेल. तू तिला भेटायचं आणि तिला कोर्टात वस्तुस्थिती सांगण्यासाठी तयार करायचं.” पाणिनी म्हणाला.
“ सरकार पक्षाच्या साक्षीदाराला मी पढवलं असं नाही ना होणार?”
“ नाही.कारण तिला आपण समन्स काढतोय तो आपल्या , म्हणजे बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून.”
“ तुम्ही तिला पिंजऱ्यात उभी करणार?” मृद्गंधा ने विचारलं.
“ ती नेमकं काय बोलणार आहे हे मला जो पर्यंत कळत नाही तो पर्यंत मी तो धोका स्वीकारणार नाही. आपल्याला हवंय ते ती सांगेल असं वाटलं तरच तिची साक्ष काढीन.” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे मला तिचा पत्ता सांगा. ” –मृद्गंधा
“ मला तो कनक कडून मिळाला की सांगीन.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १० समाप्त)

Rate & Review

Be the first to write a Review!

Share

NEW REALESED