Devayani Development and Key - Part 9 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ९

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 भाग 9

भाग  8 वरून  पुढे  वाचा ................

 

“इथे विकासचे बाबा विचारत होते की आपले बाबा बोलण्याच्या मनस्थितीत आहेत का ? म्हणाले की जे काही गैरसमज असतील ते दूर करू म्हणून.”- देवयानी 

“अग ते तर मी ही करू शकतो. पण कोणी बोलायला तर पाहिजे.” – सुरेश 

“मग आता? मी नागपूरला आहे हे त्या लोकांना माहीत आहे का?” – देवयानी

“नाही तू नागपूरला गेली आहेस हे कोणालाच माहीत नाही. मी असं करू का, बाबांनाच विचारतो की ते बोलायला तयार आहेत का म्हणून. आणि तुला सांगतो.

बरं. बाय.” – सुरेश

“काय ग काय सिचुएशन आहे?” सर्वच देवयानीकडे बघत होते. बाबांनी विचारलं.

“गंभीर आहे. मी तुम्हाला मघाशी बोलले ना अगदी तसंच झालं आहे. मावशी आली आणि तिने सगळा खेळ विस्कटून टाकला. आई रडते आहे आणि बाबा गंभीर चेहरा करून बसले आहेत.” देवयानी म्हणाली.

“सगळंच अवघड होऊन बसलं आहे. जरा थांबावच लागेल असं दिसतंय.” - बाबा 

“पण बाबा मी काय करू आता ?” देवयानी म्हणाली.

अश्विनीच म्हणाली

“तू आत्ता इथे आहेस ना मग एंजॉय कर. चिंता बाबांना करू दे. सब ठीक हो जायेगा.”

देवयानी बाबांकडे बघत होती. म्हणाली

“मी ताबडतोब आजच रात्रीच्या फ्लाइट ने वापस जाते. हे सगळं मला असह्य होतं आहे.” देवयानी खूप उदास झाली होती.

ती असं म्हणतच होती की दारांसामोर गाडी थांबली आणि विकासचे काका, काकु  आणि विकास चा चुलत भाऊ विनोद आणि बहीण प्रिया  उतरली. आणि मग गप्पांना जो काही उत आला ते विचारायची सोय नव्हती.  नुसता गदारोळ. पुन्हा चहा नाश्ता झाला. आणि हे सगळं त्यांना  देवयानीच्याच हातचं  हवं होतं. अर्धा पाऊण तास असा गोंधळ झाल्यावर सगळे जरा शांत झाले. सगळ्यांना देवयानी एकदमच आवडली होती आणि ते सर्वांनी बोलून पण दाखवलं. देवयानी पण सगळ्यांचा मोकळेपणा पाहून त्यांच्यात केंव्हा मिसळून गेली, ते तिला पण कळलं नाही. ती खूप आनंदात होती. तिच्या चेहऱ्यावरची उदासीची छटा केंव्हाच गळून गेली होती आणि चेहऱ्यावर पुन्हा ती टवटवी आली होती. गोंधळ जरा शांत झाल्यावर बाबा म्हणाले की -

“देवयानी तू आतापर्यंत जे काही सांगितलं त्या वरून असं दिसतंय की फक्त मावशीचाच या लग्नाला सक्त विरोध आहे. कारण काका नागपूरला यायला नुसते तयारच नव्हते तर आपली गाडी घेऊन आले होते. म्हणजे काकांना आधी काही प्रॉब्लेम नव्हता पण नंतर बहुधा मावशीला विरोध करायचा नाही म्हणून त्यांनी पण मत बदललं. तुझं काय म्हणणं आहे यावर देवयानी?”

“आमची मावशी म्हणजे चमत्कारिक आहे. दोन  आठवड्या पूर्वी जेंव्हा विकास इथे आला होता माझ्या बद्दल सांगायला, तेंव्हाच मी पण बेळगाव ला गेले होते. बाबांनी आईला म्हंटलं होतं की मावशीला बोलावू नको. पण आई मावशीला फार घाबरते. ती म्हणाली की जेंव्हा मावशीला नंतर कळेल तेंव्हा ती मला फाडून खाईल. म्हणून तिला पण बोलावलं होतं. मावशी जरा लवकरच आली होती. आणि मला खोदून खोदून विकास बद्दल  विचारत होती. तिला त्याचा फोटो पण आवडला होता. पण मग तितक्यात काका काकू आणि आत्या गाडीतून उतरतांना तिने पाहीलं, आणि मग सगळा नूरच बदलून गेला.” देवयानी  म्हणाली. 

“का? असं का?” बाबांनी विचारलं.

“मावशीला काका आवडत नाहीत. ती असं म्हणते की काका आमच्या बाबांवर अधिकार गाजवतात, कंट्रोल करतात. म्हणून जेंव्हा काका अनुकूल बोलायला लागले तेंव्हा मावशीने विरुद्ध बाजू पकडली” - देवयानी

“मला असं वाटतं  देवयानी,” बाबांच  बोलले, “की हा माझ्या मते इगो प्रॉब्लेम असावा. कदाचित तुमच्या कडून मावशीला त्यांच्या अपेक्षे पेक्षा कमी मान मिळत असावा. किंवा काकांना जास्त वेटेज दिल्या जात असलं पाहिजे. आणि ते मावशीला आवडत नसावं.”

देवयानी जरा विचारात पडली. मग म्हणाली की. “काही काही वेळेस असं झालं आहे की मावशीला डावलून काकांच्या विचाराने निर्णय घेतल्या गेलेत. पण बाबा हे स्वाभाविकच आहे न. कधी मावशी, कधी काका असं तर होतच. खरं म्हणजे मला आणि सुरेशला या गोष्टीचा रागच येतो. आमचे कुटुंबातले निर्णय यांनी का म्हणून घ्यायचे? आमचे आम्ही का नाही? पण आई आणि बाबा दोघांनाही हे पटत नाही. आणि आम्ही आमच्या आई, बाबांना उलटून बोलत नाही. तशी सवयच नाही.”

“देवयानी, आपण असं करू, तुझ्याजवळ जर मावशीचा फोन नंबर असेल तर मी डायरेक्ट तुझ्या मावशीशीच बोलतो. बघूया गोष्टी सरळ होतात का ?” – बाबा

“अहो, एकदम मावशीला नका करू फोन, मला असं वाटतं की आधी गोविंद रावांशी बोलावं. डायरेक्ट बोललेलं कदाचित त्यांना  आवडणार नाही.” यमुना बाईंनी आपलं मत नोंदवलं.

“असं म्हणतेस, कदाचित तू म्हणतेस ते बरोबर असेल. मग काय आधी गोविंद रावांशी बोलू म्हणतेस?” बाबांनी सहमति दर्शवली.

“हो, मला तरी असच वाटतं. देवयानी, तुझं काय मत आहे?” – यामुनाबाई.

“तुमचं म्हणणं पटतेय मला आई, पण आता बाबा बोलण्याच्या मनस्थितीत असतील की नाही हे कळायला मार्ग नाहीये.” – देवयानी

“मग असं कर न, तूच फोन लाव आणि बोल. बघ काय ताल माल आहे ते. आणि ठीक वाटलं तर मग मला दे मी बोलीन.” – भगवान राव म्हणाले.

“हो न मला ही काही कळायला मार्ग नाहीये.” – देवयानी 

“असं कर वरती जा आणि पहिली खोली गेस्ट रूम आहे तिच्या बाल्कनीत जाऊन फोन कर म्हणजे तुला बोलतांना जरा मोकळेपणा मिळेल. इथे बोलायला संकोच वाटेल तुला. जा वरती जा.” अंकुश म्हणाला.

“खरंच वर जाऊ ?” देवयानीला जरा आश्चर्यच  वाटलं.

“हो खरंच सांगतो आहे. जा वर. निवांत बोल.” – अंकुश   

“लावते आत्ताच फोन” असं म्हणून ती वरच्या बाल्कनीत गेली आणि तिने  नंबर फिरवला.

हॅलो, बाबा मी देवयानी बोलतेय.

“बोल बाळा काय म्हणतेस?” - गोविंद राव

“बाबा काय झालं? सुरेश सांगत होता की तिथे बराच धुमाकूळ झाला म्हणून.”  देवयानीने विचारलं.

“हो खरंय, मावशीला हे लग्न मुळीच मान्य नाही. आणि आता काका पण तसेच म्हणत आहेत.” – गोविंद राव

“मग आता?” – देवयानी

“अग हे नेहमीचच आहे, इथला विचार करू नकोस. तुझा तिथला अनुभव काय आहे ते सांग. तू तिथे दिवसभर आहेस, नीट सविस्तर सांग. मी स्पीकर वर टाकतो आहे. म्हणजे आईला आणि सुरेशला पण ऐकता येईल.” – गोविंद राव 

“बाबा” देवयानी म्हणाली की  “विकासच्या घरची माणसं म्हणजे हीरे आहेत हीरे. यांच्याकडे इतकं मोकळं वातावरण आहे की त्यांनी मला सहज सामावून घेतलं. आत्ता इथे विकासचे काका, काकू, आणि चुलत भाऊ आणि बहीण आली आहे. घरातलेच विकासचा मोठा भाऊ, वहिनी, बहीण आणि तिचा नवरा आणि आई आणि बाबा, इतका सारा गोतावळा घरात जमला आहे आणि काय हसणं, खिदळणं जोर जोरात चालू आहे. नुसता हंगामा चालला आहे. मी सगळ्यांसाठी चहा आणि पोहे केलेत आणि ते सगळ्यांना इतके आवडले की माझं भरभरून कौतुक होतेय. आपल्याकडे जेंव्हा मावशी, काका, काकू  लोक येतात तेंव्हा किती गंभीर वातावरण असतं, इथे अगदी उलट आहे. परत चेष्टा मस्करी करतांना सुद्धा एकमेकांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही यांची पण खूप काळजी घेतात. मघाशी सुरेशने  तिथे काय घडतंय यांची कल्पना दिली तेंव्हा मला रडायलाच आलं तेंव्हा आईंनीच मायेने जवळ बसून मला धीर दिला. मला इतकं बरं वाटलं, काय सांगू तुम्हाला.”

देवयांनीची आईच बोलली –

“देवयानी खरंच का ग इतकी चांगली माणसं आहेत ती? तस असेल तर देवच पावला म्हणायचं. तू एकटीच तिकडे म्हणून आम्हाला इतकी काळजी वाटत होती. पण आता ती निमाली.” - देवयांनीची आई.

“मग आई, बाबा, काय करायचं आता? मी काय करू?” – देवयानी.

“तुला  काय वाटतं? तू त्यांच्या घरात सुखात राहशील याची खात्री वाटते आहे का तुला?” – बाबा.  

“हो बाबा नक्कीच. तुम्ही या ना इकडे म्हणजे तुम्हालाच कळेल.” – देवयानी.

“अग आधी तूच नीट विचार कर फक्त एकाच दिवसांत तू एवढं खात्रीने कसं सांगू शकतेस?” आता आई बोलली.

“आई, बाबा तुम्ही इकडे या म्हणजे मी काही सांगण्याचा प्रश्न येणारच नाही.” देवयानी पुढे म्हणाली “आत्ताच बघ ना मला तुमच्याशी बोलायला मोकळेपणा मिळावा म्हणून त्यांनीच मला सांगितलं की वरच्या मजल्यावरच्या खोलीच्या बाल्कनीत जाऊन बोल. म्हणून. ठरव आता तूच. आपल्याकडे कोणी इतका विचार करतं का?”

हे सगळं देवयानी कडून ऐकल्यावर सगळ्यांच्याच चेहऱ्यावरची चिंतेची छटा विरून गेली आणि सर्वांनाच सुटल्या सारखं झालं. सुरेशलाही आता धीर आला. म्हणाला,

“देवयानी तू विडियो कॉल कर जरा आम्हाला तुला पाहू दे.”

देवयानी ने मग विडियो कॉल केला. देवयानीची प्रसन्न मुद्रा पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एकदम आनंदाची छटा आली. सर्वच खुश झाले. देवयानीचा चेहराच सांगत होता की तिने आत्ता पर्यन्त जे सांगितलं त्यात शंभर टक्के तथ्य होतं.

सुरेश म्हणाला –

“बाबा आपण लगेच नागपूरला जायला हवं. आता माझ्या मते वेळ घालवण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं.”

“अहो, सुरेश बरोबर म्हणतोय, आजचा दिवस तर गेला पण उद्याच निघालं तर परवा पोहोचू आपण.” देवयानीच्या आईने अनुमोदन दिलं.

“चालेल. पण रिजर्वेशन मिळतंय का ते बघाव लागेल.” – बाबा 

“आई, आणखी एक गोष्ट, तुम्ही दोघंही माझं ऐका, तू मावशीला याची कल्पना देऊ नकोस, आणि बाबा, तुम्ही पण काकांना  काही सांगू नका. या दोघांना कळलं तर पुन्हा काही तरी खुसपटं  काढतील.” इति सुरेश

“आणि बाबा” सुरेश नी पुस्ती जोडली “उद्याच्या फ्लाइट ची तिकीट मिळतात का हे मी बघतो. आणि असतील तर बूक करून  टाकतो. इथून पुण्याला टॅक्सी करून जाऊ. प्रश्न मिटला. उद्याच्या उद्या नागपूर.”

देवयानीनी तिथूनच टाळ्या वाजवल्या. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

“मी सांगू का घरात सगळ्यांना?” – देवयानी

“एक अर्धा तास थांब. कोणची फ्लाइट मिळते आहे ते बघू दे. मग सांग. नाही तर असं कर, त्यांना सांग की बाबाच  फोन करतील म्हणून. म्हणजे कुठलंच कन्फ्युजन असणार नाही.” – सुरेश

“ठीक आहे.” – देवयानी

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.