chat books and stories free download online pdf in Marathi

गप्पा

गप्पा कोणालाही कोणत्याही वयात कोणत्याही विषयावर करायला आवडतात,सगळे परिचित एकत्र जमले की क्षणात गप्पा सुरु होतात.

लहानपणी खेळाच्या मैदानात मारलेल्या गप्पा, बगिच्यात खेळताना मारलेल्या गप्पा, शाळेत मधल्या सुट्टीत मारलेल्या गप्पा,मोठं झाल्यावर ऑफ पिरेड मध्ये मारलेल्या गप्पा, सहलीतल्या गप्पा,मैत्रिणी कोणाकडे एकत्र जमल्यावर केलेल्या गप्पा,लग्नाकार्यात सगळे नातेवाईक जमल्यावर मारलेल्या गप्पा, ह्या सगळ्या प्रकारच्या गप्पा मनाला उत्साहित करतात.

गप्पा म्हणजे मनावरचं फॉरम्याटिंग च आहे, जसं सिस्टिम किंवा मोबाईल झाला की आपण फॉर्म्याटिंग करतो आणि अनावश्यक डेटा पुसल्या जातो,सिस्टिम किंवा स्मार्टफोन परत पूर्वीसारखे वेगात काम करायला लागतात,तसेच जेव्हा आपलं मन जड होते तेव्हा मनसोक्त गप्पा मारून घेतल्या पाहिजे म्हणजे आपल्या मनाची सिस्टिम सुद्धा रिफ्रेश होऊन परत उत्साहात काम करायला लागते.

मनावरचं मळभ दूर करणारा स्पा च आहे गप्पा.

मैत्रिणी जमल्या की अभ्यासाच्या विषयापासून ज्या गप्पा सुरु होतात,

'तुला हा कन्सेप्ट समजला का', ' नाही मला नाही समजला', ' मला हा जड जातो', ' मला हा आवडतो'

की मग कोलेजमधले प्राध्यापक,प्राध्यापिका यांच्यावर गप्पांची गाडी घसरते,

'ह्या मॅडम किती खडूस आहे गं', 'हो नं ते सर काय शिकवतात मला काहीच कळत नाही,मला झोपच येते' , 'त्या दुसऱ्या मॅडम फार छान शिकवतात'

मग शाळेतले मुलं,मुलींबद्दल गप्पा,

'तो सिनिअर किती शिष्ठ आहे गं' , ' हो नं आणि ती आपल्या वर्गातली किती पुढे पुढे करते' , 'मला तर वाटते ते सर तिच्याच कडे बघून शिकवतात'

की मग सिनेमाच्या गप्पा,

'तू तो सिनेमा बघितला का?', 'हो फार विशेष नाही गाणे छान आहेत', 'हिरो हिरोईन ला काहीच करता नाही आली त्यात', 'मी हिरो हिरोईन ला बघतच नाही', 'बाई! मग काय बघते तू', 'अगं मी बॅकग्राऊंड सीन बघते निसर्गरम्य देखावे'

मग राजकारणाच्या गप्पा,

'ते सुशांतच फारच वाईट झालं नाही!', 'हो नं किती वाईट आहे हे सगळं', 'पण कोरोनाची vaccine कधी येते सांगा म्हणा आधी'

एखादी मैत्रीण नसेल आली तिच्याविषयी बोलणे हे सगळं येऊन जाते.

पुरुषांच्या गप्पा क्रिकेटच्या,राजकारणाच्या,

'विराट ने असा सिक्सर मारला जबरदस्त!', 'अनुष्का यायला नको मग तो छान खेळतो'

'ह्या मंत्र्याने हा ठराव पास करायला नको होता', 'नाहीतर काय, काय घसरलाय' , ' स्टॉक मार्केट काय डाउन आहे!'

विवाहित बायकांचे वेगळ्या गप्पा,

'ह्या वर्षी मी पापड केले नाही बाई! ', ' मी लोणचं विकतच आणलं', 'मी केलं बाई! अर्धा किलो आंब्याचं, आमच्या घरी लागतेच', 'व्वा किती छान साडी कुठून घेतली', ' त्या सेल मधून', 'मी पण घेणार अशीच'

शहरातल्या आधुनिक बायकांच्या वेगळयाच गप्पा,

'माझे आय ब्रोज किती वाढले, शी! लॉक डाउन मुळें पार्लर मध्ये जाता येत नाही म्हणून चुकल्याचुकल्या सारखेच वाटते', ' रिअली! सो ऑड! मी तर व्यक्सिन्ग केलं नाही न तर मला खूपच आळस येतो', 'हो ना यार! माझा तर कॉन्फिडन्स च गेलाय फेशिअल केलं नसल्याने' , ' चल आता पिझ्झा ऑर्डर करते ', 'मी पण बर्गर मागवलंय'

मुलांच्या वेगळ्याच गप्पा,

हिरो,हिरोईन,राजकारण,खाण्याचे पदार्थ,मुली,शेजारणी,सगळ्या बायका ह्या सगळ्यांवर गप्पांमध्ये त्यांचं बोलून होते.

लग्नसमारंभातल्या गप्पा तर फारच खुमासदार असतात,

मुलीकडचे नातेवाईक म्हणतात,

'नवरा मुलगा स्मार्ट वाटतो, पण आपल्या सुलीने असं का मेकअप केलं,एरवी तर चांगली दिसते', ' मेकअप च फारच फॅड बाई आजकालच्या मुलींना', 'जाउबाईंनी काय भडक साडी नेसली', ' लग्नाचं वय झालं आता हिच्या, वंसंनि स्थळं बघणं सुरू केलं पाहिजे'

मूलाकडचे नातेवाईक म्हणतात,

'ह्या माकडाला बरी बायको मिळाली रे!' , ' मला तर वाटलं याचं लग्न होते की नाही', ' चला बफे सुरू झाला, खाऊन घेऊ पहिल्या वाफेचं'

ह्या आणि अशा अनेक गप्पा रंगतात,सगळे नातेवाईक जमलेलें असतात,सगळे एकमेकांची विचारपूस करतात, मध्यरात्र उलटेपर्यंत गप्पा चालतात, कोणी सरळ बोलतात कोणी तिरके बोलतात पण गप्पांमध्ये रंगून सगळे रिफ्रेश होतात हे नक्की.