Choriche Rahashy - 4 books and stories free download online pdf in Marathi

चोरीचे रहस्य - भाग 4

तो दिवस त्याच चर्चेत पार पडला. दुसऱ्यादिवशी सकाळी पोलीस आणखी एका माणसाला घेऊन आले.
आणि त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या फ्लॅटवासीयांना कॉमन एरिया मध्ये बोलावले.
"हा बघा तुम्ही वर्णन केल्यानुसार हा व्यक्ती आम्हाला सापडला पण हा कुरिअर बॉय नसून इथून जवळच काही अंतरावर असलेल्या चौकात पाणीपुरी गाडी चालवतो. हाच आहे न तो?",पोलीस भाले काकूंना म्हणाले.

"काय माहीत ? मी त्या दिवशी ओझरता बघितला होता. साधारण असाच होता.",भाले काकू

"हाच असेल तो पाणीपुरी च्या आड लक्ष ठेवत असेल आणि मग कुरिअर बॉय म्हणून चोरी करत असेल! काय रे बरोबर बोलतो न मी",पोलीस त्या माणसाचा हात पिरघळत म्हणाले.

"मेलो मेलो साहेब हात तुटेल माझा! मी काहीच केलं नाही. ह्या अपार्टमेंटचे मला तर नावही माहीत नव्हते. मी कशाला करू चोरी?",पाणीपुरीवाला.

"इंस्पे साहेब पण काल तर तुम्ही त्या किल्लीवाल्याला नेलं होतं ना आरोपी म्हणून त्याने काबुल केलं नाही का?",पांडे काका चिंतेने म्हणाले.

"नाही न! तो *****काही कबुल करायलाच तयार नाही. आज घरून कामावर जाता जाता रस्त्यात माझं सहज पाणीपुरी गाडीकडे लक्ष गेलं आणि हा मला दिसला आणलं पकडून. आता ह्यालाही जेलची हवा खायला घालतो बघतो कबुल करतो का ते?",पोलीस

पोलीस त्यालाही जेलमध्ये घेऊन गेले. त्यांच्याकडूनही त्यांनी सर्वतोपरी कबूल करवून घेण्याचा प्रयत्न केला पण यथेच्छ झोडपून काढल्यावरही त्याने कबूल केले नाही.

त्यानंतर एक-दोन दिवसांनी पांडे काकांनी चौकशी केली असता,'तपास सुरु आहे' असा पोलिसांकडून निरोप मिळाला. पुन्हा पुन्हा पोलिसांकडून 'तपास सुरू आहे' असंच जेव्हा ऐकावं लागलं.
तेव्हा चोरी काही सापडणार नाही ही खात्री पटल्यामुळे पांडे काका-काकू नाराज झाले.

आमच्या घरी पांडे काकांकडे झालेल्या चोरीबद्दलच डिस्कशन सुरु होतं.

"कोणी केली असेल गं चोरी ? मला वाटते खंडू भाऊच काम असेल..",काका

"सखूबाई पण असू शकते. घेतली असेल किल्ली आणि साबणावर शिक्का मारून बनवली असेल डुप्लिकेट किल्ली. सिनेमात नाही दाखवत का अगदी तसं ",काकू

"काका आपण पांडे काकांकडे जाऊन यायचं का? अगदी सहज !",मी

"का रे ?",काका

"मला वाटते एकदा त्यांच्या घराची कुलूप किल्ली बघावी म्हणजे मला काहीतरी क्लू लागू शकतो ",मी

"ओ हो ! गुप्तहेर राघव कल्याणी! आम्ही तर विसरलोच होतो की गुप्तहेर आपल्याच घरी आहेत. बघ जमलं तुला काही तर बरंच होईल! ",काका

मी व माझे काका आम्ही पांडे काकांकडे त्यांची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेलो. त्या दोघांचा मूड बदलावा म्हणून माझे काका इकडल्या तिकडल्या गप्पा मारू लागले.

बोलता बोलता मी पांडे काकूंना म्हणालो,

"काकू मला तुमच्या घराच्या मेनगेट चं कुलूप-किल्ली दाखवता का"

काकूंना थोडं आश्चर्य वाटलं.

"का रे बेटा?",पांडे काकू

"अहो आपल्याला माहीत नसेल पण राघव हेरगिरी फार उत्तम पद्धतीने करतो त्याने बऱ्याच केसेस सॉल्व्ह केल्या आहेत",काका माझ्याबद्दल फार कौतुकाने सांगत होते.

"खरंच! असं असेल तर ही पण केस तू नक्कीच सोडवू शकशील!",पांडे काकूंच्या आशा पल्लवित झाल्या.

"दे त्याला कुलूप किल्ली चोरी सापडली तर देवच पावेल",पांडे काका.

पांडे काकूंनी मला कुलूप-किल्ली दिली. मी ती बघितली व त्यांना म्हंटल,

" काकू तुम्ही हे कुलूप किल्ली वापरणार नसालच तेव्हा मी हे माझ्याजवळच ठेवतो. "
त्यांनी मला कुलूप-किल्ली ठेवण्याला होकार दिला. थोड्या वेळाने मी व काका आमच्या घरी आलो.घरी आल्यावर मी ते कुलूप आणि किल्ली बारकाईने पुन्हा एकदा बघितली.

बसल्या-बसल्या मी विचार करू लागलो की कुलूप न फोडता एक तासात कोणी चोरी केली असू शकते? कोणाजवळ पांडे काकांच्या घराची डुप्लिकेट किल्ली असू शकते ? विचार करता-करता एक जब्राट कल्पना मला सुचली.

करून बघायला काय हरकत आहे असा विचार करून मी माझ्या काका,काकू चुलत भाऊ आणि बहीण ह्यांना माझी कल्पना सांगितली.

"जबरदस्त आयडिया आहे! पण चिंटूला जमेल न?",चुलतभाऊ

"न जमायला काय झालं! माझा चिंटू चांगलाच चंट आहे!",चुलतबहीण

"बाबांवर गेला तो!",चुलतभाऊ मिश्किलपणे म्हणाला.

"वा रे वा म्हणजे मी काय ढिम्म आहे असं म्हणायचं आहे की काय तुला? (चुलत भावाकडे बघत)
व्वा! राघव खूपच छान आयडिया आहे. माझा चिंटू तुला नक्की मदत करेल. हुशारच आहे तो!",चुलत बहीण चिंटूकडे कौतुकाने बघत म्हणाली.

"पण ए कोणाला सांगू नका बरं तुम्हा बायकांना बोलता बोलता भसकन सगळं सांगायची सवय असते",काका काकुला म्हणाले.

"हॅट! मी कशाला कोणाला सांगते! बिलकुल नाही!",काकू

मी माझ्या चुलतबहिणीच्या मुलाला चिंटूला बोलावलं. चिंटू खूपच चुणचुणीत मुलगा आहे. मी त्याच्या कानात सांगितलेली कल्पना त्याला लगेच समजली ५ वर्षांच्या मानाने भलताच हुषार.

'टिंग -टॉंग ', बेल वाजली.

क्रमशः