Geet Ramayana Varil Vivechan - 1 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 1 - गीत रामायणावरील विवेचन

।।श्रीराम श्रीराम श्रीराम।।

वाचकांनो आज मी ग.दि.माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित लिहिलेल्या गीत रामायणावर यथाशक्ती विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ग.दि माडगूळकरकरांनी एकूण छप्पन गीतांत क्रमाने संपूर्ण रामायणाचे प्रसंग वर्णन केलेले आहेत. त्यातील आजपासून रोज एकेक गीत घेऊन मी त्यावर विवेचन करणार आहे.

वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल ह्याची मला खात्री आहे.

त्यातील पाहिलं गीत आहे

स्वये श्री रामप्रभू ऐकीती

एका परिटाच्या संदेहामुळे श्रीरामप्रभु सीतामाईंचा त्याग करतात त्यावेळी त्या गरोदर असतात हे श्रीरामप्रभूंना माहीत नसते. श्रीरामाच्या आदेशावरून लक्ष्मण सीता माईला ऋषी वाल्मिकीनच्या आश्रमात नेऊन सोडतात.

तिथेच सीतामाई एखाद्या तपस्विनी योगिनी प्रमाणे आयुष्य व्यतीत करतात. तेथे लव आणि कुश ह्या जुळ्या मुलांचा जन्म होतो.

ऋषी वाल्मिकीनच्या मार्गदर्शनाखाली ते दोघे सगळ्या विद्या शिकून सर्वगुणसंपन्न होतात. देवाच्या आदेशानुसार वाल्मिकी ऋशिंनी रामायण लिहिलेलं असते. आता सर्व प्रजेच्या मनात असलेला सीता माईंविषयी असलेला वृथा संदेह दूर व्हावा असे वाल्मिकी ऋषींना मनोमन वाटते. त्यासाठी ते लव आणि कुश यांना गीतरुपात रामायण शिकवितात आणि ते अयोध्येत सर्वत्र गाण्यास सांगतात.

संपूर्ण अयोध्येत ह्या दोन ओजस्वी बालकांचीच आणि ते गात असलेल्या रामायणाचीच चर्चा सुरू असते. ती चर्चा श्रीरामांच्या कानावर सुद्धा येते. ती ऐकून श्रीरामांच्या आज्ञेने लव आणि कुशला त्यांच्या दरबारात गीत सादर करण्यासाठी बोलावले जाते.

लव आणि कुश श्रीरामच आपले पिता आहे ह्याबद्दल अनभिज्ञ असतात तसेच श्रीरामचंद्रांना सुद्धा संपूर्ण रामायण सादर करेपर्यंत लवकुश आपले पुत्र आहेत ह्याची कल्पना नसते.

लव आणि कुश गाण्यास सुरुवात करतात. दरबारात सगळी प्रजा, स्वतः श्रीरामप्रभू तसेच,लक्ष्मण,भरत शत्रुघ्न त्यांच्या भार्या अनुक्रमे उर्मिला,मांडवी,श्रुतकीर्ती, श्रीरामांच्या तीनही मातोश्री कौसल्यादेवी सुमित्रदेवी व कैकयी तसेच हनुमान सुग्रीव इत्यादी हे रामायण ऐकण्यास उपस्थित असतात.

लव आणि कुश जुळे असल्याने एकाच वयाचे असतात. त्यांना श्रीरामांचे ओजस्वी रूप प्राप्त झालेले असते,त्यांनी मुनिवेष परिधान केलेला असतो. भगवे वस्त्र,हाताला गळ्यात रुद्राक्षाच्या माळा शोभून दिसतात. जणू तापोवणातील गंधर्वच धर्तीवर अवतरले असा त्यांच्याकडे बघून भास होतो.

ते दोघे जेव्हा गायला लागतात तेव्हा जणू कोकीळ गात आहे असा भास होतो. त्यांच्या फुलाप्रमाणे कोमल ओठांमधून एकेक शब्द श्रोत्यांच्या हृदयाला भिडतो. वाल्मिकी ऋषींच्या मनातील भाव ते त्यांच्या गायनाने,वीणा वादनाने जिवंत करतात.

त्यांच्या गायनात अशी प्रतिभेची जादू असते की सगळ्यांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष दृश्य उभे राहते.

त्यांच्या प्रत्येक शब्दशब्दात भावना ओथंबल्या असतात आर्तता असते की सगळे प्रजाजन श्रोते माना डोलावू लागतात, सगळ्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात.
श्रीरामप्रभूंना कळून चुकते की हे दोन दिव्य बालक हे दुसरे तिसरे कोणी नसून आपले पुत्रच आहेत. त्यांना गहिवरून येते व ते आपल्या आसनावरून उठून त्यांच्याजवळ येत त्या दोघांना वात्सल्यातिरेकाने आलिंगन देतात. लवकुशला मात्र अजूनही हे आलिंगन देणारे आपले पिता आहेत ह्याची कल्पना नसते.

स्वये श्री राम प्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतीने तेजाची आरती

राजस मुद्रा वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनीचे
वाल्मिकीनच्या भाव मनीचे
मानवी रूपे आकारीती

ते प्रतिभेच्या आम्र वनातील
वसंत वैभव गाते कोकीळ
बालस्वराने करुनि किलबिल
गायने ऋतुराजा भारीती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनी झुलती
कर्ण भूषणे कुंडल डुलती
संगती वीणा झंकारीती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी
यज्ञामंडपी आल्या उतरुनी
संगमी श्रीतेजन नाहती

पुरुषार्थाची चारी चौकट
त्या पाहता निजजीवन पट
प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती

साम वेदसे बाळ बोलती
सर्गामागून सर्ग चालती
सजीव मुनीजन स्त्रिया डोलती
आसवे गाली ओघळती

सोडूनि आसन उठले राघव
उठून कवळती आपुले शैशव
पुत्रभेटीचा घडे महोत्सव
परी तो उभया नच माहिती
★★★★★★★★★★★★★★★★★