Sita Geet - 2 books and stories free download online pdf in Marathi

सीता गीत (कथामालीका) भाग २

रावण मला नेंत असतांना मी अंगावरील पाच सात दागिने काढून ते एका वस्रात बांधून पर्वतावर कांहीं वानर दिसत होते त्यांच्या दिशेने ते खाली टाकले. चारशे कोस दूर असलेल्या समुद्रापलीकडील लंका येथे मला कलंक लावण्यासाठी नेऊन ठेवले. तेथील अशोक वनात मला ठेवले. हजार राक्षसी माझ्यावर पहारा ठेवत होत्या. मी शोकसागरात बुडून गेले होते. मला एक क्षणही चैन पडत नव्हते. मी चिंताग्रस्त झाले होते. इंद्राणी माझ्यासाठी नाना परीचा थाट असलेले ताट पाठवत असे. स्वर्गीय अन्नपदार्थ पाठवत असे पण मी एखादाच खात असे. तिकडे दिव्य धनुर्धारी (श्रीराम)  हे मारीचाचा (हरीणाचे रुपातील) वध करून मागे फिरले. मार्गात त्याना लक्ष्मणजी भेटले व त्यांनी श्रीरामांना वंदन केले. श्रीराम म्हणाले ॑ 'बंधो ' तू माझी आज्ञा का मोडलीस , सीतेला वनामध्ये एकटी सोडून कां आलास ?. भावोजी नी अश्रुपुर्ण डोळ्यांनी सर्व घटना सांगितली.
हे ऐकून स्वामी म्हणाले , हे खुप वाईट झाले. राक्षसाने मोठेच संकट आणले. परत जाताना दोघांच्याही हृदयातील धडधड वाढली. ते दोघे त्वरेने पर्णकुटीकडे आले. पर्णकुटीत पक्षी दिसले मी कोठेंच दिसले नाही. स्वामी तर धैर्य सूर्यचं पण त्यांचाही धीर सुटला. त्यांनी सगळीकडे शोध केला व नंतर लोक धन गेल्यावर जसा शोक करतात तसा शोक केला. 
शोधता शोधता ते मामाजी होते तिथे पोहोचले. मामाजींचा प्राण कंठाशी आला होता पण ते श्रीरामांना भेटण्यासाठी तग धरून होते. श्रीरामांनी विचारले तुमची अशी अवस्था कोणी केली. प्राण व्याकुळ झाल्याने त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता तरी ते सांगू लागले. स्वामींना माझे अपहरण झाले आहे असे सांगून त्यांनी प्राण सोडले. श्रीरामांनी शोक केला. व शोकामुळे क्षणभर मुर्छित झाले. नंतर मामाजींचे अंत्यसंस्कार करून ते परत वनात माझा शोध घेउ लागले. ते अत्यंत शोकाकुल झाले होते.  लक्ष्मण भावोजी त्यांना समजावत होते. भ्रमीत होवून ते सीते सीते म्हणून वेलींना आलींगन देत होते.  रात्रंदिवस शोध करून थकून जात होते.  वनामध्ये कबंध नावाच्या राक्षसाने हल्ला केला. त्याचे हात चार कोस होते. श्रीरामांनी त्याचे हात तोडून त्याचा वध केला. तो एक गंधर्व होता व शापामुळे राक्षस झाला होता. तो शापमुक्त झाला.
नंतर मतंग मुनींच्या आश्रमात शबरीने शोधात यश मिळण्यासाठी युक्ती सांगितली. ऋष्यमुक  पर्वतावर सुग्रीव नांवाचा वानर आहे त्याचे सहाय्य घेतले तर सीतेचा शोध लागेल असे सांगितले.  पंपा सरोवर येथे श्रीरामांनी हनुमंतावर अनुकंपा केली. ऋष्यमुक पर्वतावर श्रीराम व सुग्रीवाची भेट झाली, त्यांची मैत्री झाली. सुग्रीवाने आपली व्यथा कथन केली. सुग्रीव हा सज्जन होता. तो स्वप्नातही वाईट वागत नसे. त्याच्या मोठ्या भावाची बुद्धि खोटी होती. तो कोणताही दोष नसताना सुग्रीवाला त्रास देत असे. स्वामींनी एका बाणात त्याचा वध केला.  सुग्रीवाला संकटातून सोडविले व त्याला वानरांचे राज्य दिले. तो या उपकाराने खुप  आनंदीत झाला. त्याने अनेक वानरांना माझा शोध घेण्यासाठी पाठविले. पण वानरांना माझा शोध लागत नव्हता. ते म्हणत होते हे दैवा, शोध लागत नाही. सुग्रीवाने दिलेला अवधी पण संपत आला , आता दुसरा विचार न करता मरावे. समुद्राच्या किनाऱ्यावर , पर्वतावर ते रडत होते. आम्हा सेवेत कुचराई करणाऱ्यांचा धिक्कार असो असे म्हणत खेद करीत होते. श्रीरामाची भार्या सोडविताना जटायुला सद्गती मिळाली हे संपातीला कळले (जटायू चा मोठा भाऊ). संपाती बंधु शोकात खुप रडला व तोही माझा शोध करू लागला.
समुद्र पार करण्यासाठी मारुतीने मोठी उडी मारली व तो त्याच्या पुण्याईमुळे सागरात न बुडता लंकेमध्ये पोहोचला व त्याने लंकापुरीत सर्वत्र शोध घेतला व अशोक वनात पोहोचला. रात्री तो रावण मी वश व्हावे म्हणून आर्जव करीत बडबड करत होता पण मी त्याच्याकडे लक्षच देत नव्हते. शेवटी तो ' मेला ' राक्षसींना  म्हणाला ही जर दोन मासात तयार नाही झाली तर तीला मारून मांस खायला द्या. असे म्हणून रावण तीथून गेला. हनुमंताला हे पाहून दु:ख झाले.