निचरा
छातीत जळता निखारा घेऊन शांत कसं राहायचं?
ज्याने घाव दिलाय त्यालाच बघून कसं हसायचं?
माझं दुखलंय हे त्याला सांगून चिंतेत कसं टाकायचं?
आपल्याच माणसाला राग राग करुन दूर कसं लोटायचं?
सगळे प्रश्न माझ्या मेंदूत थैमान घालत होते.
शाळेत सुनी समोर येणार होती, बोलणार होती, हसणार होती. आपण ते सगळं खरं मानून चालायचं होतं.
आता स्वतःला दुय्यम समजून वागायचं होतं. ठीके...!!
पण मग मी सुद्धा तीला तशीच वागणूक द्यावी का?
नाही नाही.. तसलं शक्यच नाय आपल्याला...
सुनी आहे ती.
मी स्वतःला तिच्यासाठी कायम असण्याचं वचन दिलंय. तिच्याबाबतीत कोरडेपणा, तुसडेपणा मी सहज दूर करू शकतो. मन स्थिर करणं जमायलाच हवं.
तिच्या आईने सगळ्यांना समान वागणूक द्यायला हवी. अशी तिची ईच्छा अगदीच काही चूक नव्हती. पण काकू ते समजून घेणाऱ्यातल्या नव्हत्या. मला स्वतःच्या मुलागत ट्रीट करणं त्यांनी लहानपणापासून जपलं होतं. सुनी हे सगळं विसरून कसं असं बोलू शकली ते कळेना?
पल्लवी माझं sin, cos, tan, cot, sec आणि cosec वरून डोकं चिवडत होती. तेवढ्यात सुनी तिथे आली.
"पल्ले..! जरा बोलायचंय आम्हाला." ती म्हणाली. पल्लवीला तिचे code कळायचे लगेच. बाकी काही कळो न कळो.
"जाडू, काल आई ओरडली मला." मला नव्हतं वाटलं की सुनी स्वतःचं विषय काढेल.
"का गं?" मी म्हणालो.
"अरे!! आता कसं सांगू यार..? माझी ना हीच गोची होतीये हल्ली. काही कळत नाही निटंसं. " ती म्हणाली.
"काय झालंय सुने?" माहित असून पण मी विचारलं.
"अरे तू तिळगुळ द्यायला आलास आणि आईने तूला आग्रह करुन जेऊ घातलं. तेव्हाच सचिन आणि अभिजित पण आले होते ना. ते पण तिळगुळ देऊन गेले. पण जाताना सचिन म्हणाला की, आमच्या इथे कोंणी पाहुणा घरात आला असेल तर त्याच्यासमोर असं कोणा एकालाच महत्व नाही दिलं जात.
मला वाईट वाटलं रे. म्हणजे तूला आईने जेवायला आग्रह करुन ठेऊन घेतलं आणि त्या दोघांना विचारलं पण नाही. तिने बाकीच्यांना असं वागवणं बरं नाही ना?" ती म्हणाली.
"सुने आता मी यात काय बोलणार? काकूंचं माझ्या बाबतीत पहिल्यापासून असंच आहे. त्या आपल्या दोघात पण कधी भेदभाव करत नाहीत. पण तूला हवं असेल मी एक करू शकतो. सचिन कधी तुझ्याकडे आलेला दिसला तर मी, तूला काही मानसिक अडचण येऊ नये म्हणून इथून पुढे थांबणार मी तिथे नाही. तूला हल्ली जरा जड होत आहे ही गोष्ट हे मला कळतंय." मी म्हणालो.
"अरे मला तस नव्हतं म्हणायचं. मला तुझ्या येण्याची काहीच अडचण नाही. मी आईचं म्हणतीये. तिने अशी पार्सीलिटी करू नये ना? " ती म्हणाली.
"पार्सीलिटी?? बरं!! सुने.. मी काय म्हणतोय ऐक.. पटलं तर तस सांग मला. आपण सहावीत असतानाची गोष्ट आहे. तूला आता आठवतं की नाही माहित नाही मला.. पण काकूंना एकदा थन्डी ताप आला होता. तू आणि तुझे बाबा त्या पावसाळी दुपारी कुठेतरी सिटीत गेला होतात. पावसामुळे अडकलात. नेमका दुपारीच मी तुझ्या घरी खेळायला आलो. मला दिसलं की त्या थन्डीने गारठून अक्षरशः उडत होत्या.
सुने.. मला काही सुचत नव्हतं पण आई घरी जे करायची ते आठवत मी वागलो. त्यादिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा गॅस पेटवला होता. पाणी गरम करुन आणलं. त्यांचे तळवे आणि हात गरम पाण्याने पुसले. डोकं दाबून दिलं. दोन तास त्यांच्या उशा पायथ्याशी त्यांचं करत राहिलो. मला त्यांची अवस्था बघून रडायला येत होतं. तास दोन तास त्यांना गरम पाण्याने शेकल्यावर आराम पडला.
कोरा चहा कसा बनवायचा त्यांच्याकडून माहित करुन घेत मी जमवला कसा बसा आणि करुन दिला होता. जर माझी आई अशी आजारी असती आणि तू तिथे असतीस तर तू पण हेच केलं असतं सुने.. मला माहित आहे.
सुने.. आपल्या आई वडिलांना आपल्याबाबतीत या प्रेमळ जाणीवा पहिल्यापासून आहेत.
तूला वाटत असेल की, तुझ्या आईने मला इतरांसमोर वेगळं वागवू नये वैगरे.. पण, ना ते त्यांच्याकडून होणार आहे ना माझ्याकडून... हा पक्षपातीपणा नाहीये. प्रेमाचं, हक्काचं नातं आहे ते. तुझ्या बाबांनी तूला खेळणं आणताना मलाही एखादा बॉल किंवा खेळणं आवर्जून आणलंय. तुम्हा तिघांसोबत मी गावची जत्रा तुझ्या बाबांच्या खांद्यावर बसून पाहिलीये. त्यांच्या स्कुटरवर तुझ्या आधी मी पुढे उभा राहून राइड मारली आहे. माझं फुटलेलं तोंड धरून डॉक्टर कडे नेणारी माझी सुनी मी बघितलिये.. हे सगळं घडत आलंय गं.. घडवलं नाहीये आपण.
आणि माझं तिथं येण्याबद्दल म्हणशील तर तू त्या घरात असली नसली मला इतका फरक पडत नाही. पण मला काका काकू हवे असतात तिथं. मी त्यांच्यासाठी तिथं येणं कोणामुळे थांबवू शकतंच नाही.
सध्या हे आलेलं नवं वारं तुझ्या डोक्यात कितीही काही भरू दे.. पण मी तुला एकच प्रॉमिस देतो. तुझे आईवडील जशी तुझी आहे, तशीच माझीपण जबाबदारी असणारेत. त्यांच्यासाठी मला काही करावं लागलं भविष्यात तर मी कधीच मागे हटणार नाही. कारण ते नातं आपल्या मैत्रीपलीकडचं आहे. त्यात तू किंवा आणखी कोंणी, काहीही करू शकत नाही. ही वीण उसवायला जाऊ नको सुने. कापड फाटेल...
आणि हो... त्यादिवशी मी तुझ्याकडून घरी गेलो.. पण आईचा हळदीकुंकवाचा निरोप काकूंना द्यायला विसरलो होतो, तो सांगायला लगेच परत आलो होतो.. नको ते कानावर पडलं आणि म्हणून मग, न सांगताच निघून गेलो. काकूंना सांग शुक्रवारी संध्याकाळी घरी यायला." तिचे मोठे झालेले डोळे काठोकाठ भरून पाणावले होते. माझं बोलायचं बोलून मी तिच्याकडे वळून न बघता वर्गात येऊन बसलो.
पाच मिनिटांनी सुनी वर्गात आलेली. बहुतेक रडल्यामुळे तीला चेहरा धुवावा लागला होता.
"काय झालं नेत्रा? नेत्रा काय झालं?" असं विचारत विचारत सचिन पण तिच्या मागे मागे आला. ती बेंचवर बसली आणि सचिनला हातानेच जाण्यासाठी खूणवलं. तो माझ्याकडे रागाने बघत गेला.
🍁🍁🍁🍁
"जाडू!!" सुनी रूमच्या दारात उभी होती. परत एकदा पिंजऱ्यात उभी असल्यागत तोंड करुन.
"सुने ये की!" मी म्हणालो. आज थेट आठ साडेआठच्या सुमाराला सुनी आली होती. ट्युशन सुटलीतरी एकटी गेली. काहीच बोलली नाही. विचारात पडली होती.
"काय करतोयस?" तिने विचारलं.
"भूमिती उरकत होतो." मी म्हणालो.
"वेळ आहे? " तिने विचारले.
"नाहीये जा." मी म्हणालो.
"बरं!" असं म्हणून ती निघू लागली.
" खूप विचार बिचार करुन वागते की काय माझ्याशी सुने आजकाल..? वेळ आहे का म्हणे." मी वही बाजूला ठेवत म्हणालो.
" माझं तोंड आणि डोकं यांची जोडी तुटल्यागत झालंय हल्ली." ती वळली आणि बसत म्हणाली.
" अरे बापरे.. आपल्या गावातले हर्डीकर डॉक्टर बेस्ट आहेत. सांगू का काकांना न्यायला तूला तिकडे." मी भिंतीला टेकून पाय सरळ करत बसलो.
"गप ना यार जाडू.. प्लिज अजून नको खेचू माझी. मी असं का करतीये, तुझ्यासमोर इतर कोणाचा फारसा विचार न करण्याची माझी सवय कशी काय तुटत चाललीये? कळेना मला. सगळं चुकीचं घडतंय माझ्याकडून असं वाटत मला." ती परत रडवेली झाली होती.
" अगं चूक काय त्यात? वय वाढत जातं तस आपल्या सवयी पण बदलतात. माझ्यात नाही का बदल झाला. मामा तर म्हणतोय की या सुट्टीत तालीम लावतो तूला. कुस्त्या खेळ. " मी हसत म्हणालो.
"तुझे सगळे बदल आणि सवयी एक एक उंची गाठत चाललेत आणि माझं मात्र सगळं खाली खाली जात चाललंय. मी खुशाल तुझी बरोबरी बाहेरच्या लोकांशी केली. किती सहज हे विसरले की आपलं गणित..." सुनी म्हणत होती पण मी तीला ब्रेक लावला.
" सुने गणित मोठं असलं की कधी कधी त्याच्या स्टेप्स चुकतात.. खाडाखोड होते. पण उत्तर मिळेपर्यंत थांबायचं नसतं. आपलं गणित किती मोठं आहे माहित नाही मला. पण माझ्या प्रयत्नानी मी त्याचं उत्तर नक्की बरोबर आणेन एवढंच तूला सांगतो." मी तीला म्हणालो.
"मला तुझं बोलणं कळत नाही कधी कधी.. खूप खोल होत चाललायस. आणि सोबत एक respect पण मिळवतोयस सगळ्यांकडून. कसं जमतंय तूला हे?" ती म्हणाली.
" म्हणजे काय सचिन केवढा respect देतो मला. "असं म्हणून मी मिश्किलपणे तिच्याकडे पाहिलं.
" तू गप्प बस हा आता!!" तीचं डोळ्यात आलेलं पाणी रडक्या हसण्यात विरलं.
" सुने.. तुझ्याकडून तर शिकलोय.. आपल्याला आपल्यातलं चांगलं दुसऱ्याला देता यायला हवं. मग मी तुझ्या बाबतीत हातचं राखून कसं वागू? " मी बोललो.
"तू माझी पाठराखण करायचं सोडत नाहीस आणि मी हल्ली सतत तूला दुखवतीये असं वाटतंय मला. तू परत येऊन सगळं ऐकून गेलास. त्याचं मला किती वाईट वाटतंय अरे.. मी का असं बोलले असेल आईला?" ती म्हणाली.
" सुने मनात आलेलं बोललीस म्हणजे तू मनाने स्वच्छ आहेस. शिवाय तूच येऊन मला सगळं सांगितलंस ना? म्हणजे माझ्याबद्दल तूला आढी नाही हे कळलं की मला. तूला एखादी गोष्ट माझ्याशी क्लिअर करावी वाटली म्हणून तू आली पण माझ्याकडे.. मग एवढा विचार करुन, नको एवढा ताण घेऊ. आणि परत तूला अशी अडचण येणार नाही हे पण बोललोय ना मी तुला? " मी म्हणालो.
" नाही जाडू.. मला स्वतःला आता स्वतःवर नीट कंट्रोल आणायचाय. मला हे कळायला हवं की माझ्या life मध्यें महत्वाचं काय आहे. नीट विचार करूनच मी वागणार. बरं झालं तू आज मला शाळेत बोललास ते. " ती म्हणाली.
"सुने तू कशीही वाग, कुठेही उधळ. मी आहे की कान धरून परत आणायला तूला. कुठे जाशील? " मी म्हणालो.
"कोण कुठं चाललंय?" आई आली रूम मध्यें. तिने दोन वाट्यामध्ये गुलाबजाम आणलेले. घरी केलेले.
" ही सुनी डोंगर चढायला निघालीय सकाळपासून." मी आईला म्हणालो.
" अगं बाई खरं की काय सुने? " तिने आम्हाला वाट्या दिल्या.
"अगं विचारांचे डोंगर. " मी म्हणालो.
" जाड्या गप की रे!!" सुनी ओरडली.
" कसले डोंगर? " ती म्हणाली.
" काकू काही नका ऐकू याचं. तोच सटकलाय.. मोठा आला विचारवंत. " सुनी ओरडत म्हणाली.
" काय बोलता आणि करता तुमचं तुम्हाला माहित. सुने.. डान्स छान झाला तुझा, हा म्हणत होता. थांब हा!!" आई बाहेर जाऊन दोन मिनिटात आली. तिच्या हातात एक ड्रेस मटेरिअल होत. माझ्या मावशीने सुरत वरून आणलेलं. आईने ते तीला दिलं.
" माझ्याकडून बक्षीस तूला. शीव बरं का छानसा ड्रेस." आई म्हणाली आणि उठून गेली.
" चला!! मेंदूतल्या मेंदूत एवढी वैचारिक पळापळ करुन शेवटी बक्षीस मिळालं बाबा सुनीला. आम्हाला काय? " मी म्हणालो.
" तूला सुनी कडून हे." सुनी म्हणाली आणि तिने हातातली वाटी बाजूला ठेवत मला घट्ट कव दिली.
" बस..बस.. नरडं आवळलं माझं. " मी हसत म्हणालो.
"कमीच आहे. पण अजून हवं असेल तर पल्लीला पण सांगते. Trignometry ची शिकवणी चाललीये म्हणाली पल्ली. मग गुरुदक्षिणा नको का द्यायला गुरूला?" सुनी आली तिच्या जुन्या पदावर.
"तीला सांगशील ना असलं काही, तर खिळ्याचा शर्ट घालून येईन." मी म्हणालो.
" जाड्या!! बेशरम..." ती मला मारत मारत ओरडली.
🍁🍁🍁🍁
कधी गढूळही होऊ शकतं
आपल्या प्रेमाचं सरोवर
आपल्या शुद्ध मनाच्या निवळ्या
करतील स्वच्छ त्याचा निरझर
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁