झुळूक
मला श्वेताशी खडुसपणाने वागण्याची ईच्छा अजिबात होत नव्हती कारण ती तशी होती खूप छान. तिचं वागणं, बोलणं खूप खेळकर पण तितकंच समजूतदारपणाचंही असायचं. जणू जाडूचीच लेडी आवृत्ती असल्यागत. पण ती काही जाडू नव्हती. मला त्रास याचा होतं होता कि जाडूचा वेळ ती खात होती आणि जाडू तीला वेळ पुरवत होता. आठवडा झाला सुनी दुक्यात विरल्यासारखी झाली होती त्याच्यासाठी.
श्वेता जाडूसोबत बऱ्याचदा रहायची. त्याचं ऐकून घेणं आणि मोजकं बोलणं हे गुण त्याच्यात कोणालाही गुंतवण्याची क्षमता ठेऊन आहेत. हे मला चांगलं ठाऊक होतं. इतर मुलं श्वेताशी बोलायला बघत होते. पण ती फार कोणाशी जास्त बोलताना दिसायची नाही. जणू त्यांच्या कोणाशीच तिच्या लेव्हलच संभाषण होत नव्हतं. तिच्या बुद्धीला जाडूच सूट करतं असल्यासारखं तिचं त्याला preference देणं चाललं होतं.
जाडूच्या भीती मुळे समर आणि अभिजित सारखी पोरं ज्यांना श्वेतामध्ये इंटरेस्ट उत्पन्न झाला होता. तिच्याशी बोलायला घाबरत होते. असं मला स्नेहा आणि पल्लीकडून कळलं.
ही पल्ली जरा श्वेतावर जास्तच खवळली होती. तिचं wild कार्ड एंट्री घेत जाडूच्या इतक्या जवळ जाणं तीला पचतच नव्हतं. आल्यापासून ती एकदाही श्वेताशी बोलली नाही.
"माझ्या शेजारची जागा आणि त्याचं लक्ष दोन्ही चोरले तिने." असा एक खुनशी भाव तिच्या चेहऱ्यावर श्वेताला बघितलं कि दिसू लागला होता.
सचिन मात्र सवयीप्रमाणे माझी विचारपूस करणं, मला प्रश्न विचारणं या गोष्टी करतं होता. बाकीचे मात्र हळूहळू श्वेताकडे आपण होऊन वळू लागले होते. जाडू मला विसरून तर नाही जाणार ना? असा प्रश्न मला पडला होता. माझं मनं आतून थोडं हललं होतं. भीतीची नागीण पोटात सळसळत होती. माझी अस्वस्थता वाढत चाललेली.
शुक्रवारी मलाच रहावेना म्हणून मी संध्याकाळी सहाच्या सुमारास जाडूकडे निघाले. मला वाटलं तो असेल आत्ता फ्री. त्याच्या घराच्या फटकापाशी आलेच होते. तितक्यात मला त्याचा आणि श्वेताचा आवाज आला. मी हलकेच डोकवलं तर बारक्या स्टूलवर चेस मांडून खुर्चीवर बसून दोघे खेळत बसले होते. इथे मी चार पाच दिवस झाले धडपणे बोलली नाहीये याच्याशी आणि हा खुशाल त्या श्वेताला घेऊन चेस खेळत बसलाय. याला काहीच कसं वाटत नाही. मला आता राग आला. मी गरकन मागे फिरले आणि घरी आले.
आई म्हणाली पण, "लवकर आलीस गं?"
" तो घरात नव्हता. " मी थाप मारली आणि रूममध्यें आले.
जाडू असं कसं वागू शकतो यार? त्याला माझ्याशिवाय आणखी कोंणी कधीतरी त्याला पटलंय का? किती बदलत चाललाय ना? खुशाल त्या श्वेताशी गप्पा मारतोय खेळतोय..हसतोय.. मला विचारलं पण नाहीये त्याने गेल्या चार पाच दिवसात. सुनी कशीये? वर्गात लक्ष का नसतं तुझं आजकाल? चेहरा का पडलाय तुझा? ही श्वेता यायच्या आधी तो मला जरा काही झालं कि लगेच विचारायचा.
त्या अस्वस्थ मनस्थितीत मला अभ्यास पण करू वाटेना. मग एकदम काही चमकलं.. जाडूच्या कविता..
मी त्याची फाईल काढली ड्रॉवर मधून.. अधून मधून वाचलं कि छान वाटायचं. जाडू लिहितो मस्तच..
असता मनी मी कधी एकटा
अस्वस्थता दाटे सर्वत्र भवता
कशी लबाड या मनाची तऱ्हा
तूझीच साथ हवी त्यास आधार लागता..
असं का लिहिलं असेल त्याने.. तो कधी एकटा होता.. मी कुठे त्याला एकटं सोडते. असतेच कि, त्याच्या नाही पण माझ्या अस्वस्थेला जुळणारं लिहितोय जाडू.. खडूस कांदा.
"सुने, खरंच तू असते का सतत स्वतःला विचार."
आतून एक चिडकी सुनी चाबूक घेऊन अवतरली. जी आजवर कधी मला दिसलीच नव्हती.
" स्वतःला फार शहाणी आणि दोघात मोठी समजतेस. तुझ्या गावभर मित्र मैत्रिणी. सतत इकडे तिकडे उंडरत असतेस. जाडूला आहे कोंणी तुझ्याशिवाय? त्याने कधीतरी तूला सोडून कोणाला महत्व दिलंय? तरीपण त्या सचिनसाठी कितीवेळा जाडूच डोकं खाल्लंय तू. तो सगळं किती सहज सहन करतं आलाय? त्याला नसेल झाला त्रास? कधी बोलला तूला? कधीतरी तुझ्या मुक्त वागण्यावर मैत्रीच्या हक्काने का होईना बारीकस बंधनं घातलं का त्याने? तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी करण्यात एक कसूर सोडली असेल तर सांग? काही दिवस स्वतःवर बेतलं तर लागलीस ओरडायला.."
मला आता गलबलायला लागलं होतं. मी खुशाल त्याला कोसत होते. याचं खूप वाईट वाटलं मला. मी स्वार्थ्यां सारखी आत्ममग्न होऊन स्वतःच्याच अवस्थेला गोंजारत बसली होते. माझं चुकत होतं. जाडूबद्दल मी असा विचार करायला नको होता. मी लावला तेवढा उशीर तो नक्कीच करणार नाही. शिवाय श्वेता एक चांगली मुलगी आहे. जाडूची आणि तिची मैत्री जमली म्हणून का तो मला विसरेल. असं शक्यच नाही. माझा जाडू सुनीसाठी नेहमी असणार.. आणि सुनी पण.. सॉरी यार जाडू..
आज स्वतःच्या आत डोकावून मी माझ्या मनाचं analysis केलं. तेव्हा समजलं मी जाडू इतकी सशक्त मनाची अजिबात नाहीये. त्याने किती काही पचवलंय सुनीसाठी. माझं इतरांच्यात असणं. त्याच्यापासून खूप काही लपवणं. मी प्रामाणिकपणे या सर्व गोष्टी स्वतःशी कबूल केल्या. आणि स्वतःला समजवताना माझे डोळे कधी भरून आले कळलंच नाही..टपटप करतं थेंबं सांडत गेली. पण आईने जेवायला हाक मारल्यामुळं स्वतःला आवरावं लागलं. त्याच्या उरलेल्या कविता वाचत... मी पुढला सगळा वेळ घालवला. पण येणार भरतं ओसरायला जातंच नव्हतं... रात्री कधी डोळा लागला कळलं नाही.
पुढल्या दिवशी म्हणजे शनिवारी तास संपले आणि शाळा सुटली. मी आणि श्वेता वर्गाबाहेर आलो. जाडु मागे राहून त्याला भेटलेल्या रामदासशी बोलत होता. तितक्यात सचिनने मला हाक मारली.
"नेत्रा!!" मी थांबले. तो येतोय असं बघून श्वेता सायकल काढते म्हणाली आणि गेली.
"आजचं शेवटच्या तासाचं उरकलं नाही माझं बीजगणिताच. वही देतेस का? " त्याने विचारले.
मी जाडूकडे बघत त्याची गप्पा संपन्याची वाट पहात होते. तो लवकर येईना. आज त्याला घेरणारच होते मी.
"नाही.. माझं पण राहिलंय." मी म्हणाले आणि परत त्याच्या पलीकडे जाडूकडे पाहू लागले.
"तुझं राहिलंय? कसं काय? पहिल्यांदा झालंय असं?" तो म्हणाला.
" ऐक ना... मी आत्ता नाही पूर्ण केलं. गणितं माहितेत मला कोणती आहेत. माझी झाली कि देते तूला उद्या. आत्ता जा तू. " मी थोडी वैतागूनच त्याला म्हणाले.
त्याने माझं लक्ष कुठंय हे बघण्यासाठी मागे वळून पाहिलं.
"अच्छा.. यामुळे disturb झालीयेस का तू? आलं लक्षात. नेत्रा.. जाऊ दे ना. तू काय नेहमीचीचं आहेस त्याच्यासाठी. पण त्याला आता नवं वारं लागलंय. हे होणारच होतं. उगाच का वाट बघतीयेस त्याची? काही थांबणार नाहीये तो तुझ्यासाठी. चल निघू आपण. ती श्वेता वाट बघत असेल त्याची. उगाच इथे वेळ नको घालवू. काही फायदा नाही." सचिन म्हणाला.
मला त्याचं ते भरवणं मला राग आणून देऊ लागलं. मी आज त्याला खवळून चांगलीच ओरडणार होते. एकतर जाडू येईना आणि हा त्याच्या नावाने गरळ ओकतोय. मी सचिनला ओरडण्यासाठी मोठा श्वास घेत तोंडच उघडले होते. तितक्यात जाडू आला.
"ए सुने!! इकडे ये. लवकर. " माझा हात धरून त्याने मला खेचली आणि व्हरंड्यातून चालवलं.
"अरे कुठे?? " मी म्हणाले.
"श्वेताला कटवायचय मला, म्हणून थांबलेलो. किती दिवस झाले धड बोललोही नाहीये तुझ्याशी. आज सरळ टेकडीवर जाऊ गप्पा ठोकायला. नंतर गुरुदत्तची भेळ. नाही म्हणशील तर बघ." हे जाडू बोलत होता??
आईशपथ!! न सांगता ही जखमेवर फुंकर घालण्याचं तंत्र आणखी कोणाकडे असणार म्हणा??
"जाडू एकच मिनिट थांब." मी म्हणाले आणि मागे वळून तिथंच ऊभ्या असलेल्या सचिनकडे गेले.
"सचिन!! मी परत एकदा तूला सांगतीये.. तू त्याच्याबद्दल मला भरवण्याची लाजिरवाणी गोष्ट सतत करू नकोस. असं नको व्हायला कि मला तुझ्यासाठी थांबायची ईच्छा पुढे राहणार नाही. नीट लक्षात असू देत." मी त्याला उत्तर देणं गरजेचं होतं.
जाडुने किती सहज माझी तगमग ओळखली होती, किंवा त्यानेही तिच तीव्रता अनुभवली असावी. आम्ही शाळेच्या मागून फिरून स्टॅंडकडे आलो. डोकावून पाहिलं तर श्वेता गेली होती. आम्ही सायकली काढल्या आणि सरळ टेकडीकडे धूम ठोकली. टेकडीवर सायकली ढकलत ढकलत आलो आणि माऊलाई मंदिराच्या ओट्यावर लिंबाखाली सावलीत मस्त अंग झोकून दिलं.
एकमेकांच्याकडे पाहिलं आणि टाळी देऊन जे हसत सुटलो. हसू थांबतच नव्हतं. वेड्यागत होतं जे काही चाललं होतं ते. तिथल्या शांततेचा भन्ग करतं आम्ही देवीला सुद्धा डिस्टर्ब केलं असावं असं वाटलं मला. दोघांच्याही डोळ्यातून पाणी सांडू लागलं हसून हसून. हळूहळू आम्ही शांत झालो. भर ओसरला होता.
" सुने!! यडे.. इतके दिवस तोंड पाडून बसलीयेस शोभतं का तूला?? " जाडू म्हणाला.
" ए मी?? मी कुठे तोंड पाडून बसले होते. गप्प!!" जाडू मला नेमकं पकडत असल्यामुळे आता मला थोडं लाजल्यासारखं झालं.
" बरं बाई.. नव्हती बसलीस. मलाच गैरसमज झाला होता होना?" जाडू म्हणाला.
"गप तू.. मला किती वाईट वाटलं माहिते?" मी म्हणाले.
"अगं कसं झालं होतं.. आई बाबांचा आग्रह.. त्यात ही श्वेता नवी इथं. तीला कोणी ओळखत नाही इथं.... " तो बोलू लागला पण मी त्याला थांबवलं.
" त्याचं नाही रे काही म्हणत मी. तू जे करतोयस ते योग्यच आहे.. पण जे मूर्खासारखं माझ्याकडून चितलं जात होतं. ते चुकीचं आहे.. तू कधीच असा वागला नाहीयेस माझ्या सोबत जसं मी वागत होते. माझे कितीतरी मित्र मैत्रीण आहेत. मी कितीदा त्यांच्यासोबत असते. पण तक्रारीचा एक शब्द तुझ्याकडून नसतो. मनात पण आणत नसशील कधी. मला माहिते. पण मी? जरा काही तू कोणाला अटेंशन द्यायला लागला कि तुझ्यावर नाराजी. असं बरोबर नाही ना? " मी माझं म्हणणं मांडलं.
" सुने त्याचं कारण असं कि तू आधीपासून अशीच आहेस. सगळ्यांच्यात राहणारी, सगळीकडे वावरणारी आणि तू जशी आहेस तशीच perfect आहेस. perfect ला सुधारवायचं कसं? एवढं तुझ्यामागे असताना पण तू माझ्याकडे सतत लक्ष देते हवं नको ते बघते. मला पुरतं तुझं माझ्यासाठी तेवढं ही असणं. " जाडू किती सिम्पल बोलत होता.
" कसली डोंबल्याची perfect रे मी? मला काही कळत नाही. श्वेता किती छान मुलगी आहे.. तीला तू व्यवस्थित वागणूक देतो. ती रुळेपर्यंत तू तीला थोडा वेळ द्यायला हवा तो देतोयस. हे बघून खरं मला बरं वाटायला हवं होतं, तर मी डोक्यात घेतलं कि तू मला विसरशील." मी कबुली दिली.
" काय??! चक्रम आहेस का? असं समज मी सुट्टीवर होतो. पण तुझ्याकडे दुर्लक्ष नव्हतं माझं सुने. वर्गात अशी तोंड करुन बसायची जसं काय एखाद्या चिमणीला संध्याकाळी तिचं घरं सापडत नव्हतं. कळलं कि मला तुझ्याकडे बघून बघून. म्हणून तर आजचा कार्यक्रम केला. सुने सावर हा, determinent हो बरं का जरा आता. दहावीच वर्ष आहे. असं भरकटल्यागत वागू नकोस. मला सुनी शाळेत पहिली यायला हवी " जाडू म्हणाला.
"तर... तू येऊ देतोयस?" मी म्हणाले.
" तू म्हण. मी मागे होतो. आपल्या हातात आहे ते. " जाडू म्हणाला.
" होका?? आणि श्वेता? ती ऐकेल वाटतं तुझं? " मी म्हणाले.
"सुनीने मनात आणलं तर सुनी कोणालाही मागे टाकू शकते. मला माहिते." जाडू बोलला.
"बस झालं हा कौतुक.. आणि आजकाल फार इंग्लिश झाडतोयस रे.. श्वेता रोज cake खायला घालते वाटतं ब्रिटन वरून आलेला." मी त्याची खेचत म्हणाले.
"टवळे.. हाणू का? " जाडू माझी पोनी खेचत म्हणाला.
"हान बरं.. त्या पल्लीला सांगते.. ती बघेल तूला.. खूप चिडलीये तुझ्यावर... श्वेतामुळे...बरं तर बरं मी थोपवून धरलीये इतके दिवस." मी उठून त्याला चिडवत म्हणाले आणि पळू लागले.
"सुने... तूला बघतोच.." जाडू पण उठून धावला.
आम्ही तिथेच तर होतो. अंतर काही दिवसांचच पडलं होतं. त्याने कुठं काय फरक पडला? सगळं पूर्ववत व्हायला काही क्षण एकत्र हवे होते. ते मिळाले... आता तक्रार नव्हती. ना त्याच्यासाठी ना आयुष्याकडून...
🍁🍁🍁🍁
तू मनजोगता
तू मनकवडा
मी मूर्ख सदाफुली
तू गंधित मोगरा..
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁