The Impersonator Heir - Part 36 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तोतया वारसदार - भाग 36

Featured Books
Categories
Share

तोतया वारसदार - भाग 36

तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       सारंग वकिलांचा चपराशी.

सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र.

 

भाग  ३६                 

भाग ३५ वरून पुढे  वाचा....

 

“त्याची नका काळजी करू, कागद तयार असेल. पण काही, गरीबाला?” - दूसरा कारकून.

असं म्हणून त्याने अंगठा आणि तर्जनीची पैसे, अशी विशिष्ट खूण केली.

सुभाषने त्याला १५०० रुपये दिले. अविनाश हे नाव असलेलं सर्टिफिकेट दिलं. आणि तो निघाला.

आठ दिवसांनी सुभाष पुन्हा चंद्रपूरला गेला. शाळेत त्या कारकुनाने सर्टिफिकेट तयार ठेवलं होतं ते ताब्यात घेतलं, त्याला बाकीचे १५०० रुपये दिले. आता त्याचं काम झालं होतं. चंद्रपूरला थांबण्याची काहीच गरज नव्हती. त्याने नागपूरची बस पकडली.

आता सुभाषच्या समोर पुढचा गड चढायचा होता. बोर्डाच्या ऑफिस मधे जाऊन मॅट्रिक च्या सर्टिफिकेट मधे दुरुस्ती करून घ्यायची होती. हे काम इतकं सोपं नव्हतं पण करावंच लागणार होतं. सारंग वकिलांच्या समोर सर्व गोष्टी फूल प्रूफ ठेवाव्या लागणार होत्या, तरच काही आशा होती. थोडी जरी फट मिळाली, तरी सारंग वकिला सारखा कसलेला अनुभवी वकील त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या शिवाय सोडणार नाही, याची सुभाषला खात्री होती. सुभाषच्या समोर एक अडचण अजून होती, ती म्हणजे या कामासाठी त्याला बऱ्याच सुट्ट्या घ्याव्या लागत होत्या, आणि त्याच्यामुळे त्याचं रेकॉर्डस खराब होण्याची शक्यता होती. काय करावं हे त्याला कळत नव्हतं. महापालिकेतली नोकरी फार महत्वाची होती. त्याचा संसार त्यावर होता, नोकरी गेली, तर बायको आणि पोराचं काय? हा प्रश्नच होता. शेवटी त्याने बबनला फोन केला.

त्या दिवशी संध्याकाळी तो आणि बबन कॉफी हाऊस मधे भेटले.

“काय सुभाष शेठ काय खबर बात? कामगिरी कुठवर आली?” – बबन.

मग सुभाषने चंद्रपूरची कहाणी अगदी सविस्तर सांगितली. मग म्हणाला, “जिकडे तिकडे भ्रष्ट माणसं सापडतात म्हणून ही असली कामं बिनबोभाट होतात. तो माणूस मिळाला नसता, तर सगळं कठीणच होतं.” – सुभाष.

“तुम्ही असं बोलताय, आश्चर्य आहे. सुभाष शेठ, तुमच्या पाशी तो चंदू नामक प्राणी आहे की. त्याला हाताशी धरून हा पण कागद करून घेता आला असता, काय तुम्ही पण राव! इतकी साधी गोष्ट तुमच्या लक्षात कशी आली नाही?” बबन

“चुकता आहात तुम्ही बबनराव. सारंग सरांना बांगलादेशच्या सर्टिफिकेटची शहानिशा करणं शक्य झालं नसतं. पण चंद्रपूर हाकेच्या अंतरावर आहे, आणि त्यांच्या सारख्या मोठ्या वकिलाला शाळेचं रेकॉर्डस चेक करणं सहज शक्य होतं. नाही बबनराव, अशी रिस्क नाही घेता येणार. सारंग सरांसारखा वकील समोर असतांना तर नाहीच नाही. आपला सगळा डोलाराच एका छोट्याश्या चुकीमुळे कोसळू शकतो. ” – सुभाष

“ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. तुम्ही बरोबर बोलता आहात. मग आता पुढचं पाऊल कोणचं?” - बबन नाही म्हंटलं तरी थोडा खजील झालाच होता.

“आता पुढची पायरी. बोर्डात जाऊन मॅट्रिकचं सर्टिफिकेट बदलून घ्यायचं.” – सुभाष.

“त्याला किती वेळ लागणार आहे?” – बबन. त्याच्या डोक्यात अजून प्रकाश पडत नव्हता की हे नक्की काय चाललंय ते. त्याला भीती वाटत होती की प्रोसीजर करता करता क्लेम करण्याची वेळ निघून जायची. त्यांनी ही भीती सुभाष जवळ बोलून दाखवली.

“आपल्याला हवा तसा माणूस मिळाला तर लवकर होईल काम, नाही तर बोर्डाची जी टाइम फ्रेम ठरली आहे, त्या  प्रमाणे. पण आता बबनराव तुम्ही अपडेट द्या. काय काय नवीन घडामोडी झाल्या आहेत?” – सुभाष.

एका नवीन कुटुंबाचा शोध लागला आहे. कारवारचे परांजपे.” – बबन.

“आता हे परांजपे कोण? आणि गोखल्यांशी काय संबंध त्यांचा?” – सुभाष.

गोखल्यांचे पूर्वज विश्वनाथ, जे गोकर्णला जाऊन स्थायिक झाले, त्यांची एक पाती म्हणजे गोकर्णचे लक्ष्मण, दुसरी पाती म्हणजे साताऱ्याचे विश्राम हे दोघेही गोखले. विश्वनाथरावांची मुलगी कावेरी, तिचं लग्न कारवारच्या परांजप्यांशी झालं. तिचे आता हयात असलेले वंशज म्हणजे त्र्यंबक परांजपे. वसंत परांजपे आणि गोविंद परांजपे. त्यापैकी वसंतरावांना  प्रॉपर्टी मधे इंट्रेस्ट नाहीये. त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक आहेत. त्र्यंबकराव आणि गोविंदराव हे कारवारला नसतात. त्यांच्याशी अजून संपर्क व्हायचा आहे. बहुधा निशांत आता त्यांनाच भेटायला जाईल. त्यानंतरच कळेल की त्यांना हिस्सा हवा आहे की नको.” बबनने संपूर्ण अहवाल एका दमात दिला.

“त्र्यंबकराव आणि गोविंदराव कुठे असतात हे कळलं का?” – सुभाष.

“हो, त्र्यंबकराव वाराणसीला आणि गोविंदराव नाशिकला.” – बबन.

“बबनराव तुमची मात्र कमाल आहे. एवढी सविस्तर माहिती तुम्ही मिळवता, तुमच्या कौशल्याचं कौतुक करायला पाहिजे.” – सुभाष.

“आमच्या सारंग सरांचं काम एकदम परफेक्ट असतं. मिळालेली माहिती, ते अगदी व्यवस्थित तारीख आणि वेळेसहित, फाइल मधे लिहून ठेवतात. पुढे मागे जरूर पडली तर व्यवस्थित संदर्भ उपलब्ध असतो, अशी त्यांची स्टाफला शिकवण असते. ती फाइल मीच रोज लावतो, आणि लावता लावता वाचतो, आणि त्यांची झेरॉक्स पण काढून घरी घेऊन जातो. माझ्या घरी सरांच्या सारखीच एक समांतर फाइल मी बनवली आहे, आणि रोज मी तिचा अभ्यास करत असतो.” बबन.

“वा, बबनराव मानलं तुम्हाला. तुम्ही सरांच्या तालमीत एकदम तयार झाले आहात. पण म्हणजे, यांचा अर्थ, आपल्या जवळ अजून वेळ आहे.” – सुभाष.

“हो, या नवीन लोकांच्या गाठी भेटी, सांगलीच्या सान्यांशी चर्चा, मग नागपूरच्या घराच्या पुनरुज्जीवनाचं काम, असं सगळं विचारात घेतलं तर आपल्याला किमान सहा महीने मिळायला हरकत नाही. पण सुभाष मला इतक्या तातडीने बोलावून घेण्याचं कारण तर तू अजून सांगीतलंच नाही? – बबन

“हां कारण हे आहे, की बोर्डाच्या कामाला वेळ लागू शकतो, आत्ता तुम्ही सांगीतल्या मुळे वेळेची चिंता मिटली आहे, पण बरेच हेलपाटे पडू शकतात, आधीच माझ्या खूप सुट्ट्या झाल्या आहेत, त्यात मला भर घालायची नाहीये, नोकरी गेली तर माझे हाल कुत्रा पण खाणार नाही. तेल गेलं, तूप गेलं आणि हाती राहीलं धुपाटणं अशी अवस्था होईल. मला समजत नाहीये की काय करावं, म्हणून तुम्हाला बोलावलं. आता सांगा यातून कसा मार्ग काढायचा ते.” – सुभाष.  

सुभाषला  सल्ला देण्या इतकी बबनची क्षमता नव्हती. तो म्हणाला “ मी काय सांगू? तुम्हीच कामातून थोडा वेळ काढून एखादी चक्कर मारत जा. महापालिका आणि बोर्डाचं ऑफिस जवळ जवळच आहेत.” – बबन.

‘ते सर्व ठीक आहे हो, पण इतक्यातल्या इतक्यात माझ्या बऱ्याच सुट्ट्या झाल्या, बडे बाबू त्या दिवशी म्हणाले की “आता सुट्ट्या नको, तुमचं काम चांगलं आहे म्हणून मी सांभाळून घेतलं इतके दिवस, पण आता नाही. तुमचं पाहून बाकीचे पण तसेच वागायला लागले आहेत. मला माझ्या डिपार्टमेंटची शिस्त बिघडू द्यायची नाहीये. तेंव्हा आता फक्त कामाचा विचार करा.” ते असं निर्वाणीचं बोलल्याने माझा नाईलाज झाला आहे. आणि चकरा मारल्या शिवाय बोर्डाचं काम होत नाही, मग काय करायचं?” – सुभाष.

“ठीक आहे, मला डिटेल्स द्या, मला जसं जमेल, तशी मी चौकशी करून येत जाईन. मग तर झालं? – बबनने आश्वासन दिलं. सुभाषने समाधानाने मान डोलावली, म्हणाला, “आता मी एक दिवस जाऊन रीतसर अर्ज देऊन येतो. त्या अर्जाची पडताळणी  झाल्यावर मग फी भरायला सांगतील. मग फी भरल्यावर काम सुरू होऊन जाईल. आता वेळ किती लागेल, ते रांगे मधे किती अर्ज आहेत त्यावर अवलंबून आहे.”- सुभाष

“बापरे म्हणजे या कामांमध्ये दीड ते दोन महीने निघून जातील असं दिसतंय. आता हे झाल्यावर अजून पुढे काही करायचं बाकी आहे का?” – बबन.

“हे सर्टिफिकेट मिळालं की हे बेसिक डॉक्युमेंट होणार आहे. यांच्या आधारावर विद्यापीठात दुरुस्ती करायची मग डिग्री वर जे नाव आहे त्यात करायची. त्यानंतर महापालिकेत हाच सर्व प्रकार करायचा. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण होईल. मगच दुसऱ्याला हात घालायचा.” – सुभाष.

“बापरे, दुसरं वर्तुळ अजून बाकीच आहे म्हणता? ते कोणचं?” – बबन म्हणाला.  आता बबनला फक्त वेड लागायचंच शिल्लक होतं. तो बावचळल्या सारखा सुभाष कडे पहातच राहिला.

“बबनराव अहो असे काय बघता आहात माझ्या कडे? सर्व होऊन जाईल. फक्त वेळ लागेल, आणि आत्ताच तुम्ही सांगितलं की आपल्याजवळ वेळ आहे म्हणून. मग उगाच चिंता करू नका.” – सुभाष.

“तुम्ही दुसरं वर्तुळ म्हणता, ते कोणचं?” – बबन.

“तो एक अभ्यास आहे. अविनाश गोखलयांबद्दल. ते सैन्यात कुठल्या दलात होते, कुठे होते, वातावरण काय होतं ते गायब का झाले? या सगळ्यांचा छडा लागला पाहिजे. त्याशिवाय सारंग सरांच्या सरबत्तीला तोंड देता येणार नाही. पण तुम्ही काळजी करू नका. मी ते सर्व जमवून आणेन” – सुभाष. मग थोडं अवांतर बोलून दोघेही आपापल्या घरी पांगले.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com