Avivahit Aai - 3 in Marathi Motivational Stories by manasvi Manu books and stories PDF | अविवाहित आई - 3

Featured Books
Categories
Share

अविवाहित आई - 3

भाग ३ 


अजित रावांच्या आलिशान ऑफिसमध्ये असलेल्या केबिनमध्ये बाहेरच्या गजबजाटाचा एकही आवाज पोहोचत नव्हता. अनघा समोरच्या लेदरच्या खुर्चीवर बसली होती, तिचे पाय उत्साहाने हलत होते. तिने काही दिवसांपासून प्लॅन केलेल्या माऊंट अबूच्या सहलीची बातमी बाबांना सांगण्यासाठी ती आत आली होती. तिच्या डोळ्यांत स्वप्नांची चमक होती.


"कोण, कोण जाणार आहे, तुझ्यासोबत?" अजित रावांनी फाईलवरची नजर न हटवता प्रश्न विचारला. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणेच थंड आणि शिस्तबद्ध होता, ज्याने अनघाच्या उत्साहावर नकळत विरजण पडले.

"बाबा, माझा पूर्ण ग्रूप जाणार आहे. वैभवी, सौम्या, तरुण, किशोर, अमोल आणि मी," अनघाने शांतपणे पण आत्मविश्वासाने माहिती दिली.

अनघा सगळ्यांची नावं घेते, तेव्हा अजित राव एक महत्त्वाची फाईल बघत असतात. पण ती नावं ऐकताच ते पटकन डोकं वर करतात. त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची सूक्ष्म कडक नजर असते. "तो अमोल? तो तर तुझ्या कॉलेजला नाही ना? मग तो कसा काय तुमच्या ग्रूपमध्ये आला?"

अनघाला बाबांच्या प्रश्नातील उपरोध समजला. तिने एक दीर्घ श्वास घेतला. "अहो बाबा! असं काय करताय? आम्ही सगळे एकत्रच लहानाचे मोठे झालो आहोत ना! तो तर त्याला UPSC द्यायची होती म्हणून आमच्यापासून थोडा वेळ वेगळा झाला होता. आणि बाबा, त्याने आता UPSC क्रॅक केली आहे! त्याला IPS व्हायचं आहे. ट्रेनिंगसाठी हैद्राबादला जावं लागणार आहे म्हणून आम्ही सगळे मिळून हा प्लॅन केला आहे, शेवटची एकत्र सहल म्हणून."

अजित रावांनी खुर्ची मागे सरकवली आणि ते अनघाकडे तिरस्काराने पाहू लागले. "तो कितीही हुशार असला तरीही, शेवटी तो एक शासकीय नोकरच असणार आहे ना, अनघा? तू ज्या वातावरणात राहतेस, ज्या संपत्तीच्या आणि प्रतिष्ठेच्या वलयात वाढली आहेस, ते हे लोक कधीच मिळवू शकणार नाहीत. या दोन जगांमध्ये एक मोठी दरी आहे—एक 'डिफरेन्स' आहे. तुला हा फरक कधी कळेल? अशा लोकांशी मैत्री करून तू स्वतःचीच पातळी खाली का आणतेयस?"

अजित रावांचे हे कडक शब्द ऐकून अनघाच्या अंगाचा तिळपापड झाला. तिने खुर्चीवरून उठून ताडकन उभे राहिले. तिचे हात रागाने थरथरत होते. "बाबा, याआधीसुद्धा आपण या विषयावर अनेकदा बोललो आहोत. मी तुम्हाला माझ्या भावना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आज मला उमजलंय की मी तुम्हाला कधीच समजावू शकणार नाही, म्हणूनच या विषयावर न बोललेलेच चांगले. मी फक्त एक सज्ञान मुलगी म्हणून तुम्हाला सांगायला आले आहे की मी माझ्या मित्रांसोबत सहलीला जात आहे."

"ओके... गो, एन्जॉय युअर लाईफ," अजित राव पुन्हा आपल्या कामात मग्न झाले. "तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर होऊन जातील. बाकीच्या गोष्टींची काळजी करण्याची मला गरज वाटत नाही."

अजित रावांची ही वागणूक अनघाच्या मनाला खोलवर जखम करून गेली. ती तिथून बाहेर पडली, पण तिच्या चेहऱ्यावरचे हास्य हरवले होते. माऊंट अबूची सहा दिवसांची सहल ती निभावून गेली, पण प्रत्येक क्षणाला तिला वडिलांचे ते कडक शब्द आठवत होते. डोंगरांच्या कुशीत, मित्रांच्या हास्यात तिने थोडा वेळ विरंगुळा शोधला. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द तिने त्या सहलीतून गोळा केली.

परंतु, सहलीवरून परत आल्यानंतर जणू आयुष्याचा वेग बदलला. अमोलला ट्रेनिंगचे लेटर आले आणि तो हैद्राबादला निघून गेला. सौम्या आणि किशोरने लग्नाची गाठ बांधली आणि किशोर वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यात बिझी झाला. वैभवी आणि तरुण आपापल्या करिअरच्या वाटेवर पुढे निघून गेले. अनघानेही वडिलांच्या इच्छेनुसार आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षेनुसार एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत मार्केटिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारली.

सगळे आपापल्या आयुष्यात सेटल झाले होते. तीन महिने सहज सरकले. ऑफिसचे टार्गेट्स, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स आणि क्लायंट्सच्या मागण्या पूर्ण करताना अनघाला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. ती एका यंत्रासारखी काम करत होती. तिचे घर आता केवळ निजण्याचे ठिकाण उरले होते.

एक दिवस संध्याकाळी, अनघा ऑफिसमधून घरी आली. दिवसभराच्या कामाचा ताण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ती खूप थकली होती, पण ती थकावट शारीरिक नसून मानसिक होती. ती कोणाशीही न बोलता सरळ आपल्या खोलीत गेली आणि दरवाजा लावून घेतला.

मीना ताईंना, ज्या या घरात अनघाच्या सर्वात जवळ होत्या, तिचं असं वागणं जरा विचित्र वाटलं. सहसा आल्या आल्या ती सर्वांशी दोन शब्द बोलायची, पण आज ती थेट खोलीत शिरली. मीना ताईंना तिची काळजी वाटली. त्यांनी स्वयंपाकघरातून बाहेर येऊन अनघाच्या खोलीचा दरवाजा वाजवला.

"अनघा... बाळा, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला?"

आतला शांततेचा आवाज ऐकून मीना ताईंनी हळूच दरवाजा उघडला. खोलीत अंधार होता, फक्त खिडकीतून येणारा थोडा प्रकाश दिसत होता. अनघा बेडवर, तोंडावर पांघरूण घेऊन कोलमडलेली होती. मीना ताई तिच्या जवळ गेल्या, बेडच्या कडेला बसल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागल्या.

"अनघा... काय झालं बाळा? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला का? तू शांत का आहेस? काही होतंय का तुला? जेवलीस का तू?"

अनघाने तोंड वर न करताच उत्तर दिलं. तिचे शब्द हुंदक्यांनी अडखळत होते. "आत्या... मला खरंच बरं वाटत नाहीये. खूप गळल्यासारखं वाटतंय. डोकं इतकं जड झालंय की जणू काही अफाट ओझं माझ्या खांद्यावर आहे. मला थोडा वेळ झोपू दे, कदाचित उठल्यावर बरं वाटेल."

"अगं, पण काही खाऊन तरी घेतलं असतं ना? तू सकाळपासून बाहेर आहेस," मीना ताईंनी आर्जव केले.

"नको आत्या... सध्या काही नको. मला फक्त थोडा वेळ एकटं सोड. बरं वाटलं की मी स्वतः खाली येते," अनघा तशीच पांघरुणात तोंड लपवून बोलली. तिची ही अवस्था पाहून मीना ताईंचे मन हेलावले. त्यांना जाणवले की हे फक्त शारीरिक आजारपण नाही, तर तिच्या आत कुठेतरी काहीतरी तुटलंय.

"बरं... तू झोप. मी खाली जाते, तुला हवं तेव्हा आवाज दे," मीना ताई इतकं बोलून बाहेर निघाल्या आणि त्यांनी बाहेरून हलकेच दरवाजा लावून घेतला.

मीना ताई खोलीबाहेर पडल्या खऱ्या, पण त्यांच्या कानावर आतून येणारा एक अस्पष्ट आवाज पडला. तो आवाज होता अनघाच्या रडण्याचा. ती ओक्साबोक्सा रडत होती. तिचे ते रडणे, तिचे ते एकटेपण आणि तिच्या मनात साचलेलं ते दुःख... हे सगळं ऐकायला तिथे कोणीच नव्हतं. अजित राव आपल्या कामात व्यस्त होते, जग आपल्या गतीने धावत होतं, पण अनघा मात्र त्या आलिशान घराच्या एका खोलीत आपल्याच आयुष्यातील एका मोठ्या शून्याशी झुंजत होती. तिने जे काही कमावले होते—पद, प्रतिष्ठा, करिअर—ते सगळं तिला आज फोल वाटत होतं. ज्या समाधानासाठी तिने मित्रांना आणि स्वतःच्या आनंदाला थोडं बाजूला केलं होतं, ते समाधान आज कोठेच नव्हतं.

तिच्या रडण्याचा आवाज खोलीच्या भिंतींना छेदून बाहेर पडत होता, पण तो कोणाच्याही हृदयापर्यंत पोहोचत नव्हता. अनघा पुन्हा एकदा एकाकी पडली होती—एका अशा वळणावर, जिथे तिला समजून घेणारं कोणीही नव्हतं.

क्रमशः