तोतया वारसदार
पात्र रचना
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
रोहन - सौमित्रचा मुलगा
चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर
भाग ५३
भाग ५२ वरून पुढे वाचा....
“उद्या आपण इथल्या पटवारीला जाऊन भेटू. त्यांच्याकडे जमिनीवरचे सर्व जूने, नवीन उतारे असतात. बघूया काही शोध लागतोय का ते.” – निशांत.
“ब्रीलीयंट आयडिया. वा निशांत, तू खरंच डिटेक्टिव आहेस, हे सिद्ध झालं आहे. पण हा पटवारी कुठे भेटेल?” रोहन.
“ते काय, चार लोकांत चौकशी केल्यावर त्याची माहिती मिळून जाईल.” – निशांत.
“चला म्हणजे आता मिशन पटवारी. गुड.” – रोहन.
दुसऱ्या दिवशी हॉटेल सोडतांना त्यांनी वेळणेश्वराच्या पटवाऱ्या विषयी चौकशी केली.
“वेळणेश्वर हे गुहागर तहासिलीच्या अंतर्गत येतं, त्यामुळे पटवारी गुहागरलाच बसत असेल.” – रीसेप्शन वरचा माणूस.
दोघ गुहागरला पोचले तेंव्हा १२ वाजले होते. मग त्यांनी ठरवलं की आधी जेवून घ्यावं, तहसील ऑफिस मधे किती वेळ जाईल यांचा अंदाज बांधणं कठीण होतं.
वेळणेश्वर च्या पटवारी बद्दल चौकशी केली तेंव्हा एका माणसाने सांगितलं की “ ते वेळणेश्वरला नाना परब यांच्या शेतावर मोज माप करायला गेले आहेत. यांची वरात वेळणेश्वरला. वेळणेश्वरला गेल्यावर विचारत विचारत, नाना परबांच्या शेतावर पोचले, त्यांना गाडी सोडून देऊन, चांगले ३-४ किलोमीटर पायपीट करावी लागली. शेतावर सामसूम होती. दूर कोणी तरी शेतात दिसलं. अख्ख शेत तुडवत ते त्या माणसाजवळ गेले.
“हे नाना परबांचं शेत हे आहे न?” – निशांत.
“हो. काय काम आहे.?” – माणूस.
आम्हाला पटवारी साहेबांना भेटायचं होतं. ते शेतात भेटतील असं आम्हाला सांगितलं होतं. इथे तर कोणीच दिसत नाहीयेत.” – निशांत.
“नाना आणि त्यांचा धाकला भाऊ सदाशिव यांच्यात बेबनाव झाला, पटवारी साहेब, त्यांच्यात सलोखा करण्यासाठी आले होते. ते सगळे गेले आता.” – माणूस.
“गेले? कुठे गेले? आमची भेट कशी होईल आता? काम अर्जंट होतं. पार गुहागर वरुन आलो आम्ही, खास त्यांना भेटायला.” – निशांत.
नानांच्या घरी बैठक चालू आहे. तिथेच भेटतील.” – माणूस.
“आणि नानांचं घर कुठे आहे?” – निशांत.
वेळणेश्वरला” त्या माणसाने मग घराचा पत्ता दिला. संपूर्णं दोन तीन शेत तुडवत पाऊण तासाने निशांत आणि रोहन गाडी जवळ पोचले. सॉलिड वैतागले होते. पण इलाज नव्हता, वेळणेश्वरला नानांच्या घरी पोचल्यावर, घराच्या ओसरीवर काही माणसं बसलेली दिसली. रोहन खुश झाला, म्हणाला “ मीटिंग अजून चालू आहे असं वाटतं. चला एकदाचे पटवारी साहेब भेटले.”
“नाना परबांचं घर हेच का?” – निशांत.
“मीच नाना, काय काम आहे?”
“आम्ही तुमच्या शेतावर गेलो होतो, तिथे तुमच्या माणसाने सांगितलं की पटवारी साहेब तुमच्या घरी आहेत, म्हणून आम्ही त्यांना भेटायला इथे आलो आहे.” – निशांत.
“पटवारी साहेब आले होते, पण काम झालं आणि ते गेले.” – नाना
“आता कुठे गेले ते?” रोहन. तो जाम वैतागला होता. पण निशांत शांत होता.
“गुहागरलाच, तहसील ऑफिस मधे भेटतील तुम्हाला जर तुम्ही लगेच निघाला तर. कारण त्यांना जाऊन अर्धा तासच झाला आहे.” – नाना
रोहनला खूप भूक लागली होती, पण वेळणेश्वर मधे एकही धड दुकान नव्हतं. त्यामुळे तो विचार सोडून द्यावा लागला.
गुहागर तहसील ऑफिस मधे निशांत आणि रोहन पोचले तेंव्हा संध्याकाळचे साडे पांच, पावणे सहा वाजले होते. समोरच्याच टेबल वर असलेल्या माणसाला त्यांनी विचारलं की वेळणेशवरचे पटवारी साहेब कुठे बसतात. त्याने तिसऱ्या टेबल कडे अंगुली निर्देश केला. तिथे बसलेल्या माणसाला बघून निशांत सर्दच झाला. हा तोच माणूस होता ज्याने पटवारी शेतावर गेल्याचं सकाळी सांगितलं होतं. रोहन सॉलिड चिडला, त्याला अश्या व्यवहाराची सवय नव्हती. तो म्हणाला इंग्लंड मधे अशी बदमाशी कोणी केली असती तर त्याला जबर शिक्षा झाली असती.” निशांतनी त्याला शांत केलं. म्हणाला “चिडून काही फायदा नाहीये, काम आपलं आहे. जरा धिराने घे.”
“वेळणेशवरचे पटवारी साहेब आपणच का?” – निशांत.
“हो, पण आता सहा वाजले आहेत आणि ऑफिसची वेळ संपली आहे. तुम्ही उद्या या आता मी घरी निघालो आहे.” पटवारी.
त्याचं उर्मट पणाचं उत्तर ऐकून रोहन भयंकर चिडला, तो संतांपून काही बोलणार होता, पण निशांतनी त्याला थांबवलं. निशांतनी शांतपणे खिशातून मनी पर्स काढली, त्यातून ५०० रुपयांची नोट काढून पटवाऱ्याच्या शर्टाच्या खिशात टाकली. पटवारी दचकला. त्याला वाटलं, अॅंटी करपशन ची माणसं आहेत. तो घाबरला. त्याने नोट काढली आणि निशांतच्या हातात वापस देत म्हणाला,
“हा काय प्रकार आहे साहेब, मी स्वच्छ माणूस आहे, असे पैसे वगैरे मी घेत नसतो. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. तुम्ही मला अटक करायला आला आहात का?” – पटवारी.
“नाही, पण सकाळी तुम्ही आम्हाला जी गोटी दिली त्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा हे आम्हाला समजलंय. हे पैसे घ्या आणि आमचं अर्जंट काम आहे ते करून द्या.” निशांत जरा चढया आवाजात बोलला.
“तुम्ही खरे कोण आहात? काय काम आहे तुमचं?” – पटवारी थोडा नरमला होता.
“आम्हाला सखारामपंत गोखल्यांचा पत्ता हवा आहे. आणि तुम्ही तो नक्कीच देऊ शकता.” – निशांत.
“कोण सखाराम गोखले?” – पटवारी.
मग निशांतने सांगीतले की “२०० वर्षा पूर्वी सखारामपंत गोखले इथे राहत होते, त्यांच्या ७-१२ च्या उताऱ्यावर तुम्हाला त्यांच्या वाडीचा पत्ता मिळेल. तो आम्हाला पाहिजे आहे.” आणि हे बोलता बोलता त्याने अजून एक ५०० ची नोट पटवाऱ्याच्या हातात कोंबली.
पटवाऱ्याला समजेना की हे पैसे घ्यायचे की नाही म्हणायचं, त्याने त्या दोन्ही नोटा टेबल वर ठेवल्या, म्हणाला, “हे ठेवा तुम्ही, मी असलं काम करत नाही.” आणि आत जाऊन एक जुने रजिस्टर घेऊन आला. थोडा वेळ बघितल्यावर म्हणाला, तुमच्या सखारामपंतांच शेत नसेल कदाचित, कारण यात कुठेही नाव नाहीये. पण मला सांगा, तुम्ही पोलिस नाही?” – पटवारी.
“नाही, आम्ही पोलिस नाही, आम्ही तसं म्हंटलं पण नाही. तुम्हीच गैरसमज करून घेतला, मग आम्ही काय करणार?” – रोहन.
“बापरे मी केवढा घाबरलो. पण आता ठीक आहे.” – पटवारी
“अहो, जर या रजिस्टर मधे नाव नाहीये, तर दुसऱ्या रजिस्टर मधे असेल.”- निशांत.
“नाही, जर त्यांचं शेत नसेल, तर या रजिस्टर मधे त्यांच नाव सापडणार नाही, ते आपल्याला भूमी अभिलेखचं रजिस्टर बघावं लागेल. पण आत्ता ते लोकं घरी गेले असतील, तुम्ही थोडं थांबत असाल, तर मी बघून येतो, जर कोणी अजून असेल, तर आपल्याला आत्ताच मिळून जाईल. तुम्ही बसा थोडा वेळ.” असं म्हणू तो बाहेर गेला.
अर्धा तास निशांत आणि रोहन चुळबुळत बसून होते. दोघांनाही खूप भूक लागली होती, पण थांबणं आवश्यक होतं. उद्या पुन्हा पटवारी सापडेल की नाही ही शंका होतीच.
अर्ध्या तासानंतर पटवारी आला आणि त्याच्या हातात एक कागद होता, त्यावर त्याने पत्ता लिहून आणला होता. काम झालं होतं. पटवारी साहेबांचे आभार मानून दोघंही तिथून निघाले. गुहागरला काही खायला मिळतं का ते बघितलं पण मना सारखं काही दिसेना, तेंव्हा निशांत म्हणाला, “आपण आत्ता चिपळूणला जाऊ, आणि उद्या सकाळी येऊन पत्ता शोधू. आता पत्ता हातात आलेला असल्याने काळजी नाही.” रोहनला पण ते पटलं आणि ते चिपळूणच्या वाटेला लागले. दुसऱ्या दिवशी लवकरच नाश्ता आटोपून वेळणेश्वर ला निघाले.
“त्या घरात सध्या कोणी राहात असेल का?” – रोहन.
“कोण जाणे, गेल्यावरच कळेल. तो जर दिनकररावांचा वंशज असेल, तर आपलं काम झालं, दुसराच कोणी असेल, तर मात्र मामला अवघड आहे.” – निशांत.
“आपला स्टँड काय असणार आहे, जो कोणी असेल, त्यांच्याशी बोलतांना?” – रोहन.
निशांतनी उत्तर नाही दिलं. काय स्टँड घ्यायचा याचाच तो पण विचार करत होता.
गाडी दिलेल्या पत्त्यावर पोचली. निशांत आणि रोहन बाहेर उभं राहून घराचं निरीक्षण करत होते. घर व्यवस्थितच होतं. दोघांचेही चेहरे एकदम उजळले. घरावर पाटी होती, रहाण्याची आणि जेवण्याची उत्तम घरगुती व्यवस्था. काय स्टँड घ्यायचा हा प्रश्न सुटला होता. ते असे उभे असतांना बहुधा घरातून कोणीतरी त्यांना पाहीलं आणि तो गृहस्थ बाहेर आला.
“नमस्कार, मी चंद्रकांत गोखले, या न आत या, आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे. अगदी उत्तम. तुम्हाला नक्की आवडेल.”
निशांत आणि रोहनने हसून मान डोलावली आणि ते चंद्रकांत च्या मागोमाग घरात शिरले. सगळे बसल्यावर चंद्रकांत ने आपल्या इथे कशी उत्तम व्यवस्था आहे, आणि असं असून सुद्धा वातावरण कसं घरगुती आहे, याचं रसभरीत वर्णन केलं. तो त्यांच्या व्यवसायाचा भाग असल्याने ते अगदी सराईता सारखे बोलत होते. निशांत आणि रोहन माना डोलावत होते आणि अधून मधून चौकशी केल्यासारखं दिसावं म्हणू थोडे प्रश्न विचारात होते. रूम वगैरे बघून झाल्यावर निशांत म्हणाला की त्यांना सर्व व्यवस्था आवडली आहे आणि एक दोन दिवस तिथे राहायला आवडेल.
“मग मंडळींना केंव्हा घेऊन येता? त्यांना सुद्धा बघू द्या इथली व्यवस्था.” -चंद्रकांत
“नाही, आमचं लग्न झालेलं नाहीये, आम्हीच दोघं आहोत, तुम्हाला चालेल?- रोहन
“न चालायला काय झालं? सामान आणता न? या आत, तुम्ही खोल्या सिलेक्ट करा.” चंद्रकांत गोखले म्हणाले.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com