तोतया वारसदार भाग 72 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तोतया वारसदार भाग 72

Featured Books
Categories
Share

तोतया वारसदार भाग 72

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

 

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

 

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

 

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

 

      

भाग  ७२                       

भाग ७१  वरुन पुढे वाचा .......   

 

दोन दिवस झाल्यावर सारंग सर संध्याकाळी वाड्यावर आले. सर्व एकदा नजरेखालून घातल्यावर, म्हणाले,

“आता दोनच दिवस राहिले आहेत. लोकं यायला सुरवात होईल. कोण कोण केंव्हा येणार आहेत याचा सर्व प्रोग्राम तुमच्या जवळ आहे ना?” – सारंग.

“हो सर सर्व इन्फॉर्मेशन आम्हाला नयना मॅडमनी दिली आहे. १० गाड्या २४ तास तयार आहेत. कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. तुम्ही निश्चिंत रहा. आज रात्री पासून नयना मॅडम आणि विनय सर इथेच राहायला येणार आहेत.” मॅनेजरने खात्री दिली. 

सारंग सरांनी समाधानाने मान डोलावली आणि ते निघाले.

निशांतच्या फ्लॅट वर पोहोचल्यावर, आढावा बैठकीला सुरवात झाली.

“तुम्ही दोघं काय आज पासून वाड्यावरच मुक्कामाला जाणार आहात असं मॅनेजर म्हणत होता.” – सारंग सर.

“हो सर, म्हणजे कसलीही त्रुटि राहणार नाही यांची काळजी घेतल्या जाईल. विनयचीच आयडिया आहे ही. आणि मला पण पटलं.” – नयना.

“ओके. मला पण पटली तुमची आयडिया. बरं निशांत तुझ्या साठी एक काम आहे. उद्याचा दिवस मोकळा ठेव.” – सारंग सर.

“मी मोकळाच आहे. सांगा काही राहिलं आहे का?” – निशांत.

“सांगतो. येणाऱ्या प्रत्येक सदस्याची थोडक्यात माहिती लिहून काढ. आमच्या ऑफिस मधला कम्प्युटर वापर. आमचा ढवळे या कामात एक्स्पर्ट आहे, त्यांची मदत घे. कम्प्युटरवर श्री लिपी इंस्टॉल केलेली आहे. साधारण एक ते दीड पॅराग्राफ होईल इतकी माहिती दे. चांगला फॉन्ट वापर आणि एक छान परिचय पत्र प्रत्येक सदस्याचं तयार कर. आपल्याकडे इंक जेट प्रिंटर आहे, त्यावर प्रिंट काढ. इतकं झालं की जेवढे लोकं येणार आहेत तेवढ्या झेरॉक्स प्रती काढ. हा बंच आपण प्रत्येकाला देऊ, म्हणजे प्रत्येका कडे सर्वांची माहिती हातासरशी असेल. जमेल ना?” – सारंग सर.

“हो सर नक्कीच जमेल. माझ्याकडे सर्वांची माहिती आहेच. ब्रीलीयंट आयडिया आहे सर. उद्या संध्याकाळ पर्यन्त सर्वच पेपर तुमच्या हातात ठेवतो. सुभाषचं पण काढतो, म्हणजे बबनला संशय येणार नाही.” – निशांत.

“परफेक्ट. सुभाषचं पण तयार कर.” – सारंग.

“अरे हो, सुभाषची कुंडली काढायला सांगितली होती, त्याचं काय झालं?” – सारंग सर.

“एकदम स्वच्छ माणूस आहे सर. आज पर्यन्त एकही पैसा खाल्याचा त्याचा इतिहास नाहीये. तुम्हाला सांगितल्या प्रमाणे तो खरंच छोट्या छोट्या समाजकार्यात गुंतला आहे. तो तुम्हाला म्हणाला होता, की त्याला पैसा मिळाला तर  त्याच्या कार्याला  वेग येईल,  सर, ते अगदी खरं आहे. त्याला स्वत:साठी नको पण समाज कार्या साठी पैसा हवा आहे. आणि हे त्याने देणग्या मागतांना लोकांना सांगीतलं पण आहे.  त्याच्या सचोटी बद्दल बऱ्याच जणांनी ग्वाही दिली आहे. पण असा स्वच्छ चारित्र्याचा माणूस या सापळ्यात कसा अडकला हे समजत नाही.”– निशांत.

“हूं, असं जर असेल, तर बबनच यात खरा गुन्हेगार आहे. त्यालाच पैश्यांचा मोह पडला, आणि त्याने सुभाषचं मन वळवलं, आणि सुभाष फसला.” – सारंग.

दुसऱ्या दिवशी दिवसभर निशांत परिचय पत्राच्या कामात बिझी होता. संध्याकाळी त्याने सारंग सरांना सर्व बंच दाखवले.

“ठीक आहे छान काम केलं आहेस. आता उद्या हे सर्व विनयला नेऊन दे. तो देईल सर्वांना हे परिचय पत्रक.” – सारंग म्हणाला, “बरं, ट्रेन  ने कोणी येणार आहे का?”

“नाही सर सर्वच फ्लाइटने येणार आहेत. सर्वांनी नागपूरला केंव्हा पोचणार आहेत, त्याच्या वेळा पण कळवल्या आहेत. फक्त काही आठ तारखेला आणि काही नऊ तारखेला असे येणार आहेत. त्या त्या वेळेस नावांचे फलक घेऊन ड्रायव्हर लोकं उभे असणार आहेत, आणि विनय आणि मी जातीने एयरपोर्ट वर हजर राहणार आहोत.”– निशांत

“तुम्ही जाणार आहात हे फार चांगलं केल. बरं एक सांगायचं राहिलं, कानपूर वरुन सुधाकर गोखले सुद्धा सहकुटुंब येणार आहेत. मी त्यांना स्पेशल बोलावणं केलं होतं. ते नऊ तारखेला दिल्लीहून विमानाने येत आहेत. त्यांची सुद्धा व्यवस्था करायची आहे.” – सारंग

“होऊन जाईल. नो वरीज” – निशांत.

दूसरा दिवस धावपळीचाच असणार होता. सकाळी सकाळी नऊ वाजता विनय आणि निशांत एयरपोर्ट वर पोचले. दिवसभर सर्वच फ्लाइट मधून पाहुणे आले. निशांत आणि विनयने त्यांचं स्वागत केलं आणि वाड्यावर पाठवलं. वाड्यावर नयनाने सगळ्यांचं गुलाबांचं फूल देऊन स्वागत केलं. आल्या आल्या चहा, कॉफी आणि नाश्ता तयार होता, तो दिला. स्वत:ची ओळख करून दिली, आणि सर्वांना एक एक परिचय पुस्तिका दिल्या. सर्वांच्या खोल्यांचे अलॉटमेंट आधीच करून झालं होतं त्यानुसार पाहुण्यांचं सामान त्यांच्या खोल्यांमध्ये पोचवण्यात आलं. नयनाने सर्वांची ओळख करून घेतली. ती दिवसभर भिंगरी सारखी नुसती फिरत होती. तिचं रूप आणि तिच्या स्विफ्ट हालचालींचा सर्वांनाच मोह पडला. आलेल्या पाहुण्यांसाठी २४ तास सेवा उपलब्ध होती. मंडळी नुसती एंजॉय करत होती. खाणं पिणं आणि गप्पा टप्पा सतत चालू होतं. आता सर्वांच्याच परस्परांशी ओळखी झाल्या होत्या. सर्व खुश होते. दोन दिवस असाच धुमाकूळ चालला होता. नयनाने  त्यांच्या मनोरंजनासाठी निरनिराळे खेळ योजले होते, आणि आश्चर्याची बाब म्हणजे सर्व आपापलं वय विसरून खेळात सामील झाले होते. निशांत दिवसभर वाड्यांवरच असायचा. रात्री सर्व झोपल्यावर मग तो घरी जायचा. निशांतला सर्वच ओळखत होते, नयना त्याची सख्खी बहीण आहे हे कळल्यावर नयना त्यांच्या गळ्यातली ताईत बनली. सारंग सर ११ तारखे पर्यन्त येऊ शकणार नव्हते, त्यामुळे सर्वांचा जरा विरस झाला, पण हायकोर्टात एका महत्वाच्या केस ची सुनावणी असल्याने त्यांना वेळ काढणं  शक्य होणार नाही हे निशांतने सांगीतले, आणि हे ही सांगीतलं की अकरा  तारखे पासून पूर्णं वेळ ते आपल्या सोबतच राहणार आहेत म्हणून. मग सर्वांचं समाधान झालं.

८,९ आणि १० असे तीन दिवस सगळे जण आपापली कामं आणि वय विसरून नुसती धमाल मस्ती करत होते. दिवस केंव्हा उगवला आणि मावळला केंव्हा हे सुद्धा कळत नव्हतं. शेवटी वसुधाबाईंना म्हणजे लक्ष्मणच्या आईला आवाज चढवून सांगावं लागलं की आता खाण्या  पिण्यावर सर्वांनी कंट्रोल ठेवा. तब्येती बिघडल्या तर या परक्या गावात पंचाईत होईल. तेंव्हा कुठे खाण्या पिण्यावर थोडा चाप बसला.  

११ तारखेला सकाळी सारंग प्रशांत आणि किरीट तिघंही आले. आल्यावर सर्वांनी आपला परिचय करून दिला. आता आठ  दिवस आम्ही जाऊन येऊन असू. आमचा मुख्य उद्देश तुम्हा सर्वांची गांठ भेट घालून देणं हाच आहे. काहीही अडचण किंवा जरूर भासल्यास, नयना आणि निशांत फूल टाइम तुमच्या बरोबर आहेत. निशांतला तुम्ही ओळखताच. ज्या कुशल पद्धतीने त्याने आम्हाला पडलेला वारसदारांचा प्रश्न सोडवला, त्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. माझ्या या मताशी तुम्ही सर्व सहमत असालंच. एक वेळ त्याच्या साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.” सारंग थांबला. टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. मग सारंग सरांनी पुन्हा बोलायला सुरवात केली.

“निशांतची बहीण नयना, तिने सुद्धा आपलं काम अगदी चोख केलं आहे. जेंव्हा आम्ही तिला हे कॉंट्रॅक्ट दिलं तेंव्हा आम्हाला त्यांच नातं माहिती सुद्धा नव्हतं ते निशांत इथे आल्यावरच कळलं. तुम्हाला जशी परिचय पुस्तिका दिली आहे तशीच पण अगदी त्रोटक अशी माहिती आम्ही दिली होती. स्वत:ची बुद्धी वापरुन तिने जे इंटेरियर केलं आहे ते आमच्या मते अप्रतिम आहे. आणि तुमच्या आवडी निवडी लक्षात घेऊन, जी खाण्या पिण्या ची व्यवस्था केली आहे, त्याला तोंड नाहीये. अर्थात या कामा मधे तिला विनयची उत्तम साथ मिळाली आहे हे पण मला नमूद करायलाच पाहिजे. तिच्या आणि विनय साठी पण एकदा जोरदार टाळ्या पडू द्या.” – सारंग.

पुन्हा एकदा टाळ्यांचा  गजर झाला.

“आता मी मुख्य विषयाकडे वळतो. तुम्ही सर्वांनी वंशावळी आणि इतिहास पाहीलाच आहे. पण त्यातल्या रिकाम्या जागा निशांतने भरून काढल्या. मी निशांतला विनंती करतो की त्याने त्यांच्या कामाचा गोषवारा सर्वांना सांगावा.” – सारंग.

मग निशांतनी अथ पासून इति पर्यन्त सर्व घटना सारांश रूपात सांगितल्या.

मग सारंग सर पुन्हा उभे राहिले.

“या सर्व घडामोडी घडत असतांना एक सुभाष गोखले नावाच्या माणसाने इस्टेटी वर क्लेम ठोकला आहे. ”सारंग सरांनी पुन्हा बोलायला सुरवात केली. “आम्हाला संशय आहे की हा माणूस खोटा आहे. पण त्याने त्यांच्या बाजूने सर्व कागद पत्र पुराव्या सहित बिनतोड सादर केली आहेत. त्याला जवळ जवळ खात्रीच आहे की इस्टेट त्यालाच मिळणार म्हणून. आता मी त्याला उद्या सकाळी  इथेच बोलावणार आहे. आम्ही तिघं, ट्रस्टी या नात्याने त्यांची कसून चौकशी करणार आहोत. त्यावेळेस तुम्ही सर्व गोखले मंडळीनी हजर असावं अशी आमची इच्छा आहे.’ – सारंग.

“हा माणूस खोटा आहे हे तुम्ही कसं सिद्ध करणार आहात.” – व्यंकटेश.

“काही पुरावे निशांतने गोळा  केले आहेत. उद्या तो काय स्टँड घेतो, यावर बरचसं अवलंबून आहे.” – सारंग सर म्हणाले. “पण याला एक पदर अजून आहे. तो म्हणजे, सुभाष एक अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे. महापालिकेत नोकरी करतो, पण आजवर एकही पैसा खाल्ला नाहीये. फावल्या वेळात तो सामाजिक कार्यात गुंतला आहे. पदरमोड आणि ज्या काही छोट्या मोठ्या देणग्या मिळतात  त्यांच्यावर त्याचं हे कार्य चालतं. क्लेम करण्यामागे त्याचा केवळ एकच उद्देश आहे, की वाढीव पैशाने जास्त लोकांना त्याचा लाभ देता येईल. या सर्वांची शहानिशा निशांतने केली आहे. त्याला बबनने म्हणजे आमच्या प्यून ने आपल्या जाळ्यात ओढलं. मी जी गोखल्यांची फाइल बनवली होती ती बबनने वाचली आणि त्याचं डोकं फिरलं. हे सुद्धा निशांत मुळेच कळलं. पण क्लेम साठी सुभाषने ज्या काही लटपटी केल्या आहेत, तो अपराध आहे, त्यामुळे त्याला सोडता येणार नाही.” – सारंग सरांनी मग त्याने काय काय करामती केल्या त्याचा सर्व तपशील सांगीतला.

“माय गॉड, मग आता सारंग सर तुमची काय योजना आहे?” – व्यंकटेश.

“उद्या त्याचा आणि आमचा सामना रंगणार आहे. तुम्ही सर्व हजर असणारच आहात.

 

 क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com