Complicated Love in Marathi Love Stories by Adv Nikhil Deore books and stories PDF | Complicated Love - 7

Featured Books
Categories
Share

Complicated Love - 7

भाग 6 वरून पुढे 


अदितीने गाडीचा वेग वाढवत ईशांतच्या गाडीचा  पाठलाग करायला सुरवात केली. ईशांत भरघाव वेगाने जीवाची कसलीही पर्वा न करता त्या तरुणाचा पाठलाग करीत होता. नागमोळी वळणे, लोकांचा गर्दीप्रवाह याला तुफान वेगाने मागे टाकत ईशांत त्या तरुणाला पकडण्याचा अतोनात प्रयत्न करीत होता. त्याची भुवया आकसून तीक्ष्ण झालेली नजर क्रोधाच्या आगठिणग्या बरसवीत होती. अदितीच्या स्कुटीनेही जोर धरला होता. वाऱ्याच्या झोतामुळे तिचे रेशमी केस अस्तव्यस्त होऊन तोंडावर जमा झाले होते. स्कुटीच्या हॅण्डलला पकडलेल्या  तिच्या गोऱ्यापान हातावर सकाळचे बारीकसे दवाचे थेंब साचले होते. आपली नजर रोखून ती ईशांतच्या मागावर होती. त्या तरुणाची दुचाकी एका पडक्या कारखान्याजवळ थांबली. मागून येणाऱ्या अर्जुनला पाहताच  त्या पडक्या कारखान्यात तो जिवाच्या आकांतानं धावू लागला होता . अर्जुननेही  आपली दुचाकी पडक्या कारखान्याबाहेर  लावून त्या तरुणाला पकडण्यासाठी कंबर कसली. तो तरुण जिवाच्या आकांतान धावत होता. अर्जुनही आपली सर्व शक्ती  एकवटून त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होता. अदिती हे सर्व दृश्य पडक्या कारखान्यात लपून पाहत होती. शेवटी अर्जुनने त्या तरुणाला एकाजागी पकडले आणी खड्या आवाजात विचारू लागला.
" सांग भारतात  अवैध्य अस्त्र शस्त्र तस्करी कुठून केली जातात.  नक्की कुठल्या कुठल्या  शहरात या तस्करीचे केंद्र आहे ?" 
त्या तरुणाच्या चेहऱ्यावर नकारात्मक विजयी हास्य होत. आपली नजर अर्जुनवर फिरवून तो म्हणाला 
" नाही सांगणार..जे करायचं ते करून घे " त्याच्या कठोर स्वरलहरी समग्र कारखान्यात घुमल्या. 
" नाही सांगणार ...." अर्जुनने आपल्याजवळ असलेली बंदूक त्याच्या कपाळावर ठेवून म्हणाला 
" आता ....तर सांगावंच लागेल  आणी जर नसेलच सांगणार तर मग  मरायला तयार हो.तसंही मी  कुणालाच मारायला एका क्षणाचाही विलंब  करीत नाही " त्या तरुणाचा चेहरा भीतीने काळानिळा झाला होता. शरीर घामाने ओलेचिंब झाले होते. अतिशय भयभीत स्वरात तो म्हणाला 
" तिरुअनंतपुरम...अवैध अस्त्र शस्त्र सोबतच चंदन तस्करीचा मुख्य केंद्र बिंदू म्हणजे तिरुअनंतपुरम. तेथूनच मोठ्या प्रमाणात ह्या सर्व तस्करी भारतभर चालतात.पण तू  आहेस तरी कोण ? आणी का आमच्या सर्वांच्या मागे लागला आहेस?" 
" मी कोण आहे हे महत्वाचं नाही..आता तू शांतपणे झोप घे .तुझं काम झालंय  " अर्जूनने बंदुकीचा खटका दाबताच त्या तरुणाची वेदनामय  किंकाळी त्या कारखान्यात सर्वदूर घुमली. रक्ताच्या चिरकांड्या सर्वत्र पसरल्या आणी क्षणार्धातच त्या तरुणाने प्राण सोडले. अदितीने हे सर्व हृदयविकारक  दृश्य पाहताच तिच्या तोंडून आपोआप भीतीची किंचाळी बाहेर पडली. अर्जुनची 
विस्फारलेली नजर त्या आवाजाच्या दिशेने घिरट्या घालू लागली होती आणी  बंदूक आपोआपच तिच्यावर रोखली गेली 
" कोण आहेस तू  ? का पाठलाग करत आहे माझा ? गुपचूप इथून निघून जा आणी  इथे जे घडलंय त्याची कुठेही  वाच्यता करू नकोस. तू तर रेल्वेस्टेशनवर भेटली होतीस ना मला?" ईशांतने एकापाठोपाठ एक  प्रश्न विचारले.
" तू माझ्यावर बंदूक उगारलीस ईशांत आणी हा काय अवतार करून ठेवला आहेस स्वतःचा.? का लोकांचे जीव घेतोयस तू ?" शांत स्वरात अदिती म्हणाली 
" एक मिनिट तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी ईशांत नाही अर्जुन आहे ...अर्जुन सरनाईक" चिडक्या स्वरात ईशांत म्हणाला. 
" तू सर्व जगाला मूर्ख बनवू शकतोस पण मला मूर्ख बनवणं अशक्य आहे ईशांत..तुझे हे बोलके डोळे सर्व काही सांगून जातात मला " तिच्या मृदू स्वरात ओतप्रोत असलेले प्रेम होते.
अदितीच्या सर्व गोष्टी ऐकुन अर्जुन काहीसा स्थिर झाला . का कोण जाणे पण तिच्या गोष्टीत काहीतरी तथ्य वाटत होत त्याला . त्याच स्वतःबरोबर कधीही एकरूप न होणाऱ्या  प्रश्नाचं  उत्तर फक्त हीच देऊ शकेल असा भाबडा विश्वास त्याला होता. बंदूक खाली ठेवत तो म्हणाला 
" मी ईशांत आहे ?" 
" हो .. स्वतःच नाव पहिल्यांदा ऐकल्यासारखा का करतोय आणी हे नक्की काय लोकांचे प्राण घेण्याचा  उद्योग चालवलेस तू ..हे सर्व गौरीला  माहित आहे का ?" 
" गौरी....कोण आहे ही गौरी ? " ईशांतच्या मनात  प्रश्नांचे निखारे पेटले होते. 
" अरे तुझी प्रेयसी जिच्याबरोबर तू लग्न करणार होतास. ह्या सर्व गोष्टी पहिल्यांदा ऐकल्यासारखा का करतोस तू आणी गौरी आहे तरी कुठे. मला भेटायचंय तिला".  भुवया उंचावून अदिती म्हणाली 
" मला वाटतंय तुझा  नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय मी अर्जुन आहे ...अर्जुन सरनाईक" आवाज  चढवून अर्जुन म्हणाला. 
" अर्जुन सरनाईक कसं शक्य आहे...तू ईशांतच आहे "
" काय ईशांत....मग तू कोण आहेस ?" 
" म्हणजे तू मला विसरलास बरोबर आहे म्हणा आता तू विसरणारस ना " नाक मुरडून गाल फुगवून अदिती म्हणाली.
" चल मी निघते आता तुझ्याशी बोलण्यातही काही अर्थ नाही. काम झाल्यावर सर्वजण विसरतातच म्हणा त्यात तुझी तरी काय चूक ". अदिती रागातच तेथून निघाली. 
" हे थांब थांब जाऊ नकोस मला बोलायचं आहे तुझ्याशी. निदान तुझं नाव तरी सांगून जा "विनंती करीत अर्जुन म्हणाला. 
" मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही ईशांत आणी स्वतःची खोटी ओळख सांगायची तर जराही गरज नाही. यापुढे कधीही  मी तुला भेटण्याचा साधा  प्रयत्नही करणार नाही Good Bye" अदिती पाय आपटत तेथून निघून जायला लागली. अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करणार एवढ्यात कारखान्याच्या बाहेर काळ्या रंगाच्या कार मध्ये अजिक्य आणी प्रतापराव देसाई त्याला बसून  दिसले. खुणेनेच त्याला बोलावत होते.कुणाचातरी  खूण केल्यावर परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन अर्जनही लगेचच कार मध्ये जाऊन बसला. 
' गौरी ,ईशांत , अर्जुन या  त्रिकोणात नक्की आपली  बाजू तरी कुठली असावी ? ...गौरी हे नाव ऐकल्यावर मनात   न सांगता येणाऱ्या भावनेचा गुंजराव तरी का  होतोय?..का  हे नाव आपल आपलंस वाटतंय?. का या नावात मनाच्या गाभाऱ्याला रेखीव स्वरूप देण्याचं सामर्थ्य आहे? ..ती मुलगी तरी कोण असावी ?' ईशांतच्या मनात प्रश्नाच्या लाटा  ऊसडल्या होत्या पण त्या लाटा अजूनही सुप्तावस्थेतच होत्या. त्याला विराट स्वरूप अजून आलं नव्हतं. 
' आपल्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे ती मुलगी  देऊ शकते पण नक्की ती भेटणार तरी कुठे तिने तर स्वतःच नावही सांगितलं नाही " अर्जुन स्वतःशीच बोलत होता. 

       ' समजतो तरी कोण तो स्वतःला ? ओळख दाखवण्यासाठीही केवढा भाव खात होता. म्हणे  अर्जुन आहे मी. जर नाहीच बोलायचं तर सरळ सांगायचं ना कि बोलायची इच्छा नाही म्हणून कश्याला खोटं बोलायचं..पण त्याने माझ्यासमोर कुणाचातरी खूण केला होता. ईशांत असं कधी करूच शकत नाही .नक्की काय चाललंय हे तो जर खरंच अर्जुन असेल तर...पण तो तर हुबेहूब ईशांत सारखाच दिसत होता .काही प्रश्नांची उत्तरे त्याला भेटल्याशिवाय मिळणारच  नाही. त्याची लवकर भेट व्हायला हवी ' अदिती मनाशीच हितगुज करीत होती. 

----------------------------------------------------------------------

वाळवंटात उत्खणनाचे कार्य सुरु होते. बरीच रात्र झाल्यामुळे उत्खणन  करणारा एक गट झोपी गेला होता. तेथूनच काही अंतरावर निर्मनुष्य, निर्जन स्थळी निशब्द शांततेत अग्नीज्वाळा भडकल्या होत्या. सुवासिक अगरबत्ती शिलगावून ध्यानाच्या उच्चस्तरात असलेल्या साधूने आपले नेत्र उघडले 
" जी गोष्ट शोधण्यासाठी तू हे उत्खणन करीत आहे.त्याला वापरण्याची शक्ती तुझ्यात नाहीच. मनुष्याचा जन्मवेळ , जन्मनक्षत्र तसेच शरीरातील काही सुप्तअवयव त्याला काही शक्ती बहाल करतात. जी गोष्ट तू शोधत आहे त्याला प्राप्त करूनही तू ती  वापरू शकणार नाहीस. हे गाडले गेलेले सप्तसूर फक्त तीच वापरू शकते. तिच्यातच ती योग्यता आहे .पौराणिक कथेत नक्कीच याबद्दल काही नमूद करून ठेवले असेल आधी त्याचा संदर्भ घ्यावा लागेल " 
" पण तिला शोधाचय  तर कसं ?" 
" तीला कुठेही लपवून ठेवलं असेल तरीही मी शोधून  तुला देईल ...तू फक्त माझ्या आदेशाच  पालन कर .कलियुगातला त्रिकालदर्शी म्हणतात मला " .

क्रमश ...

तुमचा  अभिप्राय नक्की येऊ  द्या ही कथा कशी वाटत आहे