काळ्या एसयूव्हीच्या मागच्या सीटवर कमालीची शांतता पसरली होती...
बाहेर मुसळधार पाऊस गाडीच्या काचांवर आदळत होता , जणू निसर्गही बाहेर घडणाऱ्या वादळाची साक्ष देत होता...
पण गाडीच्या आतलं वातावरण त्या वादळापेक्षाही जास्त भयानक आणि गुदमरवून टाकणारं होतं... गाडी वेगाने धावत होती , आणि काव्याच्या हातातील फॉरेन्सिक किट थरथरत होती..
लवकर कर... माझ्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाही,.. रुद्रचा आवाज पुन्हा एकदा त्या बंद गाडीत घुमला...
त्याचा आवाज इतका थंड होता की काव्याच्या पाठीवरून एक थंड शिरशिरी धावून गेली...
काव्याने स्वतःचे थरथरणारे हात एकत्र जोडले आणि दीर्घ श्वास घेतला.. ती एक फॉरेन्सिक सायंटिस्ट होती.. तिने आजवर अनेक मृतदेह पाहिले होते , रक्ताचे पाट पाहिले होते ,
पण साक्षात मृत्यू तिच्या शेजारी बसून तिच्यावर हुकूम सोडेल , अशी कल्पना तिने कधीच केली नव्हती.... तिने किटमधून अँटीसेप्टिक लिक्विड , कापूस , सुई आणि धागा बाहेर काढला...
रुद्रने त्याचा काळा कोट आधीच काढून बाजूला ठेवला होता... त्याच्या पांढऱ्या शर्टाची डावी बाही रक्ताने पूर्णपणे लाल झाली होती... काव्याने हळूच त्याची बाही वर केली.. हातावर एक खोल जखम होती , जी कदाचित एखाद्या धारदार सुऱ्याने किंवा काचेने झाली असावी... रक्ताची धार अजूनही थांबली नव्हती...
हे... हे खूप खोल आहे... मला आधी हे स्वच्छ करावं लागेल... खूप वेदना होतील... काव्या म्हणाली , तिचा आवाज नकळत कापत होता...
तसे रुद्रने तिच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकली... त्याचे काळेभोर , खोल डोळे तिच्या चेहऱ्यावर खिळले होते..
तू तुझा विचार कर.. मला वेदना जाणवून बरीच वर्ष झाली आहेत....तो बोलला
तसे काव्याने कापूस अँटीसेप्टिकमध्ये भिजवला आणि त्याच्या जखमेवर ठेवला... औषध लागताच कोणाचाही जीव व्याकुळ झाला असता , पण रुद्रच्या चेहऱ्यावरच्या एका रेषेमध्येही बदल झाला नाही... त्याचे जबडे थोडे घट्ट झाले , बस... त्याची ही सहनशक्ती पाहून काव्याला धक्काच बसला... हा माणूस हाडामांसाचा आहे की दगडाचा , असा प्रश्न तिला पडला...
ती जखम शिवू लागली... तेवढ्यात गाडी एका वळणावर अचानक वेगाने फिरली , ज्यामुळे काव्याचा तोल गेला आणि ती थेट रुद्रच्या छातीवर जाऊन पडली...
तिचा चेहरा त्याच्या मानेच्या अगदी जवळ आला.. तिच्या हातातील सुई त्याच्या त्वचेला स्पर्श करून गेली.. क्षणभर दोघांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळले... रुद्रचा शरीराचा वास—महागडा परफ्युम , सिगारेटचा धूर आणि ताज्या रक्ताचा वास—काव्याच्या नाकात शिरला...
तसे तिने घाबरून वर पाहिले...
रुद्रचे डोळे अगदी जवळून अधिक भयानक आणि गडद दिसत होते... त्याने एका हाताने काव्याचा गळा हलकेच पकडला... त्याची पकड घट्ट नव्हती , पण ती एक चेतावणी होती...
जर तुझा हात पुन्हा घसरला , तर ही सुई मी तुझ्या गळ्यात आरपार करेन...तो अगदी हळू आवाजात तिच्या ओठांच्या जवळ येऊन म्हणाला...
त्याच्या श्वासाची उष्णता काव्याला तिच्या गालावर जाणवली...
मला... मला गाडीच्या गतीने धक्का लागला..काव्या अडखळत म्हणाली आणि घाईघाईने मागे सरकली...
तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि उरलेली जखम शिवून पूर्ण केली....तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते...
पट्टी बांधून संपताच रुद्रने तिचे हात झटकले आणि आपली बाही खाली केली...त्याच क्षणी त्याचा फोन व्हायब्रेट झाला...त्याने लगेच फोन रिसिव्ह करून कानाला लावला...
बोल... पलीकडून रुद्रचा उजवा हात असलेल्या एका माणसाचा घाबरलेला आवाज आला...
भाई , गोदामावर पोलीस पोहोचले आहेत... सावंत नावाचा इन्स्पेक्टर त्या त्रिशूळाच्या कार्डाचा तपास करतोय... आणि दुसरी वाईट बातमी... शेट्टीच्या माणसांना समजलंय की तुम्ही जखमी आहात... आपल्याच गँगमधल्या कोणीतरी माहिती लीक केली आहे.... तो व्यक्ती बोलला
रुद्रचे डोळे क्रोधाने लाल झाले...त्याच्या हाताच्या मुठी इतक्या घट्ट आवळल्या गेल्या की नुकतेच शिवलेले टाके ताणले गेले...
त्या फितुराचा शोध घे... त्याला जिवंत ठेवायचं नाही... आणि सावंत... त्याला मी स्वतः बघून घेईन... रुद्र ने अतिशय रागातच सांगितले..
गाडी महालाकडे घे... हायवे सोडून मागच्या रस्त्याने घे..फोन ठेवताच रुद्रने ड्रायव्हरला आदेश दिला...
काव्या त्याच्या जवळ बसली असल्यामुळे तिने ते ऐकले होते आणि आता तिचे हृदय धास्तावले...
तिचे काका , इन्स्पेक्टर सावंत.. धोक्यात होते... आणि रुद्र तिला कुठे घेऊन जात होता...? हे समजत नव्हते तिला...
तुम्ही मला सोडणार होतात...मी तुमची जखम नीट केली आहे... मला जाऊ द्या...ती गाडीच्या दरवाजाचं हँडल ओढू लागली...
रुद्रने झटकन तिचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे खेचले... त्याची पकड यावेळी अत्यंत क्रूर होती...
तुला काय वाटलं..? तू माझा चेहरा पाहिला आहेस , माझ्या गुन्ह्याचा पुरावा पाहिला आहेस , आणि मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करायला मोकळं सोडेन..? मी इतका मूर्ख दिसतो का..? तो रागातच बोलला
मी कोणाला काही सांगणार नाही..! शपथ घेते..! काव्याच्या डोळ्यात शेवटी अश्रू आले...
माफियाच्या जगात शपथांना किंमत नसते , काव्या,... तू आता माझ्यासाठी एक जिवंत पुरावा आहेस... आणि जोपर्यंत मला फितुराचा पत्ता लागत नाही , तोपर्यंत तू माझ्या नजरेसमोर राहशील.... रुद्र अत्यंत थंडपणे म्हणाला
तशी काव्या शांत च झाली...
गाडी शहराबाहेर एका टेकडीवर असलेल्या एका अवाढव्य , जुन्या पद्धतीच्या महालाच्या समोर थांबली.. तो महाल दिसायला जेवढा आलिशान होता , तेवढाच तो काळोखात बुडालेला आणि भयावह वाटत होता..
भोवताली उंच भिंती आणि काटेरी तारांचे कुंपण होते.. जणू तो एक सोन्याचा पिंजरा होता...
रुद्रने काव्याला गाडीतून बाहेर काढले... पाऊस अजूनही कोसळत होता... तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला , पण रुद्रने तिचा हात पकडून तिला फरफटत महालाच्या आत नेले... महालाचे मोठे लाकडी दरवाजे त्यांच्या मागे मोठ्या आवाजात बंद झाले , जणू तिच्या स्वातंत्र्याचे मार्ग कायमचे बंद झाले होते...
आत पूर्णपणे अंधार होता , फक्त काही जुने दिवे मिणमिणत होते...
रुद्रने तिला एका मोठ्या , रिकाम्या खोलीत ढकलले... तिथली खिडकी लोखंडी गजांनी बंद केलेली होती...
तशी काव्या जमिनीवर पडली आणि तिने रुद्रकडे पाहिले.. तो दारात उभा होता , त्याच्या पाठीमागे विजेचा कडकडाट झाला , ज्यामुळे त्याची सावली खोलीत लांब पडली... त्याच्या चेहऱ्यावर ना कोणती दया होती , ना कोणती भावना... त्याच्यासाठी काव्या फक्त एक वस्तू होती , जी त्याने त्याच्या सुरक्षेसाठी जप्त केली होती...
तुम्ही मला इथे कायमचं बंद नाही ठेवू शकत... माझे काका मला शोधून काढतील..,काव्याने जमिनीवरूनच त्याला आव्हान दिले...
रुद्र खोली बाहेर जात होता, पण तिचा आवाज ऐकताच त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिले...त्याच्या डोळ्यात कोणतीही प्रेमाची किंवा आकर्षणाची भावना नव्हती... तिथे फक्त एक क्रूर ताबा मिळवण्याची नशा होती...
तुझे काका इथे पोहोचण्याआधी कदाचित त्यांचा मृतदेह तुला पाहावा लागेल , काव्या सावंत... त्यामुळे शांत पडून राहा...
तुझा हा नवीन पत्ता आहे... आणि इथून बाहेर पडण्याचा रस्ता फक्त माझ्या परवानगीनेच मिळतो... रुद्र शांतपणे म्हणाला...
आणि त्याने दरवाजा धाडकन बंद केला...ज्याचा मोठा आवाज झाला आणि खोलीत पूर्ण अंधार पसरला...
काव्या त्या अंधारात एकटीच उरली होती... तिचे संपूर्ण शरीर भीतीने आणि थंडीने कापत होते... तिला समजले होते की ती एका साध्या गुन्हेगाराच्या तावडीत नाही , तर काळोखाच्या अशा राजाच्या विळख्यात अडकली आहे , ज्याच्या मनात दयेला कोणतीही जागा नाही...!!
To be continue... 😊
पार्ट वाचून कॉमेंट नक्की करा 👍
आणि पुढील पार्ट संताजी मला फॉलो करा 🥰