Sonsakhali - 1 in Marathi Moral Stories by Sane Guruji books and stories PDF | सोनसाखळी - 1

Featured Books
Categories
Share

सोनसाखळी - 1

सोनसाखळी - 1

बहीणभाऊ

पांडुरंग सदाशिव साने

मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यापेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते. मधूही आता मोठा झाला होता. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु एकाएकी त्याचे वडील वारले. वडील वारले व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती चार दिवस माहेरी आली होती. परंतु पुन्हा सासरी गेली. सारा कारभार मधूच्या अंगावर पडला. परंतु त्याला अनेकांनी फसविले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादारांचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू, त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जेवत त्याला अन्न मिळेना. जो गाद्यागिर्द्यावर झोपायचा, त्याला रस्त्यावर निजावे लागे. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता. मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे. प्रथम बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता. तो स्वाभिमानी होता. "श्रीमंत बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसे जावयाचे? जिच्याकडे पूर्वी हत्तीघोड्यांवरुन गेलो, तिच्याकडे पायी कसे जावयाचे? जरीच्या पोषाखाने पूर्वी गेलो, तेथे फाटक्या चिध्यांनी कसे जावयाचे?" परंतु मधू मनात म्हणाला, "प्रेमाला पैशाअडक्याची पर्वा नाही, हिरेमाणकांची जरुर नाही. माझी बहीण का मला दूर लोटील? छे, शक्य नाही." मधू बहिणीकडे आला, दारात उभा राहिला. वरुन गच्चीतून बहीण बघत होती. मधूने वर पाहिले, परंतु बहीण आत निघून गेली. मधूला वाटले बहीण खाली भेटायला येत असेल. परंतु कोणी आले नाही. दरवाज्यावरील भय्याने विचारले, "कोण रे तू? येथे का उभा चोरासारखा? निघ येथून." मधू म्हणाला, "माझ्या बहिणीचा हा वाडा आहे. तिला आत सांगा, जा." नोकर हसला. परंतु घरात जाऊन परत आला. तो मधूला म्हणाला, "चला तिकडे गोठ्यात, तेथे तुम्हाला भाकरी आणून देतो. ती खा व जा." मधूने विचारले, "बहिणीने काय सांगितले?" नोकर म्हणाला, "बाईसाहेब म्हणाल्या, असेल कोणी भिकारी. बसवा गोठ्यात, द्या शिळी भाकरी." मधू गोठ्यात गेला. त्याच्या डोळ्यांतून पाणी आले. त्याला कोरडी भाकर देण्यात आली. मधूने तेथे एक खळगा खणला व त्यात ती भाकर पुरली. पाणीही न पिता तो तेथून निघून गेला. मधू दूर देशी गेला. तेथील राजाच्या पदरी तो नोकर राहिला. एकदा फार कठीण प्रसंग आला असता त्याच्या सल्ल्याने राजा वाचला. राजाने त्याला मुख्य प्रधान केले. मधूच्या सांगण्याप्रमाणे राजा वागे. नव्या प्रधानाची वाहवा होऊ लागली. मधूने आता विवाहही केला. तो मोठ्या बंगल्यात राहू लागला. आपल्या बहिणीला भेटावे असे मधूच्या मनात आले. पत्नीसह तो निघाला. बरोबर हत्ती होते. घोडे होते. थाटामाटाने निघाला. पुढे जासूद बहिणीला कळविण्यासाठी गेले. बहीण एकदम उठली. ती आपल्या पतीसह सामोरी गेली. चौघडे वाजत होते, शिंगे फुंकली जात होती. थाटामाटाने भाऊ बहिणीच्या घरी आला. दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती. गावातील मोठमोठ्यांना आमंत्रणे होती. चंदनाचे पाट होते. चांदीची ताटे होती. मोठा थाट होता. पंचपक्वान्ने होती. सारी मंडळी पाटावर बसली. आता जेवायला बसावयाचे. इतक्यात भाऊ एकाएकी उठला. सारे चकित झाले. "काय पाहिजे, काय हवे?" सारे विचारु लागले. परंतु मधू एकदम गोठ्यात गेला. तेथील ती जुनी मातीसारखी झालेली भाकर त्याने खणून काढली. मालती मधूला म्हणाली, "भाऊराया, हे काय वेड्यासारखे करतोस?" मधू म्हणाला, "ताई, तुझ्या भावाला बसायला गोठा व खायला शिळी भाकर हेच योग्य. हा आजचा थाटमाट भावासाठी नाही. हा सारा मान भावाच्या श्रीमंतीचा आहे. हे पैशाचे प्रेम आहे." मालतीच्या डोळ्यांत पाणी आले. ती मधूच्या पाया पडून म्हणाली, "भाऊ चुकले मी. तू बहिणीला क्षमा नाही करणार? पुन्हा उतणार नाही, मातणार नाही. प्रेमाला विसरणार नाही. भाऊ, क्षमा कर. घरात चल." मधूने मालतीचे डोळे पुसले. पुन्हा कधी मालतीने कोणाला तुच्छ मानले नाही. बाहेरची संपत्ती, ती आज आहे उद्या नाही. खरी संपत्ती हृदयाची. ती कधी गमावू नये असे ती साऱ्यांना आता सांगते. मधू व मालती दोघे बहीणभावंडे सुखी झाली तशी आपण सारी होऊ.

***