Ekach Pyala - 2 books and stories free download online pdf in Marathi

एकच प्याला - अंक दुसरा

एकच प्याला

(मराठी नाटक)

अंक दुसरा

साहित्यिक = राम गणेश गडकरी

अनुक्रमणिका

१.अंक दुसरा

१.१प्रवेश पहिला

१.२प्रवेश दुसरा

१.३प्रवेश तिसरा

***

अंक दुसरा

प्रवेश पहिला

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू व सुधाकर.)

सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे का आता बाहेर?

सुधाकर : अगं, जरूरीचं काम असल्याखेरीज का मी असा तातडीनं जात असेन? मला गेलंच पाहिजे आता! आणखी संध्याकाळी माझी फराळासाठी वाट पाहू नका.

सिंधू : मी आल्या दिवसापासून पाहते आहे, नेहमी रात्री फराळाला बाहेर असायचं; एक दोन का तीनच वेळा काय ते फराळाला घरी राहायचं झालं तेवढं! विचारू मी एक? फार दिवस माहेरी राहिले म्हणून रागबीग तर नाहीना आला? तसं असेल तर पदर पसरून भीक मागते.

(राग- मांड-जिल्हा; ताल- दादरा. चाल- कहा मानले.) स्थिरवा मना। दयाघना। विनतिसी या माना। होई पात्र न रोषा दीना। हृदयी करुणा आणा॥ ध्रु.॥ जाहला दोष मम करी चुकूनि काही। प्रेमला, क्षमा

तरि त्या करा। विनतिसी या माना॥ 1॥

सुधाकर : अगं, या सनदेच्या कामासाठी खटपट करायची असते तर चारचौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडावं लागतं असं सारखं! कुणाच्या तरी घरी फराळाचा होतोच आग्रह. काम सोडून फराळासाठी घरी तर उठून यायचं नाही! रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसावं लागतं आताशा! तेवढयावरून तुझा रागच मला आला आहे हे कसं ठरविलंस?

सिंधू : (रडत) मग बोलणं जरा असं त्रासिकपणाचं होतं, बाळाचं सुध्दा कोडकौतुक पुरविणं होत नाही!

सुधाकर : तुझ्याशी बोलणं मोठं पंचायतीचं काम आहे बुवा! किती वेळा सांगू की, माझं तुझ्यावर अगदी पहिल्यासारखं प्रेम आहे म्हणून! बाळाचं कोडकौतुक मी मनापासून- पण हे सांगायला तरी कशाला हवं! तुझं तुला दिसून येत नाही? बरं, आता रडू नकोस! उद्या मुदत संपून सनद मिळायची आहे- म्हणजे काम संपलंच म्हणायचं. जातो मी आता. उगीच काहीतरी तर्कवितर्क चालवायचे- त्यात स्वत:लाही त्रास आणि दुसर्‍यालाही त्रास! (स्वगत) रामलालनं तार करून एकदम बोलावून आणल्यामुळं हिला नसती काळजी वाटायला लागली आहे! हा रामलाल चांगला इंग्लंडला गेलेला. पण ही लढाई मध्येच मुळावर आल्यामुळं तसाच परतून आला. त्यामुळं ही नसती विवंचना माझ्यामागं लागली आहे. हा असा लपंडावच किती दिवस चालू ठेवायचा? (जातो.)

सिंधू : देवा, आता माझी सारी काळजी तुलाच!

(राग- तिलककामोद, ताल- एकताल. चाल- अब तो लाज.) प्रणतनाथ! रक्षि कान्त। करि तदीय असुख शांत॥ ध्रु.॥ अशुभा ज्या योजी दैव। पतिलागी, त्या सदैव। परिणभवी मंगलात॥ 1॥ (रामलाल व शरद् येतात.)

सिंधू : हे बघितलंस भाई? आताच जाणं झालं. रोजचंच सांगणं- कामासाठी जायचं आहे आणि फराळासाठी वाट पाहू नका!

रामलाल : काय चमत्कार आहे कळत नाही! सनद तूर्त रद्द झालेली आहे. हा पैशाबियशांच्या अडचणीत नाही ना? हो, कदाचित मानी स्वभावामुळे उघड करून नाही बोलायचा कुणाजवळ!

शरद् : छे:, ती अडचण मुळीच नाही. दादाची सनद गेली एवढं कळलं मात्र, त्या घटकेपासून वहिनीच्या वडिलांनी, दादा नको नको म्हणून लिही, तरी मोकळया मुठीनं पैसे पाठवायला सुरुवात केली आहे.

सिंधू : नाही रे भाई; पैशाची कसली अडचण? काही तरी वेडंवाकडं आहे- माझं मनच मला सांगत आहे! भाई, आता कसे रे करायचे? (रडू लागते.)

रामलाल : ताई, सिंधूताई, हे काय असं वेडयासारखं? तू चांगली शहाणी धीराची- अन् हे असं करायचं? धीर धर-

(राग- भीमपलासी; ताल- त्रिवट. चाल- बिरजमें धूम मचाई.) सचतुरे, धैर्यसदा सुखधाम। विपदि महा सकल पुरवी काम॥ ध्रु.॥ निजभजकांच्या विघ्नभंजनी। जणु दुसरे प्रभुनाम॥ 1॥

मी एक दोन दिवसांत बारकाईनं चौकशी करून खरं काय आहे ते शोधून काढतो. जा, ही शरद् बाळाला बाहेरून घेऊन आली आहे, त्याला नेऊन नीट निजीव; हं डोळे पूस! अगदी हसून खेळून राहिलं पाहिजे- नाही तर आपण नाही पडायचे या कामात! कशाला काही पत्ता नाही आणि उगीच रडत सुटणं म्हणजे काय झालं! जा त्याला घेऊन.

सिंधू : भाई, भाई तू काही म्हण पण-

(राग- जिल्हा मांड, ताल- कवाली. चाल- पिया मनसे.) दयाछाया घे निवारुनिया, प्रभु मजवरी कोपला॥ ध्रु.॥ जीवनासि मम आधार गुरु जो। तोहि कसा अजि लोपला॥ 1॥

रामलाल : शरद्, शरद्, जा बेटा. ताईची जरा समजूत घाल जा! तिला उगीच रडू देऊ नकोस! (शरद् जाते. रामलाल जाऊ लागतो.) (गीता येते.)

गीता : भाईसाहेब-

रामलाल : कोण? गीता, नव्हे? मला हाक मारली तुम्ही?

गीता : हो! अगदी निलाजरेपणानं हाक मारली! शरदिनीबाईप्रमाणं मलाही आपली मुलगीच म्हणा! भाईसाहेब, बाईसाहेबांचं आत्ताचं बोलणं मी ऐकलं आणि जीव कळवळून आला. अगदी बोलल्याखेरीज राहवेना म्हणून आपली धावत आले बघा, दादासाहेब काय करतात, कुठं जातात, कुणाबरोबर जातात, सारं मला माहीत आहे.

रामलाल : असं! काय-काय-काय करतात सांगा पाहू?

गीता : काय सांगायचं कपाळ! आताशा त्यांनी प्यायला सुरुवात केली आहे- (हळूच) दारू प्यायला!

रामलाल : काय, दारू? (नि:श्वास टाकून) रघुवीर! श्रीहरी!- गीताबाई, तुम्ही खात्रीनं म्हणता?

गीता : अहो, खात्री कसली? डोळयांदेखतच्या गोष्टीसारखी ही गोष्ट मला माहीत आहे! आमच्या घरातल्यांनीचदादासाहेबांना-

रामलाल : थांबा, इथं नका बोलू! सिंधूनं एखादा शब्द ऐकला तर ती आपल्या जिवाचा अनर्थापात करील! तुम्ही जरा बाहेर चला, अंमळ पलीकडे. सगळं माहीत असेल ते मला सांगा- चला. (स्वगत) अरेरे, चांडाळा दुर्दैवा काय केलंस हे?

(राग- बिलावल. ताल- त्रिवट. चाल- सुमरन कर.) वसुधातलरमणीयसुधाकर। व्यसनधनतिमिरी बुडविसी कैसा?॥ ध्रु.॥ सृजुनि जया परमेश सुखावे। नाशुनि ह्या, तुजसि मोद नृशंसा!॥ 1॥ (जातो. पडदा पडतो.)

प्रवेश दुसरा

(स्थळ: रस्ता. पात्रे: भगीरथ व रामलाल)

भगीरथ : (स्वगत) दारूपासून सुख नाही हे खरं; पण दु:खी जिवाला दारू सुखाचं स्वप्न तरी दाखविते खास! या पापपूर्ण संसारात कधी कधी दु:खाचा अर्क वाटेल त्या रीतीनं कोळून प्यावा लागतो, हेच खरं! संसार-संसार! परमेश्वरा! संसाराचा माझ्याइतका कडू अनुभव यापुढं कोणत्याही तरुणाच्या कपाळी लिहून ठेवू नकोस आणि ठेवायचाच असला तर त्या दुर्दैवी जिवाला आतल्या आत जाळण्यासाठी दीर्घायुष्य तरी देऊ नकोस!

(राग- खमाज; ताल- त्रिवट. चाल- सनक मुख विनुत.) प्रणय जरी भंगला। तरी नर जगता मुकला॥ ध्रु.॥ घोर निरयसम। त्यासी विकट जग। दीर्घ जीवित शापचि खर तयाला॥ 1॥ (रामलाल येतो.)

रामलाल : (स्वगत) यांच्याशी एकदम बोलायला सुरुवात केली आणि गीतानं सांगितलेलं खरं नसलं तर- नाही पण- तिचं म्हणणं हजार हिश्श्यांनी खोटं नाहीच! बाकी हे बोलायचं ठरल्यावर त्याला याच्याइतका योग्य मनुष्य मात्र गीतेनं सांगितलेल्या पाच-सातजणांपैकी एकही नाही! शिवाय याची माझी थोडीशी ओळखही आहेच! (उघड) नमस्कार भगीरथ!

भगीरथ : ओहो! कोण? डॉक्टरसाहेब? या! डॉक्टरसाहेब, तुम्ही परत आलात एवढं कळलं, पण परतण्याचं कारण नाही कळलं!

रामलाल : तुम्हाला माहीत असेलच की, प्रथम इंग्लंडात काही दिवस काढून शेवटच्या परीक्षेसाठी जर्मनीत जाण्याचा माझा विचार होता. पुढे ही लढाईची वावटळ सुरू झाली, तेव्हा साहजिकच जर्मनीत जाण्याचा बेत रद्द केला! चार सहा महिने इंग्लंडात काढले आणि आलो परत झालं.

भगीरथ : काय एक एक अडचणी असतात पाहा!

रामलाल : बरं, ते राहू द्या तूर्त! भगीरथ, मी तुमच्याकडे आलो आहे एका कामासाठी. हवापाण्याची प्रस्तावना केल्यावाचून एकदम सरळपणानं आणि मोकळया मनानं बोलायचं आहे ते बोलू का?

भगीरथ : अगदी खुशाल बोला!

रामलाल : पाहा, मग लपवाछपवी करू लागाल! नाही ना? बरं तर मग, आज संध्याकाळी आम्हालाही तुमच्या मंडळात दाखल करून घ्या! हं, चकित होऊ नका! मला सर्व काही ठाऊक आहे! तशी मला एकटयाला जायलासुध्दा हरकत नाही! पण माहीतगारामार्फत शिरकाव झालेला बरा! माझे एक-दोन मित्रही आहेत त्यात; पण संकोचामुळे कोणी कबूल व्हायचं नाही! तेव्हा सर्वांची विमानं वर चढल्यावरच गाठी पडलेल्या बर्‍या!

भगीरथ : डॉक्टरसाहेब, तुम्ही या पंथातले आहात? मला नाही खरं वाटत!

रामलाल : पूर्वी नव्हतो; पण परदेशगमन करून ही विद्या शिकून आलो झालं! तिकडच्या थंड प्रदेशात या भानगडीवाचून चालतच नाही. इथं आल्यापासून मनमोकळेपणानं घेण्याची जरा पंचाईत पडू लागली आहे; तेव्हा हा मार्ग हुडकून काढला! कराल ना एवढं काम!

भगीरथ : माझी काही हरकत नाही; पण तिथला एकंदर प्रकार कितपत रुचेल तुम्हाला-

रामलाल : न रुचायला काय झालं? अहो, हा चोरटेपणाचा तरी त्रास टळेल ना, मी म्हणतो!

भगीरथ : ठीक आहे, चला मग आताच!

रामलाल : अगदी सुरुवातीपासूनच नको! मंडळी रंगात आली म्हणजे गेलेलं बरं! म्हणजे दुसर्‍याला संकोच नाही, आपल्यालाही संकोच नाही!

भगीरथ : तसंच करू या! पण डॉक्टर, ही कल्पना नव्हती मला! थोडया नवलाची गोष्ट आहे!

रामलाल : वा:, नवल माझ्याबद्दल की तुमच्याबद्दल अधिक? तसं म्हटलं तर तुम्ही अगदी तरुण, शिवाय पदवीधर- पण तुम्ही-

भगीरथ : मी दुर्दैवाची दिशाभूल होऊन या आडवाटेला लागलो आहे! संसाराच्या सुरुवातीलाच माझा प्रेमभंग झालेला आहे. ज्या मुलीवर माझं प्रेम होतं, तिचं दुसर्‍याशी लग्न लागलं आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलो! पण जाऊ द्या. त्या कुळकथा सांगायला आपल्याला पुढं पुष्कळ वेळ सापडणार आहे. तूर्त आपल्या रस्त्याला लागू या!

रामलाल : चला. (दोघेही जातात.)

(पडदा पडतो.)

प्रवेश तिसरा

(स्थळ: आर्यमदिरामंडळ. पात्रे, तळीराम, भाऊसाहेब, बापूसाहेब, रावसाहेब, सोन्याबापू, मन्याबापू, जनूभाऊ, शास्त्री, खुदाबक्ष, मगनभाई, वगैरे वगैरे... हुसेन सर्वांना पेले भरून देत आहे. मंडळींचे खाणे चालले आहे.)

हुसेन : सुधाकरसाहेब- (पेला पुढे करतो.)

सुधाकर : हुसेन, मला नको आता!

शास्त्री : वा:, सुधाकर, नको म्हणजे काय गोष्ट आहे? घेतला पाहिजे!

सुधाकर : पण मला अगदी आटोकाट बेताची झाली आहे! आता पुरे!

खुदाबक्ष : नाही सुधाकर, मंडळींचा बेरंग होतो आहे!

बापूसाहेब : घ्याहो, सुधाकर! उद्या तुमची सनद तुम्हाला परत मिळणार आणि आज तुम्ही असं चोरटं काम चालविलं आहे?

रावसाहेब : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे- आणखी आमचं सांगणं मोडायचं? वा:, मग झालंच म्हणायचं.

सुधाकर : हं, आण बाबा तो पेला! आता मात्र हा शेवटचा हं! (पितो.)

शास्त्री : अहो, आम्ही तुमचे खरे मित्र आणि आमच्याबाहेर वागता तुम्ही? आम्ही तुमच्या आयत्यावेळी उपयोगी पडलो! आणि तुमचे दोस्त म्हणविणारे तुमची सनद गेल्यामुळं तुमची कुचेष्टा करायला लागले आणि सनद गेल्यामुळं तुम्ही दारू पिण्याला सुरुवात केली म्हणून गावभर तुमची निंदा करीत सुटले.

खुदाबक्ष : आता उद्या सनद सुरू होताच त्यांना जबाब द्या.!

सुधाकर : नुसता जबाब द्या! भर कचेरीत खेटरानं एकेकाची पूजा करतो. पाजी लोक!

तळीराम : नाही, नाही. दादासाहेब. उद्या त्या लोकांच्या नाकावर टिचून दारू पिऊनच कचेरीत हजर व्हा! घ्या खबर गुलामांची!

सुधाकर : हो, मी दारू पिऊन कचेरीत जाऊ शकतो! उद्या दारू पिऊन कचेरीत जातो आणि घेतो हातात पायातला! हिंमत आहे माझी!

जनूभाऊ : शाबास, जरूर दारू पिऊन जा!

रावसाहेब : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे- तुमच्या जिवासाठी जीव देऊ! दारू पिऊनच कचेरीत जा! मग सनद कायमची रद्द झाली तरी हरकत नाही! तुम्हाला वाटेल तितक्या आम्ही नोकर्‍या देऊ! हे घ्या वचन! तुम्हाला गरज पडेल त्या वेळी तुम्हाला वाटेल तेव्हढी मोठी नोकरी लावून देण्याचं मी तुम्हाला वचन देतो! भाऊसाहेब, बापूसाहेब. आपणही त्यांना वचन द्या. (सर्व सुधाकरला वचन देतात.)

शास्त्री : सुधाकर, आता माघार घ्यायची नाही!

सुधाकर : माघार घ्यायची मला हिंमत नाही! मी आता कचेरीत जायला तयार आहे!

खुदाबक्ष : बस्स, बस्स, शास्त्रीबुवा! आता असंच करायचं, की सर्वांनी उद्या कचेरीची वेळ होईपर्यंत असं सारखं पीतराहायचं आणि सुधाकराला तसाच कचेरीत पोहोचवायचा!

शास्त्री : पसंत आहे ही कल्पना!

तळीराम : हुसेन, दादासाहेबांना दे एक प्याला आणखी!

हुसेन : हा जी साहेब! (पेला देतो.)

सुधाकर : आता नको. मी बेशुध्द होईन!

जनूभाऊ : आम्ही जिवाला जीव देऊ तुमच्यासाठी! आम्ही पण बेशुध्द होऊ!

सुधाकर : नको, आता नको आहे. मला हिंमत आहे- मी पिऊ शकतो!

तळीराम : दादासाहेब, आता हा खास शेवटचा- हं, हा एकच प्याला! (सुधाकर पितो व गुंगत पडतो. सर्वांचे पेले तयार होतात. इतक्यात रामलाल व भगीरथ एका बाजूने येतात.)

रामलाल : (भगीरथास एकीकडे) हं भगीरथ, थोडा वेळ इथं बाजूला उभे राहू, आणि मंडळी जरा रंगात आली, की आपणही होऊ सामील!

भगीरथ : (रामलालास एकीकडे) आपल्याला यायला फार वेळ झाला आज!

मन्याबापू : (मोठयाने रडायला लागतो.) जनूभाऊ, अरे इकडे ये! (जनूभाऊच्या गळयाला मिठी मारून मोठयाने रडायला लागतो.)

जनूभाऊ : अरे, रडतोस का मन्याबापू असा!

मन्याबापू : मला जास्त चढली आहे!

जनूभाऊ : मग काय करू म्हणतोस?

मन्याबापू : मला आणखी पाज!

जनूभाऊ : हं ही घे. (मन्याबापू पितो व पुन्हा रडू लागतो.) अरे, आता का रडतोस?

मन्याबापू : मला जास्त चढत नाही!

जनूभाऊ : मग मर (जनूभाऊ स्वत: पितो.)

रामलाल : (भगीरथास एकीकडे) भगीरथ, पाहा या एकमेकांच्या लीला! आश्चर्याने माझ्याकडे पाहता भगीरथ? एका कार्यासाठी मघाशी तुमच्याजवळ खोटं बोललो त्याची मला क्षमा करा. मी मद्यपी नाही! माझ्या एका मित्राला- जो या शहराची केवळ शोभा- त्याला- सुधाकराला इथून परत नेण्यासाठी म्हणून मी तुमच्याबरोबर आलो. तुमची फसवणूक केली याबद्दल मला क्षमा करा.

मन्याबापू : दारू ही खराब चीज आहे! दारू ही भिकार वस्तू आहे. दारू ही वाईट गोष्ट आहे.

जनूभाऊ : मन्या! काय बडबडतो आहेस हे!

मन्याबापू : मी चळवळ करतो आहे! मद्यपाननिषेध करीत आहे.

जनूभाऊ : निषेध करू नकोस! मद्यपान कर!

मन्याबापू : दारू ही खराब चीज आहे, दारू हे मद्यपान आहे, दारू हा निषेध आहे, दारू ही चळवळ आहे!

जनूभाऊ : मन्या, मन्या, सांभाळ. भडकत चाललास!

मन्याबापू : दारू- आहे! दारू अशुध्द आहे!

जनूभाऊ : तीर्थोदकं च वन्हिश्च नान्यत: शुध्दिमर्हत:! वहातं पाणी किंवा अग्नी ही जात्या शुध्द असतात. दारूचा प्रचंड ओघ चारी खंडांत वाहतो आहे आणि तिच्या पोटी आग आहे. दारू दुहेरी शुध्द आहे. हे धर्मवचनावरून सिध्द होत आहे!

मन्याबापू : दारू अधर्म आहे. दारू धर्मबाह्य आहे!

जनूभाऊ : मद्यपानाला प्रायश्चित्तही आहे! रात्री दारू पिऊन सकाळी ब्राह्मणाला एक काशाचं भांडं दान केलं म्हणजे पाप राहात नाही! आता जर तोंड बंद केलं नाहीस, तर तुला प्रायश्चित्त भोगावं लागेल.

मन्याबापू : दारूमुळं आपापसात कलह माजतात-तंटे माजतात.

जनूभाऊ : मन्या! नरडं दाबून जीव घेईन आता. दारूमुळे जन्माची वैरं बंद होतात, दारूच्या दरबारात आग आणखी पाणी सलोख्यानं संसार करतात.

मन्याबापू : दारूमुळं मनुष्य असंबध्द बडबडू लागतो!

जनूभाऊ : साफ खोटं आहे! मी मघापासून असंबध्द बडबडतो आहे.

जनूभाऊ : तू मुळीच असंबध्द बडबडत नाहीस.

मन्याबापू : मी खरं बडबडतो आहे. दारू वाईट आहे, असं मी बडबडतो आहे!

जनूभाऊ : मुळीच नाही! दारू चांगली आहे, असं तू म्हणतो आहेस. दारू वाईट आहे, असं कबूल करतोस की नाही बोल?

मन्याबापू : नाही म्हणायचं तसं. दारू चांगली आहे!

शास्त्री : अरे, बोलण्याच्या गडबडीत तुम्ही आपल्या बाजू बदलून लढता आहात!

जनूभाऊ : असं का? ठीक आहे! चल मन्या, पुन्हा आपापल्या बाजू घेऊन पहिल्यापासून लढू! (एकमेकांच्या गळयात मिठया मारून थोडा वेळ दोघेही रडतात.)

रामलाल : भगीरथ, प्रेमभंगाचा ताप चुकविण्यासाठी, या गोठणीवर येऊन तुम्ही विसावा घेता? (सोन्याबापू रडू लागतो.)

खुदाबक्ष : का सोन्याबापू, तुम्ही का रडायला लागलात?

सोन्याबापू : दारूच्या सद्गुणांचं केवढं उदात्त चित्र हे! अरेरे, याचा फायदा घेऊन पुरुषांप्रमाणेच आमच्या स्त्रीवर्गाला आपली उन्नती करून घेता येत नाही, हे केवढं दुर्भाग्य आहे!

जनूभाऊ : सोन्याला कंठ फुटला वाटतं हा! या सुधारकांना प्रत्येक बाबतीत बायकांचे देव्हारे माजविण्याची मोठी हौस! कसला रे कपाळाचा स्त्रीवर्ग? यामुळेच या सुधारकांची चीड येते!

सोन्याबापू : खुदाबक्ष, अबलांचा अन्याय होतो आहे! तुम्ही अविंध आहात! यवन आहात! मुसलमान आहात! स्त्रीजातीचा काही अभिमान धरा!

खुदाबक्ष : बायकांना आत्मा नसतो!

जनूभाऊ : भले शाबास! खांसाहेब, खाशी खोड मोडलीत! बायकांचे चोचले माजविल्यामुळं या सुधारकांचा सारखा वीट येत चालला आहे! खरं की नाही शास्त्रीबुवा?

शास्त्री : नाही, माझा सुधारकांच्यावर कटाक्ष या मुद्दयावर नाही! सुधारणेच्या नावाखाली सुधारकांनी जो सावळागोंधळ मांडला आहे, धर्माचा जो उच्छाद मांडला आहे, तो आम्हाला नको आहे! सुधारणेचे नाव सांगून उद्या तुम्ही जर अपेयपान करू लागलात, अभक्ष्य भक्षण करू लागलात, सुधारक म्हणून मांसाहार करू लागलात- खुदाबक्ष, आज मटण शिजलं आहे चांगलं नाही?- तुम्ही जर खाण्यापिण्याचा ताळ सोडू लागलात, तर ते आम्हा जुन्या लोकांना कधी खपायचं नाही. मांसाहार कधी खपायचा नाही- अरे हुसेन, आणखी आण मटण ... थोडं. आगरकरांचा तिटकारा येतो तो या कारणानं! टिळकांबद्दल आम्हाला आदर वाटतो तो या कारणामुळं!

सोन्याबापू : मग टिळकांच्या गीतारहस्याबद्दल एवढी आरडाओरड का माजली आहे ती? (शास्त्री बुचकळयात पडतो.)

खुदाबक्ष : मी सांगतो त्याचं कारण. एरव्ही टिळकांच्याबद्दल आम्हाला आदर आहे; पण गीतारहस्यात टिळकांनी श्रीमंत शंकराचार्यांना छेडले आहे. त्यांनी आर्यधर्माच्या ऐन गड्डयाला हात घातला आहे! सनातनधर्माची ही हानी आहे, म्हणून ...

शास्त्री : भले शाबास (त्याच्या गळयाला मिठी मारतो.) खुदाबक्ष, आज तू सनातन आर्यधर्माची बाजू राखलीस! आज मी मुसलमान झालो! अरे, कोणी शेंडी उपटून ती हनवटीखाली चिकटवून मला दाढीदीक्षित करा! खुदाबक्ष, आज आपण पगडभाई झालो! (पगडयांची अदलाबदल करू लागतात.)

रामलाल : अरेरे, भगीरथ, संस्काराने पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू-मुसलमानांचं वैरसुध्दा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटतं. कुठं पवित्र योग्यतेचा गीतारहस्य ग्रंथ, कुठं श्रीशंकराचार्य, कुठं सनातनधर्म आणि कुठं हे रौरवातले कीटक! आगरकर आणखी टिळक या महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा! शूचिर्भूत ब्राह्मणांनासुध्दा संध्येच्या चोवीस नावांबरोबरच टिळक-आगरकर यांची नावं भरतीला घालावी, भगीरथ पाहा, या कंगालांचा किळसवाणा प्रकार! भगीरथ, भगीरथ, पुरे झाला हा प्रसंग!

भगीरथ : रोज सुरुवातीपासून यांच्याबरोबर पीत गेल्यामुळं हा सर्वस्वी निंद्य प्रकार माझ्या कधीही लक्षात आला नाही.

रामलाल : भगीरथ, पाहा या प्रेतांच्याकडे! यांच्याबरोबर तुम्ही दारू पिऊन बसता? हतभागी महाभागा, तू ताज्या रक्ताचा तरुण आहेस, तीव्र बुध्दीचा आहेस, थोर अंत:करणाचा आहेस, रोमारोमात जिवंत आहेस आणि म्हणूनच तुझ्यासाठी अंतरात्मा तळमळून मी बोलतो आहे. संसारात प्रेमभंग झाला म्हणून तू या दारूच्या व्यसनाकडे वळलास? एकोणीसशे मैल लांबीचा आणि अठराशे मैल रुंदीचा, नाना प्रकारच्या आपदांनी भरलेला, हजारो पीडांनी हैराण झालेला, तुझा स्वदेश तेहतीस कोटी केविलवाण्या किंकाळयांनी तुला हाका मारीत प्रेमभंगामुळं अनाठायी पडलेलं जीवित सार्थकी लावायला तुला दारूखेरीज दुसरा मार्गच सापडला नाही का? असल्या प्रेमभंगानं स्वार्थाच्या संसारातून तुला मोकळं केल्याबद्दल, तुझ्या जन्मभूमीची अशा अवनतकाली सेवा करायची तुला संधी दिल्याबद्दल भाग्यशाली भगीरथ, आनंदाच्या भरात परमेश्वराचे आभार मानायच्या ऐवजी तू वैतागून दारू प्यायला लागलास, आणखी या नरपशूंच्या पतित झालास? पवित्र आणखी प्रियतम गोष्टींना संकटकाली साहाय्य करण्याचं भाग्य पूर्वपुण्याई बळकट असल्याखेरीज प्राणिमात्रांना लाभत नाही. पतितांच्या उध्दारासाठी, साधूंच्या परित्राणासाठी वारंवार अवतार घेण्याचा मोह प्रत्यक्ष भगवंतालासुध्दा आवरत नाही. भगीरथ, दीन, हीन, पंगू, अनाथ, अशी ही आपली भारतमाता तुम्हा तरुणांच्या तोंडाकडे आशेने पाहात आहे. पाणिग्रहणांवाचून रिकामा असलेला तुझा हात- चुकलेल्या बाळा, जन्मदात्री स्त्रीजात गुलामगिरीत पडली आहे, लक्षावधी निरक्षर शूद्र ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत आहेत, साडेसहा कोटी माणसांसारखी माणसं नुसत्या हस्तस्पर्शासाठी तळमळत आहेत, या बुडत्यांपैकी कोणाला तरी जाऊन हात दे-

(राग- अडाणा, ताल- त्रिवट, चाल- सुंदरी मोरी का.) झणी दे कर या दीना। प्रेमजलातुर मृतशा दे जल ते या मीना॥ ध्रु.॥ वांछा तरी उपकारमधूच्या। या करि संतत पाना॥ 1॥

भगीरथ : रामलाल, भगीरथाला पुनर्जन्म देणार्‍या परमेश्वरा, मी अजाण आहे, रस्ता चुकलो आहे; यापुढं मला मार्गदर्शक व्हा. आजपासून हा भगीरथ भारतमातेचा दासानुदास झाला आहे.

शास्त्री : भगीरथ, काय गडबड आहे? तळीराम, भगीरथाला दे! (तळीराम पेला भरतो.)

भगीरथ : मित्रहो, माझ्याकरता हे कष्ट घेऊ नका. आजपासून हा भगीरथ तुम्हाला आणि तुमच्या दारूला पारखा झाला.

तळीराम : भगीरथ, काय भलतंच मांडलं आहेस हे? अरे मंडळींच्या आग्रहाखातर- फार नको फक्त एवढा एकच प्याला! बस्स, एकच प्याला!

भगीरथ : (पेला जमिनीवर पाडून) एकच प्याला! एकच प्याला!

अंक दुसरा समाप्त.