Aatmhatya - ek bhaykatha - 3 books and stories free download online pdf in Marathi

आत्महत्या- एक भयकथा ( भाग 3) ( अंतिम भाग)

( भाग २ पासून पूढे)

मंजिरी ला बांधता बांधता बाबाना धाप लागला. मंजिरी ची ताकद दुप्पट होत चालली होती आणि अचानक तीची धडपड थांबली.

' मंजिरी... मंजिरी... ए बाळा... काय झालं... बर वाटत आहे ना तुला... ए बाळा बोल ना काहीतरी... बघ मला मी बाबा... '  बाबांचा गळा दाटून आला होता.  तिच्या चेहर्‍याजवळ आपला चेहरा नेत बाबा मंजिरीला काय झाले पाहू लागले आणि झटक्यात मंजिरी ने बाबांचा गळा धरला. बाबा झटपटू लागले. आपली सुटका करुन घ्यायला लागले. मंजिरी आता कपटी पनाने हसू लागली. हसताना तिचे काळे कूट्ट दात खूपच भयानक वाटत होते. बाबाचे डोळे फिरायला लागले.

' मला बांधून ठेवणार तू.... तुझी एवढी हिम्मत.... प्रत्येक वेळी तू मला अडवतोस.... आज तुझा जीवच घेते.... ' तोच घोगरा आवाज.... रागाने मंजिरी चे डोळे लाल भडक झाले होते.

' मंजिरी अग सोड... काय करतेस हे.... बाबा आहेत तुझे ते... सोड त्यांना ' आई घाबरत बोलत होती.

' एएएएए..... तु गप्प बस.... ह्याचा नंतर तुझाच नंबर आहे आणि नंतर ह्या दिड शाहण्याचा ....' भावाकडे बघत मंजिरी बोलली.

आई ला सूचेना काय कराव... ती पळत देव घरात गेली. दत्त महाराजांना मनोमन नमस्कार केला.  देवाजवळील विभूती मूठीत घेऊन ती बाहेर आली आणि मंजिरी च्या दिशेने बघून जोरात फुंकली तस मंजिरी ने जोरात किंकाळी फोडली आणि बेशुद्ध झाली. बाबा खाली कोसळले.  त्यांचा गळा पूर्ण  सूकून गेला होता. बाबा जोरजोरात खोकत होते.

' अहो.. अहो... ' म्हणत आई ने बाबाना पकडले.

' पाणी... पाणी ' बाबा बडबडत होते.  लगेच भाऊ पळत जाऊन पाणी घेऊन आला आणि बाबाना पाणी पाजवू लागला. बर्याच वेळाने बाबा शांत झाले. त्या रात्री कोणीच झोपले नाही. घडयाळयात ६ चा ठोका पडला तशी आई काही तरी ठरवून उठली आणि बाहेर जायला दरवाजा उघडू लागली.

' कूठे जात आहेस' बाबानी विचारले

' आता मी तुमच काही ऐकणार नाही.... मी स्वामीजींकडे जात आहे ' आई बोलली

' थांब जरा' बाबा नी अडवल

' आता मला थांबवू नका' आई आपल्या निर्णयावर ठाम राहत बोलली.

' मी तूला जाण्यासाठी नाही अडवत आहे.... मी तर तुझ्या सोबत येण्यासाठी तूला थांबवत आहे ' बाबा शांतपणे बोलले.

आपले डोळे पूसत आई बोलली ' चला तर मग '

' मंजिरी कडे लक्ष दे.... आम्ही आलोच' बाबा भावाला सूचना वजा आवाजात बोलले. भावाने होकारार्थी मान हलवली.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

गावाच्या वेशीजवळ असणार्या मंदिरात आज खूप प्रसन्न वातावरण होते. मंदिर छान धूवून काढले होते. मंदिरासमोर भली मोठी रांगोळी काढली होती. खांबावर फुलांच्या माळा लावल्या होत्या. मंदिरात सुमधूर अशी आरती बोलली जात होती. आई बाबा च्या मनामधील भिती थोडी कमी झाली. ताजतवान वाटू लागल. आता आपल्या ला दत्त महाराजच ह्यातून तारतील हा विश्वास वाटू लागला. आई बाबा दोघे ही आरती मध्ये लीन झाले. आरती झाल्यावर दोघांनी मनोभावे देवाला नमस्कार केला. प्रसाद ग्रहण करून दोघे एका घराकडे निघाले जे मंदिराला लागूनच बांधले होते. दोघांनी एकत्र त्या घरात प्रवेश केला. आजूबाजूला पाहू लागले. कोणी दिसत नव्हते मग त्यानी देवघरातील घंटीची नाजूक किनकिन ऐकली आणि त्या दिशेने दोघे निघाले. देवघराच्या दारात उभे राहून आत पाहू लागले.

' ये अविनाश.... मी तूझीच वाट पाहत होतो... खूप उशीर केलास यायला ' स्वामी बोलले आणि अचानक आपल नाव ऐकून बाबा दारातच थबकले आणि स्वामी कडे एकटक पाहू लागले.

अंगात भगवा झब्बा, भगवे धोतर आणि खांद्यावर पांढरे शुभ्र असे पंचा, हातात सतत खाली खाली जाणारी रुद्राक्ष ची माळ, मध्यम बांधा, वय साधारण ५५-५८, चेहर्‍यावर कमालीचे समाधान आणि  शांत भाव आणि मुखात दत्ताचे नाव असे तेजस्वी पुरूष होते. स्वामी ना पाहून आई चे हात नकळत जोडले गेले.

' स्वामीजी... तुम्हाला माझे नाव कसे माहित झाले? ' बाबानी आश्चर्य नी विचारल.

स्वामी हसले आणि म्हणाले ' मला नाव काय पण तुम्ही दोघ इथे का आला आहात हे सुद्धा माहित आहे. '

दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. स्वामी दोघांच्या चेहर्‍याकडे आळीपाळीने पाहू लागले.

' अविनाश, कसला एवढा विचार करत आहे. हेच ना मला कस माहित ते.... हया जगात अश्या खूप सार्या गोष्टी आहेत जे आकलनशक्ती च्या पलीकडच्या आहेत.....जस कि मंजिरीच वागणं...... ' स्वामी एकदम खोल कुठेतरी बघून विचार करत बोलले. मंजिरीच नाव ऐकून आई परत रडायला लागली.

'आता रडून नाही तर विचार करून ह्या गोष्टीचा छडा लावला पाहिजे' स्वामी समजावून सांगू लागले. आई ने ही आपले आसवे पुसली.

' स्वामीजी ह्यावर उपाय सांगा.... आम्ही मंजिरीला हया अवस्थेत नाही बघू शकत' बाबाचा गळा दाटून आला.

' एकच उपाय आहे.... त्या आत्याला नक्की काय हव आहे हे जाणून घेणे... त्याच बोलण आपण ऐकून घ्यायला हव'

' स्वामीजी काहीही करा पण पोरीला वाचवा... '

' पण ते सोपे नाही... कदाचीत त्या आत्माच काम पूर्ण होऊन ही तीने मंजिरीला नाही सोडल तर अवघड होईल कारण त्या आत्माला मानवी शरीर मिळाल आहे... ह्या साठी त्या आत्माला हे पटवून देणे गरजेच आहे की हे सगळं करन चूकीच आहे. '

' आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो? ' बाबा नी विचारले

' उद्या दत्त जयंती आहे तर आज रात्री १२ नंतर उद्याचा दिवस चालू होईल.... दत्त जयंती च्या पावन दिवसात त्या आत्माची ताकद कमी असेल तर तूम्हाला आज १२ नंतर मंजिरीला इथे आणाव लागेल.... तशी त्या आत्माची शक्ती कमजोर असेल त्यामुळे त्रास होणारा नाही आणायला.... बाकी सगळी तयारी मी इथे करून ठेवतो आणि एक गोष्ट.... हा अभिमंत्रीत केलेला असा नारळ आहे... तुम्हाला वाटल कि मंजिरी आपल्या नियंत्रणात येत नाही तेव्हा हा नारळ देवघरात ठेवून हळद कुंकू लावून दत्तच नामस्मरण करा त्यामुळे त्या आत्माला थोडा वेळ का होईना पण आळा बसेल आणि मंजिरी ला घेऊन येताना हा नारळ आणि दत्तचा फोटो सोबत घेऊन या... त्यामूळे तो आत्मा तुम्हाला नुकसान नाही करणार... शेवटी तो तुम्हाला साहय करेल' स्वामी नी वर बोट करून सांगितले. '

आई बाबांना आता आशा वाटू लागली. दोघांनी स्वामीच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्या घरी परतू लागले. आज त्याच्या परिक्षेचा दिवस होता. घरी आल्यावर पाहिले मंजिरी हळूहळू हालचाल करत होती. भावाने तीला तिच्या खोलीत नीट झोपवले होते. आई बाबा सोफ्यावर बसले.  भावाने त्यांना पाणी आणि चहा आणून दिले

' सगळ नीट होईल ना... मला काळजी वाटत आहे ' आई बोलली.

' सगळ नीट होईल... काळजी करु नको'. बाबांनी भावाला ही सगळ समजावून सांगितले.

इकडे खोलीत मंजिरी दारामागे लपून सर्व काही ऐकत होती. रागाने ती धूसपूसत होती. काय करू आणि काय नको असे झाले होते. तिने बेडरूम मध्ये सामानाची फेकाफेकी चालू केली. कसला आवाज येत आहे म्हणून तिघे ही मंजिरी च्या खोलीकडे धावले. मंजिरी चा रूद्र अवतार पाहून तिघेही जागेवरच खिळून राहिले.

' माझा बंदोबस्त करणार का तुम्ही.... नाही तुम्हाला धडा शिकवला तर बघा' मंजिरी आदळ आपट करत बोलत होती.

' मंजिरी.... बाळा माझ ऐकून तर घे' आई काळजीने बोलत मंजिरी जवळ जाऊ लागली.

' ए... काय गं मला सारख सारख मंजिरी मंजिरी करते.... मी मंजिरी नाही... मी तूमची मूलगी नाही..... आणि मी हे शरीर सोडून कूठे ही जाणार नाही.... मला माझ्या घरी जायच आहे.... अंबेवाडीला जायच आहे ' मंजिरी च पूर्ण अंग थरथरत होत. ती जोरजोरात किंचाळू लागली. तिला सावरायला बाबा आणि भाऊ तिच्या कडे धावू लागले तस ती खोलीतून सटकून किचनमध्ये गेली. ती आपल्या जिवाच काही बर वाईट करेल म्हणून तिघ किचन कडे धावू लागले. किचन मध्ये तिघही भीतभीत वाकून पाहू लागले. पण मंजिरी कूठे दिसत नव्हती.

' अरे गेली कूठे? ' तिघांच्या मनात एकच प्रश्न आला.  तोच अचानक टपटप असा आवाज आला. काय गळत होत कोणाला कळल नाही पण छतावरून जमिनीवर काही तरी पडत होत म्हणून तिघांनी एकदम वर बघितल तर... तर... समोरच दृश्य पाहून आई जोरात किंचाळली. मंजिरी छताला उलटी लटकत होती आणि आपले काळे दात दाखवून हसत होती. तिच्या केसातून पाणी टपटप गळत होते. बघता बघता गळणारे पाणी एवढे वाढले की किचन मध्ये जणू पूरच आला पण पाणी बाहेर जात नव्हते जणू ते किचनच्या दाराजवळ अडकून पडले होते. आता तिघ गटांगळ्या खाऊ लागले. श्वास घेण अवघड झाले. काय कराव सूचेना झाल. नाका तोंडात पाणी जाऊ लागल. तोच बाबा ना तो नारळ आठवला. पण त्याना कसही करून किचन मधून बाहेर पडायच होत. त्यांनी आपले प्रयत्न चालू केले पण पूढे काही जात नव्हते. मग त्यानी मनोमन ' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ' म्हणून जप चालू ठेवला आणि थोडया वेळात जपाने आपल काम चालू केल. बाबा हळूहळू किचन मधून बाहेर आले आणि मागे न बघता देवघरात नारळ ठेवलेल्या जागी जाऊ लागले. जप चालू असल्यामुळे बाबा धडपडत कसेतरी देवघरात पोचले. तिथे त्यानी दिर्घ श्वास घेतला आणि नारळाची पुजा करायला घेतली. जशी पूजा चालू झाली इकडे मंजिरी ची शक्ती कमी पडू लागली. आई आणि भाऊ त्या पाण्यातून बाहेर फेकले गेले. तो दोघ खोकत खोकत देवघराकडे जाऊ लागले. इकडे पाणी हळूहळू कमी होऊ लागले. उलटी लटकलेली मंजिरी धप्प करून खाली पडली आणि हळूहळू देवघराच्या दिशेने एखादे जनावर जसे येत तस येऊ लागली. देवघराच्या चौकटी जवळ येऊन थांबली. आता काय होणार हया विचारानेच तिघांना दरदरून घाम फुटला. पण बाबा नारळाची पूजा करतच राहिले. मंजिरी आपला एक हात आत ठेवणारच तोच तिला जोरात धक्का लागला आणि ती कोलांट्या उड्या मारत मागे फेकली गेली आता तिथे एक सूरक्षा कवच तयार झाले होते. मंजिरी ने पुन्हा प्रयत्न केला परत तसेच झाले. मंजिरी भयंकर चिडली होती.  ती रागाने घरभर नाचू लागली. तिने स्वतःच्या अंगावर नखाने ओरबडायला चालू केले. तिला जागोजागी जखमा झाल्या. त्यातून रक्त येऊ लागले. त्या आत्मचा राग मंजिरी च अशक्त शरीर झेलू नाही शकल आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली. आई बाबा देवघरात बसून सगळ बघत होते. त्यांचे अश्रू थांबतच नव्हते. आई मंजिरी कडे जाऊ लागली पण बाबांनी तिला अडवले आणि मानेनेच नाही म्हणून सांगितले

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मध्यरात्र होई पर्यत तिघ देवघरात जीव मुठीत धरून बसले होते. शेवटी ती वेळ आली.

' मी आधी बाहेर जातो.... परिस्थिती काय आहे बघून तुम्हाला सांगतो ' अस बोलून बाबा देवघराच्या बाहेर पडले. पडताना बाबांनी देवाची विभूती बरोबर घेतली. मंजिरी कूठे दिसत नव्हती. बाबा मंजिरीला शोधू लागले. आणि अचानक मंजिरी ने बाबा ना पाठिमागून गच्च धरून ठेवले. बाबा झटपटू लागले पण त्यांना काही केल तरी विभूती मंजिरीला ला लावता येत नव्हते. काय कराव विचार करत असताना अचानक आई बाहेर आली.

' मीरा... तू बाहेर का आलीस? ' बाबा ओरडले

' मंजिरी बेटा.... बघ इकडे.... मी.... मी आई बाळा.... तुला आठवतय आपण सगळे किती मज्जा करायचो ते.... बाबाची तू किती लाडकी आहेस.... तूझा दादा तूला किती चिडवायला आणि मग तू रडत रडत बाबांकडे पळत यायची... आणि बाबा खोट खोट दादाला ओरडायचे... मग दादा आपले कान पकडायचा.... आणि तू मोठमोठ्या ने हसायची... आठवतय का बाळा तूला.... बघ ना इकडे' आईच्या डोळयात मंजिरी बद्दल प्रेम, माया भरून आले.

इकडे मंजिरी ने आईच्या डोळ्यात आपल्या बद्दल माया बघून त्या आत्माची मंजिरी वरील पकड थोडी ढिली झाली. तो आत्मा आई च्या मायेसमोर हतबल झाला. हया संधीचा फायदा घेत पटकन बाबानी मंजिरीला विभूती लावली आणि मंजिरी बाबाच्या हातावर पडली

' हीच योग्य वेळ आहे... जा मीरा पटकन नारळ आणि फोटो घेऊन ये... जा' आई ' हो' बोलत पटकन देवघरात जाऊन सगळ सामान घेऊन आली. आता ते सगळे मंदिराकडे जाऊ लागले.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

इकडे स्वामी नी सर्व तयारी करून ठेवली होती. हाॅल च्या मधोमध एक यज्ञकुंड होते. त्यात स्वामिनी अग्नी प्रज्वलित केली होती. आजूबाजूला भली मोठी पांढरी रांगोळी काढली होती. मातीपासून बनवलेल्या पणती पूर्ण हाॅल मध्ये लावले होते. भिंतीवर सगळी कडे देवाचे फोटो लावले होते. वातावरणात एक वेगळीच शक्ती संचारली आहे अस वाटत होतं. आई बाबांनी मंजिरी ला कसबस सांभाळून आणल होत.

' मंजिरीला त्या कुंकवाच्या रिंगणात बसवा आणि तुम्ही लोक बाजूला ह्या हळदीच्या रिंगणात बसा... ह्या रिंगणात तुम्ही सुरक्षित आहात ' स्वामी एकदम शांत होते.

आता मंजिरी रिंगणात बसली होती. स्वामी नी विभूति हातात घेऊन मंजिरी वर फुंकले तशी मंजिरी एकदम जोरात किंचाळली.

' तू कोण आहेस आणि ह्या मुलीला का त्रास देत आहेत ' स्वामिनी सहानुभूती ने विचारले.

मंजिरी काही बोलत नव्हती.

' हे बघ मला तूला मदत करायची आहे.... जर तू बोलली नाहिस तर मी तूला कस मदत करणार? ' स्वामिनी हुशारीने विचारले.

' मदत... आणि तू मला करणार.... थूँ.... ' अस म्हणत मंजिरी जमिनीवर थुंकली.

' माझ्यावर विश्वास ठेव.... आता मीच एक असा आहे जो तूला मदत करू शकतो ' स्वामी तीला विश्वास दाखवत बोलले.

' मग आधी माझ्या आई वडिलांना बोलवा. ' मंजिरी रागात बोलली.

' कोण आहेत ते.... कूठे असतात... नाव काय त्यांच? ' स्वामिनी प्रश्नांचा भडिमार चालू केला.

' एएएएए.... थांब थेरडया जरा श्वास तर घे... ' अस म्हणून मंजिरी भयानक हसायला लागली.

स्वामिनी पुन्हा तिच्यावर विभूती फेकली तशी ती जोरात विव्हळली. स्वामी परत विभूति टाकण्याच्या तयारीत होते तेव्हाच मंजिरी ओरडली.

' थांब... थांब... मी सगळ सांगेन... पण आधी माझ्या आई वडीलांना बोलवा. ते अंबेवाडीत राहतात... मनोहर गायकवाड त्यांच नाव आहे... '

अंबेवाडी गाव कसबे गावापासून 1.5 तासाच्या अंतरावर होते. स्वामिनी आपल्या सहकार्‍यांला हाक मारली.

' आनंदा.... इकडे ये... '

तोच एक 24-25 वयाचा मुलगा धावत आला. स्वामिनी त्याला कानात काही सांगितले आणि तो निघून गेला. इकडे मंजिरी गुरगुरत होती... मध्येच कधीतरी बडबड करत होती पण वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. बराच वेळ गेला.

' तुझ नाव काय आहे.... सांग नाही तर.... ' स्वामिनी विभूती हातात घेऊन बोलले.

' सांगते... सांगते.... मी... मी.... माझ नाव नंदिनी ' मंजिरी घाबरत बोलली. तोच एक बाई आणि माणूस आत मध्ये प्रवेश करतात.

' काय.... नंद... नंद.... नंदिनी? ' ती बाई नंदिणी नाव ऐकून फार चकित होते.

मंजिरी हळूहळू त्या बाई कडे बघते आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागते.

' आई..... ' मंजिरी जोरात ओरडते.

ती बाई आणि माणूस एका जागी उभ राहून मंजिरी कडे एकटक पाहत बसतात. स्वामी त्यांना हळदीच्या रिंगणात बसायचा इशारा करतात. तो माणुस बसायला तयार नसतो पण ती बाई त्याला विनंती करते आणि तो बसतो.

' आई.... पप्पा.... ' मंजिरी उठून जायला लागते पण त्या कुंकवाच्या रिंगणात ती अडकून राहते.

' जो पर्यत तू हया जगात का आलीस सांगत नाहीस तो पर्यत तू हया रिंगणाच्या बाहेर जाऊ शकत नाहीस' स्वामी मंजिरीच्या डोळ्यात डोळे घालून बोलले.

हे ऐकून मंजिरीच्या चेहर्‍यावर शांत असे भाव आले. तिचा चेहरा हळूहळू बदलू लागला. एक गोडस असा चेहरा तिच्या चेहर्‍यावर दिसू लागला. मंजिरी चे छोटे केस हळूहळू वाढत जाऊन मोठी वेणी झाली. डोळे पाणीदार आणि बोलके वाटू लागले.

' मी नंदिनी... नंदिनी गायकवाड... मी वाणिज्य शाखेत पहिला वर्षाला शिकत होती.... मंजिरी च्या काॅलेज जवळच माझे काॅलेज होते... मला शिकायला खूप आवडायचे पण माझ्या नशिबातच अल्प आयुष्य होते. ' अस म्हणून मंजिरी त्या बाई कडे आणि माणसाकडे बघून रडायला लागली.

' पण एका नालायक मुलामुळे माझ आयुष्य बरबाद झाल. त्याच नाव राजेश... राजा म्हणून बदनाम होता... माझ्या मागे लागला... नेहमी त्रास द्यायचा..... कूठेही गेला तरी पिच्छा नाही सोडायचा.... वर्गात, लाॅबररी मध्ये...काॅलेज मध्ये अशी कूठलीच जागा नव्हती कि तो तेथे नसायचा .....खूप कंटाळली होती मी.... गुंड होता तो.... एक दिवस त्याने कहरच केला... त्याने माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला.... मी आतून तूटून गेली.... आठवडाभर काॅलेज ला नाही गेली.... आणि एक दिवस वसतिगृहाच्या जवळ असलेल्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.... दोन दिवसाने माझ प्रेत फूगून वर आले.... सगळी कडे माझी बदनामी झाली कि माझ चरित्र चांगल नव्हत म्हणून काहितरी झाल असेल आणि मी आत्महत्या केली.... आई पप्पा ना ही गोष्ट कळली... पप्पा ना हे खर वाटल म्हणून त्यानी माझ प्रेत ही स्वीकारले नाही... माझी शेवटची सगळी विधी माझ्या काका काकीनी केल.... म्हणून मला शांती नाही मिळाली. मला त्यांना खर सांगायच होत कि माझी ह्यात काही चूक नव्हती.... आणि त्यांना शेवटच भेटण झालच नाही म्हणून मला खर सांगायला परत यायला लागल. ' तिची कथा ऐकून मंजिरीच्या आई बाबांना फार वाईट वाटल. नंदिनी चे आई पप्पा जे रिंगणात बसले होते ते पूतळया सारखे सगळ ऐकत होते.

' पण तू मंजिरीला का पकडल आहेस? ' स्वामिनी विचारल

' खूप दिवस माझा आत्मा एक शरीर शोधत होता. ज्या झाडाजवळ मला मंजिरी दिसली तिथे जवळच ती विहीर होती. त्या दिवशी अमावस्या होती... मंजिरी ने काळे कपडे घातले होते... केस मोकळे सोडले होते आणि त्यात तिची मासिक पाळी झाली होती जे एकदम अनुकूल परिस्थिती होती तिच्या शरीरात प्रवेश करण्याची'  ( हे सर्व कथेला वळण मिळावे म्हणून लिहिले आहे. मुळात असे काही नसते. त्यामूळे गैरसमज करुन घेऊ नये)

' ठिक आहे पण आता तुला हे शरीर सोडून जावे लागेल कारण हे शरीर तुझ नाही आहे ' स्वामी दरडावून बोलले.

' नाही... नाही... नाही.... खूप वाट पाहिल्यावर मला हे शरीर मिळाल आहे.... मी नाही सोडणार' आता नंदिनी चा गोंडस चेहरा जाऊन तिथे एक पांढरा फटफटीत चेहरा दिसू लागला. तेव्हा नंदिनी चे आई पप्पा तिच्या जवळ आले.

' नंदिनी बेटा... तू पुन्हा आलीस हे पाहून आम्हाला खरच खूप आनंद झाला.... 2 वर्ष झाले पण एक दिवस ही तूझी आठवण आली नाही अस झाल नाही.... होय मी तूझ प्रेत तेव्हा स्विकारले नाही कारण लोकांच्या बोलण्यात मी आलो आणि तुझ्यावर विश्वास नाही ठेवला.... नंदिनी मला माफ कर बेटा पण तूझी ही हालत माझ्यामुळे झाली जर मी तुझ्यावर विश्वास ठेऊन तूला अग्नी दिली असती तर तूला मुक्ती मिळाली असती.... पण बेटा हे शरीर तूझ नाहि... हे जग तूझ नाही.... ह्या मुलीला सोडुन तुझ्या जगात निघून जा.... ह्या मुलीच्या आई बाबांना आमच्या सारखे दिवस नको दाखवू.... तू निघून जा मंजिरी... निघून जा' अस बोलून नंदिनी चे पप्पा ढसाढसा रडायला लागले.

' नंदिनी... तूझे पप्पा बरोबर बोलत आहेत.... ह्यात मंजिरीच्या आई बाबांचा, तिच्या भावाचा काय दोष आहे... आणि मंजिरी चा काय दोष आहे... नंदिनी तू आमची समजुतदार मूलगी आहेस...  आम्हाला माहीत आहे कि तू दुसर्याला त्रास होईल अस कधी वागणार नाही' आई ही डोळ्यात पाणी आणून बोलली.

नंदिनी ला आपल्या आई बाबांच म्हणण पटल आणि मुख्य म्हणजे तिच्या पप्पांना खर काय झालं होतं ते कळाल... तिची आई पप्पाला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली होती... आता ती तिथे जास्त वेळ राहू शकत नव्हती.

' आई पप्पा.... मी तुमच्यावर खुप प्रेम करते आणि करत राहीन' अस बोलून एक पांढरा धूर मंजिरीच्या अंगातून निघतो आणि अग्नी कुंड्याच्या पवित्र अग्नीत विलीन होतो.

मंजिरी धाड करून खाली पडते. तिचे आई बाबा तिला पकडायला धावतात  आणि इकडे नंदिनी चे आई पप्पा कोपर्यात उभे राहून रडत असतात. तोच नितळ असे सूर्य किरणे आत प्रवेश करतात आणि मंजिरीला जाग येते.  ती आई बाबा म्हणून त्यांना मिठी मारते. त्या तिघांना ही आनंद होतो. मंदिरात दत्त जयंती म्हणून गावातील लोक मंदिरात येऊ लागतात.  आरती, भजन चालू होते... धूप, अगरबत्ती चा सुवास दरवळू लागतो... वातावरण अगदी प्रसन्न होऊन जात.  आपल्या मुलीला परत जीवन मिळाले म्हणून मंजिरी चे आई बाबा आणि आपल्या मुलीला मुक्ती मिळाली म्हणून नंदिनी चे आई पप्पा असे चौघेही दत्त महाराजांसमोर नतमस्तक होतात.

( हि एक काल्पनिक कथा आहे)

धन्यवाद.