Goa - picturesque beach, unforgettable sunset and lots of things .. books and stories free download online pdf in Marathi

१.. गोवा- नयनरम्य समुद्र किनारा, अविस्मरणीय सूर्यास्त आणि बरंच काही..

१. गोवा- नयनरम्य समुद्र किनारा, अविस्मरणीय सूर्यास्त आणि बरंच काही..

गोवा सगळ्यांचच आवडत ठिकाण!! सुट्टी म्हटली की गोवा असं समीकरण झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे लोकं पर्यटक गोव्याला सुट्टी घालवायला येत असतात. गोव्यातील अदबशीर लोक, गोव्याची जीवनशैली, खाद्यपदार्थ पर्यटकांना भुरळ घालतात. गोव्याची लोकसंस्कृती, सण, उत्सव, त्याचप्रमाणे आल्हाददायक निसर्ग पर्यटकांना गोव्याकडे खेचून आणतो. गोवा सगळ्यांसाठी आहे म्हणूनच गोवा हे पर्यटकांच आवडत ठिकाण आहे. नयनरम्य समुद्र किनारा, अविस्मरणीय सूर्यास्त आणि बरंच काही हे अनुभवायचं असेल तर गोव्यासारखं ठिकाण नाही. निसर्गात रमणाऱ्या त्याच बरोबर नाईट लाईफ म्हणजेच रात्रीच आयुष्य आवडणाऱ्या लोकांना गोवा नेहमीच खुणावत असतो. नेहमीच्या रुटीन मधून थोडीशी विश्रांती आणि त्याचबरोबर आपल्या जिवलगांबरोबर पार्टी एन्जॉय करण्यासाठीची उत्तम जागा म्हणून गोवा प्रसिद्ध आहे. एन्जॉय करतांना महत्वाच असत ते जेवण.. आणि जेवणाबद्दल गोव्यामध्ये अजिबात चिंता करायची गरज नसते. गोव्यामध्ये प्रत्येक पर्यटकाला जे हव ते मिळेल याची खात्री असते. अगदी प्रत्येकाच्या खिशाला परवडेल इतक्या खर्चात राहण्याची सोय होते त्यामुळे बहुतांश पर्यटकांच गोवा हे आवडत ठिकाण आहे.

गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.

पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगीजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला.

निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधताआहे.

* गोव्यातील प्रमुख समुद्रकिनारे

१. कोलवा (Colva)

२. दोना पावला (Dona Paula)

३. मिरामार (Miramar)

४. कळंगुट (Calangute)

५. हणजुणे (Anjuna)

६. पाळोळे (Polem)

७. वागातोर (Vegator)

८. हरमल (Harmal)

९. आगोंद (Aagond)

१०. बागा (Baga)

११. मोरजिम (Moraji)

* ह्यातले काही समुद्र किनारे खूप प्रसिद्ध आहेत.

१. कळंगुट बीच-

गोव्याची राजधानी पणजी पासून १५ किमी अंतरावर हा बीच आहे. नॉर्थ गोवा मधला हा सगळ्यात मोठा बीच आहे आणि पर्यटकांच विशेष आकर्षण!! ह्या किनाऱ्याला "क्वीन ऑफ बीचेस" संबोधले जाते. सुंदर सोनेरी वाळूवरून चालतांना ताण कुठच्या कुठे पळून जातो. निसर्गात रमतांना कळंगुट बीच वर वॉटर स्पोर्ट्सची मजा देखील अनुभावता येते.

२. बागा बीच-

बागा बीच हा गोब्यातील एक प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. कळंगुट बीच जवळच बागा बीच आहे. बागा बीच ला कळंगुट बीच सारखीच वाळू तिथे आहे. टॅटू पार्लर, टॅरोट शॉप्स, स्पा, खायच्या पदार्थांची रेलचेल त्याचबरोबर वेगवेगळी ड्रिंक्स त्यामुळे बागा बीच उत्तम बीच हॉलीडे बनवण्यास मदत करतो. त्याचबरोबर, रात्री फिरायला आणि शांत सकाळ अनुभववत योग करणाऱ्यांसाठी देखील हा उत्तम बीच आहे. म्हणजेच, सगळ्यांसाठी बागा बीच वर काही ना काही आहेच! बागा बीच आलेले सगळेच तृप्त होऊन जातात.

३. हणजुणे बीच-

आपल्या निसर्गसौंदर्याकरता हा बीच प्रसिद्ध आहे. गोव्याच्या पश्चिम भागात हा बीच विदेशी पर्यटकांना आकर्षित करतांना दिसतो. हा बीच इतर बीचेस पेक्षा सुरक्षित आहे. बंजी जम्पिंग, पॅराग्लायडिंग, विंड सर्फिंग ह्या वॉटर स्पोर्ट्स ची मजा हणजुणे बीच वर घेता येते. गोव्याची मजा घ्यायची असेल तर हणजुणे बीच ला भेट ही दिलीच पाहिजे.

गोवा हे हॉट एअर बलुनिंग सेवा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत चालली आहे. हॉट एअर बलून सेवेला मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. दक्षिण गोव्यातील असोल्डा आणि केपे येथे ही सेवा कार्यरत असून देशविदेशातील पर्यटक या सेवेचा लाभ घेत आहेत. गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. देश-विदेशातील जवळपास ६० लाखांहून अधिक पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देत असतात. देशी पर्यटकांसाठी गोवा हे नंदनवन बनले आहे. विदेशात जाण्याचा खर्च परवडत नसेल आणि विदेशातील माहोल उपभोगायचा असेल तर गोवा हेच एकमेव ठिकाण आहे. ३६५ दिवस कधीही गोव्याला भेट देता येते हे गोव्याच वैशिष्ट आहे. कॅसिनो, क्रुज ही गोव्याच्या प्रमुख आकर्षण आहेत.

* गोव्यातले फेमस कॅसिनो-

१. डेल्टन रॉयल कॅसिनो

२. डेल्टन जॅक

३. कॅसिनो प्राईड

४. कॅसोनी कार्निवल

५. कॅसिनो पाल्म्स

* गोव्यातील फेमस क्रुज-

१. सनडाऊन क्रुज

२. फूल मून क्रुज

३. डिनर क्रुज

४. डेल्टन रॉयल

५. बॅकवॉटर क्रुज

* निसर्ग संपदा-

गोवा निसर्गाने सुद्धा नटला आहे. पर्यटनातही अनेक ठिकाणे अशी आहेत की ज्यांचा एकच चेहरा कायम जगासमोर येतो आणि दुसरा अंधारातच राहातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राला खेटून असलेलं गोवा. गोवा म्हटल्यावर उसळत्या सागरलाटा आणि फेसाळता समुद्र आणि खान, दारू हीच प्रतिमा सर्वसामान्य पर्यटकांच्या मनावर उमटलेली आहे. पण या राज्याला वन्यजीवनाचा अप्रतिम वारसाही लाभलेला आहे. गोव्याच्या या जंगलांना भेट द्यायला पावसाळ्यापेक्षा दुसरा उत्तम ऋतू नाही. आषाढाच्या धो धो सरी कोसळून गेल्यावर, हिरवाईच्या अनेक छटा मिरवणाऱ्या आणि धबधब्यांच्या जलजल्लोष साजरा करणाऱ्या गोव्याच्या जंगलात मारलेली एक फेरीसुद्धा तुम्हाला प्रसन्न करणारी ठरेल. भौगोलिकदृष्टय़ा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये असलेलं गोवा, महाराष्ट्राच्या सह्यद्रीतील जंगल आणि कर्नाटकातलं जंगल यांतील दुव्याचं महत्त्वपूर्ण काम बजावतं. गोव्यातला सुमारे ५९ टक्के भूभाग वनाच्छादित आहे. या भूभागावर खाडीकिनाऱ्यांच्या कांदळवनांपासून ते सदाहरित रानापर्यंत अरण्याचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. गोव्याचा वाईल्ड चेहरा पण तितकाच सुंदर आहे. सर्वसाधारणपणे जंगलात जायचे, अभयारण्यात फिरायचे म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर हत्ती, वाघ, बिबटय़ा असे मोठे प्राणीच येतात. पण या नेहमीच नजरेत भरणाऱ्या प्राण्यांपलीकडे एक छोटय़ा जिवांची आणि उडणाऱ्या पाखरांची दुनियाही येथे आहे. आणि गोव्याची जंगले या बाबतीत अतिशय संपन्न आहेत. गोव्याची पूर्व हद्द जिथे कर्नाटकला भिडलेली आहे तिथे भगवान महावीर अभयारण्य हे गोव्यातले सर्वात मोठे अभयारण्य आहे. या हिरव्यागर्द जंगलात गौर(गवा), सांबर, चितळ, बिबटय़ा असे मोठे प्राणी तर आहेतच, पण स्लेंडर लोरिस आणि फ्लाइंग स्क्विरलसारखे स्पेशल अ‍ॅपिअरन्स देणारे प्राणीही आहेत. या अरण्यात जे दोनशे सव्वा दोनशे प्रकारचे पक्षी आहेत त्यामध्ये ट्री पाय, ओरिओल, ड्रोंगो, मुनिया, बॅबलर, बुलबुल, वुडपेकर असे नेहमीचे भिडू तर आहेतच, पण ग्रेट हॉर्नबिल, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर, मलबार ट्रोगन, व्हर्नल हॅगिंग पॅरट, लिटल स्पायडर हंटरसारखे पक्षीप्रेमींना आकर्षति करणारे पक्षीही आहेत. या अरण्यात धामण, मांजऱ्या साप, ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक असे बिनविषारी साप जसे आहे तसेच रसेल्स व्हायपर (घोणस), मण्यार, नाग, मलबार पिट व्हायपर असे विषारी सापही आहेत. त्यातही बदामी, गुलाबी रंगाचा आणि नाकावरचा उंचवटा मिरवणारा ‘हम्प नोज्ड व्हायपर’ साप त्याच्या कॅमोफ्लेज रंगसंगतीमुळे आसपासच्या परिसरात असा मिसळून गेलेला असतो. गोव्याच्या जंगलातला एकाच नजरेत प्रेमात पाडणारा साप म्हणजे ऑर्नेट फ्लाइंग स्नेक. इतर अनेक उडणाऱ्या प्राण्यांप्रमाणेच म्हणजेच फ्लाइंग फ्रॉग, फ्लाइंग स्क्विरल प्रमाणेच हा देखणा साप प्रत्यक्ष उडत नसला तरी ग्लाइड होत म्हणजे तरंगत तरंगत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो. दिवसा हालचाली करणाऱ्या या सापाच्या अंगावरील रंगांची नक्षी त्याचे ऑर्नेट विशेषण सार्थ करते. विशेषत: त्यामधील शेंदरी रंगाचे ठिपके पाहाताना पोवळी जडवलेल्या दागिन्याची आठवण होते. उडत्या (तरंगत्या) सापाप्रमाणेच गोव्याच्या जंगलात उडते सरडेही आहेत. त्यासाठी जायला हवं नॉर्थ गोव्यातील फोंडा तालुक्यातील बोंडला अभयारण्यात. गोव्यातील हे आकाराने सर्वात लहान अभयारण्य आहे. इथेच गोव्यातलं एकमेव प्राणी संग्रहालय असल्याने शनिवार-रविवारी कुटुंबासह पिकनिकला येणाऱ्यांची संख्या भरपूर असते. याच अभयारण्यात ड्रॅको अर्थात उडता सरडा अगदी सहज पाहायला मिळतो. या सरडय़ाच्या पायांना एक कातडी पडदा असतो, त्याच्या मदतीने हा सरडा आरामात उंच झाडावरून जमिनीकडे किंवा दुसऱ्या झाडाकडे तरंगत जातो. तसा आपल्या नेहमीच्या सरडय़ासारखाच हा दिसत असला तरी त्याच्या गळ्यावर एक छोटीशी, पिवळ्या रंगाची पताका असते, त्यामुळे तो ओळखता येतो. बोंडलाच्या अरण्यात तुम्हाला जायंट स्क्विरल्स अर्थात शेकरूही अगदी जवळून पाहायला मिळतात.

या दोन जंगलांशिवाय गोव्यातील नेत्रावळीचं जंगल आणि कोटिगाव अभयारण्य देखील आपल्या समृद्ध वन्यसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोणत्याही जंगलात स्थानिक वाटाडय़ाशिवाय जंगलात शिरायचे धाडस करू नका.पावसाळ्यात काही भागांमध्ये जळवांचे प्रमाण जास्त असते, त्यापासून काळजी घेण्याची गरज असते. जंगलातील फुले, फळे, भूछत्र, अळंबी तोडू नका. वन्य प्राण्यांना (अगदी सरपटणाऱ्याही) डिवचू नका. वन भ्रमंती करायची तर ही खबरदारी घ्यायलाच हवी. हा हिरवा खजिना मिस केला असेल तर पुढच्या गोवा भेटीमध्ये गोव्याचा समुद्र किनाऱ्यांबरोबर हिरवा खजिना अवश्य बघा.