Tadoba - Land of Tigers .. in Marathi Travel stories by Anuja Kulkarni books and stories PDF | ४. ताडोबा- लॅंड ऑफ टायगर्स..

Featured Books
Share

४. ताडोबा- लॅंड ऑफ टायगर्स..

४. ताडोबा- लॅंड ऑफ टायगर्स..

वाघ बघण्याची इच्छा आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा ताडोबा आणि नागपूरचा पेंच प्रकल्पाचा समावेश आहे. ह्यातले ताडोबा हे महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असे अभयारण्य आहे. ताडोबाला वाघांचे रण म्हणले जाते. तस पाहता, वाघाला बघायची उत्सुकता सगळ्यांनाच असते आणि ते पार्क मध्ये पाहण्यापेक्षा खऱ्या खुऱ्या जंगलात पहायची मजा काही वेगळीच असते. ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ५०८.८५ चौ. कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात जिल्हा चंद्रपूर येथे ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे. इथे जाण्यासाठी विमान, रेल्वे आणि बस सेवा उपलब्ध आहे. नागपूर पर्यंत विमान प्रवास करून पुढच अंतर बस ने पार करून ताडोबा मध्ये जाता येत.

१९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले गेले. ताडोबा हे ‘Land of the Tiger’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे.येथे एकूण चार बफर झोन आहेत. या प्रकल्पालगतचे सुमारे ११०१.७७ चौ.कि.मी. क्षेत्र त्यात येते. त्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे. मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष टळावा असा त्यामागील हेतू आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूरच्या वैदर्भीय भूमीवर आहे. १९५५ पासून अस्तित्वात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि त्यात १९८६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले अंधारी अभयारण्य मिळून हा व्याघ्रप्रकल्प तयार झाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र ६२५.४० चौ.कि.मी.चे असून त्याचे कोअर झोन म्हणजे अतिसंरक्षित क्षेत्र व बफर झोन म्हणजे कोअर सभोवताली असलेले जैविक दबाव सहन करणारे क्षेत्र असे विभाजन करण्यात आले आहे. व्याघ्रप्रकल्पात एकूण ६ गावे आहेत. प्रकल्प क्षेत्रात पाण्याची पुरेशी व्यवस्था असून, त्यात १७ तलाव, ३७ नैसर्गिक पाणवठे तसेच ४४ कृत्रिम पाणवठे आहेत.

या प्रकल्पासभोवताली अनेक कोळसा खाणी आहेत. तेथील उत्खननामुळे व करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे या क्षेत्राच्या पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शका सह खुल्या टॉप जीप आणि बसेस उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी मुक्कामच सोय आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प साडेतीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येतो. साधारण 1 जुलै पासून 15 ऑक्टोबर पर्यंत ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येते.

* निसर्गसंपन्न ताडोबा-

मुळच्या आदिवासी लोकांचा देव तारु आणि अंधारी नदी यामुळे या अभयारण्याला वरील नाव पडले. बांबू(गवत), साग, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ, अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असे हे जंगल आहे. इथे अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आणि विविध प्रकारची झाड पहायला मिळतात. पण इथल प्रमुख आकर्षण हे वाघ आहे.

ताडोबाला फक्त वाघ नाही तर बरेचसे प्राणी, पक्षी बघायला मिळतात. तिथे जातांना काय दिसेल याची करून जाण्यापेक्षा जे दिसेल ते पाहत राहायचं अश्या विचारांनी गेल तर नक्कीच तुम्हाला सरप्राईज मिळेल. कारण जंगलात गेल्यानंतर जे दिसेल ते पाहावे. दिसणारा प्रत्येक प्राणी आणि पक्षी आपल्याला त्यांच्यात गुंतवत
असतो. त्यांच्या हालचाली, हावभाव पाहणे मनस्वी आनंद देणारे असते. अगदी छोट्या किड्यांपासून ते अगदी वाघापर्यंत सगळ्यांनाच पाहण म्हणजे ट्रीट असते. आणि जंगलाचा अनुभव घेतांना मजा येते. वाघांना नैसर्गिकरीत्या संरक्षण देण्याच्या हेतूतून आपल्याकडे व्याघ्र प्रकल्पांची योजना सुरू झाली. असाच एक व्याघ्र प्रकल्प, ‘ताडोबा’! चंद्रपूर जिल्ह्य़ातील हे सर्वात जुने आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य. ताडोबा हे एका देवाचे नाव आहे. त्याचे दुसरे नाव ‘तारू’ असेही आहे. तारू हा या जंगलात फार पूर्वीपासून राहणाऱ्या आदिवासींच्या गावाचा नायक होता. एका पौराणिक कथेप्रमाणे एका वाघाशी झालेल्या लढाईमध्ये त्याला मरण आले आणि या जंगलालाच त्याचे नाव बहाल झाले. आजही त्याची स्मृतिशिला ताडोबा तलावाच्या काठी एका मोठय़ा झाडाखाली दाखविली जाते. हे जंगल फार पूर्वी ‘गोंड’ राजाच्या अधिपत्याखाली होते. १९३५ मध्ये ब्रिटिशांनी येथे शिकारीसाठी सर्वप्रथम बंदी घातली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा भाग अभयारण्य म्हणून घोषित झाला. तेव्हा त्याचे क्षेत्रफळ होते फक्त ११५ चौरस किलोमीटर. पुढे १९८६ मध्ये ताडोबा शेजारील अंधारी हे प्राणी अभयारण्य म्हणून घोषित झाले. पुढे ही दोन्ही अभयारण्य एकत्र करत त्यातून ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प’ आकारास आला. आज ताडोबा भारतातील एक महत्वाचे जंगल म्हणून गणले जाते, ते त्याच्या जैवविविधतेमुळे. या व्याघ्र प्रकल्पाचे संपूर्ण क्षेत्रफळ ६२५ चौरस किलोमीटर आहे. ताडोबामध्ये वाघ, बिबटय़ा, अस्वल, रानडुक्कर, चितळ, सांबर, चौसिंगा, गवा, जंगली कुत्री, नीलगाय, पट्टेरी तरस, रानमांजर, ससा, भेकर असे अनेक प्राणी दिसतात. भारतात एके काळी सहज दिसणारी मगर इथे दिसते. त्याच बरोबर उन्हाळ्यात स्थलांतर करणारा अतिशय सुंदर पक्षी नवरंग (इंडियन पिट्टा), सिकंदर, स्वर्गीय नर्तक, काळा शराटी, कुदळ्या, बुरखा, हळद्या, सोनपाठी सुतार, कपाशी घार, हुदहुद्या, तांबट, गरुड, मोर, चीरक, नीलपंख, रानभाई, रानकस्तुर, करडी रानकोंबडी, हरोळी, तुरेवाला सर्प गरुड, टकाचोर असे अनेक सुंदर आणि दुर्मिळ पक्षीही इथे दिसतात. जंगलातील प्राणी-पक्षी पाहायचे असतील, तर हमखास उन्हाळ्यात जावे. पाण्याचे जवळपास दुर्भिक्ष असल्यामुळे त्यांचे दर्शन सहज घडते. ताडोब्यात फिरण्यासाठी बऱ्याच टूर्स उपलब्ध आहेत त्यातली तुम्हाला योग्य वाटेल तिची निवड करून तुम्ही ताडोबा मध्ये राहायचा आनंद घेऊ शकता.

* ताडोबात काय पाहता येईल-

१. ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व-

ताडोबा नॅशनल पार्क (११६.५५ चौ. कि.मी.) आणि अंधारी वन्‍यजीव अभयारण्य (५०८.८५ चौ.कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात जिल्‍हा चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे. १९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्‍याघ्र प्रकल्‍प म्‍हणून घोषित केले गेले. ताडोबा हे Land of the Tiger म्‍हणून ओळखले जाते. हे ठिकाण मुख्यत्वे वाघांसाठी प्रसिद्ध आहे पण इतर पक्षी आणि प्राणी आपल्याला पाहायला मिळतात.

२. मोहर्ली-

उन्हाळ्यात वन्यजीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात वन विभागाने निर्माण केलेल्या कूपनलिकावर ‘वॉटर इज लाईफ’ या वन्यजीव प्रेमी संस्थेतर्फे अत्याधुनिक सौरऊर्जा पंपाद्वारे कृत्रिम झरे निर्माण करून आठ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे वन्यजीवांना तृष्णा भागवता येते. मोहर्ली बफर क्षेत्रात ‘वन्यजीवांसाठी पाणपोई’ हा उपक्रम राबविला जातो. तिथे जंगल सफरीची सोय आहे. प्राण्यासाठी पाणी पुरवठा हा कृत्रिम सिमेंटच्या पाणवठ्यात होत होता. त्यामुळे यातील पाणी संपले की जनावरे इतर ठिकाणी स्थलांतर करीत होते. सोबतच नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी आटले की जनावरांना इतरत्र भटकावे लागत होते. त्यामुळे त्यांना स्थलांतरित न होता त्याच व सोबतच्या नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी मिळावे म्हणून ‘वॉटर इज लाईफ’ च्या सदस्यांनी नेहमीच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध व्हावे व त्यासाठी जमिनीच्या आत उपलब्ध असलेले पाणी जमिनीवर आणण्यासाठी पंपाचा उपयोग करून नैसर्गिक ठिकाणी सतत ताजे व शुद्ध पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यासाठी सौर पाणपोई ही योजना वन अधिकाऱ्यासमोर ठेवली. त्यामुळे या वर्षी आठ ठिकाणी तलावात कूपनलिका तयार करून दिल्या आहेत.

३. ताडोबा तलाव-

हा तलाव ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वच्या मध्यभागी आहे. तिथे बरेचसे प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्यांना ही जागा खास आवडीची आहे कारण पाण्यातल्या पक्ष्यांच सुद्धा इथे दर्शन होत. कधी तलावावर वाघ आला तर पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच असते. कधी कधी वाघांबरोबर बछडे सुद्धा दर्शन देतात.

आज भारतातच नव्हे, तर जगभरात वाघांची प्रजनन भूमी म्हणून हा प्रकल्प प्रसिध्द आहे. बांबूची दाट राजी असलेल्या या जंगलात वाघांची संख्या फार मोठी आहे. या प्रकल्पात तब्बल ७२ वाघ आहेत, तर प्रकल्पाबाहेरील जंगलात ४८ – म्हणजे एकटया चंद्रपूर जिल्ह्यात एक-दोन नव्हे, तर १२० वाघ आहेत. शिवाय येथील प्रत्येक १०० चौरस कि.मी. क्षेत्रात पाच बिबटयांचे वास्तव्य आहे. म्हणूनच अतिशय देखण्या अशा वाघ-बिबटयांचे दर्शन या व्याघ्रप्रकल्पात हमखास होते. वाघांच दर्शन आणि इतर प्राणी पक्षी पाहायचे असतील तर ताडोबा उत्तम ठिकाण आहे. फक्त वाघ नाही तर वाघाबरोबर इतर पक्षी सुद्धा दिसू शकतात. ताडोबा ला गेल्यावर फक्त वाघ बघण्यापेक्षा इतर निसर्ग संपदा अनुभवावी. तिथे गेल्यावर तुम्ही निसर्गाच्या अधिकच जवळ जाऊ शकता. बिल्डींगच्या जंगलातून बाहेर पडून खऱ्या जंगलात जाऊन मन प्रसन्न करू शकता.