Swaraja Surya Shivray - 1 books and stories free download online pdf in Marathi

स्वराज्यसूर्य शिवराय - 1

॥॥ स्वराज्यसूर्य शिवराय॥॥।

【भाग एक】

शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र!

शिवाजी महाराजांचे अफाट देशप्रेम, अविस्मरणीय, आश्चर्यकारक, धाडसी कामगिरी, अचंबित करणारी युद्धनीती, प्रामाणिकपणा, सत्यता, जनतेबद्दल कळवळा या साऱ्यांचा अभ्यास करण्यापूर्वी शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो काळ, त्यावेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेतली पाहिजे. महाराजांचा जन्म होण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात जवळपास चारशे वर्षांपासून अधिक काळ परकियांची सत्ता होती. अगदी नावच घ्यायचे झाले तर खलजी सुलतान आणि त्याचे वारसदार, तुघलक सुलतान त्याचे उत्तराधिकारी महंमद तुघलक, बहमनी सुलतान आणि त्याचे वंशज यांनी जवळपास पावणे दोनशे वर्षे सत्तेचा सारीपाट रंगवला. बीदर येथील बेरीदशाही सुलतान, वऱ्हाडचे इमादशाही सुलतान, अहमदनगरचे निजामशाही सुलतान, विजापूरचे आदिलशाहा, खानदेशातील फरूकी सुलतान, मोंगल सुलतान या राजवटींचा समावेश होता. त्याच बरोबर मुघल सम्राट अकबर आणि विजयनगरचे राजे कृष्णदेवराय यांचेही राज्य होते. ह्या सर्वांनी महाराष्ट्र प्रदेश पादाक्रांत केला होता.

महाराष्ट्र प्रदेशातील सुपीक जमीन, धनदौलत ताब्यात घेण्यासाठी, सत्ता विस्तारासाठी या राजांमध्ये सातत्याने लढाया होत असत. प्रदेश आमचा, जनता आमची, दौलत आमची परंतु या सर्वांचा उपभोग घेण्यासाठी हा भूभाग स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी या सर्व मंडळीची कटकारस्थाने चालू असत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रदेशात राहणाऱ्या जनतेला ते चाकर म्हणून राबवून घेत असत. आमचा मराठी माणूस पूर्वापार इमानदार, प्रामाणिक, कष्टाळू, समाधानी, धाडसी, ताकदवान असाच होता परंतु या इमानदार माणसांना वापरून, त्यांना आपापसात लढायला लावून ही मंडळी स्वतः सम्राट म्हणवून मिरवत होती. वाहणाऱ्या रक्ताचे पाट हे मराठी माणसांचे असत, जीवानिशी लढणारे, घरादारावर तुळशीपत्र ठेवून, स्वतःच्या संसाराचे भवितव्य पणाला लावणारे हे मराठे परकियांना खुश करण्यासाठी स्वतःच्या जातीच्या, धर्माच्या आणि वेळ पडलीच तर नात्यागोत्यातील व्यक्तींची कत्तल करायला मागेपुढे पाहत नसत. ही सल्तनत स्वतःच्या राज्याची सीमा सुईभर वाढविण्यासाठी शेकडो संसार उद्वध्वस्त करायला, शेकडो जीव घ्यायला, हजारोंच्या संख्येने जनतेला अपंग करायला मागेपुढे बघत नसे. या सुलतानी लोकांच्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या म्होरक्याने सदैव आपलीच चाकरी करावी, हा मुखिया शत्रूला जाऊन मिळू नये म्हणून या पराक्रमी योद्ध्यांना इनाम म्हणून सोने, जडजवाहीर आणि प्रसंगी जमिनीचा तुकडा देऊन स्वतःचे मांडलिक बनवून त्यांच्याकडून त्यांच्याच स्वकियांवर हल्ले करायला लावत होते. हे मराठे वीरही मिळेल त्यात समाधान मानून आपली निष्ठा, इमान, कष्ट सारे सारे काही सुलतान चरणी अर्पण करत. त्यांंनी इनाम म्हणून दिलेला भाग सांभाळताना इनामदार म्हणवून घेणे त्यांना गौरवास्पद वाटत होते. अशीच काही मंडळी स्वतःला राजे म्हणवून घेत असत. या मराठी राजांमध्ये तरी कुठे ऐक्याचे, एकोप्याचे संबंध होते. स्वतःचा भूभाग कसा वाढवता येईल, आपल्या जनतेवर कसा अंकुश ठेवता येईल हाच विचार ही मंडळी सातत्याने करीत असत. त्यासाठी या राजांमध्येही सातत्याने लढाया होत असत. गरीब जनता मात्र बिचारी यांच्या आपापसातील सततच्या भांडणाला, लढायांंना, रक्तपाताला कंटाळली होती. सर्वात जास्त त्रास रयतेला होता, सामान्य सैनिकाला होता. जनतेचे हाल होत होते. कोण कुणीकडून हल्ला करेल, धनधान्य लुटून नेतांना त्यांना विरोध करणारांना कंठस्नान घालेल सांगता येत नसायचे. हसणारा-खेळणारा परिवार कधी धाय मोकलून रडायला लागे ते कळायचे नाही. अनेक संसार उघड्यावर यायचे ते समजायचे नाही. मायबापाचे छत्र हिसकावून घेतले जायचे. त्यावेळी होणारा आक्रोश पाहवत नसे, ऐकवत नसे परंतु शत्रूच्या रुपाने येणाऱ्या स्वकियांनाही तो आक्रोश ऐकू जात नसे. पाषाण रुपी ह्रदयाला पाझर फुटायचा नाही. रक्ताच्या थारोळ्यात तळमळणाऱ्या, किंचाळणाऱ्या, तडफडणाऱ्या लोकांची याचना, विनंती कशाकशाचाही परिणाम हल्ला करणारांवर होत नसे. काही वेळात होत्याचे नव्हते करून आलेले यमदूत प्राणहानी, धनाची प्रचंड लुट करून निघूनही जात होते. रयतेला रोजचे चार घास गोड लागायचे नाहीत, घशाखाली उतरत नसत. जनता सदैव तणावाखाली असे. सणवार साजरे करताना कायम दुःखाची छाया असे. बाहेर गेलेला माणूस घरी सुखरूप परत येईल याची शाश्वती नसे तसेच सायंकाळी घरी परत येईपर्यंत आपण सकाळी आपला संसार जसा सोडून गेलो होतो तसा असेलच की नाही ही चिंता कायम सतावत असे. हे जे राजे होते, वतनदार होते, इनामदार होते, सरदार होते या कुणाचेही रयतेवर प्रेम होते असे नाही. स्वतःची मक्तेदारी कशी वाढेल, धनदौलत कशी वाढेल, स्वतःचा उत्कर्ष कसा साधता येईल याकडेच या सर्वांचे लक्ष नसे. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती.

परकियांसाठी लढणाऱ्या स्वकियांजवळ काय नव्हते? हिंमत होती, पैसा होता,धाडस होते, जमीनजुमला होता, रयतेवर आदरयुक्त दरारा होता, शब्दाला किंमत होती, जीवाला जीव देणारी माणसं होती असे असूनही ह्या सर्वांच्या निष्ठा सुलतानी राजवटीकडे जणू गहाण ठेवल्या होत्या. महाराष्ट्र प्रांतातील या राजे, सरदार, शिपाई यांनी मनात आणले असते, सारे एक होऊन सुलतानी राजवटींशी झुंजले असते तर हे सारे शत्रू महाराष्ट्रातून निघून जाऊ शकले असते परंतु या मराठी भाषी नेतृत्वाकडे तशी इच्छा नव्हती. का केला नसावा आपल्या माणसांनी आपल्या माणसांचा विचार? आपली भूमाता परक्यांच्या ताब्यात देताना ह्यांना यातना झाल्या नसतील काय? जनतेचे दुःख ही सारी मंडळी उघड्या डोळ्यांनी कशी काय पाहू शकत होती? दुसरीकडे हे सुलतानी राजे मराठी माणसांना आपापसात लढवून आनंदाने मजा लुटत होते, मराठी प्रदेश बेचिराख करत होते. गरीब जनता, कास्तकार, कामगार ही सारी मंडळी त्रस्त झाली होती. पिकवलेले धान्य घरी येईल की नाही ही खात्री कुणी देत नव्हते. रक्ताचे पाणी करून, घाम गाळून पिकवलेल्या धान्यावर हक्क कुणाचा असावा? शेतकऱ्यांचा? मजुरांचा?मुळीच नाही. या धान्यावर हक्क होता...बादशहाचा...सुलतानाचा.... त्यांची इमानेइतबारे सेवा करणाऱ्या आमच्याच बांधवांचा. खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही, डोक्यावर छप्पर नाही अशा अवस्थेत जनता हाती जीव घेऊन जगत होती. दिवसेंदिवस कर्जाच्या चक्रव्यूहात गरगरत होती.

या सुलतानी राजवटीचा का कुणी सामना केलाच नाही? स्वराज्याच्या शत्रुसंगे दोन हात करायला, युद्ध करायला, त्यांचा विरोध करायला का कुणी पुढे येत नव्हते? नक्कीच येत होते. अगदी नावच घ्यायचे झाले तर शातवाहनांपासून, देवगिरीच्या यादव घराण्यातील भिल्लम, सिंघण, कृष्णदेव ते सम्राट महादेवराय यादव यांच्यासारख्या महापराक्रमी राजांचा उल्लेख वाचायला मिळतो. सर्वसंपन्न असा महाराष्ट्र या काळात होता. जनता समाधानी होती. धार्मिक कार्यात अग्रेसर होती. चंगळवाद नसला तरीही अमंगळ असे फारसे नव्हते. अन्याय, खोटारडेपणा नव्हता. सुलभता होती. एकमेकांबद्दल प्रेम होते, आदर होता, निष्ठा होती, भक्तीभाव होता. परंतु या सर्वगुणसंपन्न अशा महाराष्ट्र प्रदेशाला नजर लागली. दृष्ट लागली. तेराव्या शतकाच्या अखेरीस अल्लाउद्दीन खलजी हा पठाण महाराष्ट्रावर चालून आला. सारे काही शांततेत, नेहमीप्रमाणे चालले असल्यामुळे देवगिरीच्या गादीवर असलेले राजे रामदेवराव काहीशे बेफिकीर होते. आपल्या राज्यावर हल्ला होईल असे त्यांना मुळीच वाटले नसावे. जेव्हा समजले तेंव्हा उशीर झालेला होता. अल्लाउद्दीन महाराष्ट्राला लुटत निघाला. कत्तल करीत, सोने, जडजवाहीर, धनधान्य, पैसा सारे काही दोन्ही हाताने लुटणारा अल्लाउद्दीन खलजी देवगिरीपासून तीन-साडेतीनशे किलोमीटरवर येऊन धडकला तरीही त्याची खबर ना राजाला होती, ना राज्याच्या सेनापतीला होती. त्यावेळी सेनापतीपदी होता, रामदेवराव यांचा शंकरदेव नावाचा पुत्र! अल्लाउद्दिनने घमासान माजवलेले असताना, लोकांची कत्तल करीत तो राजधानीकडे सुसाट वेगाने निघाल्याची पुसटशी कल्पना नसलेला सेनापती देवदर्शनासाठी गेला होता असे म्हणतात. रामदेवराव यांच्या हेरखात्यालाही शत्रू स्वराज्य लुटतोय, तो केंव्हाही देवगिरीवर हल्ला करू शकतो याची पुसटशी चुणूक ही लागली नाही. केवढा हा गाफीलपणा! एकप्रकारे शत्रूला रान मोकळे होते. ऐनकेनप्रकारे अल्लाउद्दीन देवगिरीच्या दिशेने येतोय ही बातमी राजे रामदेवराव यांना समजली. राजांना काळ्याकुट्ट भविष्याची जाणीव झाली परंतु परिस्थिती कशीही असो झुंजल्याशिवाय हार मानील तो सैनिक कसा? रामदेवराव यांनी निर्णय घेतला अल्लाउद्दीनपुढे सहजासहजी शरण जायचे नाही. एका मांडलिक असलेल्या राजाला त्याने अल्लाउद्दीनवर चढाई करायला पाठवले. अल्लाउद्दीन आणि राजाची सेना समोरासमोर आली. युद्धाला तोंड फुटले. घनघोर युद्ध सुरू असताना पठाणी सैन्यासमोर यादव सेनेचा टिकाव लागत नव्हता. अखेरीस व्हायचे तेच झाले. यादव सैन्याचा प्रचंड प्रमाणात पराभव झाला. असा मोठा विजय पदरात पडताच अल्लाउद्दीन दुप्पट उत्साहाने, अत्यंत वेगाने, चित्त्याच्या चपळाईने देवगिरी किल्ल्याकडे निघाला ही बातमी रामदेवराव यांना समजली. ते मनोमन घाबरले. किल्ल्यावर फक्त चार हजारच्या आसपास सैन्य होते. सेनापती शंकरदेव कधी येतील काही सांगता येत नव्हते. दुसऱ्या कुणाकडून मदत मिळण्याची शक्यता मुळीच नव्हती.परंतु राजे हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. होते तेवढेच तुटपुंजे सैन्य घेऊन राजे स्वतः अल्लाउद्दीनच्या जवळपास आठ हजार फौजेचा समाचार घ्यायला निघाले. काही अंतर चालून जातात न जातात तोच समोरून अल्लाउद्दीनची फौज त्वेषाने धावत येतांना दिसली. पुन्हा महाभयंकर लढाई झाली परंतु दुर्दैवाने रामदेवराव आणि त्यांचे सैन्य पठाणी सैन्याचा सामना करू शकले नाहीत. यादवी सैन्य घाबरून गडाकडे धावत सुटले. त्यांना धीर देण्याचे सोडून, त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचे स्फुल्लिंग चेतविण्याचे सोडून रामदेवराय स्वतः गडाच्या आश्रयाला गेले. अल्लाउद्दीनचा विजय झाला. परंतु अजून देवगिरी किल्ला जिंकण्याची त्याची इच्छा बाकी होती. गडाचे दरवाजे बंद झाले होते . देवगिरीचा किल्ला अत्यंत बळकट होता. तो सहजासहजी जिंकणे सोपे नाही हे ओळखून अल्लाउद्दीनने किल्ल्याला वेढा घातला. जनता त्रस्त झाली होती. अल्लाउद्दीनच्या सेनेने दुष्कर्माची लयलूट केली. लहानथोर, बाईमाणूस, म्हातारे असा कोणताही भेद न करता, कोणताही विधिनिषेध न बाळगता रयतेवर जबरदस्त जुलूम करण्याचा एक कलमी कार्यक्रम आखला. स्वतः रामदेवराय आणि भ्यालेल्या जनतेमध्ये अजून जास्त दहशतीचे, भीतीचे वातावरण निर्माण व्हावे या हेतूने अल्लाउद्दीन आणि त्याच्या खबऱ्यांनी अशी अफवा पसरवली की, ही फौज तर काहीच नाही अजून संख्येने फार मोठी आणि क्रुर सेना पाठीमागून येत आहे. ती अफवा ऐकून आधीच भयभीत झालेली जनता, सैन्य आणि स्वतः राजा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली. मात्र रामदेवराव यांनी किल्ल्यावर प्रचंड धान्याची सोय करून ठेवली होती त्यामुळे काही महिने तरी अन्नधान्याची कमतरता जाणवणार नव्हती. पण हाय रे दैवा ! घर फिरले की वासेही फिरतात, संकट यायला सुरुवात झाली की, ती सर्व बाजूंनी येतात ह्याची प्रचिती राजाला आली. कारण ज्या अन्नधान्याच्या पोत्यांच्या विश्वासावर राजे रामदेवराव होते त्या सर्व पोत्यांमध्ये फक्त मीठच होते ती बातमी ऐकून राजाचे अवसान गळाले. रामदेवराव यांच्यापुढे अल्लाउद्दीनला शरण जाण्याशिवाय अन्य मार्ग दिसत नव्हता आणि तो त्यांनी निमूटपणे स्वीकारला.तह झाला. युद्ध थांबले. पण झाले भलतेच अल्लाउद्दीनच्या पराक्रमाची आणि आपल्या पित्याच्या पराभवाची बातमी सेनापती शंकरदेव यांना समजली. ते तातडीने देवगिरीकडे निघाले. रामदेवराव यांच्यावरील विजयाने आनंदी झालेल्या अल्लाउद्दीन आणि त्याच्या सैन्याला ही बातमी समजली. ते चपापले. मनात भीतीची एक रेषा तयार झाली पण अल्लाउद्दीन घाबरला नाही. ही बातमी रामदेवराव यांना समजली. तेही अंतर बाह्य घाबरले कारण त्यांनी नुकतीच पराभवाची चव चाखली होती. त्यांनी शंकरदेव यांना असा निरोप पाठवला की, मी अल्लाउद्दीनशी तह केला आहे तू शांत रहा. परंतु वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी शंकरदेव पेटून उठला होता. त्याने राजांचा सल्ला मानला नाही. तो गडाजवळ आला. तिथे त्याची सैन्यासह अल्लाउद्दीनच्या सैन्याशी समोरासमोर गाठ पडली. चवताळलेल्या, चिडलेल्या शंंकरदेव यांच्या सैन्याने पठाणी सैन्यावर तुफान हल्ला केला. पठाणी सैनिक मारल्या जात होते. भयानक रक्तपात होत होता. पठाणी फौज आणि स्वतः अल्लाउद्दीन घाबरले होते. परंतु रामदेवराव आणि शंकरदेव यांच्यावर रुसलेले दैव अल्लाउद्दीनवर मात्र प्रचंड प्रमाणात खुश झाले होते कारण युद्धात हरत असलेल्या पठाणांच्या मदतीला त्याने किल्ल्याच्या नाकेबंदीसाठी पाठवलेली फौज पुन्हा त्याच्या मदतीला धावून येताना दिसली. शंकरदेवाच्या सैन्याला वाटले की, दिल्लीहून येणारी मोठी फौज ती हीच. या कल्पनेने त्यांचे धाबे दणाणले. शंकरदेवाची सेना घाबरून, हत्यारे टाकून वाट सापडेल तिकडे पळत सुटली. फार मोठा पराभव शंकरदेव यांच्या पदरी पडला. अल्लाउद्दीनने पळून जाणारांचा पाठलाग केला नाही तर त्याने किल्ल्याभोवतीचा वेढा अजून आवळला कारण किल्ल्यावर रामदेवराव होते. मुलाचा पराभव, सैन्याची वाताहत पाहून राजांनी पुन्हा तहाचा निरोप पाठवला. अल्लाउद्दीनने भरमसाठ खंडणी पदरात पाडून घेतली. अशारीतीने एका सम्राटाला मानहानीकारक पराभव स्वीकारून मांडलिक व्हावे लागले.

तहात ठरलेली खंडणी नंतरची काही वर्षे दिल्ली दरबारी पोहोचत होती. परंतु त्यानंतर शंकरदेव यांनी खंडणी पाठवणे बंद केले. काही वर्षे हा प्रकार घडल्यानंतर अल्लाउद्दीनने पुन्हा प्रचंड फौज महाराष्ट्राच्या दिशेने पाठवली परंतु खंडणी न देणे एवढ्या एका कारणासाठी ही फौज चालून येत नव्हती तर कुणीतरी फितुरी केली होती. त्यामुळे कैक वर्षांपासून बाळगून असलेली इच्छा पूर्ण होणार या आनंदाने अल्लाउद्दीनने ती फौज रवाना केली होती. कोण होता हा फितूर? कुणाला शंकरदेवाचे वर्चस्व सहन होत नव्हते? हा फितूर दुसरा तिसरा कुणी नसून खुद्द राजे रामदेवराव होते. एका बापाने स्वतःच्या मुलाच्या पराभवासाठी शत्रुचे दार ठोठावले होते ,याचना केली होती. आनंदी झालेल्या अल्लाउद्दीनने तात्काळ मलिक काफूर या आडदांड, वहशी सरदाराला फार मोठी फौज देऊन पाठवले. पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला. आधीच्या युद्धाने होरपळून निघालेल्या रयतेला पुन्हा युद्ध कुंडात ढकलण्यात आले. शंकरदेव यांचा मलिक काफूर याच्यापुढे निभाव लागला नाही. या युद्धात काफूरने राज्यात प्रचंड प्रमाणात लुट मिळवली. महत्त्वाचे म्हणजे स्वतः राजा रामदेवराव यांना बंदिस्त करून दिल्ली दरबारी हजर करण्यात आले. तिथे राजे सहा महिने नजरकैदेत होते. तिथे राजाचा छळ झाला नाही उलट त्यांना अल्लाउद्दीनने 'रायरायान' ही पदवी देऊन गौरविले. राजे पुन्हा स्वराज्यात परतले. परंतु राजे रामदेवराव यांचे लवकरच निधन झाले. त्यांच्या सिंहासनावर शंकरदेव आरूढ झाले. त्यांनी वडिलांनी केलेला तह मोडून काढला. दिल्ली दरबारी पाठवली जाणारी खंडणी पाठवणे बंद केली. बाप आणि मुलामधील हे वितुष्ट, फितुरी जणू मराठी माणसाच्या पाचवीलाच पुजल्या गेली. यादवांचे राज्य बुडाले. संपुष्टात आले..…

अशाच परिस्थितीत सोळावे शतक उजाडले. दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या सम्राटांनी अनन्वित छळ सुरू केला. त्यांच्या क्रुरततेचे एक उदाहरण पुरेसे आहे. त्यावेळी कर्नाटकातील विजयनगर या संस्थानचे राजे होते... राजा रामराय! एक तगडा आणि भरपूर ताकदीचा राजा म्हणून रामरायांची ख्याती होती. हे राज्य सुलतानांच्या डोळ्यात खुपत होते. काहीही करून हे राज्य, हा राजा नष्ट करायचा या हेतूने निजामशाह, अली आदिलशाह, इब्राहिम कुतुबशाह, अली बेरीदशाही यांनी आपापले प्रचंड प्रमाणात असलेले सैन्य एकत्र केले आणि हुसेनशाह हा सरदार सैन्याचा महासागर घेऊन विजयनगरच्या दिशेने कुच करता झाला. तिकडे रामराय यांना ही बातमी समजली. तोही आपली भलीमोठी फौज घेऊन शत्रूशी मुकाबला करण्यासाठी निघाला. दोन्ही सैन्य समोरासमोर आले. महातुंबळ युद्ध झाले. दोन्हीकडील सैन्याची मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. रामरायांची फौज मोठी असूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुर्दैवाने रामराजे हे शत्रूच्या हाती सापडले. लोखंडी साखळदंडाने बंदिस्त अवस्थेतील रामराजेंना निजामशाहच्या पुढे उभे केले. रामराजे यांना तशा अवस्थेत समोर पाहून निजामशाहला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तो आनंदाने म्हणाला,

"व्वाह! बहोत खुब! मै इसी दिन की राह देख रहा था कि कब यह राजा मेरे सामने खडा रहेगा और मै इसकी गर्दन काटूँगा। वह दिन आ ही गया...." असे म्हणत त्याने समशेर उपसली. मागचा पुढचा विचार न करता रामराजाची मान धडापासून वेगळी केली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. विकृत, गगनभेदी हसण्याचे स्वरही निनादले.....

नागेश सू. शेवाळकर