Tujhya Vina- Marathi Play - 8 books and stories free download online pdf in Marathi

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ८

प्रसंग -६ स्थळ.. एखादं कॉफी शॉप

अनु आणि केतन कॉफी पित बसलेले आहेत.

अनु : केतन.. खरंच परत एकदा थॅन्क.. तु आलास म्हणुन.. नाही तर इतकी कामं होती.. एकट्याने फिरायला कंटाळा येतो.. आणि सुशांतला तर लग्न इतकी जवळ आलं आहे तरी कामातुन सवडच नाही. त्याचं ही बरोबर आहे म्हणा.. नेमका आजच व्हिसा इंटर्व्ह्यु आला त्याला तो काय करणार…??
केतन : हे.. कम ऑन.. थॅक्स काय त्यात.. आणि त्या बदल्यात मी कॉफी घेतली ना तुझ्याकडुन
अनु त्याच्याकडे बघुन हसते.

केतन तिच्या हसण्याकडे पहातच रहातो. (मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

एखादं केतन-अनुवर गाणे जे केतनचा भास असते.

गाण संपता संपता स्टेजवर अंधार होतो. केतन खुर्चीत बसतो त्याच्यावरच स्पॉटलाईट आहे. केतन स्वतःशीच हसत अजुनही गाण्याच्या मंद होत चाललेल्या संगीतावर डोलतो आहे.

अंधारातुन अनुचा आवाज येतो..

अनु : केतन.. ए केतन.. अरे कुठं तंद्री लागली आहे?

स्टेजवर पुन्हा पुर्ववत प्रकाश पसरतो. अनु त्याच्या समोरच्याच खुर्चीत बसलेली आहे. केतनला तो भास असल्याचे लक्षात येते.

केतन : (भिंतीवरील साईन-बोर्ड वाचतो) एनीथींग कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी.. मस्त कॅच लाईन आहे नाही..
अनु : हो..

केतन उगाचच इकडे तिकडे बघत बसतो…. थोड्यावेळाने..

केतन : अनु….
अनु : हम्म..
केतन : तुझं आणि सुशांतदाचं लव्ह मॅरेज ना?
अनु : अम्मं… म्हणजे हो पण आणि नाही पण..

केतन : म्हणजे?
अनु : म्हणजे.. तशी मी त्याला आवडत होते.. तो पण मला आवडायचा.. पण आमच्यापैकी कोणीच एकमेकांना प्रपोज वगैरे असं काही केलं नाही. आमच्या घरच्यांनीच आमच्या लग्नाचा प्रस्ताव पुढे केला आणि आम्ही दोघांनीही होकार दिला इतकंच..
केतन :.. हाऊ अनरोमॅंटीक.. मला वाटलं तुम्ही इतकी वर्ष एकमेकांना ओळखताय…
अनु : छे रे.. आणि तुझा सुशांतदादा तर भलताच अनरोमॅंटीक आहे..
केतन : बघं.. अजुनही लग्नाला चार दिवस आहेत.. फेरविचार करायचाय का?

अनु काही क्षण अविश्वासाने त्याच्याकडे बघत रहाते जणु त्या प्रश्नाचे उत्तर तिला माहीती आहे पण आणि नाही पण…

अनु : ए.. गप रे.. काही बोलतो… आणि सुशांतने ऐकले ना तर पहीलं तुलाच धरेल तो.. भाऊ ना त्याचा तु? मग?
केतन : तोच तर प्रॉब्लेम झालाय…
अनु : म्हणजे?
केतन : “अनु.. एक सांगु?”
अनु : नको… (मग हसत) अरे विचारतोस काय.. सांग ना..

केतन : “.. तु विचारत होतीस ना.. अमेरीकन मुलीचा विचार मनातुन का काढुन टाकला? दुसरी कोणी भेटली का?..”
अनु : “हम्म..”

केतन : “खरं तर भेटली होती एक.. तिला भेटल्यावर वाटलं.. कित्ती मुर्ख होतो मी.. नसत्याच्या मागे धावत होतो.. आणि ती मात्र माझ्या इतक्या जवळ होती.. मीच डोळे बंद करुन बसलो होतो..”

अनुने कॉफीवरचे आपले लक्ष काढुन घेते आणि ती केतनचे बोलणे ऐकायला लागते.

केतन : “.. तिला भेटल्यावर वाटलं.. बस्स.. हीच..”

अनु : “ओsssह.. लव्ह ऍट फर्स्ट साईट की काय?”
केतन “तसं म्हण हवं तर…”

अनु : “मगं? पुढे काय झालं? बात आगे बढी की नही?”

केतन : (हातातल्या कॉफी-कप बरोबर चाळा करत) “नाही ना.. इथे आल्यावर मला कळाले की तिचे लग्न ठरले आहे..”
अनु : “आई…गं.. सो बॅड.. पण मग संपलं सगळं?”

केतन : “काय करावं तेच कळंत नाही.. दुसरा कोणी असतं तर कदाचीत मी विचार सुध्दा नसता केला.. पण ज्याच्याशी तिचं लग्न ठरलं आहे.. तो… तो माझा भाऊच आहे म्हणल्यावर..”
अनु : ‘काय? कुणाबद्दल बोलतो आहेस तु केतन?’

केतन : ‘सुशांत.. मी सुशांत बद्दल बोलत आहे..’ केतन अनुकडे न बघताच म्हणाला
अनु : ‘अरे काय बोलतो आहेस तु केतन? कळतेय का तुला?’

केतन : ‘हो अनु? पण तु मला सांग ना माझी काय चुक आहे याच्यात? ती मुलगी मला भेटली तेंव्हा मला नव्हते ना माहीती की ही माझ्या होणाऱ्या भावाची बायको आहे. तिच्याबरोबर घालवलेल्या ४-६ तासांतच ती माझ्या मनात बसली. मग आता असे अचानक मला कळल्यावर कसं मी तिला मनातुन बाहेर काढुन टाकु? तुच सांग अनु!!’

अनु : (जागेवरुन उठत ) ‘माझ्याकडे उत्तर नाही केतन.. चल आपण जाऊ घरी.. मला उशीर होतो आहे..’

केतन : ‘माझं बोलणं तरी संपु देत.. अजुन थोडा वेळ नाही का बसु शकणार?’

अनु : ‘केतन………… उशीर होतो आहे….. चल लवकर’

केतन : ‘अनु.. माझी इच्छा आहे की त्या मुलीने मला माफ करावं..मी दोषी नाही आहे. मला पुर्ण कल्पना असुनही मी तिच्यावर प्रेम केले असते तर.. तर… मान्य आहे.. पण..’

अनु : ‘केतन.. तु येणार आहेस का मी जाऊ ऑटो ने घरी?’ (उठुन उभी रहाते..)

केतन : अनु प्लिज.. (उठुन उभ्या राहीलेला अनुला हाताला धरुन केतन खाली बसवतो) ट्राय टु अंडरस्टॅन्ड अनु..

अनु : व्हॉट ट्राय टु अंडरस्टॅन्ड केतन? ह्यात समजण्यासारखे काहीच नाहीये. तु जे बोलतो आहेस तो सर्व मुर्खपणा आहे. उगाच नसत्या गोष्टीवर बोलण्यात काय अर्थ आहे.. मला सांग..
केतन : बरोबर आहे अनु.. तु म्हणते आहेस ते पटते आहे मला… पण त्याचबरोबर हे सुध्दा खरंच आहे ना की मी तुझ्यावर प्रेम करतो…??

अनु : कमऑन केतन.. प्रेम हे असं इतक्या पट्कन होतं का? तु इतकी वर्ष अमेरीकेत राहीलास.. कदाचीत तिथं होत असतील प्रेम अशी.. पण अशी प्रकरणं मोडतातही तितक्याच लवकर हे तुलाही माहीती असेलच.. हो ना?
केतन : नाही अनु.. चुकती आहेस तु.. प्रेमाला कधी प्रांताचं, देश्याचं, जाती धर्माचं बंधन नसतं.. प्रेम हे प्रेमच असतं ना?
वारा कोणी पाहीलाय? देव कुणाला दिसलाय? पण म्हणुन काय कोणी त्याचे अस्तित्व नाकारते का? प्रेमाचे अगदी तस्संच आहे. प्रेमाचा अविष्कार तुम्हाला कधी, कुणाच्या रुपात, कुणाकडुन होईल हे कोणीच सांगु शकत नाही.

अनु : अरे हो.. पण आपल्यात तसं आहे का? मी प्रेमाचं अस्तीत्व नाकारत नाहीये.. पण त्या प्रेमात जे नातं येतेय मध्ये त्याचं काय? गॉड डॅम केतन.. मी तुझ्या सख्या भावाची होणारी बायको आहे.. कळतेय का तुला?
केतन : (अनुचा हात हातात धरतो..) मला काहीही कळत नाहीये अनु..मला फक्त एव्हढंच कळतं आहे की मी तुझ्यावर खुप खुप प्रेम करतो. मला कळत नाहीये तु माझ्यावर काय जादु केली आहेस.. पण मला तुझ्याशिवाय काहीच सुचत नाहीये अनु.. घरामध्येही सगळीकडे तुच
दिसतेस.. सुशांतदाशी नजर करायला भिती वाटते अनु.. वाटतं कधी त्याच्या जागी तुच दिसशील आणि मी काही तरी मुर्खासारखं बोलुन जाईन..

अनु : (केतनच्या हातातुन आपला हात सोडवुन घेते) कळतंय ना हे? भिती वाटतेय ना?.. हीच भिती तर संवेदना आहे, जाणीव आहे की तुझ्या मनात जो विचार आहे तो चुकीचा आहे. केतन हे केवळ एक आकर्षण आहे.. विसरुन जा सगळं.. विसरुन जा की आपण कधी शांघाय एअरपोर्टवर भेटलो होतो.. विसरुन जा की आपलं दीर-वहीनीचं नात बनायच्या आधी आपण एकमेकांचे मित्र बनलो होतो…
केतन : आकर्षण? नाही अनु.. माझ्या मनातल्या भावना मी न ओळखण्याइतपत लहान नाहीये. माझ्या हृदयाची स्पंदन मीच न समजण्याइतपत मी कुकुल बाळही नाहीये अनु.. माझ्या प्रेमाला आकर्षणाचं थिल्लर विषेशण नको लावुस. मी जगु नाही शकणार तुझ्याशिवाय अनु. तु नाही मिळालीस तर मी आत्महत्या करुन जिवन वगैरे संपवणार्‍यांसारखा भेकड नाही. पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थ सुध्दा उरणार नाही अनु..

अनु केतनकडे स्तंभीत होऊन पहात असते.

केतन : मी तुझं आणि सुशांतदाच लग्न झालेल नाही पाहु शकत अनु.. त्या पेक्षा मी आधीच अमेरीकेला निघुन जाईन. कुठल्या तोंडाने तुला वहीनी म्हणु मी? ज्या तोंडाने ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ म्हणलं त्या तोंडाने? नाही अनु.. हा धोका होईल मला आणि सुशांतदाला. मी असं कुणाला फसवु नाही शकत..

अनु काहीच बोलत नाही…ती विस्फारलेल्या नेत्रांनी केतनकडे पहात रहाते…

केतन : हे बघ.. कदाचीत… कदाचीत तुझं मन, तुझे विचार हे आत्तापर्यंत केवळ सुशांत ह्या एकाच व्यक्ती भोवती फिरत होते.. तु केवळ त्याचाच विचार करत होतीस.. कदाचीत तु माझ्याकडे कधी तसं पाहीलंच नाहीयेस.. हे बघ.. हे बघ.. मी म्हणत नाही की तु लगेच हो म्हण.. पण..पण निदान एकदा विचार तर करुन पहा.. निदान तुझ्या मनाला तरी विचारुन पहा ते काय म्हणतेय..

अनु पुन्हा उठुन जायला लागते…

केतन : अनु, तु ज्या सुशांतसाठी माझा विचार सुध्दा करायला तयार नाहीस तो सुशांतमात्र तुझ्या मागे मागे त्या पार्वतीबरोबर….
अनु : केतन?? अरे काय बोलतो आहेस तु कळतंय का तुला…
केतन : हो अनु.. मी माझ्या डोळ्यांनी पाहीलं आहे…
अनु : शट अप केतन.. वेड लागलं आहे तुला… माझा सुशांत तसा नाहीये… शक्यच नाही..
केतन : हो अनु, लागलंय मला वेड.. लिसन टु माय हार्ट अनु.. बघ ते केवळ तुझाच विचार करतंय.. (असं म्हणुन केतन अनुला जवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारतो…)

अनु स्वतःला केतनच्या मिठीतुन सोडवण्याचा प्रयत्न करते.. पहील्यांदा ती त्याला आपल्यापासुन दुर ढकलु पहाते पण ते शक्य होत नाही. हळु हळु तिची धडपड कमी होत जाते.. तिच स्वतःला केतनपासुन दुर ढकलणं कमी होत जातं आणि ती काही क्षण का होईना स्वतःला केतनच्या मिठीमध्ये झोकुन देते…

(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

काही क्षणच आणि मग तिला वर्तमानकाळाची जाणीव होते. ती जोरात ढकलुन केतनला बाजुला करते, टेबलावरची आपली पर्स उचलते आणि बाहेर पडते.
केतन निराश मनाने खांदे उडवतो आणि तो सुध्दा अनुबरोबर बाहेर पडतो..

[पडदा पडतो..]

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मध्यांतर
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<